Wednesday, November 11, 2009

अन्नयोग : फळे


फळे खाणे आरोग्यासाठी हितकारक असते. पण फलाहार हा मुख्य आहाराचा पर्याय असता कामा नये. फळे सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत आणि जेवणानंतर लगेचही खाऊ नयेत. फळे दुधाबरोबर खाऊ नयेत. ती कापल्यानंतर लगेच खावीत.

- डॉ. श्री बालाजी तांबे


संतुलित आहारात फळांचा अंतर्भाव आवश्‍यक असतो. आयुर्वेदाने "फलवर्ग'' म्हणून वेगळा वर्ग सांगितला आहे. त्यात अनेक फळांची माहिती दिलेली आहे. योग्य प्रमाणात व प्रकृतीला अनुकूल फळे सेवन करणे आरोग्यासाठी हितकर होय. पण फळे सेवन करताना वेळ, पद्धत, प्रमाण याविषयी माहिती असायला हवी. प्रमाण - फळांविषयी माहिती घेताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळे आहाराच्या ऐवजी खाणे योग्य ठरू नये. आहारातला एक भाग इतक्‍या प्रमाणातच फळांचे सेवन करणे योग्य होय. महिन्यातून एक-दोन दिवस केवळ फलाहार करणे काही प्रकृतीसाठी सोसवणारे असू शकले किंवा विशेष वैद्यकीय देखरेखीखाली काही दिवस केवळ द्राक्षासारखा पथ्यकर फळांचे सेवन करता येत असले तरी उपवास किंवा डाएटच्या नावाखाली फक्‍त फलाहार दीर्घकाळपर्यंत किंवा वारंवार करणे योग्य नाही.

वेळ - फळे सकाळी रिकाम्या पोटी, विशेषतः अननस, संत्री, मोसंबीसारखी आंबट फळे, घेण्याने पित्त वाढताना दिसते. साधारणतः जेवणानंतर फळे खाण्यानेही ती पचणे अवघड होताना दिसते. साधारणतः जेवताना किंवा नाश्‍ता व दुपारच्या जेवणाच्या दरम्यान किंवा दुपारच्या जेवणानंतर व सूूर्यास्ताच्या दरम्यान फळे खाणे चांगले असते.

पद्धत - दूध व फळे एकत्र करून किंवा एकापाठोपाठ लगेच खाणे आयुर्वेदाने विरुद्ध अन्नात मोडले आहे. विरुद्ध अन्न सेवन करण्याने आम्लपित्त, आतड्यांना सूज येणे, ऍलर्जी, अंगावर गांधी, खाज वगैरे अनेक समस्यांना आमंत्रण मिळू शकते. तेव्हा फ्रुटसॅलड, मिल्कशेक वगैरे स्वरूपात फळे खाणे टाळणेच उत्तम. सध्या जगभरातल्या सर्व देशातली फळे सर्वत्र 12 महिने उपलब्ध असतात पण त्या त्या देशातील फळ त्या त्या देशातील लोकांच्या प्रकृतीला जसे मानवते व पचते ते तसेच इतर देशातल्या लोकांना पचेल असे नाही. तेव्हा रोज खायचे फळ आपल्याच देशातले आणि त्या फळांच्या ऋतूत तयार झालेले असणे चांगले.

फळांचे रस किंवा फळांचे तुकडे टिकण्याच्या दृष्टीने त्यावर विशेष प्रक्रिया करून हवाबंद डब्यात भरून हवे तेव्हा वापरण्याचीही आजकाल पद्धत आहे पण अशा फळांचे किंवा रसाचे सेवन करताना त्यात पोषणमूल्ये किती आहेत आणि ती शरीराला खरोखरच उपयोगी पडणार आहे का, याचे भान ठेवायला हवे. फळे कापल्यावर वा फळांचे रस काढल्यावर लगेच घेणे उत्तम असते. सहज उपलब्ध असणाऱ्या काही फळांची माहिती आपण घेणार आहोत.

द्राक्षे
आयुर्वेदात द्राक्षांना फलोत्तम म्हणजे सर्व फळात श्रेष्ठ असे सांगितले आहे,

पक्वं द्राक्षाफलं स्वर्यं मधुरं तृप्तिकारकम्‌ ।पाके स्निग्धं चातिरुच्यं चक्षुष्यं मूत्रलं गुरु ।।

तुवरं च सरं चाम्लं वृष्यं शीतं श्रमापहम्‌ ।। पित्तं श्‍वासं च कासं च छर्दिं शोथं भ्रमं ज्वरम्‌ ।।

दाहं मदात्ययं वातं वातपित्तं क्षतक्षयम्‌ ।....निघण्टु रत्नाकर

पिकलेली द्राक्षे चवीला गोड, किंचित आंबट व तुरट असतात, वीर्याने शीत असतात, चवीला रुचकर असतात, स्वर सुधारतात, तृप्तीकर असतात, गुणाने स्निग्ध असतात, थकवा खोकला, उलटी, ताप, चक्कर, दाह, क्षय, सूज वगैरे रोगात हितकर असतात.

द्राक्षा च गोस्तनी शीता हृद्या वृष्या गुरुर्मता ।

वातानुलोमनी स्निग्धा हर्षदा श्रमनाशिनी ।।

दाहमूर्च्छा श्‍वासकासकफपित्तज्वरापहा ।

रक्‍तदोषं तृषां वातं हृद्‌व्यथा चैव नाशयेत्‌ ।।....निघण्टु रत्नाकर

सबीज काळी द्राक्षे विशेषतः हृदयासाठी हितकर असतात, शुक्रधातूचे पोषण करतात, थकवा घालवतात व मनाला उल्हसित करतात, वाताचे अनुलोमन होण्यास सहायक असतात; दाह, मूर्च्छा, दमा, खोकला, ताप, रक्‍तदोष, तापात हितकर असतात, तहान शमवतात, वात-पित्त-कफ अशा तिन्ही दोषांना संतुलित करतात आणि हृदयातील वेदनेचा नाश करतात.

लघवी अडखळत होत असल्यास वा जळजळ होत असल्यास गोड द्राक्षांच्या रसात थोडीशी जिरेपूड टाकून घेण्याने बरे वाटते. याने लघवीचे प्रमाण वाढण्यासही मदत मिळते. पाळीच्या वेळेला कमी रक्‍तस्राव होत असल्यास, काळपट रंगाचा किंवा गाठींनी युक्‍त रक्‍तस्राव होत असल्यासही द्राक्षांचा रस, बडीशेप व जिऱ्याचे चिमूटभर चूर्ण टाकून घेण्याने सुधारणा होते. द्राक्षे खाण्यापूर्वी किंवा द्राक्षांचा रस काढण्यापूर्वी ती अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवणे व नंतर वाहत्या पाण्यात स्वच्छ धुणे चांगले होय.

No comments:

Post a Comment

ad