Monday, December 7, 2009

स्त्रीचे नवजीवन


रजःस्रावामुळे स्त्रीचे शरीर शुद्ध राहते, सौंदर्य टिकून राहते, त्वचा सुंदर राहते, आवाज गोड व मधुर राहतो. रजोनिवृत्तीनंतर स्त्रीला या गोष्टींना मुकावे लागू शकते व बाह्यउपचारांनी हे गुण कसेबसे टिकवावे लागतात. त्यामुळे जेवढी रजोनिवृत्ती लांबेल तेवढे स्त्रीत्व व तारुण्य जास्त काळ टिकून राहू शकते.

निवृत्ती म्हटली की कसेसेच व्हायला लागते. निवृत्त होताना जणू काही आता जीवनात काही उरले नाही, अशा तऱ्हेने माणसे वागायला लागतात. खरे पाहताना निवृत्ती कामाच्या बदलाची असते. निवृत्ती ही नवीन क्षेत्र समोर उघडण्यासाठी संधी देत असते. अनेक वर्षे जे काही केले त्या कामाने आलेला कंटाळा झटकून टाकून काहीतरी नवीन कार्य करण्याची निवृत्ती ही सुरवात असू शकते. तसे पाहताना निवृत्तीपूर्वीची काही वर्षे थोडे थोडे काम कमी करून इतर कार्यक्षेत्रात भाग घेतल्यास निवृत्तीची भीती वाटत नाही व निवृत्तीमुळे शरीर-मनावर काही विपरीत परिणाम होत नाहीत.

रजोनिवृत्तीच्या बाबतीतही असाच विचार करायला हरकत नसावी. रजोनिवृत्ती जरी फक्‍त स्त्रियांपुरती मर्यादित असली, तरीसुद्धा स्त्री-पुरुषही एक जोडी असल्यामुळे स्त्रीच्या निवृत्तीचा काही परिणाम पुरुषावर होतोच. "रज' हा शब्द रसरक्‍तासाठी वापरलेला आहे. ज्या प्रक्रियेद्वारा जन्म घेता येतो, त्याच्याशी संबंधित असलेला हा रसधातूचा उपधातू. स्त्रीच्या अंडाशयातून प्रत्येक महिन्याला जन्म देण्याची शक्‍यता असलेले एक बीजांड बाहेर पडते, हे बीज फलित न झाल्यास गर्भाशयातून बाहेर पडणारे रज (र+ज) ही साधी समजूत करून घ्यायला हरकत नाही. रजःप्रवृत्ती साधारणपणे मुलगी वयात आली की म्हणजे साधारण बाराव्या- तेराव्या वर्षापासून सुरू होते व ती प्रत्येक महिन्याला होत असल्याने त्याला मासिक धर्म असेही म्हटले जाते. बाराव्या-तेराव्या वर्षी सुरू झालेली व प्रत्येक महिन्याला तीन-चार दिवस चालणारी ही क्रिया अनेक वर्षे नित्यनियमाने सुरू असते. त्यामुळे स्त्रीचे स्त्रीत्व सिद्ध होते. या सर्व प्रक्रियेचे आरोग्य बरोबर असले तर संततीला जन्म देण्याची शक्‍यता म्हणजेच स्त्रीला मातृत्व प्राप्त होण्याची शक्‍यता वा योग्यता दिसून येते आणि मातृत्व प्राप्त झाल्यावर स्त्रीचे स्त्रीत्व सिद्ध झाल्याने ती भाग्यवान ठरते.

या रजोदर्शनाचा व त्या तीन-चार दिवसांच्या कालावधीचा बाऊ करून जनमानसात त्याविषयी अनेक समजुती-गैरसमजुती पसरलेल्या दिसतात. मुळात स्त्रीचे शरीर अतिशय संवेदनक्षम असते. तिच्या शरीरातील अग्नी व सर्व हार्मोन्सची व्यवस्था फारच नाजूक रीतीने कार्यान्वित असते. या दोन्ही गोष्टींचा संबंध मानसिकतेशी असल्यामुळे ही सर्व प्रक्रिया खूप अवघड व गुंतागुंतीची असते. तेव्हा रजोप्रवृत्तीवेळच्या चार दिवसांत स्त्रीच्या वात-पित्त-कफदोषात नक्कीच काहीतरी बदल होत असतात. तसेच या काळात पंचप्राणांपैकी प्राण-अपानातसुद्धा बदल होतात. तसे बदल होणे आवश्‍यक असते, तरच रजोदर्शन होऊन बरोबर तीन-चार दिवसांपर्यंत रज शरीराबाहेर टाकले जाणे शक्‍य होते. या प्राणाच्या अधोगामी वृत्तीमुळे शरीरात शक्‍तिसंचार अधोगामी झालेला असतो आणि म्हणून त्यासंबंधीचे काही नियम पाळणे आवश्‍यक असते. रजःप्रवृत्तीच्या दिवसांत खालच्या बाजूला वाहणारा शक्‍तीचा प्रवाह कुठल्याही तऱ्हेने अवरोधित होऊन रजःस्राव होण्यासाठी अडथळा उत्पन्न होऊ नये, हे पाहणे आवश्‍यक असते. गर्भधारणा झाली तरच रजःप्रवाह थांबावा.

सामान्य माणसाचा प्राणप्रवाह मेंदूकडे होणे अपेक्षित असते. ज्या गोष्टींमध्ये प्राणशक्‍ती वर उचलून नेण्याची क्षमता असेल, अशा गोष्टी या चार दिवसांत केल्या जाऊ नयेत, यासाठी नियम केलेले दिसतात. स्त्रीने एकदा का दैनंदिन व्यवहारात भाग घ्यायचा ठरविला, की गुंतागुंतीचे जीवनमान व तिच्या मनोव्यापारातील गुंतागुंतीमुळे शरीरातील हार्मोन्सच्या प्रक्रियेवर व रजःप्रवृत्तीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून रजःस्वला स्त्रीने मानसिक ताण वाढू शकेल अशा व्यक्‍तीशी शक्‍यतो संपर्क टाळावा, विश्रांती घ्यावी, फार अवघड कामे करू नयेत.

रजःप्रवृत्ती ही एक कटकट वाटली, अपत्यप्राप्तीच नको वा हवी असलेली एक-दोन अपत्ये झाल्यावर रजःप्रवृत्तीची आवश्‍यकता काय, अशा समजातून व ही सर्व कटकट नको म्हणून रजोनिवृत्ती लवकर यावी, अशी अनेक स्त्रियांची अपेक्षा असते.

कामधंद्यातून निवृत्त व्हायची वेळ न येता आधीच निवृत्ती घेतल्यानंतर एखादा व्यवसाय चांगला जमल्यास ठीक, अन्यथा निवृत्तीनंतर मिळालेले पैसे संपल्यावर त्रास होतो, तसा वेळेच्या अगोदर रजोनिवृत्ती आणण्याचा प्रयत्न केल्यासही बऱ्याच प्रकारचा त्रास होऊ शकतो. खरे पाहताना स्त्रीचे रजःप्रवृत्ती चालू असेपर्यंत पुरुष व स्त्री हा भेद दिसतो.
एकदा रजोनिवृत्ती झाली, की स्त्रीच्या शरीरात पुरुष हार्मोन्सचे प्रमाण वाढायला लागते. परिणामतः स्त्रीच्या शरीरात पुरुषासारखे काही बदल दिसायला लागतात. स्त्रीचे सौंदर्य, स्त्रीचा स्वभाव, स्त्रीची विशेषता स्त्रीत्वात असते. या स्त्रीत्वाचीच निवृत्ती केली, तर स्त्रीचा मूळ धर्म टाकून केलेली वागणूक नैसर्गिक राहणार नाही, अशी शक्‍यता तयार होते. रजोनिवृत्तीच्या वेळी होणारे बदल त्रासदायक ठरू नयेत म्हणून केलेल्या औषधोपचार योजनेमुळे इतर त्रास होणार नाहीत, याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते आणि म्हणून नैसर्गिक व आयुर्वेदिक उपाययोजना श्रेयस्कर ठरतात. बऱ्याच स्त्रियांची नैसर्गिकपणेच रजोनिवृत्ती लवकर होते, पण अशा वेळीही स्त्रियांच्या स्वभावात बदल झालेले दिसतात. काही वेळा स्त्रीला काही विशेष रोग झाला असता रजोनिवृत्ती लवकर येताना दिसते. रजःस्रावामुळे स्त्रीचे शरीर शुद्ध राहते, सौंदर्य टिकून राहते, त्वचा सुंदर राहते, आवाज गोड व मधुर राहतो. रजोनिवृत्तीनंतर स्त्रीला या गोष्टींना मुकावे लागू शकते व बाह्यउपचारांनी हे गुण कसेबसे टिकवावे लागतात. त्यामुळे जेवढी रजोनिवृत्ती लांबेल तेवढे स्त्रीत्व व तारुण्य जास्त काळ टिकून राहू शकते.

म्हणून अपेक्षेप्रमाणे एक वा दोन मुले झाल्यावर अधिक अपत्यप्राप्तीची इच्छा नसली तरी रजोनिवृत्ती येऊ नये यासाठी स्त्रीने प्रयत्न करून पाहावेत. रजःस्रावामुळे शरीरातील रक्‍त प्रमाणाबाहेर कमी झाले तर रजोनिवृत्ती लवकर येऊ शकते. या चार दिवसांच्या कालावधीत जर स्त्रीच्या मन-शरीरावर भलतेच आघात झाले तर रजोनिवृत्ती लवकर येऊ शकते. शिवाय आता काही गरज उरलेली नाही म्हणून गर्भाशयच काढून टाकले तरी अकाली रजोनिवृत्ती येते. मुद्दाम ओढवून घेतलेल्या रजोनिवृत्तीनंतर वजन वाढणे, संधिवात, मधुमेह, हृदयविकार असे वेगवेगळे त्रास सुरू झाले, असे अनेक स्त्रिया सांगताना दिसतात. तेव्हा नैसर्गिक रजोनिवृत्तीपेक्षा मुद्दाम ओढवून घेतलेली रजोनिवृत्ती स्त्रीला अधिक बाधक ठरू शकते.

प्रत्येक महिन्याला रजोदर्शन सुरू असेपर्यंत स्त्री-पुरुषांतील ओढ वेगळी असते. रजोनिवृत्तीनंतर मात्र त्यात बदल होतो. अवेळी ओढवून घेतलेल्या रजोनिवृत्तीमुळे अशा तऱ्हेचे संबंध टिकवून ठेवण्यासाठी औषधे घेण्याची वेळ येते व त्यातून वेगळा त्रास होऊ शकतो. रजोनिवृत्तीच्या वेळी प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या शरीरात असलेली हाडे व्यवस्थित राहावी, संपूर्ण शरीराचे संतुलन राहावे, शरीरातील कॅल्शियम, लोह नीट टिकावे म्हणून विशेष आयुर्वेदिक उत्पादने घेण्याची आवश्‍यकता असते. तसेच एरवी दूध आवडत नसले तरी रजोनिवृत्तीच्या काळात दूध घेणे अत्यावश्‍यक असते. ज्या स्त्रियांना रजःप्रवृत्ती होते त्या प्रत्येक स्त्रीने रक्‍त वाढण्यासाठी रक्‍तवर्धक योग व अन्न लक्ष ठेवून घेणे श्रेयस्कर ठरते. असे असताना रजोनिवृत्तीच्या वेळी तर या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःचे संतुलन ठेवणे खूप आवश्‍यक असते. तसेच रजोनिवृत्तीच्या वेळी गुप्तांगावर कोरडेपणा येणार नाही याची काळजी घेणेही खूप आवश्‍यक असते. रजोनिवृत्तीच्या वेळी केस गळणे, स्वभाव चिडचिडा होणे या गोष्टी टाळायच्या असतील तर आधीपासून काळजी घेऊन आयुर्वेदाने सांगितलेले उपचार करून घेणे आवश्‍यक असते. अशोकारिष्ट, कुमारी आसव, शतावरी कल्प, प्रवाळपंचामृत, कामदुधा, मौक्‍तिक वगैरे सर्व योग किंवा हे योग वापरून तयार केलेली विशेष औषधे वैद्यांच्या सल्ल्याने घेणे आवश्‍यक असते. मासिक धर्म चालू असताना नैसर्गिक नियम पाळले तर अकाली रजोनिवृत्ती येणार नाही. तसे पाहता पुरुष कामेच्छेपासून कधीच निवृत्त होत नाहीत, परंतु रजोनिवृत्तीनंतर स्त्रीची कामेच्छा कमी होऊ शकते. अशा वेळी कौटुंबिक संबंधात अडचणी आलेली उदाहरणे दिसतात.

पुरुष जसे व्यवसायातून म्हणजे कामातून स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेतात, तशी नोकरी करणाऱ्या स्त्रीने कामातून स्वेच्छानिवृत्ती घ्यायला हरकत नाही; पण रजोनिवृत्ती ओढवून घेऊन म्हातारपण जवळ आणणे इष्ट नाही. तेव्हा सर्व नियम पाळून आपली रजःप्रवृत्तीची क्षमता उतारवयापर्यंत चालू राहील, असा प्रयत्न केल्यास स्त्रीचे तारुण्य जास्तीत जास्त टिकून राहू शकते. तिचा जगाला वात्सल्य व प्रेम दारा स्वभाव टिकून राहू शकतो. तेव्हा रजोनिवृत्तीची काळजी प्रत्येक स्त्रीने घेणे इष्ट आहे.

डॉ. श्री बालाजी तांबे
--Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad