Monday, March 31, 2008

देवाची दिशा आणि देवाची खोली

-प्रसाद केळकर

पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा. घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असो की मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. म्हणूनच थोडेसे पूजाघराविषयी..

वास्तुचा ईशान्य कोपरा म्हणजे ईश्वरीस्थान, परमेश्वराचे स्थान असे जरी मानले जात असले तरी ह्या
कोप-याला 'पूजे' पेक्षा प्रथम 'प्रवेश' व मग 'पाणी' या गोष्टींसाठीच प्रथम प्राधान्य देणे वास्तुधारकाच्या दृष्टीने जास्त फायदयाचे ठरते. कारण ईशान्य दिशा ही 'पूजेची' नसून 'पूजनीय' आहे, हे सर्व प्रथम लक्षात घेतले पाहिजे. वास्तुचा ईशान्य कोपरा हा जास्तीत जास्त मोकळा व वजनाने हलका असावा. त्याचबरोबर तो कमी उंचीचा तसेच जास्त उताराचा असावा, रमणीय, मनोहरव प्रसन्न दिसावा, जास्तीत जास्त स्वच्छ, सुंदर व पवित्र ठेवावा असे असेल तरच ईशान्य दिशेचे व त्या कोप-याचे जास्तीत जास्त फायदे मिळतात.

एखादया वास्तुला पूर्व ईशान्य किंवा उत्तर ईशान्य यासारख्या 'उच्च स्थानी' मुख्य दरवाजा म्हणजे वास्तुशास्त्राच्या परिभाषेत सिंहद्वार हे शुभलक्षण मानले जाते. त्यामुळे ईशान्येच्या कोप-यात व्हेंटिलेटर, त्याच्या आजूबाजूच्या खिडक्या, त्या ठिकाणचा लो - प्रोफाईल मधला पोर्च, दरवाजासमोरील कमी उंचीचा कट्टा किंवा ओटा, त्याच्या पाय-या इत्यादी गोष्टीं येतात. त्यामुळे हा कोपरा आपोआपच 'हलका', मोकळा, उताराचा, कमी उंचीचा व कमी जडत्वाचा होतो. त्यामुळे सकाळची सूर्यप्रकाशाची सर्व सौम्य व उपयुक्त किरणे आपल्या वास्तुमध्ये थेट प्रवेश करतात. मुख्य दरवाजाला जोडून असलेला हॉल, बैठक खोली, सिटआउट हा भाग वास्तुच्या 'प्रथम दर्शनी' भागात येतो. त्यामुळे साहजिकच दरवाजासमोरील, आतील, बाहेरील आणि आजूबाजूची जागा आपण जास्तीत जास्त स्वच्छ, सुंदर व पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्या वास्तुधारकाला ईशान्य भागाची सर्व शुभ फळे आपोआपच प्राप्त होतात.

वास्तुच्या या ईशान्य कोप-यामध्ये जर 'ईश्वर स्थान' म्हणून तुम्ही 'पूजाघर' बांधले तर पहिले नुकसान हे होते की पूर्व ईशान्य किंवा उत्तर ईशान्य या दोन्ही पैकी कुठल्याही उच्च स्थानी त्या वास्तुचे सिंहद्वार निर्माण करता येत नाही. त्यामुळे साहजिकच वरील सर्व शुभफलांच्या प्राप्तीपासून वंचित व्हावे लागते. हा झाला एक भाग आणि त्याहुनही महत्वाची बाब म्हणजे वास्तुच्या ईशान्य कोप-यामध्ये जर पूजाघर बांधले तर तो कोपरा 'पॅक होतो व 'जड' होतो. कारण अशाप्रकारे बांधल्या जाणा-या पूजाघराला एवादी दुसरी खिडकी किंवा व्हेंटिलेटर वगळता एकच दरवाजा ठेवला जातो.

वास्तुच्या ईशान्य कोप-यामधे पूजाघराची निर्मिती करण्यापेक्षा पूर्व ईशान्य किंवा उत्तर ईशान्य यासारख्या उच्च स्थानी वास्तुचे मुख्य दार बसवणेचे जास्त फायदेशीर व लाभदायक ठरते. मग आता तुम्ही म्हणाला की वास्तुमध्ये पूजाघर बांधावे तरी कोठे ? ज्यांना पूजेसाठी देवघर, पूजागृह म्हणून 'स्वतंत्र खोली' बांधायची असेल त्यांनी वास्तुच्या पूर्व किंवा उत्तर भागामध्ये पूजाघराची निर्मिती करावी आणि जर का जागे अभावी तुम्हाला स्वतंत्र पूजाघर बांधणे शक्य होत नसेल तर त्यांनी पूजेचे देव, देव्हारा आग्नेयच्या स्वयंपाक गृहातील ईशान्य कोप-यात ठेवावे.

देव्हा-यातील - पूजाघरातील रचना खालील प्रमाणे असावी.

देव्हा-यातील सर्व देव - देवतांच्या मूर्ती तोंडे पश्चिमेस असावी. म्हणजे पूजा करणा-या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पध्दतीने देव - देवतांची मांडणी करावी. शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे (शिवलिंगाचे) निमुळते टोक उत्तरेकडे करुन ठेवावे. मारुतीच्या मूर्तीचे किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडे तर गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्तीचे किंवा फोटोचे तोंड उत्तरेकडे करुन ठेवावे.

पूजा घरातील दिवा, समई, निरांजन आग्नेय कोप-यात ठेवावे तर धूप, उदबत्ती स्टँड वायव्य कोप-यात ठेवावे. पूजा घरात पांढ-या - पिवळसर रंगाची संमगरवरी फरशी जरुर बसवावी. पूजाघराला तोरण असावे, उंबरठा असावा. पूजाघरातील होमकुंड, अग्निकुंड आग्नेय दिशेस असावे. पूजा, जप, तप, अनुष्ठान, पारायण, सप्ताह वगैरे करताना पूवेर्कडे किंवा उत्तरेकडे तोंड करुन बसावे.

वास्तुमध्ये आग्नेय, दक्षिण, नेऋत्य, पश्चिम, वायव्य या भागात चुकूनही पूजा घर नसावे. देव देव्हारा ठेऊ नये. पूजा करु नये. अशा ठिकाणी केलेली पूजा- जप - तप, आराधना - उपासना, पारायण - सप्ताह इत्यादी गोष्टी निष्फळ ठरतात.

No comments:

Post a Comment

ad