Abstract India : A blog where you will find many Health, Ayurveda articles, thanks to Shree Balaji Tambe and Esakal.
Friday, August 28, 2009
दूधदुभतं, आरोग्य लाभतं
दूध सर्वांसाठीच आवश्यक असतं. दुधामुळे जीवनशक्ती वाढते, आकलनशक्ती सुधारते, ताकद वाढते, तारुण्य टिकून दीर्घायुष्याचा लाभ होतो. हे दूध ताजं असावं. महिनोन्महिने टिकवून ठेवलेलं किंवा पावडर स्वरूपातील नसावं. दूध आरोग्य देणारं औषध असतं.
दूधदुभतं म्हणजे दूध आणि दुधाचे दही, लोणी, तूप वगैरे पदार्थ. भारताला "गोकुळा'ची हजारो वर्षांची परंपरा आहेच; पण संपूर्ण जगभर हजारो वर्षांपासून दूध व दुधाच्या पदार्थांचा आरोग्यासाठी वापर केला जात असल्याचे दिसून येते. वैदिक संस्कृतीत, वैदिक वाङ्मयात दूध, लोणी, तुपाचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. पश्चिमेकडच्या देशातही चीज बनविण्याची हजारो वर्षांची परंपरा दिसून येते.
आयुर्वेदात दूध-दुभत्याचे गुणधर्म सांगण्यासाठी "दुग्धवर्ग' असा एक विशेष वर्गच सां गितला आहे. या दुग्धवर्गात दूध, मलई, दही, ताक, लोणी व तूप यांचा मुख्यत्वे अंतर्भाव होतोच, पण खरवस, पनीर, दह्याचे पाणी वगैरेंचे गुणधर्मही दुग्धवर्गात सांगितलेले आहेत.
दूध - दूध म्हटले की सर्वसाधारणपणे गाईचे किंवा म्हशीचे दूध डोळ्यांसमोर येते. पण आयुर्वेदात या दोघांशिवाय बकरी, उंट, मेंढी, हत्ती, घोडा, हरिण वगैरे प्राण्यांच्या दुधाचे औषधी उपयोगही सांगितलेले आहेत. रोज पिण्यासाठी मात्र गाय वा म्हशीचे दूध उत्तम असते.
दुधाचे सामान्य गुण याप्रमाणे होत,
दुग्धं समधुरं स्निग्धं वातपित्तहरं सरम् ।
सद्यः शुक्रकरं शीतं सात्म्यं सर्वशरीरिणाम् ।।
...भावप्रकाश
दूध चवीला मधुर, गुणाने स्निग्ध व वातदोष-पित्तदोष कमी करणारे असते, सारक असते, शीत वीर्याचे असते, तत्काळ शुक्रधातूचे पोषण करते व शरीरासाठी अनुकूल असते.
दुधामुळे जीवनशक्ती वाढते, आकलनशक्ती सुधारते, ताकद वाढते, तारुण्य टिकून दीर्घायुष्याचा लाभ होतो, तुटलेले हाड सांधते, हाडे बळकट राहतात, ओज वाढते. अनेक मनोरोगात, हृदयरोगात, गर्भाशयाच्या रोगात दूध उत्तम असते.
दूध सर्वांसाठी आवश्यक असतेच, आरोग्य टिकावे, जीवनशक्ती उत्तम राहावी आणि हाडांचा-सांध्यांचा बळकटपणा कायम राहावा यासाठी दूध नियमित सेवन करणे उत्तम असते. विशेषतः चमचाभर खारकेची पूड टाकून सकाळी कपभर दूध पिणे हाडांसाठी विशेष उपयुक्त असते.
लहान मुलांनी नियमित दूध घेतल्याने त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाला हातभार लागतो. "संतुलन चैतन्य कल्पा'सारखे रसायन टाकून दूध घेतल्याने दुधाचे गुण अजूनच वृद्धिंगत होतात.
गर्भारपण व बाळंतपणातही शतावरी कल्प टाकून दूध घेणे उत्तम असते. याने स्त्रीची ताकद चांगली राहतेच पण बाळालाही पोषण मिळू शकते.
शारीरिक श्रम करावे लागत असल्यास, रोजच्या दिनक्रमामुळे थकवा जाणवत असल्यास, जास्ती बोलण्याचे काम करावे लागत असल्यास तसेच बौद्धिक काम करावे लागत असल्यास दुधाचे नियमित सेवन करणे श्रेयस्कर होय.
संगणकावर काम, हवेतील प्रदूषण, जागरणे, प्रखर प्रकाश वगैरे कारणांनी डोळे थकतात, अशा वेळी बंद डोळ्यांवर गाळून घेतलेल्या थंड दुधाच्या घड्या ठेवणेही उत्तम असते.
दूध दिवसा पिणे चांगले असते. रात्री दूध प्यायचे असले तर इतर जेवण वर्ज्य करून नुसतेच दूध प्यावे, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.
खरवस तसेच पनीर पौष्टिक असले तरी पचायला जड असतात, कफदोष वाढविणारे असतात. त्यामुळे ज्यांचा अग्नी उत्तम स्थितीत आहे अशांसाठी योग्य असतात.
मलई - दूध तापवून त्यावर जमलेली मलई थंड असते, वात-पित्तशामक असते, गुणांनी स्निग्ध व जड असते, शरीरपुष्टी करते, ताकद वाढवते.
दही व ताक - दुधाला किंवा सायीला दह्याचे विरजण लावले की त्याचे दही तयार होते. व्यवस्थित लागलेले गोड दही खाण्यास योग्य असते. आंबट दह्यामुळे पित्त-कफदोषांचा प्रकोप होतो. सायीच्या दह्याचा उपयोग घुसळून लोणी काढून तूप करण्यास होतो.
दध्यष्णं दीपनं स्निग्धं कषायानुरसं गुरु ।
पाके।म्लं श्वासपित्तास्रशोथमेदःकफप्रदम् ।।
...भावप्रकाश
दही वीर्याने उष्ण असते व पचण्यासही जड असते. चवीला गोड व मागाहून तुरट असले तरी पचनानंतर आंबट होते. खोकला, दमा, सूज, मेदरोग, कफरोग, रक्तरोग यांना उत्पन्न करू शकते.
आयुर्वेदात दही रात्री खाणे वा गरम करून खाणे निषिद्ध मानले आहे. उष्ण ऋतूत म्हणजे वसंत, ग्रीष्म व शरद ऋतूत दही खाणे टाळणे उत्तम असेही सांगितले आहे.
दही घुसळून लोणी काढून टाकलेले ताक मात्र अतिशय पथ्यकर असते.
हिंगुजीरयुतं घोलं सैन्धवेन च संयुतम् ।
भवेत् अतीव वातघ्नं अर्शो।तिसार हृत्परम् ।
रुचिदं पुष्टिदं बल्यं बस्तिशूलविनाशनम् ।।
...भावप्रकाश
भाजलेला हिंग, जिरे व सैंधव मीठ मिसळलेले ताक अतिशय वातशामक असते. मूळव्याध, अतिसारसारख्या रोगात उत्तम असते, अतिशय रुचकर व पौष्टिक असते, ताकद वाढवते व मूत्राशयासंबंधित वेदना दूर करते, ताक पचनसंस्थेसाठी उत्तम असते. उलटी, अतिसार, उदरशूळ, जंत, संग्रहणी, मूळव्याध वगैरे त्रासात ताक औषधाप्रमाणे उपयोगी असते. विविध वातविकार, विषमज्वर, प्रमेह, त्वचारोग, सूज वगैरे विकारात पथ्यकर असते.
लोणी - दह्याचे ताक करताना जो स्नेहभाग वेगळा होतो, त्याला लोणी म्हणतात. लोणी ताजे वापरायचे असते. शिळे लोणी किंवा फार काळ टिकू शकणारे लोणी आरोग्यासाठी अहितकर होय.
नवनीतं तु सद्यस्कं स्वादु ग्राहि हिमं लघु ।
मेध्यं किंचित् कषायाम्लमीषत् तक्रांशसंक्रमात् ।।
...भावप्रकाश
ताजे लोणी चवीला गोड व ताकाचा अंश असल्याने किंचित तुरट व आंबट असते, पचायला हलके, वीर्याने शीत व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, मेधावर्धक म्हणजे आकलनशक्ती सुधारणारे असते.
लहान मुलांसाठी घरचे ताजे लोणी उत्कृष्ट असते. रोज एक - दोन चमचे लोणी खाण्याने ताकद वाढते, शारीरिक विकास व्यवस्थित होतो आणि आकलनशक्ती वाढते. गर्भवती स्त्रीने गर्भारपणात घरचे ताजे लोणी खाणे गर्भाच्या एकंदर विकासासाठी उत्तम असते.
मूळव्याधीमध्ये, विशेषतः मळाचा खडा होण्याची, रक्त पडण्याची, आग होण्याची प्रवृत्ती असता लोणी नियमित खाणे उत्तम असते. त्वचेचा वर्ण उजळण्याच्या दृष्टीने लोणी खाणे उत्तम असतेच पण बाहेरून लावणेही उपयुक्त असते. विशेषतः उन्हाच्या संपर्कात येणाऱ्या त्वचेवर, मेक-अप काढल्यानंतर त्या ठिकाणी थोडेसे लोणी जिरवले तर त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते.
हातापायांची आग, अशक्तपणा, पायाला भेगा, त्वचा कोरडी होणे वगैरे त्रास होत असणाऱ्यांनी रोजच्या आहारात लोणी-साखरेचा समावेश करणे उत्तम असते.
जुने किंवा दीर्घकाळ टिकणारे लोणी ताज्या लोण्याच्या विरुद्ध गुणांचे असते.
सक्षारकटुकाम्लत्वात् छर्द्यर्शः कुष्ठकारकम् ।
श्लेष्मलं गुरु मेदःस्थं नवनीतं चिरन्तनम् ।।
...भावप्रकाश
शिळे लोणी खारट व आंबट होत असल्याने उलटी, मूळव्याध व त्वचारोग उत्पन्न करते. शिळे किंवा दीर्घकाळ टिकणारे लोणी कफदोष वाढवते, पचण्यास अतिशय जड असते आणि मेद वाढवते.
अनेक दिवसांपर्यंत साठवून ठेवता येणारे लोणी सेवन करताना या गोष्टीचा विचार करायला हवा.
तूप - तापवलेल्या दुधावरच्या सायीच्या दह्याचे ताक करताना निघालेले लोणी आणि लोण्याचे तूप याप्रकारे तूप बनत असल्याने दूध-लोण्याचा जणू सारभाग म्हणजे तूप असते. म्हणूनच तूप गुणांनी सर्वश्रेष्ठ असते.
घृतं रसायनं स्वादु चक्षुष्यं वदिीपनम् ।
शीतवीर्यं विष अलक्ष्मीपापपित्तानिलापहम् ।।
...भावप्रकाश
शास्त्रोक्त पद्धतीचे साजूक तूप हे रसायन गुणांनी युक्त असते, चवीला गोड असते, डोळ्यांसाठी हितकर असते तसेच अग्नी प्रदीप्त करते. तूप वीर्याने शीत असते, वात- पित्तदोषांना कमी करतेच पण विषदोष, अलक्ष्मी, पाप यांचाही नाश करते.
तूप कांतिवर्धक, सौंदर्यवर्धक असते. तूप सेवन करण्याने त्वचेला उचित स्निग्धता मिळून त्वचा घट्ट, चमकदार राहण्यास मदत मिळतेच पण बाहेरून तूप लावण्यानेही त्वचेवरचा काळपटपणा, खरखरीतपणा नाहीसा होण्यास मदत मिळते.
बुद्धी, स्मृती, आकलनशक्ती या तिन्ही प्रज्ञाभेदांसाठी तूप उत्कृष्ट असते. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी, बौद्धिक काम करावे लागणाऱ्यांनी, तसेच कामाचा ताण असणाऱ्यांनी नियमित तूप सेवन करणे उत्तम असते.
तुपामुळे बुद्धिसंपन्नता मिळतेच पण जीवनशक्ती वाढते, प्रतिकारशक्ती वाढते. एकंदर तेजस्विता वाढते म्हणूनच लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सर्वांसाठी तूप उत्तंम असते. गर्भारपणात व बाळंतपणात स्त्रीने खाल्लेल्या तुपाचा तिला स्वतःला व बालकालाही फायदा होतो. सहा महिन्यांनंतर बालकाला बाहेरचे अन्न सुरू केले, की त्यालाही घरचे तूप देणे सुरू करता येते.
मलावरोधाचा त्रास असल्यास गरम पाण्यासह एक - दोन चमचे तूप घेण्याचा उपयोग होतो. याने अग्नीची ताकद तर वाढतेच, शिवाय पचनसंस्थेतील रुक्षता दूर होऊन पोट साफ व्हायला मदत मिळते.
झोप शांत लागत नसणाऱ्यांनी, अतिताणाचे काम असणाऱ्यांनी, वारंवार डोके दुखण्याची प्रवृत्ती आऱ्यांनी आहारात तुपाचा पुरेसा समावेश करणे चांगले असतेच पण रात्री झोपताना नाकात साजूक तुपाचे तीन - चार थेंब टाकणे, टाळूवर तूप जिरवणे उत्तम असते. यासाठी साध्या तुपापेक्षा "नस्यसॅन'सारखे औषधी तूप वापरले तर अधिक चांगला गुण येताना दिसतो.
मानसिक विकारांवर तुपासारखे उत्तम औषध नाही असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. उन्माद, अपस्मार, नैराश्य यांसारख्या विकारात आहारासह तूप खाणे आणि "संतुलन ब्रह्मलीन घृता'सारखे औषधांनी सिद्ध तूप खाणे या दोहोंचाही अप्रतिम उपयोग होताना दिसतो.
जखम भरून येण्यासाठीसुद्धा तुपाचा उपयोग होताना दिसतो. खरचटणे, भाजणे अशा तऱ्हेच्या जखमांवर तूप लावल्यास आग व वेदना कमी होतात व जखम पटकन भरून येते. जुनाट जखमाही तुपाच्या, विशेषतः औषधी तुपाच्या योगे भरून येताना दिसतात.
तुपाचा विशेष गुण म्हणजे तूप जेवढे जुने तेवढे अधिक गुणकारी होते. विशेषतः मानसिक रोगांवर, नेत्ररोगांवर व विषरोगांवर जुने तूप अधिक प्रभावी असते. जुन्या तुपाने जखमाही अधिक चांगल्या प्रकारे भरून येतात.
अशा प्रकारे दूध व दुधाच्या पदार्थांचा रोजच्या आहारात योग्य स्वरूपात, योग्य प्रमाणात वापर केला तर त्यामुळे आरोग्याचा लाभ होऊ शकतो.
डॉ. श्री बालाजी तांबे
Labels:
दूध
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment