Saturday, April 4, 2009

असत्याचा व्हायरस

आजारपणाचे मूळ शोधताना वागणुकीतील अनियमितता. जंतुसंसर्ग, अति घाई, वंशपरंपरागत बाधा, औषधांचे दुष्परिणाम अशी अनेक कारणे दिली तरी मनुष्याला सशक्‍त करण्यासाठी व रोग झाला तर रोगाचे मूळ कशात आहे हे समजून त्यावर इलाज करत येत नाहीत तोपर्यंत हा विषय कळला असे म्हणता येणार नाही. आयुर्वेदाने मात्र स्वास्थ्याची व्याख्या करून रोग कसा होते याचे व्यवस्थित मार्गदर्शन केलेले आहे. शारीरिक, मानसिक व आत्मिक प्रसन्नता आणि सर्व प्रकारचे काम करण्यासाठी शक्‍ती आणि उत्साह असणे अशी आरोग्याची व्याख्या करून, सर्व आजारांचे मूळ प्रज्ञापराधात आहे असेही आयुर्वेदाने सांगितले.

प्रज्ञापराधाची अगदी खालची पातळी म्हणजे खोटे बोलणे. खोटे बोलण्यातही दोन प्रकार असतात. एक म्हणजे समजून उमजून जाणीवपूर्वक खोटे बोलणे. दुसरे म्हणजे अजाणतेपणी खोटे बोलणे. झालेल्या प्रसंगाची वा घडलेल्या प्रसंगाची स्मृती न राहिल्यमुळे अजाणतेपणी खोटे बोलले जाते. पण, आपण खोटे बोलत आहोत हे त्या व्यक्‍तीला मान्य नसते.
आरोग्याची काळजी घेताना प्रज्ञापराधाचे, मनाचे व एकूण इंद्रियव्यापारांचे स्थान मेंदूत आहे, असे गृहीत आहे. मेंदूच्या आरोग्याची नीट काळजी घेतली नाही तर तरुण वयातच विस्मृतीसारखे रोग जडतात. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची सवय केली नाही तर मुळात गोष्ट केली गेली तरीही मेंदूत त्या गोष्टीची नोंद व्यवस्थित होत नाही व मग अशा वेळी त्या घटनेची स्मृती जागृत होण्याचा प्रश्‍नच राहात नाही.
मला सगळे समजते, मी किती मोठा / मोठी आहे, मी केले आहे ते बरोबरच आहे अशा प्रवृत्तीमुळेसुद्धा मेंदूच्या कार्यक्षमतेत बाधा उत्पन्न होते. मी असे बोललोच नाही, मी असे सांगितलेच नाही, मी असे केलेच नाही, अशा समजुतीतून मनुष्य दुराग्रही होऊन त्याला आपण सत्य बोलतो वा मी करतो ते बरोबरच आहे असे वाटत असले तरी ते असत्यच असते. उलट त्यामुळे मेंदूला अधिक इजा पोचते. तेव्हा रोजच्या व्यवहारातील हा खोटे बोलण्याचा प्रकार सर्वाधिक अनुभवाला येतो व त्यामुळे वितंडवाद वाढून मने कलुषित होतात व अनेक प्रकारचे आजार उत्पन्न होतात.
एखाद्याने जरासा विचार करून माझे काहीतरी चुकीचे असेल, कदाचित मला आता आठवत नसेल व वस्तुस्थिती कदाचित वेगळी असू शकेल असे मान्य केले तर शरीरावर व मेंदूवर होणारे दुष्परिणाम टाळता येऊ शकतील. मेंदू संगणाकासारखा काम करतो. त्यामुळे उलटसुलट वा चुकीच्या आज्ञा दिल्या तर मेंदूच्या कार्यव्यवस्थेत बाधा येते हे निश्‍चित.
एखाद्याला रस्ता सांगताना, "प्रथम डावीकडे वळा, तेथे एक पिवळे घर दिसेल तेथून उजवीकडे वळा, नंतर थोडे मागे येऊन उजव्या हाताने पुढे जाऊन डावीकडे वाळा, तेथून बरेचसे सरळ गेले की डावी-उजवी न करता समोरचा रस्ता सुरू झाल्या झाल्या डावीकडे वळा' अशा सूचना लक्षात ठेवणे मेंदूला खूप अवघड जाते व नंतर चुका घडण्याचा संभव असतो. कारण ही माहिती कार्यान्वित करण्यासाठी खूप शक्‍ती खर्च होते.
आपल्याकडून चूक घडली आहे हे लक्षात न घेता पुढच्या आज्ञा दिल्याने वा चिडचिड करण्याने मेंदूला अधिक इजा होते. हाताने एखादे काम करायचे असताना काम कुठले, त्यासाठी कुठल्या अवयवांची कशी हालचाल करावी लागणार, त्यासाठी किती शक्‍ती लागणार, काय काय तयारी करावी लागणार हे ठरविणे तसेच पूर्वीचे काम संपविल्यानंतर काम करण्याचीही आज्ञा मेंदूने हाताला देणे गरजेचे असते. यात गोंधळ झाला तर कार्यसिद्धी निश्‍चितच होऊ शकत नाही व मेंदूवर ताण येऊन प्रज्ञापराध घडण्याची शक्‍यता असते.
डोळ्याने दिसणे, कानाने ऐकणे, अन्न पचविणे, हृदयाचे काम नीट चालू ठेवून रक्‍तदाब योग्य ठेवणे, वेळेवर मलमूत्र विसर्जन करणे अशी अनेक आतली व बाहेरची कामे मेंदूला करावी लागतात. मेंदूवर ताण आला असता सर्व इंद्रियांच्या कामात बाधा निर्माण होते, त्रास व्हायला लागतो आणि काही दिवसांनी त्रासाचे रूपांतर रोगात होते.
जाणून बुजून खोटे बोलणारे अनेक असतात. खोटे बोलत असताना किमान दहा वेळ मेंदूतून आज्ञा येते की आपण हे काही जिभेला बोलायला सांगतो आहे ते चूक आहे. कारण मेंदूत उपलब्ध माहिती काही वेगळेच सांगत असते. तरीही तिकडे दुर्लक्ष केले जाते. ही विसंगत माहिती कुठे साठवायची हे मेंदूला नीटपणे न कळल्यामुळे मेंदूची कार्यव्यवस्था बिघडून जाते. स्वतःच्या फायद्यासाठी खोटे बोलणाऱ्या मंडळीच्या मेंदूचे आणि स्वतःचा फायदा असो की नसो खोटे बोलून स्वतःचे व दुसऱ्याचे नुकसान करणाऱ्या मंडळींच्या मेंदूचे नुकसान सारखेच होते.
करतो आहे ते बरोबर नाही, हे निसर्गाला धरून नाही, न्यायाला धरून नाही, एकूण कल्याणाच्या विरुद्ध आहे हे समजत असतानासुद्धा खोडे बोलणाऱ्यांना प्रज्ञापराधाची शिक्षा लगेचच मिळते. बहुतेक सगळे रोग मानसिक संबंधातून झालेल्या ताणामुळे तयार होतात हे सत्य सर्वांनीच मान्य केलेले आहे. पण शेवटी मन म्हणजे विचारांशी साठवणूक व देवाणघेवाण करणारी एक बॅंकच आहे. त्यामुळे असत्याचा परिणाम मनरूपी बॅकेची दिवाळखोरी होण्यात प्रत्ययाला येतो.
सत्यवचनाचे एवढे माहात्म्य का? प्रभू श्रीरामचंद्रांना एकवचनी, सत्यवचनी, दिलेले वचन पाळणाऱ्या कुलात जन्म घेतलेला असे का म्हटले जाते याचे महत्त्व आपल्याला यावरून पटू शकते. तोंडातून निघालेला शब्द व धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही, असे म्हटले जाते. तेव्हा खोटे बोलून नंतर त्यावर सारवासारवी करण्याचा काहीच उपयोग होत नाही. प्रभू श्रीराम सत्यवचनी व दिलेले वचन पूर्ण पाळणारे होते म्हणूनच त्यांच्या आयुष्यात अनेक घटना घडूनही श्रीराम पूजनीय व अवतारी पुरुषच राहिले.
- डॉ. श्री. बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad