स्वातंत्र्याचा अर्थ मनाला येईल तसे
वागणे असा करून घेतला, तर त्यातून कदाचित क्षणिक आनंद मिळेल; पण
कालांतराने रोगरूपी पारतंत्र्याला सामोरे जावे लागेल. रोगाच्या पाठोपाठ
परावलंबित्व येते हे वेगळे सांगायची गरज नाही. तेव्हा स्वातंत्र्याचा आनंद
घ्यायचा असेल तर त्यासाठी आरोग्याची जोड अपरिहार्य होय. जन्मसिद्ध हक्क असणारे स्वातंत्र्य कोणाला हवेहवेसे वाटत नाही? स्वातंत्र्याची ओढ स्वाभाविक आहे, कारण स्वातंत्र्यात पराधीनता नसते. आयुर्वेदात "स्वतंत्र' शब्दाचा अर्थ याप्रमाणे समजावलेला आहे,
स्वाधीनं जीवनं यस्य सः स्वतन्त्रः । ...चरक शारीरस्थान
ज्याचे जीवन स्वतःच्या आधीन आहे, जो दुसऱ्यावर अवलंबून नाही, तो स्वतंत्र होय.
वरवर पाहता हा अर्थ सहज, साधा, सोपा वाटला तरी त्याची दुसरी बाजू लक्षात घेणेही तेवढेच आवश्यक आहे. स्वतःच्या आधीन असणे म्हणजे मनाला येईल तसे वागणे असा समज करून घेतला तर त्यातून कदाचित क्षणिक आनंद मिळेल, पण कालांतराने रोगरूपी पारतंत्र्याला सामोरे जावे लागेल. रोगाच्या पाठोपाठ परावलंबित्व येते हे वेगळे सांगायची गरज नाही. तेव्हा स्वातंत्र्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी आरोग्याची जोड अपरिहार्य होय. म्हणूनच "आरोग्यरक्षण' हे आयुर्वेदाचे प्रथम उद्दिष्ट आहे. आरोग्यरक्षणासाठी सांगितलेल्या स्वस्थवृत्तामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, की त्या वर वर पाहता नियमाच्या बंधनात अडकवणाऱ्या भासल्या तरी सरतेशेवटी आरोग्याच्या रूपाने स्वातंत्र्य देणाऱ्या आहेत, हे लक्षात येते.
नये वापरू दुसऱ्यांचे
उदा. अष्टांगसंग्रहात दुसऱ्यांच्या वस्तू न वापरण्याबद्दल याप्रमाणे सांगितलेले आहे,
नैव चान्येन विधृतं वस्त्रं पुष्पमुपानहौ । ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
दुसऱ्या व्यक्तीची वस्त्रे, केसात किंवा शरीरावर घातलेली फुले, अलंकार तसेच पादत्राणे वापरू नयेत. दोन व्यक्तींनी एका थाळीत जेवू नये, अर्थात उष्टे अन्न, पाणी सेवन करणे टाळावे. संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी या सर्व गोष्टी अत्यावश्यक असतात. वस्त्रे, अलंकार, पादत्राणे या गोष्टी व्यक्तीच्या अतिनिकट संपर्कात असल्यामुळे याद्वारा त्वचेवरील जंतुसंसर्ग पसरण्याची शक्यता मोठी असते किंवा दूषित श्वासाशी संबंध आलेल्या वस्तूंमार्फत रोग फैलावणे सहज शक्य असते. सध्या मात्र मोकळेपणाने वागण्याच्या नावाखाली एकाच बाटलीतील पाणी तोंड लावून सर्वांनी थोडे थोडे पिणे, आइस्क्रीम, शीतपेये किंवा तत्सम जंक फूड "शेअर' करणे, इतरांचे कपडे, कंगवा वगैरे गोष्टी वापरणे, पर्यटनाच्या ठिकाणी विशिष्ट वेषात फोटो काढून घेण्यासाठी अगोदर अनेक व्यक्तींनी वापरलेले कपडे घालणे हे सर्रास चालताना दिसले, तरी ते आरोग्यदृष्ट्या बरोबर नाही.
जाणावे आधी, आले कोठून?
अन्नसेवनाच्या बाबतीत आयुर्वेदाने काही नियम सांगितले आहेत.
नाविदितं नाविदिताननं अश्नीयात् । ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
जेवण काय आहे हे जाणल्याशिवाय, ते कोठून आले आहे हे माहिती असल्याशिवाय जेवू नये.
जेवण हे केवळ पोट भरण्यासाठी नसते, तर त्यातून आरोग्य मिळावे, शरीराचे पोषण व्हावे व आपापली कर्तव्ये करण्यास समर्थ व्हावे हे अपेक्षित असते, यात शंका नाही. पण अशा आरोग्यपूर्ण जेवणासाठी अन्नाची प्रत चांगली आहे, त्यातील घटकद्रव्ये शुद्ध स्वरूपाची आहेत, अन्न शिजवताना त्यात विरुद्ध गुणधर्माचे पदार्थ एकत्र केलेले नाहीत याची खात्री असावी वागते. जेवण कोठून आले आहे, अर्थात ते कोणी, कशा परिस्थितीत बनवलेले आहे हे सुद्धा, त्या अन्नाच्या शुद्धतेची, अन्नाच्या उत्तम प्रतीची, अन्न शिजवताना त्यावर होणाऱ्या चांगल्या संस्कारांची खात्री असावी यासाठीच माहिती असावे लागते. दूध व मीठ, मलई व लिंबू, दूध व फळे यांसारख्या विरुद्ध गोष्टी खाऊ नयेत. यातून त्वचारोगांपासून ते वंध्यत्वापर्यंत असंख्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
न आकाशे न असंवृते न हस्तेन अश्नीयात् ।
...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
सरळ आकाशाखाली, छत नसलेल्या ठिकाणी जेवण (अन्नाचे ताट) हातात धरून जेवू नये. बागेत, लॉनवर उभ्या उभ्या हातात ताट धरून "बुफे' पद्धतीने जेवण्याची प्रथा सध्या वाढते आहे, पण उभे राहून जेवल्याने पोटाला आधार मिळत नाही व त्यामुळे अन्नपचानात अडथळे येऊ शकतात, शिवाय अशा प्रकारे जेवताना खूप गप्पा होतात. ओघाने विविध विषय हाताळले जातात आणि या सगळ्याचा अन्नपचनावर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. अशा जेवणाने पोट भरले तरी नंतर क्रमाक्रमाने अपचनाचे त्रास मागे लागू शकतात. मनात येईल तेव्हा, स्वतः स्वयंपाक न करता, ऋतुकाळ व प्रकृतीचा विचार न करता आवडीचे अन्न खाण्याचे स्वातंत्र्य असले तरी असे अन्न पचेलच असे नाही आणि त्यामुळे अपचनाचा त्रास सुरू झाला, की त्यापाठोपाठ स्थौल्य, मधुमेह, रक्तदाब वगैरे अनेक त्रास कायमचे पारतंत्र्य आणू शकतात.
नको परसंग
आयुष्यरक्षणासाठी सर्वांत महत्त्वाचा नियम आयुर्वेदात असा सांगितला आहे,
आयुष्कामस्य मिथ्यैव परदारादिवर्जनम् । ...अष्टांगसंग्रह
आयुष्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीने परस्त्री किंवा परपुरुषाबरोबर मैथुन करणे टाळावे. मुक्त व स्वतंत्र वागण्याने मनाला आनंद वाटला तरी पुढे होणाऱ्या रोगांमुळे शारीरिक परस्वाधीनता येऊ शकते.
झोपेची आपल्या सर्वांनाच गरज असते. पण कधी झोपावे, किती वेळ झोपावे हे शास्त्रांनी सांगितलेले असते. रात्री झोपून सूर्योदयी उठणे ही पद्धत पूर्वीपासून प्रचलित आहे, मात्र सध्या टीव्ही, संगणक, पार्टी वगैरेंच्या मोहापायी रात्री जागरणे करून दुसऱ्या दिवशी खूप उशिरा उठण्याचे स्वातंत्र्य अनेकांना, विशेषतः तरुण पिढीला हवेहवेसे वाटते. मात्र या प्रकारच्या अवेळी निद्रेमुळे डोकेदुखी, अर्धशिशी, चक्कर, सूज, ऍलर्जी, नैराश्य वगैरे कितीतरी त्रास होऊ शकतात.
गर्भवती स्त्रीसाठी सुद्धा अनेक नियम आयुर्वेदात सुचवले आहेत. उदा. फार भडक रंगाचे कपडे न घालणे, रात्र फार झाली असता घराबाहेर न पडणे, मद्यपान-धूम्रपान-मांसाहार न करणे, कायम पाठीवर न झोपणे, फार प्रवास न करणे, अति व्यायाम न करणे, दिवसा न झोपणे वगैरे गोष्टींमुळे काही प्रमाणात स्वातंत्र्यावर मर्यादा येत असल्या तरी यातून तिचे व आतील बाळाचे आरोग्यरक्षण होत असते. गर्भवतीने असे नियम पाळले नाही तर त्याचा बाळाच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होईल हेही आयुर्वेदात सांगितले आहे. उदा. गर्भारपणात गर्भवती कायम पाठीवर झोपल्यास बाळाची नाळ त्याच्या गळ्याभोवती गुंडाळली जाण्याची शक्यता असते; फार प्रवास केल्यास वात असंतुलन झाले की बाळाचे शरीर तयार होताना काही दोष राहून जातात; दिवसा तसेच रात्री फार वेळ झोपल्याने बाळाची बुद्धी नीट विकसित होत नाही; कायम फक्त गोड पदार्थ खाण्याने बाळाला प्रमेह होण्याची, तसेच स्थूल होण्याची शक्यता वाढते; फार खारट पदार्थ खाण्याने अपत्याचे केस अकाली पांढरे होऊ शकतात व टक्कल पडण्याची प्रवृत्ती तयार होते; फार तिखट गोष्टी खाल्ल्या तर जन्माला येणाऱ्या अपत्याला पुढे अपत्यप्राती होत नाही वगैरे.
आयुर्वेद हे फक्त रोग झाल्यावर उपयोगात आणायचे शास्त्र नाही. कारण आयुर्वेदात आरोग्यरक्षणासाठी सर्वांगीण मार्गदर्शन केलेले आहे. हे मार्गदर्शन शिरोधार्य मानले व त्यानुसार आचरण केले तर आरोग्याचे स्वातंत्र्य निश्चितपणे मिळेल, पण याच मार्गदर्शनाकडे नियमांच्या बेड्या म्हणून बघितले आणि खोट्या स्वातंत्र्याच्या मागे धावले, तर बघता बघता रोगांचे आक्रमण होऊन कायमचे पारतंत्र्य येऊ शकेल.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love
No comments:
Post a Comment