Wednesday, September 12, 2012

आरोग्यस्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

जीवनाचे लक्ष्य तन-मन-आत्म्याने कुठल्याही अडचणीशिवाय साधता यावे, हीच मुक्‍ती व हाच मोक्ष. त्यात पहिला अडसर येतो तो शारीरिक अनारोग्याचा. शरीराला आरोग्यवान ठेवण्यासाठी आवश्‍यकता असते अन्नाची व आचरणाची; परंतु मन हे शरीराच्या आरोग्याचा विचार न करता स्वतःला जे आवडेल किंवा स्वतःने जे ठरविले असेल तोच आहारविहार निवडते. यातून उद्‌भवतो अनावस्थेचा प्रसंग. ज्यात भोगावे लागतात शारीरिक हाल, तोंड द्यावे लागते रोगांना. एका बाजूने मनाला येईल ते खाण्याचे स्वातंत्र्य व दुसऱ्या बाजूने रोगाने होणारे शोषण हे पारतंत्र्य. अशा स्वातंत्र्याचा काय उपयोग? आरोग्यस्वातंत्र्याचा सूर्य पाहायचा असेल तर आयुर्वेदातल्या स्वस्थ वृत्ताच्या नियमांकडे डोळेझाक करता येणार नाही.

हे सर्व विश्‍व व जीवन चालवणारी अशी एक सुसूत्र व्यवस्थित संकल्पना आणि शक्ती अस्तित्वात आहे हे प्रत्येकास जाणवतेच, तसेच काही गोष्टी किंवा प्रसंग हे अनाकलनीय राहतात. या सर्व संकल्पना ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला देव असे म्हटले जाते. या देवाशी म्हणजेच सर्व विश्‍वाशी संबंध जोडणारा तो धर्म समजला जातो. तेव्हा देव आणि धर्म यांच्यापासून सुटे होणे किंवा स्वातंत्र्य मिळविणे ही केवळ काल्पनिक मनोधारणा होऊ शकते. इंद्रियांना जेवढे समजते तेवढेच सत्य, हा झाला भौतिकवाद, परंतु त्याच्याही पलीकडे असलेल्या अनाकलनीय अस्तित्वाचा परिणाम होताना नक्कीच दिसतो, हा झाला अध्यात्मवाद. म्हणून आत्मविश्‍वास आणि श्रद्धा याच्यापासून स्वतंत्र होता येत नाही. म्हणजेच मनाला स्व-तंत्राप्रमाणे वागून चालत नाही.

विश्‍वनियमांना आणि निसर्गनियमांना धरून, तसेच कालबाह्य न होणारे असे आयुर्वेद हे शास्त्र सृष्टीतील सर्व प्राणिमात्र आणि त्यातल्या त्यात मनुष्यमात्र यांचे शारीरिक, मानसिक व आत्मिक जीवन प्रगल्भ होऊन त्याला आरोग्यस्वातंत्र्य नित्य अनुभवता यावे यासाठी तयार केलेले आहे. त्यामुळे ते जुने (out dated) कधीच होत नाही. त्यात सांगितलेले नियम, ऋतुचर्या, आहार-विहार, स्वास्थ्याचे नियम हे सर्व बदलून चालणार नाहीत, पण ते का व कशासाठी सांगितले, हे समजून घेऊन आजच्या काळातही ते कसे पाळायचे, एवढेच प्रत्येक मनुष्याच्या हातात असते. आयुर्वेदच नव्हे, तर श्रीमद्‌भगवद्‌गीता, वेद, उपनिषदे यातील सर्व ज्ञान हे मनुष्यमात्राला कायम उपयोगी पडणारे म्हणजे आधुनिक काळातही उपयोगी पडणारे आहे. बदललेल्या परिस्थितीत जीवनाचा हेतू व निसर्गाचे विज्ञान बदलत नसते, तेव्हा त्यात सांगितलेले नियम कसे पाळायचे, एवढेच ठरविणे मनुष्याच्या हातात असते व असे केल्याने आरोग्यस्वातंत्र्य उपभोगता येऊ शकते. काही नियम अवघड वाटले तरी ते शेवटी अंतिम फायद्याचे म्हणजेच श्रेयस्करही आहेत, हे लक्षात ठेवून आयुर्वेदच मनुष्याला खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव देऊ शकतो.

मनाला असे वाटते, की मनच सर्वांत मोठे, सर्वांवर राज्य करणारे, सर्वांत शहाणे आणि सर्व भोग मी एकट्यानेच घ्यावेत. भोग ज्या शरीराच्या माध्यमातून घ्यायचे त्या शरीराचा विचार न करता, म्हणजेच स्वतःच्या प्रकृतीला न झेपतील असे भोग घेण्याचे स्वातंत्र्य मनाला हवे असते. लहान मुलालाही त्याच्या मनाविरुद्ध काही झालेले आवडत नाही; परंतु मनाला जे चांगले ते शरीराला व आत्म्यालाही चांगले असावे हा विचार न करता मन स्वतंत्रपणे वागण्याचा प्रयत्न करते. कौटुंबिक आणि सामाजिक परंपरा आणि आजूबाजूच्या सर्वांना आवडेल, न आवडेल याचा विचार न करता आहारविहार करणे, वाटेल तसे कपडे घालणे, मैथुनादी क्रिया करणे हे मनाला आवडते आणि तसे वागणे म्हणजे स्वातंत्र्य मिळाले, अशी समजूत करून घेतली जाते. या समजुतीला पुष्टी म्हणून आर्थिक स्वातंत्र्य मिळाले म्हणजे सर्व काम झाले, असे मन ठरविते. परंतु अशा मानसिक स्वातंत्र्यामुळे आपल्या स्वतःच्या माणसांपासून, समाजापासून दूर होणे, एकटेपणा अनुभवणे आणि त्यातून शारीरिक रोग आणि मानसिक विकृती उत्पन्न होणे व शेवटी अधोगती होणे यांना तोंड द्यावे लागते. एखाद्या गोष्टीपासून त्रास होतो म्हणून त्यापासून मुक्ती मिळवताना दुसऱ्या त्रास देणाऱ्या गोष्टी ओढवून घेण्यात काहीच अर्थ नाही.

काळाचे गणित समजणे बऱ्याच वेळा खूप अवघड असते. प्रत्येक व्यक्‍ती 30 वर्षांपूर्वीच्या आपल्या आधीच्या व्यक्‍तीला "जुन्या काळातील व्यक्‍ती' असे संबोधते. "त्या वेळी परिस्थिती वेगळी होती, आता काळ पुढे गेला आहे, आता सुधारणा झाल्या आहेत, जग बदलले आहे,' अशा तऱ्हेचे प्रस्ताव मांडून स्वतःचे मन मानेल तसे वागण्याचे समर्थन केले जाते. हीच गोष्ट पिढ्या न्‌ पिढ्या चालू राहिलेली दिसते. आधुनिकता म्हणजे काय, काळ ही काय चीज आहे हे पूर्णपणे समजलेले दिसत नाही. जुन्या परंपरा मोडून काढाव्यात व जग बदलेल तसे वागावे, असे म्हणणे सोपे आहे; पण त्या परंपरा काही विशिष्ट फायद्याच्या हेतूने व स्वातंत्र्याचा आनंद घेत असताना त्याची शारीरिक पातळीवर भलतीच किंमत मोजावी लागू नये, यासाठी तयार केलेल्या असू शकतात, हे विचारात घेणे आवश्‍यक आहे. एका बाजूने परंपरा सांभाळत असता दुसऱ्या बाजूने काळाबरोबर बदल घडवणे, एका बाजूने स्वातंत्र्य उपभोगत असता मनाच्या वृत्ती भरकटणार नाहीत हे बघावे लागेल, तरच कुठल्या तरी अडचणीत न सापडता म्हणजे नवीन नवीन रोगाला तोंड न द्यावे लागता, मानसिक असंतुलन, नैराश्‍य यांना सामोरे जावे लागणार नाही, हेही पाहणे आवश्‍यक ठरते. परंपरा व सामाजिक रूढी पाळत असताना व्यक्तीच्या नैसर्गिक गरजा पूर्ण होतात की नाही, हेही पाहावे लागते. खरे तर प्रत्येक व्यक्तीने म्हणजे त्याच्या मनाने स्वतःपुरते स्वार्थी विचार न जोपासता सर्वांचे हित होईल व सर्व सुखी होतील, हे उद्दिष्ट ठेवून स्वातंत्र्याचा विचार करावा लागेल.

बऱ्याच वर्षांच्या पारतंत्र्यानंतर भारत देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र होऊनही आता अनेक वर्षे लोटली आहेत. देश स्वतंत्र झाला म्हणजे भारतीय स्वतंत्र झाले. भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले म्हणजे त्यांना प्रत्यक्षात काय मिळाले? देशातील लोकांना न आवडणाऱ्या, त्यांच्या हिताच्या व त्यांना समृद्धीकडे नेणाऱ्या वाटा रोखणाऱ्या गोष्टी कराव्या लागणे आणि शोषण होणे म्हणजे पारतंत्र्य आणि त्यातून मुक्‍ती हे स्वातंत्र्य.

प्रत्येक व्यक्‍तीला दैनंदिन जीवनात दुसऱ्याची गुलामगिरी करावी लागू नये, आनंदाने जगता यावे, आपले देशबांधव व कुटुंबीय यांच्याबरोबर आरोग्यपूर्ण सुखाने जगता यावे यासाठी स्वातंत्र्य हवे असते. परकीयांची सत्ता गेली व ते करत असलेले शोषण थांबले, पण इतर कुठल्याही प्रकारचे शोषण चालू राहिले तर त्या स्वातंत्र्याचा काय उपयोग? आरोग्यस्वातंत्र्याचेही असेच असते. मनुष्याला अस्तित्वात येण्याबरोबरच मिळालेले शरीर, मन व आत्मा या सर्व साधनांद्वारा जीवन फुलवून, आनंदात जगून, ज्या ठिकाणाहून मनुष्य पृथ्वीवर आला त्या मूळ स्थानाकडे जाता यावे, तेथे पुन्हा आनंदाने समर्पित होता यावे हा स्वातंत्र्याचा मूळ उद्देश. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "जयो।स्तु ते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे' या काव्यात "मोक्ष मुक्‍ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती, स्वतंत्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती' असे म्हटलेले आहे. तेव्हा जीवनाचे लक्ष्य तन-मन-आत्म्याने कुठल्याही अडचणीशिवाय साधता यावी, हीच मुक्‍ती व हाच मोक्ष. त्यात पहिला अडसर येतो तो शारीरिक अनारोग्याचा.

शरीराला वाढते ठेवण्यासाठी, आरोग्यवान ठेवण्यासाठी आवश्‍यकता असते अन्नाची व आचरणाची. परंतु मन हे शरीराच्या आरोग्याचा विचार न करता स्वतःला जे आवडेल किंवा स्वतःने जे ठरविले असेल तोच आहारविहार निवडते. यातून उद्‌भवतो अनावस्थेचा प्रसंग. ज्यात भोगावे लागतात शारीरिक हाल, तोंड द्यावे लागते रोगांना. एका बाजूने मनाला येईल ते खाण्याचे स्वातंत्र्य व दुसऱ्या बाजूने रोगाने होणारे शोषण, हे पारतंत्र्य. अशा स्वातंत्र्याचा काय उपयोग?

तेव्हा आरोग्यस्वातंत्र्याचा सूर्य पाहायचा असेल तर आयुर्वेदातल्या स्वस्थ वृत्ताच्या नियमांकडे डोळेझाक करता येणार नाही.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad