Wednesday, December 21, 2011

ऊब व्यायामाची


डॉ. श्री बालाजी तांबे
व्यायामाची ऊब व्यक्‍तीला घडवते. शरीराचे स्नायू बळकट करण्यासाठी व नंतर येणारा जीवनाचा भार सहन करण्यासाठी शरीराला स्थैर्य लागते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी पळून जाता येत नाही. त्या अडचणींना सामोरे जावेच लागते. अडचणींना सामोरे जाण्याचे स्थैर्य व धैर्य व्यायामाने मिळते. व्यायामाने रक्‍ताभिसरण वाढते. हात, मांड्या, छाती, पाय यांचे स्नायू घट्ट होऊन त्यांना सुंदर आकार येतो. एकदा सकाळी व्यायाम झाला, की साधारणतः दिवसभर थंडीचा लवलेश जाणवत नाही. तेव्हा व्यायामामुळे स्वतःला तर ऊब मिळतेच, परंतु आवश्‍यक असणाऱ्यांना संरक्षणाची व मायेची ऊबही देता येते. 

"तरुणपणी तरी प्रत्येकाने व्यायाम करावा' असे बऱ्याच वर्षांपासून अनेक जण सांगत आहेत. पण "इच्छा असूनही तसे जमलेच नाही' असे सांगणारेही अनेक जण आहेत. उशिरा उठण्याची सवय असणाऱ्यांना व्यायाम जमणार तरी कसा? कारण उशिरा उठल्याने त्यांना शाळेला, कॉलेजला, कामावर जायची घाई होते. "अनेकांनी सांगून पाहिले, परंतु व्यायामाला काही मुहूर्त लागत नव्हता. पण आता नक्की ठरवले, की या थंडीत व्यायाम नक्की करायचा,' असा निश्‍चय अनेक जण दर वर्षी करताना दिसतात.

थंडीचा व व्यायामाचा संबंध काय? एक संबंध म्हणजे व्यायाम करणाऱ्याने भरपूर व पौष्टिक खावे, छान मलईसहित दूध प्यावे असा रिवाज असल्याने थंडीच्या दिवसांत छान पौष्टिक आहार करता येईल, अशा समजाने थंडीत व्यायामाला सुरवात करण्याचे ठरविले जाते. दुसरा व्यायामाचा व थंडीचा संबंध असा, की थंडीत खाऊन-पिऊन जाड पांघरूण वा रजई घेऊन झोपले तर ऊब मिळते, वजनही वाढते, पण घाम येत नाही. व्यायामाचा उपयोग ऊब मिळण्यासाठी, शरीर गरम होण्यासाठी तर होतोच, पण व्यायामाने छानपैकी घाम निघून गेला, की नंतर शरीराला ताजेतवाने वाटण्यासाठीही होतो.

प्रत्येकाला ऊब हवी असते, हे आपण जाणतोच. त्यातली व्यायामाची ऊब व्यक्‍तीला घडवते. शरीराचे स्नायू बळकट करण्यासाठी व नंतर येणारा जीवनाचा भार सहन करण्यासाठी शरीराला स्थैर्य लागते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी पळून जाता येत नाही. त्या अडचणींना सामोरे जावेच लागते. अडचणींना सामोरे जाण्याचे स्थैर्य व धैर्य व्यायामाने मिळते. खूप पैसे मिळतात म्हणून चित्रपटात काम करणारे नट व्यायामशाळेत म्हणजे जिममध्ये जाऊन शरीराचे पट दाखवता येतील इथपर्यंत घटवितात. मग काही तरुण मुले मात्र भाव मारण्यासाठी त्यांचेच नुसते अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.

मुळात शरीराला एक घाट पाहिजे, खाण्या-पिण्याच्या सवयी चांगल्या पाहिजेत आणि व्यायामाची सवय पाहिजे. 50 वर्षांपूर्वी, भाव मारण्यासाठी म्हणून नव्हे, तर प्रकृती सुदृढ राहावी, आरोग्यवान राहता यावे व जीवनाला सहजतेने सामोरे जाता यावे म्हणून सर्वच मुले व्यायाम करत असत. दंड-बैठका, सूर्यनमस्कार हे अत्यंत आवडते व प्रचलित व्यायामप्रकार बहुतेक सर्व घरी होत असत. काही जण आखाड्यात जाऊन वजन उचलणे, डंबेल्स फिरवणे, मल्लखांब खेळणे किंवा कुस्ती लढणे असे व्यायाम करत असत. अर्थात कुस्तीसाठी दंड-बैठकांची आवश्‍यकता असतेच.

काय घडले ते कळायला मार्ग नाही, परंतु व्यायामाची आवड मध्यंतरीच्या काळात कमी झाली. कस नसलेले अन्नधान्य हे यासाठी कारण असावे कदाचित. "व्यायाम करा, शरीर कमवा' असे कोणी सांगितले तर "आम्ही शांतताप्रिय आहोत, आम्हाला कुठे लढायला जायचे आहे?' अशा तऱ्हेचे विचार ऐकू येऊ लागले. परंतु लढाईला जायचे नसले तरी स्वसंरक्षण किंवा अबलांचे-दुर्बलांचे संरक्षण करावेच लागते. तसेच देशाच्या सीमा जागृत ठेवण्यासाठी सुदृढ सैनिकांची आवश्‍यकता असते.

पूर्वीच्या काळी गावात हनुमानाचे मंदिर असे व मंदिरापुढे कुस्तीसाठी हौदा व इतर व्यायाम करण्यासाठी जागा असे. अत्यंत अल्प खर्चाच्या अशा व्यायामशाळा गावोगावी असत. एखाद्या शहरात सुदृढ शरीराला महत्त्व देणारे, सामाजिक जाण असलेले किंवा धनिक व्यक्‍तिमत्त्व असले तर त्या ठिकाणी व्यायामाची इतर साधने, पोहण्यासाठी तलाव अशा इतर सुविधा असत. बडोद्यासारख्या ठिकाणी श्री. माणिकरावजी यांचा आखाडा प्रसिद्ध व सर्वांच्या परिचयाचा होता.

सकाळी उघड्या हवेत मैदानावर व्यायाम करणे, मैदानावर पळणे, तेथे थोडी परेड करणे आणि हुतूतू, खोखो असे व्यायामाला पूरक खेळ खेळले जात असत. पण अलीकडे जिम (व्यायामासाठी यंत्रशाळा) ठिकठिकाणी सुरू होईपर्यंत व्यायामाचे महत्त्व जणू कोणाला समजतच नाही. अर्थात शर्टाची वरची दोन बटणे उघडी ठेवण्याची फॅशन आल्याचा एक फायदा झाला, की उघड्या शर्टातून दिसणारी छाती भरदार आहे हे लोकांना दिसावे, या हेतूने तरुण मुले पुन्हा व्यायाम करू लागली.

व्यायामाने रक्‍ताभिसरण वाढते. हात, मांड्या, छाती, पाय यांचे स्नायू घट्ट होऊन त्यांना सुंदर आकार येतो. एकदा सकाळी व्यायाम झाला, की साधारणतः दिवसभर थंडीचा लवलेश जाणवत नाही. तेव्हा व्यायामामुळे स्वतःला तर ऊब मिळतेच, परंतु आवश्‍यक असणाऱ्यांना संरक्षणाची व मायेची ऊबही देता येते. 

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad