तांबा-पितळ्याच्या भांड्यांत निरोगीपणाचा मंत्र
(मदन टोळ)
भारतात पूर्वापार तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवण्याची परंपरा चालत आलेली आहे. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी हे त्या धातूंच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे फक्त निर्जंतुकच होते असे नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात प्रविष्ट होतात. ........
पावसाळ्यात अशुद्ध पाण्याची समस्या सर्वांत मोठी व गंभीर स्वरूपाची आरोग्य समस्या ठरते. साथीच्या रोगांपैकी ८० टक्के रोग हे दूषित पाण्यामुळे होतात, तर लहान मुलांच्या मृत्यूच्या कारणांपैकी २५ टक्के कारणे ही जलजन्य आजाराची असतात. शहरी व ग्रामीण या दोन्ही भागांत याचे प्रमाण थोड्याफार फरकाने सारखेच आढळून येते. म्हणूनच पावसाळ्यात तांब्या-पितळ्याच्या भांड्यांतील पाणी पिण्याचा आग्रह आरोग्यतज्ज्ञ करत असतात. त्यामागे बरीच कारणे आहेत. त्यापैकी काहींचा ऊहापोह या लेखात करत आहोत.
भारतात पूर्वापार तांब्या-पितळेच्या भांड्यामध्ये पाणी साठवण्याची परंपरा चालत आलेली आहे. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी हे त्या धातूंच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे फक्त निर्जंतुकच होते असे नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात प्रविष्ट होतात. आयुर्वेदातील रसरत्नसम्मुचय या ग्रंथात (रसतरंगिणी श्लोक ४६) हा उल्लेख आहे.
पितांबरी कंपनी व आगरकर इन्स्टिट्यूट, पुणे यांनी यावर एकत्रितपणे काही प्रयोग केले. त्याचे निष्कर्ष असे निघाले, की तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यातील इ- कोलीसारखे अत्यंत घातक व चिवट जिवाणूदेखील दोन तासांत पूर्णपणे नष्ट होतात तर तांबे व जस्त यांचा मिश्र धातू असलेल्या पितळ्याच्या भांड्यातील पाणी ३ ते ४ तासांत पूर्णपणे निर्जंतुक होते. इतकेच नाही तर तांब्याचे व जस्ताचे गुणधर्मदेखील पाण्यात उतरतात.
नेचर या इंग्लंडमधील विज्ञान व संशोधन विषयातील मासिकाने नॉर्थेब्रिया विद्यापीठातील डॉ. रीड या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यांचा निष्कर्षदेखील याचीच पुष्टी करतो. अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण मंडळानेदेखील तांब्याच्या जंतुनाशक गुणधर्माचा अभ्यास करून निर्जंतुकीकरणाची क्षमता असलेल्या घटकांत प्रथमच तांब्यांसारख्या एका धातूचा समावेश केला आहे.
पण सध्याच्या काळात तांब्याच्या भांड्यांचा वापर कमी होत असल्याने या धातूच्या औषधी गुणधर्माच्या फायद्यापासून आपण वंचित राहतो. तांब्याच्या भांड्यात २ ते ३ तास ठेवलेल्या पाण्याला ताम्रजल असे म्हणतात. ताम्रजल हे आम्लपित्त, मधुमेह, सांधेदुखी, मूत्राशय आदींच्या गंभीर विकारांवर गुणकारी आहे. गरविष म्हणजेच शरीरातील घातक द्रव्य बाहेर फेकण्याचे काम ताम्रजल करते. हृदयरोगावरही ते अत्यंत प्रभावी असे आहे. पितळ हे तांबं आणि जस्त यांचे संयुग असल्याने पितळ्याच्या भांड्यातील पाण्यात जस्ताचेही गुण उतरतात. जस्त हे शारीरिक तसेच बौद्धिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असते. जस्ताच्या कमतरतेमुळे बौद्धिक वाढ खुंटते. वारंवार आव होण्याचा त्रास असणाऱ्यांनादेखील पितळ्याच्या भांड्यात शिजवलेले अन्न लाभदायक ठरते. असे अन्न स्वादिष्ट व पौष्टिक होते. असे अल्पमोली बहुगुणे तांबं आणि पितळ यांचा दैनंदिन वापर अधिकाधिक प्रमाणात होऊ लागल्यास आरोग्यविषयक अनेक अडचणी दूर होणार आहेत. तांब्या-पितळाचे आध्यात्मिक महत्त्वही आहे.
आपल्याकडे पूजाविधीसाठी वापरण्यात येणारी ताम्हण, पळी, भांडं इ. उपकरणी, देव्हाऱ्यातील देवदेवतांच्या मूर्तीदेखील तांब्यापितळ्याच्या असतात. कारण तांबं - पितळ या धातूंची सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमता अधिक असते. तांब्या- पितळ्याच्या लालसर व सोनेरी रंगांमुळे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते व मनाची प्रसन्नता वाढते.
आर्थिक दृष्टिकोनातून विचार करता तांबा व पितळ हे उष्णतेचे सुवाहक असल्याने अशा भांड्यांचा उपयोग स्वयंपाकाकरिता केल्यास ४० टक्के इंधनाची बचत होते तसेच तांब्या- पितळ्याच्या भांड्यात तीन तास ठेवलेले पाणी निर्जंतुक होत असल्याने पाणी उकळण्याचा खर्चदेखील वाचतो.
तांबं आणि पितळ हवेतील बाष्पाच्या प्रक्रियेमुळे काळे पडते. त्यासाठी ते नियमित स्वच्छ करणे आवश्यक असते. ताक, लिंबू, राख वापरून ते नीट स्वच्छ होत नाहीत. पितांबरी पावडरचा वापर केल्याने भांडी स्वच्छ तर होतातच शिवाय भांड्यांची चमकही कायम राहते. सध्या बाजारात विविध प्रकारची तांब्या-पितळ्याची आकर्षक आकारातील भांडी उपलब्ध आहेत. फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी तांब्याचे विशिष्ट प्रकारचे उभे भांडे, छोट्या, मोठ्या आकारातील वेगवेगळ्या घाटणीची पिंप, तांब्याचा तळ असलेली स्वयंपाकाची भांडी यांच्या अधिक वापराने आपल्याला आरोग्यमय जीवन जगता येईल व पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे होणारे रोग टाळता येतील.
- मदन टोळ, ठाणे
No comments:
Post a Comment