Saturday, April 25, 2009

"अन्नाद्‌ भवन्ति भूतानि''

आरोग्याच्या रक्षणात, संवर्धनात अन्न अव्वल स्थानी आहे. अन्नाद्वारे आरोग्य संतुलित ठेवता येते तसेच त्यानेच रोगही ओढावून घेतला जाऊ शकतो. त्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या संस्कार, संयोग, संतुलन या संकल्पना समजून घेणे आवश्‍यक आहे.
संस्कारांमध्ये इतकी ताकद असते की त्यामुळे एकच पदार्थ संस्कारापरत्वे वेगवेगळ्या गुणांचा बनू शकतो. गहू जरी एकच असला तरी त्याच्यापासून बनवलेली घडीची पोळी, फुलका आणि पराठा यांचा शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळा असतो. फुलका पातळ असून प्रत्यक्ष निखाऱ्यावर भाजला जात असल्याने पचनास अतिशय हलका असतो. घडीच्या पोळीत घडी बनवताना तेल किंवा तूप लावले जात असल्याने पोळी स्निग्धता देणारी असून पचायला फार हलकी नसते किंवा फार जडही नसते. पराठा मात्र जाड लाटलेला असून तेल किंवा तूपावर भाजला जात असल्याने स्निग्धता देत असला तरी तुलनेने सर्वात जड असतो.
संस्काराबरोबरच दुसरा महत्त्वाचा असतो "संयोग''! कशाबरोबर काय एकत्र करावे आणि काय एकत्र करू नये याचेही एक शास्त्र आहे. रव्याच्या खिरीत केशर हवेच कारण ते खीर पचवण्यास मदत करते. श्रीखंडामध्ये जायफळ व केशर हवेच कारण ते चक्‍क्‍यामुळे वाढणारा कफ कमी करायला समर्थ असते. आमरस खाताना त्याच चमचाभर तूप व चिमूटभर सुंठीचे चूर्ण टाकल्यास आंबा गरम पडत नाही आणि पचायला हलका होतो.
अनुकूल संयोग फक्‍त त्या-त्या पदार्थापुरता मर्यादित नसतो तर जेवणाचा बेत ठरवतानाही कशाबरोबर काय खायला हवे याचा विचार करावा लागतो. उदा. पुरणपोळीबरोबर कटाची आमटी असते कारण जड हरबऱ्याची डाळ पचवण्यासाठी विविध मसाल्यांपासून बनवलेली कटाची आमटी आवश्‍यक असते. भाजणीच्या थालिपीठाबरोबर लोणी खाल्ले जाते कारण ते थालिपीठाची रुक्षता कमी करते.
आहारः प्रीणनः सद्योबलवृद्धिकृद्‌ देहधारणः ।
स्मृत्यायुः शक्‍तिवर्णौजः सत्त्वशोभाविवर्धनम्‌ ।।

... निघण्टुरत्नाकर
आहार प्राणिमात्रांना तृप्त करतो, शरीरधारणासाठी आवश्‍यक असतो, ताबडतोब बलवृद्धी करतो तसेच स्मरणशक्‍ती, शरीरशक्‍ती, तेजस्विता, ओज, आयुष्य ह्या गोष्टी आहारावरच अवलंबून असतात. शरीराचे सौंदर्य तसेच मनाचे औदार्य हे सुद्धा आहारातूनच वाढत असते.
आयुर्वेदाने आहाराची इतकी प्रशंसा केलेली आहे की त्यावरून अन्नाचे महत्त्व सहज लक्षात येते. अर्थात आहाराचे असे सगळे उत्तमोत्तम फायदे अनुभवायचे असतील तर त्यासाठी आहाराचे नियम अर्थात "अन्नयोग संकल्पना' समजून घ्यावी लागते. आरोग्यरक्षण हा मुख्य हेतू असणाऱ्या आयुर्वेदाने आहाराचे अतिशय सविस्तर व पूर्णतः वैज्ञानिक दृष्ट्या मार्गदर्शन केलेले आहे. आयुर्वेदातील अन्नयोगाची संकल्पना इतकी समर्पक आणि परिपूर्ण आहे की ती जगाच्या पाठीवर कुठेही लागू पडते व आरोग्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला अगदी सहजपणे अंगीकारता येते.
जेवण प्रकृतीनुरूप व ऋतूला साजेसे असावेच पण ते संतुलित व परिपूर्ण असावे. जेवणात गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट अशा सहाही रसांचा योग्य प्रमाणात समावेश असावा. जेवणातील पदार्थ असे असावेत की जे संपूर्ण शरीराचे सहज पोषण करू शकतील. चटणी किंवा लोणचे, कोशिंबीर, सूप किंवा आमटी, खीर किंवा त्यासारखे हलके पक्वान्न, एक फळभाजी व एक उसळ, वरण-भात-लिंबू, पोळी किंवा भाकरी, आणि ताक यास परिपूर्ण आहार म्हणता येईल.
गरम गरम वरण-भात व लिंबू याने जेवण सुरू करणे सर्वात चांगले कारण त्याने पोटातील अंतस्त्वचेचे रक्षण व्हायला मदत होते, वाढलेले पित्त पटकन शमते आणि लिंबामुळे पाचक स्राव स्रवायलाही मदत मिळते. भांड्यात किंचित तूप घालून शिजवलेला भात पचावयास अधिक सोपा असतो. कफाची प्रवृत्ती असणाऱ्यांनी वरण-भातासह लोणचे किंवा चटणी मिसळून घेतल्यास अधिक चांगले. वात व पित्त प्रकृतीला तर वरण-भात हे वरदानच असते.
मघाशी पाहिल्याप्रमाणे फुलका पचावयास सर्वात हलका असल्याने पावसाळ्यात किंवा एरवीही रात्रीच्या जेवणासाठी फुलका किंवा ज्वारी-बाजरीची भाकरी बनवावी. हिवाळ्यात अधून मधून पराठा बनवण्यास हरकत नाही. बाकीच्या वेळी घडीची पोळी उत्तमच असते. पोळ्यांसाठी गहू दळून आणल्यावर न चाळता कोंड्यासकट वापरावे. मैद्यापासून बनवलेला पराठा, नान वगैरे टाळणेच योग्य.
आरोग्य टिकविण्यासाठी म्हणजेच रोग होऊ न देण्यासाठी आहार महत्त्वाचा असतोच पण रोग झाला असता त्यातून लवकरात लवकर मुक्‍ती मिळण्यासाठीसुद्धा आहाराचा उपयोग होत असतो.
सध्या सर्व जगभर आरोग्याविषयी अधिक जागरूकता निर्माण झालेली दिसते. सध्या सर्व जगभर असे काही रोग पसरायला सुरुवात झाली आहे की माणसाला पळता भुई थोडी झालेली दिसते. या विकसित झालेल्या जगाचा व जीवनाचा आनंद व आस्वाद घेण्यासाठी आरोग्याशिवाय पर्याय नाही हे आता आपल्या लक्षात आले आहे.
शरीर उत्तम ठेवून त्याला घाटदार करण्यासाठी व्यायामशाळा, योग, प्राणायाम, जिम वगैरे उपाय अवलंबण्याचे ठरविले तरी मुळात शरीराचे प्राथमिक आरोग्य चांगले असण्याची खूप गरज असते.
या सर्व पार्श्‍वभूमीवर एक गोष्ट नक्की आहे की आरोग्य रक्षणासासाठी, वाढविण्यासाठी अन्नाचा क्रमांक पहिला आहे. "अन्नाद्‌ भवन्ति भूतानि' हे आपण जाणतो. अन्नामुळेच आरोग्य संतुलित ठेवता येते किंवा अन्नामुळेच अनारोग्यही प्राप्त होऊ शकते.
डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad