Friday, October 3, 2008

आरोग्य वार्ता - झोप हवी कशाला?

आरोग्य वार्ता - झोप हवी कशाला?


(अभिजित मुळ्ये)
इटलीमधल्या दोन रुग्णांनी सध्या शास्त्रज्ञांचीच झोप उडवून टाकली आहे. त्यांना "मल्टिपल सिस्टिम ऍट्रॉफी' हा चेतासंस्थेचा विकार आहे. या रोगामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम झाला आहे. आणि पुढील तपासणीतून "झोपेचे काम काय?' असा अगदी मूलभूत प्रश्‍न तज्ज्ञांना पडला आहे. ........
"स्लीप मेडिसिन' या नियतकालिकात त्याची माहिती प्रसिद्ध झालेली आहे. रॅपिड आय मूव्हमेन्ट म्हणजे बुबुळाची जोरदार हालचाल होत असलेली झोप अर्थात "रेम' स्लीप आणि अशी हालचाल नसलेली झोप म्हणजेच "नॉन रेम' स्लीप असे झोपेचे दोन मुख्य प्रकार असतात. इटलीतील रुग्णांमध्ये झोपेचे हे दोन्ही प्रकार आणि जागेपणाचा अंश एकत्रित दिसून आले आहेत. या रुग्णांची तपासणी करणाऱ्या डॉक्‍टरांना आधी त्यांचा आजार साधा वाटला. पण, झोपेत बडबडणे किंवा हातपाय झाडणे अशा लक्षणांवरच्या उपचारांना पुरेसा प्रतिसाद मिळत नाही, उलट परिस्थिती हाताबाहेर चालली आहे, हे लक्षात आल्यावर डॉक्‍टरांनी मेंदूच्या आलेखांवरून (इइजी) काही नवे दिसून येते का, हे पाहण्याचे ठरवले. मेंदूच्या आलेखांवरून (इइजी) "नॉन रेम' झोपेचे हलकी झोप आणि गाढ झोप, असे प्रकार केले जातात. जागृतावस्थेतील इइजी अगदी वेगळ्या प्रकारचे असतात. पण, इटलीतील रुग्णांमध्ये मेंदूचे आलेख झपाट्याने रेम, नॉन रेम आणि जागृतावस्थेत बदलत असल्याने दिसून आले. झोपेतील या गडबडीचा बौद्धिक क्षमतांवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नव्हता. म्हणजेच सर्वसाधारणपणे झोपेमध्ये स्मृतीच्या वर्गवारीचे जे काम केले जाते ते त्यांच्या मेंदूत चोख होत असावे. याचा अर्थ, मुळात "झोपेमध्ये स्मृतीच्या वर्गवारीचे काम केले जाते' हे गृहितकच चूक असू शकेल! म्हणूनच शास्त्रज्ञांची झोप उडाली आहे.

- अभिजित मुळ्ये

No comments:

Post a Comment

ad