Wednesday, March 19, 2014

पाठदुखीमुळे मन अस्वस्थ होते, जीव त्रस्त होतो. एवढेच नव्हे, तर इंद्रियांना काम करण्यासाठी संवेदना व शक्‍ती पूर्ण न मिळाल्यामुळे जीवन यशस्वी करण्यास अडचण येऊ शकते. शरीरात घडणाऱ्या सर्व घटना, शरीराने केलेल्या सर्व हालचाली, इंद्रिये करतात ते सर्व काम मुख्यतः पाठीलाच करावे लागते. त्यामुळेच काही चांगले काम केले की शाबासकी मिळते ती पाठीलाच.

काही चांगले काम केले की पाठ थोपटायची पद्धत असते; तसेच आत्मीयतेची, मित्रत्वाची थापही पाठीवरच असते. हात, पाय, तोंड वगैरे अवयव काम करतात; पण केलेल्या कामाची शाबासकी मात्र मिळते पाठीला. असे का असावे? याचे साधे, सोपे कारण असे आहे, की शरीरात घडणाऱ्या सर्व घटना, शरीराने केलेल्या सर्व हालचाली, इंद्रिये करतात ते सर्व काम मुख्यतः पाठीलाच करावे लागते. पाठीवरच्या थापेमुळे पाठीतील ताणाला व दुखण्याला बरे वाटते. पाठ म्हणजे मुख्यतः मेरुदंड. शरीरात अनेक अंतरेंद्रिये व बहिरेंद्रिये काम करत असतात; परंतु पाठीच्या आता असलेल्या मज्जारज्जूचे संरक्षण करण्यासाठी जेवढी काळजी घेतलेली दिसते, त्याभोवती जेवढे मजबूत कवच दिलेले दिसते, तेवढे संरक्षण शरीरातील कुठल्याही अवयवाला दिलेले दिसत नाही. मज्जारज्जूचे संरक्षण करणाऱ्या मेरुदंडाची रचना खूप गुंतागुंतीची असते. शरीर डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, मागे, पुढे कुठेही वाकवावे लागते त्यामुळे मेरुदंडाची विशेष रचना केलेली दिसते. जिला 24 बाय 365 नव्हे तर 24 बाय 36500 दिवस (100 वर्षांच्या आयुष्यात 24 तास) काम करावे लागते ती आहे पाठ व मज्जारज्जू. शरीराच्या सर्व तऱ्हेच्या हालचाली, मग त्या स्वेच्छेने असोत, अजाणतेपणी केलेल्या असोत किंवा रिफ्लेक्‍स म्हणून झालेल्या असोत; त्या सर्व मज्जारज्जूंच्या मार्फत चालतात. आरोग्यशास्त्रात ज्याला इफरंट व एफरंट संवेदना (मेंदूकडून येणाऱ्या व मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना) त्या सर्व मज्जारज्जूच्या मार्फत चालू असतात. मेरुदंडामध्ये रज्जू असते व त्यात विशिष्ट द्रवही असतो, जो मेंदूत असलेल्या द्रवाशी जोडलेला असतो. काही काम या द्रवात असलेल्या विशेष गुणामुळे होते व काही काम मज्जातंतूंमार्फत मज्जारज्जूतून होऊ शकते. उजव्या हाताचे पहिले बोट उंच करावे असा विचार बोटापर्यंत पोचवून ते हलवायला लागणारी शक्‍ती पुरविण्याचे काम, तसेच बोट किती उंच करायचे, किती वाकवायचे, हे सर्व कार्य मज्जारज्जूमार्फत चालते. तसेच कुठेतरी पायावर मुंगी चढली तर येणारी संवेदना मेंदूला कळविण्याचे कामही मज्जारज्जूमार्फतच चालते.

मज्जारज्जूवर ताण नको
मेरुदंड वर किंवा खाली पक्का बांधलेला नसतो. तर तो वर व खाली अशा दोन्ही बाजूंना लटकल्यासारखा असतो. मांस, मज्जा यांच्या साह्याने त्याला जागेवर ठेवलेले असते. ज्याच्या आत मज्जारज्जू असतो, तो मेरुदंड हाडांनी बनलेला असल्याने वजनदार असतो. मनुष्य काम करत असताना, उभे असताना, बसलेला असताना मेरुदंड खालच्या बाजूला सरकण्याची शक्‍यता असते. म्हणून वयानुसार मानेची लांबी कमी होऊन डोके खांद्याकडे टेकायला सुरुवात होते, मेरुदंड खाली उतरायला लागतो. उतरलेला मेरुदंड नुसतीच मनुष्याची उंची कमी करतो असे नव्हे, तर मेरुदंडातून निघणारी नस दबली गेल्यामुळे हातापायांना मुंग्या येणे, बधिरता येणे वगैरे त्रास होऊ शकतात. योगशास्त्रातील षट्‌चक्रे वैश्‍विक शक्‍ती व शरीरातील शक्‍ती, तसेच प्राणशक्‍ती, विचारांतील शक्‍ती, इच्छाशक्‍ती अशा शक्‍तीच्या अनेक स्पंदनांना एकमेकांशी पाहिजे तेव्हा संपर्क ठेवून किंवा संपर्क न ठेवता आपापल्या मार्गाने जाण्यासाठी केलेली व्यवस्था असते. हेसुद्धा सगळे मज्जारज्जूशीच जोडलेले असते.

एकूण काय, तर मज्जारज्जूवर एकूण खूप ताण असतो. मज्जारज्जूवर ताण आला तर पाठीचे स्नायू ताणले जातील, यात काही संशय नाही. त्यामुळे मानेचे, खांद्याचे, कंबरेचे स्नायू दुखतात, असा अनेकांचा अनुभव असतो. सतत चालणाऱ्या चलनवलनामुळे वातवृद्धी होते. सरळ न बसणे, काम करताना मेरुदंडाला त्याच्या मूळ आकारात न ठेवता काम करणे, गुडघ्यात न वाकता कंबरेत वाकून वजन उचलणे, खुर्चीवर वेडेवाकडे बसणे, खुर्चीच्या खाली पाय घालून उगाचच हलवत बसणे अशा तऱ्हेच्या चुकीच्या वागण्यामुळेही मज्जारज्जूवर ताण येऊन पाठदुखीची सुरवात होते.

सूर्यनमस्कार हा उत्तम उपाय
सूर्यनमस्कारासारखी आसने करणे, प्राणायामाने नाडीशुद्धी करणे, प्रकृतीला अनुकूल व सात्त्विक आहाराचे सेवन करून शरीराच्या सर्व स्नायूंमधील वात-पित्त कमी ठेवणे, योग्य वेळेस पोट साफ ठेवणे, पोटाचा घेर वाढू न देणे, कंबरेपासून मानेपर्यंत तेल लावून अभ्यंग करणे (कुंडलिनी तेल) वगैरे उपचारांद्व्रारा पाठीच्या दुखण्यावर इलाज करावा लागतो.

मेरुदंडाची वा मणक्‍याची झीज झाल्यासही मज्जारज्जूवर ताण येण्याची शक्‍यता असते, त्यामुळेही पाठदुखी होऊ शकते. अपचनामुळे झालेल्या पोटातील वायूमुळे पाठ दुखू शकते. गरोदरपणात पोटाचे वजन पुढच्या बाजूला वाढल्यामुळे मेरुदंडावर बाक आल्याने पाठ दुखू शकते. तेव्हा पाठदुखीचे कारण शोधून काढून इलाज करावा लागतो.

पाठदुखीमुळे मन अस्वस्थ होते, जीव त्रस्त होतो. एवढेच नव्हे, तर इंद्रियांना काम करण्यासाठी संवेदना व शक्‍ती पूर्ण न मिळाल्यामुळे जीवन यशस्वी करण्यास अडचण येऊ शकते. म्हणून महत्त्व आहे मेरुदंडाचे, पाठीचे तसेच पाठीच्या आरोग्याचे.
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad