Monday, December 12, 2011

ताणतणाव


अश्‍विनी लाटकर, समुपदेशक, पुणे.
या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकांना आपले मूल सर्वगुणसंपन्न असावे, असे वाटत असते. मात्र सर्वच ठिकाणी सतत फक्त स्पर्धाच असते. मनाला निखळ आनंद मिळेल असे एकही ठिकाण नाही. (अगदी घरसुद्धा!) या सगळ्यामुळे मुलांवरील ताणतणाव लहान वयापासूनच वाढत जातो.

"ताणतणाव' हल्लीच्या जगात अगदी लहान मूल ते वयस्क व्यक्ती, प्रत्येकाच्याच आयुष्यात सगळ्यात जास्त वापरला जाणारा शब्द. प्रत्येकाचेच आयुष्य त्याने भरून गेले आहे.

गेल्या काही वर्षांत वाढते शहरीकरण, वेगाने बदलत जाणारी जीवनशैली व कुटुंबपद्धती, प्रसारमाध्यमांचा वाढता प्रभाव या सगळ्यांचा वाढत्या ताणतणावामध्ये मोठाच वाटा आहे.

हल्ली ताणतणावाची सुरवात ही मूल लहान असल्यापासून होते. या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकांना आपले मूल सर्वगुणसंपन्न असावे, सर्वच क्षेत्रांत यशस्वी असावे, शक्‍य झाल्यास इतरांच्या पुढे असावे, असे वाटत असते. त्यासाठी मूल दोन-तीन वर्षांचे झाले की पालकांचे प्रयत्न सुरू होतात. शाळा, क्‍लास, खेळ, छंद वर्ग वगैरे ठिकाणी त्यांना घातले जाते. या सर्वत्र क्षेत्रांत मुलांना परफेक्‍ट करण्यासाठीची ही धडपड असते, पण या सगळ्यात ज्याच्यासाठी हा सारा खटाटोप केला जातो त्या मुलाच्या मनाचा विचार मात्र राहूनच जातो. अर्थातच या सगळ्यामुळे मूल खरेच परफेक्‍ट किंवा ऑलराऊंडर वगैरे होते का, हा प्रश्‍नच आहे. का त्यातून काही मानसिक समस्याच निर्माण होतात, हा विचार पालकांनीच करायला हवा. यातील सर्वच ठिकाणी सतत फक्त स्पर्धाच असते. मनाला निखळ आनंद मिळेल असे एकही ठिकाण नाही. (अगदी घरसुद्धा!) या सगळ्यामुळे मुलांवरील ताणतणाव लहान वयापासूनच वाढत जातो.

सकाळी उठल्यापासून धावपळ सुरू होते ते रात्री झोपेपर्यंत. संध्याकाळी घरी परत आल्यावरसुद्धा कोणालाच शांत बसायला, बोलायला वेळ नसतो. घरात पाऊल ठेवल्यापासून टीव्ही चालू होतो. तो बघता बघताच होमवर्क, जेवण, खेळ, भांडणे, दप्तर भरणे, तर कधी कधी गप्पा या सर्वच गोष्टी होत असतात. यात अनडिव्हायडेड अटेन्शन कशालाच दिले जात नाही. एवढे करून रात्री 11 पर्यंत कसेबसे झोपले, की पुन्हा पहाटेपासून धावपळ सुरू. झोपण्यापूर्वी शांत बसून एकमेकांशी गप्पा नाहीत, की राजाराणीच्या, परीच्या गोष्टी नाहीत. दिवसभरात काय काय झाले त्या बऱ्या-वाईट अनुभवांचे देणे-घेणे नाही, की भविष्यात काय करायचे आहे, याचा विचार नाही.

आपले अनुभव, भावना दुसऱ्यांबरोबर वाटून घेणे, व्यक्त करणे ही मनुष्यस्वभावाची इतर मूलभूत गरजांप्रमाणेच महत्त्वाची गरज आहे. ती जर योग्य प्रकारे पूर्ण केली गेली नाही तर त्यातून शारीरिक किंवा मानसिक समस्या वा ताण निर्माण होऊ शकतात.

हल्ली बहुतेक पालकांची तक्रार असते, की मुलगा ऐकत नाही, खूप हट्टी झालाय. उलटून बोलतो, सतत लोळून टीव्ही पाहत राहतो, त्यामुळे आम्हाला ताण येतो, पण त्याला त्याचे काहीही वाटत नाही.

पालकांची ही तक्रार वरवर पाहता जरी खरी वाटली, तरी ती तितकीशी खरी नाही. खरे तर मुलांना काही ताणतणाव नसतो म्हणून ती टीव्ही पाहतात हे नेहमीच बरोबर असते असे नाही, तर मुलांना बरेचदा ताणतणाव असतो, त्याच्याशी कसा सामना करायचा, हे त्यांना माहीत नसते. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी, तो घालवण्यासाठी मुले जास्त टीव्ही पाहतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या ताणतणावाचा विसर पडतो. असे असले तरी ताण (डीींशीी) हा प्रत्येक वेळेस वाईटच असतो असे नाही, तर काही वेळेस त्याचे फायदेसुद्धा होतात. उदा.- त्यामुळे आपल्याला समस्या लक्षात येण्यास मदत होते व त्यावर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात किंवा त्यावर मात करण्यासाठी आणखी जोमाने प्रयत्न केले जातात. ज्याप्रमाणे कोणतेही तंतुवाद्य सुरात वाजण्यासाठी जसा ठराविक ताण आवश्‍यक असतो, तसाच प्रत्येकाचे आयुष्य सुरात चालण्यासाठी थोडासा ताणसुद्धा आवश्‍यक असतो. पण ताण चांगला आहे का वाईट, हे ओळखायचे कसे? त्याची लक्षणे कोणती?

ताणतणावाची असंख्य लक्षणे असू शकतात व प्रत्येक व्यक्तीमध्ये ती वेगळी असतात. कोणाला कोणत्या प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक समस्या उद्‌भवतील हे प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर व आनुवंशिकतेवर अवलंबून असते. उदा.- परीक्षेचा ताण दोन मुलांवर सारखाच असणार नाही. एखाद्याचे डोके दुखेल, पोट दुखेल तर दुसऱ्याला झोप लागणार नाही, भूक लागणार नाही, तर आणि कोणी भांडेल, चिडचिड करेल.

बऱ्याचदा पालक- शिक्षक या सगळ्याकडे या वयात असे होतेच, असे म्हणून दुर्लक्ष करतात. ही मुलांवरच्या ताणतणावची लक्षणे आहेत. यावर त्यांचा विश्‍वासच बसत नाही. पण जेव्हा समस्येची तीव्रता वाढते त्या वेळेस ती लक्षात येते, पण अजूनसुद्धा मुलांच्या वर्तनसमस्या वाढल्या तरी व्यावसायिक मदत (समुपदेशन) घेण्याचे टाळण्याकडेच जास्त कल दिसून येतो. कोण काय म्हणेल या विचारालाच महत्त्व दिले जाते.

ताणतणावांची लक्षणे
लक्षणांची व्याप्ती व तीव्रता विकासाच्या टप्प्यानुसार वाढते वा कमी होते. अगदी लहान मुलांमध्ये हट्टीपणा, अंगठा चोखणे, नखे खाणे, गादी ओली करणे, उलटी, जुलाब होणे ही लक्षणे दिसून येतात, तर मोठ्या मुलांमध्ये नाडीचे ठोके वाढणे, आम्लपित्त, त्वचाविकार, नैराश्‍य, भीती, एकलकोंडेपणा, विचारांचा गोंधळ, मारामारी, शाळा बुडवणे, खोटे बोलणे, चोरी करणे, व्यसनाधीनता अशी लक्षणे असतात.

कुमार वयातील मुलांमध्ये मुख्य करून जलद शारीरिक बदलांमुळे, वाढीमुळे व हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे मानसिक अस्वस्थता, अवघडलेपणा, बंडखोरी व बेजबाबदार वर्तन जास्त प्रमाणात दिसून येते. ताणतणावाची पातळी या वयात अत्युच्च असते. त्याचा परिणाम एकाग्रतेचा अभाव व अभ्यासात लक्ष न लागणे, अशा गोष्टींवर होतो.

पालक किंवा शिक्षक मुलांना अशा वर्तनाबद्दल ओरडतात किंवा शिक्षा करतात. त्यामुळे लक्षणे कमी झालेली दिसत तर नाहीतच, पण त्यांची तीव्रता मात्र बऱ्याचदा वाढलेलीच दिसून येते. अशा वेळी मुलांना त्या लक्षणांसाठी (उदा.- रडणे, ओरडणे, हट्ट करणे, शाळा बुडवणे वगैरे.) शिक्षा न करता त्यामागचे मूळ कारण शोधून त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे असते. एकदा ही ताणतणावांची कारणे व लक्षणे लक्षात आली, की त्यावर उपाययोजना करणे खूपच सोपे जाते.

ताणतणावांची कारणे व त्याचे परिणाम - तणावांच्या कारणांचा विचार करताना त्याचे मुख्य दोन प्रकार सांगता येतील.
1) बाह्य लक्षणे - जेव्हा ताणतणावांची कारणे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिकतेशी संबंधित नसून, बाहेरची असतात.
परिस्थिती- घरातील, घराबाहेरची, प्रसारमाध्यमे इ.
पालकांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे. शाळा, परीक्षा, अभ्यास, स्पर्धा वगैरे. रोजचे दमवणारे दैनंदिन वेळापत्रक.
2) अंतर्गत - जेव्हा कारणे बाह्य नसून व्यक्तीच्या शरीराशी, मनाशी संबंधित असतात; ती बऱ्याचदा जन्मजात किंवा आनुवंशिक असतात.
नकारात्मक/ निराशावादी विचार.
आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे अति विश्‍लेषण/ अतिविचार.
स्वतःकडून अवाजवी/ चुकीच्या अपेक्षा.

विचारांमधला ताठरपणा - परिस्थितीशी जुळवून घेता न येणे, दुसऱ्यांचे विचार, वागणे पटवून न घेणे, याव्यतिरिक्त आयुष्यातली अनिश्‍चितता, परिस्थितीचे आकलन, दृष्टिकोन, पालकांशी सुसंवादाचा अभाव, रॅगिंग, व्यसने, प्रेम, लैंगिक आकर्षण, अपयश, मित्रांशी किंवा भावंडांशी भांडण, इतरांशी तुलना, भ्रमनिरास इत्यादी अनेक कारणे मुलांमध्ये ताणतणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. वेळेवरच ही कारणं ओळखून त्यावर उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, तर शारीरिक किंवा मानसिक व्याधी, शाळेतून/ घरातून पळून जाणे, व्यसनाधीनता, आत्महत्या यासारखे गंभीर परिणाम दिसून येतात.

ताणतणावांचे व्यवस्थापन
हल्ली पालकत्व ही एक तारेवरची कसरत झाली आहे. वेगाने बदलत जाणारी जीवनशैली, कुटुंबपद्धती, वाढती महागाई, वाढता खर्च, त्यासाठी आई-वडील, दोघांनी नोकरी करण्याची आवश्‍यकता, वेळेची कमतरता, याच बरोबर मुलांच्या शाळा, अभ्यास, परीक्षा, क्‍लास, स्पर्धा ही एक न संपणारी दमवणारी यादी या सगळ्याचा ताण मुलांबरोबरच पालकांनासुद्धा निश्‍चितच येत असतो. आता पालक स्वतःच जर तणावग्रस्त असतील तर ते मुलांना कसे मदत करू शकतील? त्यामुळे जेव्हा आपण ताणतणावाच्या व्यवस्थापनाविषयी बोलतो त्या वेळेस पालकांच्या तणाव व्यवस्थापनापासून सुरवात करून मगच मुलांच्यासाठी उपाययोजना केल्यास नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. खरे तर ताणतणावांवर उपाययोजना करण्यापेक्षा तो न येईल यासाठी खबरदारी घेणेच चांगले.

पालकांसाठी काही सूचना
- खरी, आवाक्‍यातील उद्दिष्टे ठरवा, स्वतःमधील गुण-दोषांची माहिती करून घ्या.
- आयुष्यातले स्वतःचे प्राधान्यक्रम ठरवा.
- कोणत्याही अर्थशून्य किंवा कमी महत्त्वाच्या गोष्टींमुळे त्रास करून घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीबाबत योग्य दृष्टिकोन ठेवावा.
- रोज झोपण्यापूर्वी पाच मिनिटे शांत बसून आत्मपरीक्षण करा.
- वेळेचे व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे.
- सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
- वेळ पडेल त्या वेळेस न लाजता व्यावसायिक मदत जरूर घ्या.
- मुलांना वस्तूंपेक्षा वेळ द्या. त्यांना बोलते करा.
- टीव्ही पाहण्याचा वेळ कमी करा.

मुलांसाठी सूचना -
- जेव्हा ताण जाणवेल त्या वेळेस कोणाशी तरी बोलावे.
- मित्र, पालक, शिक्षक यांच्याकडे मदत मागायला लाजू नका.
- स्वतःची ध्येये ठरवून त्याच दिशेने वाटचाल करा.
- नकारात्मक विचार टाळा.
- वेळेचे व्यवस्थापन शिका/ करा.
- स्वतःच्या शारीरिक/ मानसिक क्षमतांचा विचार करूनच आपली उद्दिष्टे ठरवा.
- परिस्थितीमध्ये जरुरीप्रमाणे छोटे छोटे बदल करा. परिस्थितीशी / लोकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा.
- आहार, विहार, झोप यात योग्य संतुलन राखा.
- कोणतातरी छंद जोपासा.                        

No comments:

Post a Comment

ad