Saturday, January 7, 2012

ऊब सूर्याची

डॉ. श्री बालाजी तांबे


उगवत्या सूर्याचा प्रकाश कृमीनाशक असतो. मनुष्याची स्थूलता दूर करण्यासाठी आतपसेवन उपयुक्‍त असते. त्वचारोग नाहीसा करण्यासाठी, अंतःशुद्धीसाठी सूर्यकिरणांचा उपचार म्हणून वापर केला जातो.

थंडीचा कडाका वाढला, की सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेण्यासारखे दुसरे सुख नसावे. वर्षभर ऊब देण्याचे काम सूर्यनारायण करत असतातच, पण हिवाळ्यात ही ऊब हवीहवीशी वाटणारी असते.

सूर्यकिरणांच्या माध्यमातून सूर्य ऊब तर देतोच; शिवाय आरोग्य राखण्यासही मोठा हातभार लावत असतो. दमट हवामानात, अंधाऱ्या जागी जीवजंतू वाढतात, रोगराई फैलावते, हे सर्वज्ञात आहे. सूर्यप्रकाशात मात्र जंतुसंसर्गाचा आपोआपच प्रतिबंध होत असतो. वेदांमध्ये तर उगवत्या सूर्याचा प्रकाश कृमीनाशक असतो असे स्पष्ट सांगितले आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत असावी; घर, मंदिर, चिकित्सागृह वगैरेंचे मुख्य दार पूर्वेकडे असावे असा वास्तुशास्त्राचा नियम असावा.

सूर्याची ऊब सूर्यकिरणांतून मिळते; मात्र त्यांचा संपूर्ण फायदा होण्यासाठी ती कोवळी असावी लागतात. सूर्यकिरणांतून "ड'जीवनसत्त्वाची पूर्ती होते, असे आधुनिक शास्त्रातही सांगितलेले आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये हाडे ठिसूळ झाल्याने हात-पाय वाकू लागले (मुडदूस) तर सध्याच्या काळातही "सौरचिकित्सा' म्हणजे सूर्यप्रकाशात बसवले जाते. शरीराचा फिकटपणा, निस्तेजता कमी होण्यासाठीही सूर्याची ऊब महत्त्वाची असते. त्वचा तेजस्वी व्हावी, त्वचेवर नैसर्गिक चमक यावी यासाठी आजही थंड प्रदेशातील म्हणजे नैसर्गिक सूर्यप्रकाश कमी असणाऱ्या ठिकाणचे स्त्री-पुरुष प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा किंवा सूर्यकिरणांप्रमाणे असणाऱ्या विशिष्ट किरणांचा उपयोग करतात. तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळवंडू शकते, हेही सर्वज्ञात आहेच.

आतपसेवनाचा उपचार
आयुर्वेदानेही वजन कमी करणाऱ्या, शरीराला हलकेपणा आणणाऱ्या उपचारांमध्ये "आतपसेवन' म्हणजे सूर्यप्रकाशात बसण्याचा समावेश केला आहे.

लंघनप्रकारः आतपसेवनम्‌ ।
ध्यबलस्थूलमनुष्येषु स्थौल्यापनयनाय ।...चरक सूत्रस्थान

चांगली किंवा मध्यम ताकद असणाऱ्या स्थूल मनुष्याची स्थूलता दूर करण्यासाठी आतपसेवन उपयुक्‍त असते.
सुश्रुतसंहितेत सूर्यकिरणांचे अजूनही फायदे सांगितले आहेत,

दुष्टव्रणपीडितेषु कुष्ठिषु तैलपानाभ्यङ्‌गाद्‌ अनन्तरमन्तःशोधनार्थं प्रयुक्‍तश्‍चिकित्सोपक्रमः ।
जुना, दूषित व्रण नष्ट करण्यासाठी, त्वचारोग नाहीसा करण्यासाठी, अंतःशुद्धीसाठी सूर्यकिरणांचा उपचार म्हणून वापर केला जातो.
स्वेद उपचार समजावतानाही अनेक ठिकाणी उन्हाचा वापर केलेला आढळतो. काही मानसिक रोगांवर उपचार म्हणून उन्हात बसवावे, झोपवावे असे उल्लेख सापडतात. एकंदरच आरोग्य टिकवताना किंवा मिळवताना सूर्याची मोठी आवश्‍यकता असते.

ब्रह्मांडी सूर्य, तैसे पिंडी पित्त
"पिंडी ते ब्रह्मांडी' हा आयुर्वेदातला महत्त्वाचा सिद्धान्त आहे. जे काही विश्‍वात आहे ते सर्व सूक्ष्म स्वरूपात शरीरात आहे. याच तत्त्वानुसार जसा बाह्य जगतात सूर्य आहे, तसे शरीरात पित्त आहे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.

विसर्गादानविक्षेपैः सोमसूर्यानिलः यथा ।
धारयन्ति जगद्देहं कफपित्तानिलस्तथा ।।

सूर्य जसे बाह्यसृष्टीत परिवर्तनाचे, पचनाचे काम करतो, तसेच त्याचे प्रतीकस्वरूप असणारे पित्त अन्नपचनासाठी शरीरातील धातुपरिवर्तनासाठी जबाबदार असते. हेच पित्त शरीराची ऊब कायम ठेवण्यासाठी मदत करणारे असते.

सूर्याचा आणि पित्ताचा प्रवासही एकाच पद्धतीने होत असतो. दुपारी बारा वाजता सूर्य सर्वाधिक प्रखर असतो, याच वेळी शरीरातील पाचकपित्ताची पाचनक्षमता सर्वोत्तम असते. म्हणूनच दुपारचे जेवण वेळेवर घ्यावे व चारही ठाव परिपूर्ण असावे असे आयुर्वेद सांगतो.

सूर्याच्या उबेत तेलाची सिद्धता
अशा प्रकारे सूर्याचा उपयोग आयुर्वेदाने अनेक प्रकारांनी करून घेतला आहे. यालाच योगशास्त्राने जोड दिली आणि त्यातून सूर्यनमस्कार हा योगप्रकार साकार झाला.

सूर्याच्या उष्णतेचा उपयोग आयुर्वेदाने काही विशिष्ट तेले बनविण्यासाठी केला आहे. शिरोरोगावर "महानील' नावाचे तेल सांगितले आहे.
या तेलाचे वैशिष्ट्य असे, की हे तेल सिद्ध करण्यासाठी अग्नीचा उपयोग केलेला नाही, तर "आदित्यपाक' करायला सांगितला आहे.

कुर्यात्‌ आदित्यपाकं वा यावत्‌ शुष्को भवेत्‌ रसः ।...अष्टांगसंग्रह उत्तरतंत्र
आदित्यपाक करण्यासाठी सर्व गोष्टी लोखंडाच्या भांड्यात एकत्र करून भांडे उन्हात ठेवले जाते व सूर्याच्या उष्णतेने हलके हलके त्यातला जलांश उडून गेला की उरलेले तेल गाळून घेऊन वापरले जाते. सूर्यशक्‍तीचा असाही वापर करून घेतलेला आहे.

त्वचारोगासाठी आतपस्वेद
याशिवाय त्वचारोगावर उपचार करतानाही आतपस्वेद म्हणजे सूर्यकिरणांच्या उष्णतेचा उपयोग करून घेतला आहे.

कुष्ठ, तमालपत्र, मनःशिळा वगैरे द्रव्ये तेलात मिसळून तयार झालेल्या मिश्रणाचा तांब्याच्या भांड्याला लेप करावा व नंतर तो लेप "सिध्म कुष्ठ' (एक त्वचारोग) झालेल्या ठिकाणी लावून रुग्णाला उन्हात बसवावे. याप्रमाणे सात दिवस केल्यास सिध्म कुष्ठ बरे होते, असे चरक संहितेत सांगितलेले आढळते.
याचप्रमाणे कोड आले असताही विशिष्ट औषधांचा लेप लावून किंवा औषधी तेल लावून त्या ठिकाणी सूर्यप्रकाश घ्यावा असे सांगितले जाते. काही पाठात तर रक्‍तशुद्धीकर वनस्पतींचा रस पिऊन अंगाला तेल लावून सूर्यकिरणात बसायला सांगितले आहे.

सुश्रुतसंहितेमध्ये सूर्यप्रकाशाचा उपयोग जलशुद्धीसाठीसुद्धा सांगितला आहे.

व्यापन्नस्य चाग्निक्वथनं सूर्यातपप्रतापनं....। सुश्रुत सूत्रस्थान

दूषित पाणी निर्दोष करण्यासाठी अग्नीच्या उष्णतेने कढवावे किंवा सूर्यप्रकाशात (उन्हात) सडकून तापवावे.

सूर्यशक्‍तीचा संबंध आपल्या शरीरातील चेतासंस्थेच्या व हाडांच्या आरोग्याशीही असतो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे अंधार नाहीसा झाला की निसर्ग जागा होतो व सर्वदूर उत्साह संचारतो, तसेच मेंदू व चेतातंतूंचे अभिसरण व्यवस्थित होण्यासाठी, चेतनत्व येण्यासाठीही सूर्यशक्‍तीची आवश्‍यकता असते.
स्वतःची प्रकृती, वय, प्रदेशानुसार सूर्यकिरणांची तीव्रता वगैरे गोष्टींचा नीट विचार करून सूर्यशक्‍तीची उपासना केली, सूर्याची ऊब मिळवली तर तनाचे व मनाचेही आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत मिळेल हे नक्की.

सूर्यनमस्काराचा फायदा
सूर्यनमस्कार मुळात उगवत्या सूर्याकडे तोंड करून करायचे असतात. यामुळे कृमिनाशन आपोआपच घडते, शिवाय सूर्यनमस्कारात समाविष्ट केलेल्या आसनांचाही फायदा मिळतो. सूर्यनमस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे ते करायला फारसा वेळ लागत नाही, पण त्यातून अनेक आसनांचे फायदे मिळतात. नियमितपणे सूर्यनमस्कार घालायला लागले की त्यातून श्‍वासाचेही नियंत्रण आपोआपच साधले जाते.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad