Tuesday, October 14, 2008

नका देऊ वाताला संधी!!

नका देऊ वाताला संधी!!


(डॉ. श्री बालाजी तांबे)
अनेक जण नाना तऱ्हेचे चटपटीत, तीक्ष्ण, पित्तकारक पदार्थ सेवन करतात, सारखे चिडतात, रागावतात. अशा रीतीने शरीरात उष्णता तयार केली, जागरणे केली, की तयार झालेला अग्नी वाताला बोलावतो आणि वात व अग्नी यांचा संगम झाला की शरीरातील जीवनसत्त्वे वाळू लागतात, स्नायू कडक होतात, सांध्यात असलेले वंगण द्रव्य कमी होते वा वाळून जाते आणि वाढलेला वात संधिवात या स्वरूपात त्रास देऊ लागतो. ........
भारतीय परंपरेत, नव्हे तर एकूणच प्राणिमात्रांसाठी "संधि' म्हणजे जोडणे या गोष्टीला फार महत्त्व असते. त्यातूनच सध्या विकसित झालेली स्त्री-पुरुष विवाह परंपरा आपल्याला दिसून येते. आधुनिक काळात म्हणतात कोलॅबरेशन, एखाद्या भारतीय कंपनीला परदेशी कंपनीशी वा परदेशी कंपनीला भारतीय कंपनीशी जोडणे, नेहमी फायद्याचे ठरते. जोडणे व तोडणे हा फक्‍त दिशाबदल असतो. वारा हा अतिचंचल असतो, क्षणाक्षणाला दिशा बदलू शकतो. आवश्‍यकतेनुसार काही वेळा जोडताना आनंद वाटतो तर काही वेळा तोडताना. संस्कृत भाषेत, जी भारताची प्राचीन व मूळची भाषा आहे, संधी खूप महत्त्वाचा आहे. या संधिकरणाच्या गंमतीमुळे भाषेत आटोपशीरपणा तर येतोच, पण त्यात काव्यात्मकताही येते. संधीवरून उच्चार जमला तर खूप आनंद घेता येतो. मात्र, संस्कृतातील या संधीला बरेच जण घाबरतात. संधी सोडवावा तर व्याकरण कळत नाही आणि संधीचा उच्चार करावा तर जीभ वळत नाही. संधीची महत्ता अशी असली तरी, संधिवात म्हटला की हमखास डोकेदुखी!

संधिवातात वाताचा संधी कोणाशी झाला आहे हा शब्द अध्याहृत आहे. तो शोधून काढायचा असतो. दोन हाडे ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी संधिवात दिसत असला तरी तो केवळ दोन हाडांच्या ठिकाणी असल्याने त्याला संधिवात म्हटलेले नाही. एकूण बघता असे लक्षात येते की संधिवात पूर्ण शरीरव्याप्त आहे. हाडांच्या ठिकाणी संधिवात प्रकट होत असला ती संधिवात ज्या आमदोषामुळे होतो तो आमदोष शरीरव्याप्त असतो.

निसर्गाचे चक्र पुढे चालण्यासाठी परमेश्‍वराने अनेक प्रकारच्या जोड्यांची योजना केली व अनेक प्रकारचे संधी केले. स्त्री-पुरुष हा एक त्यातलाच संधी. शरीर नीट चालावे म्हणूून अनेक प्रकारचे संधी केलेले सापडतात. मनगटात, कोपरात, मानेत, खांद्यात, कंबरेत, गुडघ्यात, पावलात वगैरे ठिकाणचे मोठे संधी दिसून येत असले तरीसुद्धा शरीरातील प्रत्येक स्नायू लवचिक असावा लागतो. संधिवातामुळे स्नायू जखडणे व कडक होणे हाही त्रास होऊ शकतो. वात म्हटला की तो वात आणतो व डोकेदुखी वाढवतो. एखादा मनुष्य फार बडबड करायला लागला तर आयुर्वेदाचा गंध नसणारी माणसेही उद्गारतात,""याने वात आणला''.

अति बडबड हे लक्षण वाताचे आहे हे आयुर्वेदाने सांगितलेले आहे. कुठलाही त्रास हा बहुतेक वेळा वाताने होतो. कारण, वातामुळे हव्या त्या हालचाली होत नाहीत. नको त्या हालचाली अधिक होतात. वातामुळेच वेदना होतात अशा तऱ्हेने वात मनुष्याला नाना प्रकारे त्रास देत राहतो. तो संधिवाताच्या रूपाने प्रकट झाला तर मग बघायलाच नको. बऱ्याच वेळा अग्नी वाताचा मित्र बनूून त्याला मदत करतो. अनेक जण नाना तऱ्हेचे चटक- मटक, तीक्ष्ण, पित्तकारक पदार्थ सेवन करतात, सारखे चिडतात व रागावतात. रागावल्याने शरीरात किती कॅलरीज उष्णता उत्पन्न होत असेल याचे गणित करण्यास कॅलक्‍युलेटर पुरणार नाही. रागाने आतमध्ये डंख कोरला गेला तर द्वेषाच्या वा सूडाच्या रूपाने शरीरातील भट्टी कायमसाठी पेटती राहते. अशा रीतीने शरीरात उष्णता तयार केली, जागरणे केली, की तयार झालेला अग्नी वाताला बोलावतो आणि वात व अग्नी यांचा संगम झाला की शरीरातील जीवनसत्त्वे वाळू लागतात, स्नायू कडक होतात, सांध्यात असलेले वंगण द्रव्य कमी होते वा वाळून जाते आणि वाढलेला वात संधिवात या स्वरूपात त्रास देऊ लागतो.

कणिक मळता येत नाही, वेणी घालण्यासाठी खांदा उचलता येत नाही, हातात पेन धरता येत नाही, मान डगडगते, पाय हलतात, कंप जाणवतो अशी लक्षणे घेऊन संधिवाताचे रोगी येतात. संधिवाताने त्याच्या इतर भाऊबंदांना बोलावले तर पाय वाकडे होणे, हातापायाची बोटे वेडीवाकडी होणे असा त्रास होऊ लागतो. फार पूर्वी एक बाई माझ्याकडे आल्या व मला जेवणासाठी येण्याचा आग्रह करू लागल्या. त्यांची पुरणपोळी गावात वाखणण्यासारखी असे पण त्यांची बोटे वाकडी झाल्याने त्या पुरणपोळी करू शकत नव्हत्या. माझ्या इलाजाने त्यांची बोटे सरळ झाली म्हणून मी त्यांच्याकडे पुरणपोळीचे जेवण करण्यासाठी यावे असा त्यांचा आग्रह होता. असेच दुसरे एक गृहस्थ होते ज्यांच्या पत्नीची पालिताण्याचे दर्शन करण्याची फार इच्छा होती पण संधिवाताने ग्रासल्याने त्या त्यांच्या घरातून खाली येण्यासही अमसर्थ झाल्या होत्या. माझ्या उपचारांनी त्या पालिताण्याच्या दर्शनाला जाण्याइतपत बऱ्या झाल्याने त्यांच्या बरोबर मीही पालिताण्याला जावे असा त्यांचा आग्रह होता. मी त्यांना म्हटले,"" अशा तऱ्हेने मी रोज पुरणपोळ्या खाऊन पालिताणा वगैरे फिरायला लागलो तर दवाखान्यात कोण बसणार?'' सांगायचा हेतू असा की संधिवाताच्या बरोबरीने पुढे अनेक त्रास वाढू शकतात. संधिवात होऊ नये म्हणून आंबट, वातूळ पदार्थ खाणे टाळणे, शरीरातील आमाचा वेळच्या वेळी निचरा करणे. यासाठी पंचकर्मातील विरेचन, बस्तीएवढा उत्तम उपाय नाही. तसेच रोज सांध्यांना "संतुलन शांती तेला'सारख्या तेलाचा मसाज केला तर आमवाताचा, पर्यायाने संधिवाताचा त्रास होणार नाही.

- डॉ. श्री बालाजी तांबे
www.ayu.de

No comments:

Post a Comment

ad