Wednesday, April 15, 2009

ब्रह्मचर्य आणि आरोग्य

आयुर्वेदात जीवनाचे तीन आधार सांगितले आहेत, त्यात ब्रह्मचर्याचा समावेश केला आहे. यावरून ब्रह्मचर्य आरोग्यरक्षणाच्या दृष्टीतून किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येऊ शकते. भूक, झोप या क्रिया जशा नैसर्गिक व स्वाभाविक असतात तशीच मैथुन इच्छा स्वाभाविक असते. चार पुरुषार्थांपैकी "काम' हा एक आहे कारण त्याच्या अभावी जग चालणारच नाही.
आयुष्याचे चार विभाग केले तर त्यातल्या पहिल्या भागात विद्यार्जन महत्त्वाचे असते आणि त्यासाठी ब्रह्मचर्य आवश्‍यक असते. म्हणूनच ब्रह्मचर्याश्रम आयुष्याचा प्रथम चरण समजला जातो.
ब्रह्मचर्य दोन प्रकारचे असू शकते.
१. नैष्ठिक
२. वैवाहिक
नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणजे आयुष्यभर मैथुनापासून दूर राहणे. या प्रकारचे ब्रह्मचर्य हे एक प्रकारचे व्रत असते. मनःशांती, अध्यात्मिक उन्नती याप्रकारची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ब्रह्मचर्य व्रत घेता येते. परंतु, हे अतिशय कठीण समजले जाते. जीवनाच्या तीन मुख्य गरजांपैकी उपवास करून भुकेवर आणि तंत्र, मंत्र, ध्यान, जागरणाने झोपेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी तपस्या केली जाते. तसाच मैथुनापासून दूर राहणे हाही तपस्येचा एक प्रकार आहे.
वैवाहिक ब्रह्मचर्य हा शब्द परस्परविरोधी भासला तरी आयुर्वेदाला हेच ब्रह्मचर्य अपेक्षित आहे. विद्यार्जन होईपर्यंत नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळून नंतर गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला की वैवाहिक ब्रह्मचर्य पाळणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते, संसार चालू राहण्यासाठी आवश्‍यक असते.
आयुर्वेदाने जीवनाचा आधार म्हणूून ब्रह्मचर्य सांगितले त्या ठिकाणीही वैवाहिक ब्रह्मचर्यच अपेक्षित आहे. म्हणूनच त्यादृष्टीने आयुर्वेदाने अनेक नियम सांगितले आहेत. या नियमांचे उल्लंघन न करता गृहस्थाश्रमाचे पालन करणे याला वैवाहिक ब्रह्मचर्य असे म्हणतात.
वैवाहिक ब्रह्मचार्याचे आयुर्वेदाने सांगितलेले काही महत्त्वाचे नियम याप्रमाणे,
* शरीरधातू अशक्‍त झाले असताना मैथुन करू नये.
* वाताच्या काळात म्हणजे सकाळी वा संध्याकाळी मैथुन करू नये.
* भूक वा तहान लागली असता मैथुन करू नये.
* इच्छा नसताना मैथुन करू नये.
* रजःस्वला स्त्रीने मैथुन करू नये.
* अप्रिय, निंदित आचरण असलेल्या स्त्रीबरोबर किंवा पुरुषाबरोबर मैथुन करू नये.
* पुरुषापेक्षा स्त्री वयाने मोठी असणे हेही मैथुनासाठी योग्य नाही.
* परस्त्री वा परपुरुषाबरोबर मैथुन करू नये.
* सार्वजनिक ठिकाणी, अनोळखी ठिकाणी किंवा गुरु, देवता यांच्या निवासस्थानी मैथुन करू नये.
वैवाहिक जीवनामध्ये मैथुनाचे स्थान महत्त्वाचे असते. पण, त्याचे प्रमाण योग्य असणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. आयुर्वेदात उभयतांची प्रकृती व ऋतू यांच्या समन्वयाने हे प्रमाण ठरविण्यास सांगितले आहे. हेमंत व शिशिर ऋतूत इच्छेनुसार, वसंत व शरद ऋतूत तीन दिवसांच्या अंतराने तर ग्रीष्म व वर्षा ऋतूत पंधरा दिवसांच्या अंतराने मैथुन करावे, असे सुचविलेले असले तरी त्याअगोदर यासंबंधी एक सूत्र दिलेले आहे.
विश्रब्धदृष्टो रहसि तत्कामस्तरुणः पुमान्‌ ।
समस्थिताः सुरभिमुक्‍तमूत्रादिरव्यथः ।।

... अष्टांगसंग्रह
जितक्‍या मैथुनाने मन व शरीर स्थिर राहील तितक्‍या प्रमाणातच मैथुन करावे. वैवाहिक ब्रह्मचर्यामध्ये "ब्रह्मचर्य' हा शब्द वापरला आहे कारण त्यामध्ये "शुक्राचे रक्षण' करण्याला महत्त्व दिलेले आहे. आयुर्वेदात ब्रह्मचर्य, मैथुन वगैरे विषयांची माहिती ज्या अध्यायात दिली त्याच अध्यायात शुक्रधातूचे महत्त्वही पटवून दिलेले सापडते.
कायस्य तेजः परमं हि शुक्रमाहारसारादपि सारभूतम्‌ ।
जितात्मना तत्परिरक्षणीयं ततो वपुः सन्ततिरप्युदारा ।।

... अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
आहाराचे सार असणारा शुक्रधातू हेच शरीरातील परमश्रेष्ठ तेज आहे म्हणूून संयमी बनून शुक्रधातूचे रक्षण करावे, कारण शुक्राच्या बळावरच शरीर उत्कृष्ट, निरोगी राहते आणि भावी संततीही संपन्न अशी जन्माला येते.
शुक्रधातूचे सर्वतोपरी रक्षण म्हणजे ब्रह्मचर्य हा ब्रह्मचर्याचा खरा अर्थ यातून स्पष्ट होतो. श्रीरामभक्‍त हनुमान, समर्थ श्री रामदास ब्रह्मचारी म्हणून प्रसद्ध आहेत. तसेच त्यांच्या शरीरसंपदेबद्दल, समर्थ शरीराबद्दलही नावाजलेले आहेत. ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्या योगी, संतजनाच्या चेहऱ्यावरची तेजस्विताही हेच प्रतपादन करते.
शुक्ररक्षण होण्यासाठी फक्‍त मैथुन संयमित ठेवणेच पुरेसे आहे असे नाही तर सातत्याने मैथुनाची कल्पना करणे, हस्तमैथुन यातूनही शुक्रधातूचा ऱ्हास होणे शक्‍य असते. मैथुनसमयी शरीरातून उत्सर्जित होणारे वीर्य हे शुक्रधातूचे दृश्‍य स्वरूप असले तरी तो संपूर्ण शरीराला व्यापून असतो. हृदय, मेंदू वगैरे महत्त्वाच्या अवयवांचे कार्य परिपूर्णतेने होण्यासाठी शुक्रधातूची आवश्‍यकता असते.
एकूणच उत्साह, जोश, शरीराचे नवचैतन्य व्यवस्थित राहण्यासाठी शुक्रधातूची मोठी आवश्‍यकता असते. अतिमैथुन किंवा इतर कोणत्याही कारणाने शुक्रक्षय झाला तर त्यातून अनेक शारीरिक-मानसिक व अवघड विकार होऊ शकतात.
संपन्न अपत्याची इच्छा असणाऱ्या पुरुषाने पंचविसाव्या वर्षी विवाह करवा म्हणजेच पंचविसाव्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करून मग गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे. अकाली वयात मैथुन, शुक्राचा नाश संपूर्णतः निषिद्ध समजला जातो हे खालील सूत्रावरून स्पष्ट होते.
अतिबालो ह्यसंपूर्णसर्वधातुः स्त्रियं व्रजन्‌ ।
उपशुष्येत सहसा तडागमिव काजलम्‌ ।।

... चरक चिकित्सास्थान
लहान वयात जोपर्यंत शरीरधातू पूर्णपणे तयार झालेले नसतात तेव्हा शुक्रऱ्हास झाला तर तो मनुष्य कमी पाणी असलेला तलाव जसा शुष्क होईल तसा सुकून जाईल अर्थात त्याची शक्‍ती क्षीण होईल.
बाल्यावस्थेप्रमाणेच वृद्धापकाळातही मैथुन वर्ज्य सांगितले आहे. एखादे सुकलेले, कोरडे झालेले, जर्जर लाकूड ज्याप्रमाणे थोडाही धक्का लागला तर मोडते त्याप्रमाणे वृद्धावस्थेमुळे धातू क्षीण झालेल्या व्यक्‍तीने ब्रह्मचर्य मोडले तर तिचा नाश होऊ शकतो.
रोगामुळे अशक्‍त झालेल्या व्यक्‍तीमध्येही हेच लागू पडते. शुक्र यथाव्यवस्थित राहण्यासाठी शुक्ररक्षण महत्त्वाचे असते, तसेच शुक्रपोषक आहार-रसायनांचे सेवन करणेही महत्त्वाचे असते. ब्रह्मचर्याचे पालन करताना याकडेही लक्ष द्यायला हवे.
थोडक्‍यात संपन्न जीवन जगण्याची ‌‌‌‌‌‌‌इच्छा असेल तर ब्रह्मचर्याचे पालन करायलाच हवे, आहार-आचरणातून शुक्ररक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत.
- डॉ. श्री बालाजी तांबे

1 comment:

ad