Thursday, September 13, 2012

तांदूळ आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनडॉ. श्री बालाजी तांबे
तांदूळ हा सर्व दृष्टीने आरोग्यदायी आहे. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात भाताचा समावेश करायलाच हवा. बहुतेक सर्व रोगांमध्ये तांदूळ हा पथ्यकारक म्हणून सांगितला आहे. आयुर्वेदाने भाताचा नेहमीच आग्रह धरला आहे.

जगात सर्वत्र मिळणारे आणि अन्न म्हणून सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे धान्य म्हणजे तांदूळ. जगभरात सुमारे 40हजार जातींचे तांदूळ होतात. भारतामध्येही तांदळाच्या पारंपरिक अनेक जाती आहेत. बासमती, आंबेमोहोर, सोना मसुरी, कोलम वगैरे भाताची नावे बहुतेकांच्या परिचयाची असतात; मात्र याखेरीज साठेसाळ, रक्‍तसाळ, चंपा, चंपाकळी, जिरगा, काळी गजरी वगैरे अनेक जाती असतात. बासमती, आंबेमोहोर भात सुगंधामुळे अधिक प्रचलित असला तरी साठेसाळ, रक्‍तसाळ वगैरे पारंपरिक तांदूळ आरोग्याच्या दृष्टीने अधिक गुणकारी असतो. उदा. रक्‍तसाळ भातात लोह अधिक प्रमाणात असते, साठेसाळ भात पचण्यासाठी अतिशय सोपा असतो. जिरगा, काळी गजरी वगैरे भात रुग्णांसाठी विशेष हितकर असतो.

आयुर्वेदात तांदळाची अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे. तांदूळ तयार झाल्यावर वर्षभर साठवून मग खाण्यासाठी वापरावा असेही सांगितलेले आहे. बहुतेक सर्व रोगांमध्ये अशा प्रकारच्या जुन्या तांदळाचा पथ्य म्हणून उल्लेख केलेला सापडतो. वेदांमध्येही तांदळाचा उल्लेख सापडतो. भारतीय संस्कृतीनुसार यज्ञ, पूजा, लग्नकार्यात तांदळाचा उपयोग केला जातोच, पण जगातील सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये तांदूळ हे भरभराटीचे, समृद्धीचे व वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते.

"भावप्रकाश' या आयुर्वेदाच्या ग्रंथात तांदळाच्या काही मुख्य जातींचा उल्लेख याप्रमाणे केलेला आहे, रक्‍तशाली, सकलम, पांडुक, शकुनाहृत्‌, सुगंधक, कर्दमक, महाशाली, दूषक, पुष्पांडक, पुंडरीक, महिष, मस्तक, दीर्घशूक, कांचनक, हायन, लोध्रपुष्पक. मात्र, विस्तारभयामुळे सर्व जातींचा निर्देश करणे शक्‍य नाही असे याच्यापुढे म्हटलेले असल्याने प्रत्यक्षात त्या वेळीही यापेक्षा अनेक जाती अस्तित्वात होत्या, हे समजते.

तांदळाचे गुणधर्म
तांदळाचे गुणधर्म व उपयोग पुढीलप्रमाणे सांगितले आहेत,
शालयोः मधुराः स्निग्धा बल्या बद्धाल्पवर्चसः ।
कषाया लघवो रुच्या स्वर्या वृष्याश्‍च बृंहणाः ।।
अल्पानिलकफाः शीताः पित्तघ्ना मूत्रलास्तथा । ...भावप्रकाश

तांदूळ चवीला गोड, गुणाने स्निग्ध व वीर्याने थंड असतात, बल वाढविणारे व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात, स्वरासाठी हितकर असतात. शुक्रधातूला वाढवितात, इतर धातूंचेही पोषण करतात, पित्तशमन करतात, थोड्या प्रमाणात वात-कफाला वाढवतात, पचण्यास सोपे असतात, तसेच लघवी साफ होण्यासही मदत करतात.

हे झाले सामान्य तांदळाचे गुण. मात्र, सर्व तांदळांत साठेसाळी तांदूळ श्रेष्ठ आहेत, असे सांगितले आहे. हे तांदूळ साठ दिवसांत तयार होतात व त्यांचे गुण या प्रकारे असतात.

षष्टिकाः मधुराः शीता लघवो बद्धवर्चसः ।
वातपित्तप्रशमनाः शालिभिः सदृशा गुणैः ।। ...भावप्रकाश

चवीला मधुर, वीर्याने शीतल व पचायला हलके असतात, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात. वात तसेच पित्तदोषाचे शमन करतात; ताकद देतात, तसेच तापात हितकर असतात.

रक्‍तशाली म्हणजे लाल रंगाचे तांदूळ. यांची विशेषता अशी, की ते डोळ्यांसाठी चांगले असतात.

रक्‍तशालिर्वरस्तेषु बल्यो वर्ण्यस्त्रिदेषजित्‌ ।
चक्ष्युष्यो मूत्रलः स्वर्यः शुक्रलस्तृङज्वरापहा ।।
विषव्रणश्‍वासकासदाहनुत्‌ वपिष्टिदः । ...भावप्रकाश

सर्व तांदळांपैकी रक्‍तसाळ तांदूळ डोळ्यांना हितकर असतात, ताकद वाढवितात, कांती सुधरवतात व तिन्ही दोषांना संतुलित ठेवतात; आवाजासाठी हितकर असतात, लघवी साफ होण्यास मदत करतात, शुक्रवर्धन करतात. तहान, ताप, विष, व्रण, दमा, खोकला, दाह यांचा नाश करतात व अग्नीची पुष्टी करतात.

विविध जातींच्या तांदळाचे अंगभूत गुण याप्रमाणे सांगितले आहेत; मात्र, तांदूळ कशा प्रकारे उगवले आहेत यावरही त्यांचे गुणधर्म बदलतात.
अगोदर जाळून घेतलेल्या जमिनीमध्ये लावलेले तांदूळ किंचित तुरटसर चवीचे व पचायला सोपे असतात. हे तांदूळ मल-मूत्र विसर्जनास मदत करतात, कफनाशक असतात.
नांगरलेल्या जमिनीतील तांदूळ विशेषतः शुक्रवर्धक असतात आणि तुलनेने कमी हलके असतात, धारणाशक्‍ती वाढवितात, ताकद देतात, या तांदळापासून मलभाग फारसा तयार होत नाही.
अजिबात न नांगरलेल्या जमिनीतील तांदूळ वात वाढवितात.
आपोआप उगवलेले म्हणजे मुद्दाम पेरणी न करता आलेले तांदूळ गुणाने कमी प्रतीचे असतात.
एकदा आलेल्या तांदळाच्या लोंब्या कापून घेऊन त्याच फुटीवर पुन्हा आलेले तांदूळ गुणांनी रुक्ष असतात, पित्त वाढवितात व मलावबंध करतात.

मधुमेहीनो, भात खा!
अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने, नीट पेरणी, मशागत करून उगवलेले तांदूळ वर्षभरानंतर वापरणे अतिशय आरोग्यदायी आहे, हे सहज लक्षात येते.
मधुमेही व्यक्‍तींनी, वजन जास्त असणाऱ्यांनी भात खाऊ नये असा प्रचार बऱ्याचदा केला जातो; मात्र, आयुर्वेदातील पुढील संदर्भावरून यामध्ये अजिबात तथ्य नाही, हे स्पष्ट होते.
मधुमेहावरचे औषध खाल्ल्यानंतर तूप व भात खावा असे सांगितले आहे,

सुभावितं सारजलैला हि पिष्ट्‌वा शिलोद्‌भवाः ।
शालिं घृतैश्‍च भुञ्जानः ।। ...रसरत्नाकर

चंदनाच्या पाण्यात वेलची व शुद्ध शिलाजित टाकून घ्यावे व वर तूप-भात खावा.
मधुमेही व्यक्‍तीसाठी पथ्यकर पदार्थ सांगताना म्हटले आहे,
यवान्नविकृर्तिमुद्‌गाः शस्यन्ते शालिषष्टिकाः । ...रसरत्नाकर

जवापासून बनविलेले पदार्थ, मूग, तांदूळ, विशेषतः साठेसाळीचे तांदूळ मधुमेही व्यक्‍तींसाठी हितकर आहेत.
स्थूलता कमी करण्यासाठीसुद्धा तांदळाचा आधार घेतलेला आहे.

उष्णमत्रस्य मण्डं वा पिबन्‌ कृशतनुर्भवेत्‌ ।
...भैषज्य रत्नावली

रोज सकाळी तांदळाची मंड (14 पट पाणी घालून केलेली भाताची पेज) घेण्याने स्थूल व्यक्‍ती कृश होते.
स्थूल व्यक्‍तीसाठी हितकर काय आहे सांगताना तांदळाचा उल्लेख केलेला आहे.

पुराणशालयो मुद्गकुलत्थयवकोद्रवाः ।
लेखना बस्तयश्‍चैव सेव्या मेदस्विना सदा ।। ...भैषज्य रत्नावली

एक वर्ष जुने तांदूळ, मूग, कुळीथ, यव, कोद्रव (एक प्रकारचे धान्य), लेखन (मेद कमी करणाऱ्या औषधांनी संस्कारित तेलाची वा काढ्याची बस्ती, हे मेदस्वी व्यक्‍तीने नित्य सेवन करण्यास योग्य आहे.

तांदूळपाण्याचे अनुपान
तंडुलोदक म्हणजे तांदळाचे पाणी हे अनुपान म्हणूनही वापरले जाते. बारीक कांडलेले तांदूळ आठपट पाण्यात भिजत घालावेत, 15-20 मिनिटांनी हातांनी कुस्करून गाळून घ्यावेत. हे तंडुलोदक अतिशय तहान लागणे, उलटी, मूत्रप्रवृत्ती व्यवस्थित न होणे, आव, जुलाब वगैरे रोगांमध्ये उपयोगी असते. स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून पांढरे जाणे, पाळीच्या दिवसात अति रक्‍तस्राव होणे, वारंवार पाळी येणे वगैरे तक्रारींवर द्यायचे औषध तंडुलोदकाबरोबर दिल्यास अधिक लवकर व चांगला गुण येतो.

तांदळापासून बनविलेल्या साळीच्या लाह्या आम्लपित्त, उलटी, जुलाब वगैरे तक्रारींवर औषधाप्रमाणे उपयोगी असतात.

पिंडस्वेदन या विशेष उपचारासाठी औषधी काढ्यात तांदूळ शिजवला जातो व असा भात पुरचुंडीत बांधून मसाज करण्यासाठी वापरला जातो. काही वातशामक लेपसुद्धा तांदळाच्या पेजेमध्ये मिसळून लावायचे असतात.

अशा प्रकारे तांदूळ हा सर्व दृष्टीने आरोग्यदायी आहे. तेव्हा रोजच्या आहारात योग्य प्रमाणात भाताचा समावेश करायलाच हवा.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad