Tuesday, January 14, 2014

जेवणात लिंबाचे महत्त्व

Tags: lemonfood
शरीराला आहाराच्या बाबतीत काही सवयी लावून घेतल्यास, एखाद्या चांगल्या गुंतवणुकीप्रमाणे आयुष्यभर त्यांचा आरोग्य परतावा मिळत राहतो. अशीच एक सवय म्हणजे दुपारच्या जेवणात लिंबाचा समावेश असणे. फळांपैकी लिंबामध्ये सर्वाधिक सायट्रेट असल्याने, आहारात त्याचे किती महत्त्व आहे हे जाणून घेऊ : 

  • लिंबू हा शरीरातील ऍसिड-अल्कली यांचा योग्य समतोल राखतो. त्यामुळे रोज दुपारच्या जेवणात किमान अर्धे लिंबू पाण्यातून घेतल्यास अल्काइन तत्त्व रक्ताचा पीएचचा समतोल राखण्यास मदत करते.
  • ज्यांना अजीर्णाची, पित्ताची तक्रार आहे, त्यांनी जेवण झाल्यानंतर ग्लासभर पाण्यात अर्धे लिंबू पिळून घ्यावे. यात साखर मात्र घालू नये. असे नित्यनेमाने केल्यास वरील तक्रारी कमी जाणवतात.
  • लिंबू यकृतरक्षक आहे. लिंबामुळे पित्तरसाचा घट्टपणा कमी होतो, ज्यायोगे पित्ताशयात खडे तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. लिंबूरस हा युरिक ऍसिडवर नियंत्रण आणतो. ज्यांना गाऊट, हाय कोलेस्टेरॉल, गॉलस्टोनची तक्रार आहे अशांनी रोजच्या खाण्यात लिंबाचा समावेश करावा.
  • लिंबू-संत्री-मोसंबी ही तीन फळे कॅल्शिअम ऑक्‍झलेट्‌स असलेल्या मुतखड्यांपासून संरक्षण देतात.
  • लिंबाचा रस हा जंतुहारक असून, त्यातील "क' जीवनसत्त्वामुळे लिंबू हा प्रतिकारक्षमता वाढवणारा आहे.
  • लिंबातील "रुटीन' या नेत्ररक्षक घटकामुळे तो मधुमेहींना होणाऱ्या डायबेटिक रेटिनोपॅथीपासून संरक्षण देतो.
  • लिंबात जवळजवळ 22 कॅन्सरप्रतिरोधी घटक सापडले आहेत.
  • तरुणांसाठी लिंबू हे सौंदर्यवर्धक फळ आहे. त्वचेला अकाली येणाऱ्या सुरकुत्यांपासून ते वाचवते.
  • सर्वांत महत्त्वाची बाब अशी, की लिंबू चोखू नये. लिंबात सायट्रिक ऍसिड भरपूर असल्याने त्याचा दातांवर परिणाम होतो. इनॅमल म्हणजेच दातांवरील  टणक आवरण खराब होऊ शकते. म्हणून लिंबू थेट न खाता नेहमी अन्न किंवा पाण्यातून घ्यावे.


Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad