Sunday, September 19, 2010

आरोग्याचे चक्र

डॉ. श्री बालाजी तांबे
भारतीय स्वयंपाकाचे शास्त्र आणि भारतीयांचे आरोग्य यांचा निश्‍चित असा परस्परसंबंध आहे, तसाच निश्‍चित संबंध अध्यात्माचा आणि भारतीय लोकांचाही आहे. अध्यात्माची शास्त्रशुद्ध उपासना करणाऱ्या साधकाचे जीवन केव्हाही अधिक सुखाचे, समाधानाचे आणि समृद्धीचे होते.
विज्ञानाचा अभ्यास हे माझ्या आजवरच्या वाटचालीचे महत्त्वाचे अंग राहिलेले आहे. त्यामुळेच मी आधी अभियंता झालो आणि नंतर डॉक्‍टर. परंतु विज्ञान हे केवळ भौतिक वस्तूंपुरते मर्यादित नाही. नीट समजून घेतले तर त्याहीपलीकडे असणारी त्याची व्याप्ती आपल्या लक्षात येते. शरीराचे जसे शास्त्र आहे, तसे अंतर्मनाचे, अंतःचक्षूंचे, अनुभूतीचे- थोडक्‍यात अध्यात्माचेही एक क्षेत्र आहे. विज्ञानाबरोबरच मी अध्यात्माचाही अभ्यासक आहे. मुळातील विज्ञानाची आवड आणि त्यात मी अध्यात्माचा अभ्यासक, यामुळे अध्यात्माचे काही विज्ञान आहे का, शतकानुशतके टिकलेल्या, चिरकाल अशा अध्यात्माचे आणि माणसाचे असे कोणते वैज्ञानिक नाते आहे, ज्यामुळे दोघांचा संबंध अधिकाधिक दृढ होत आहे, अशा प्रश्‍नांची उत्तरे शोधणे हा माझ्या आजवरच्या वाटचालीचा एक भागच बनून गेला आहे. भारतीय स्वयंपाकाचे शास्त्र आणि भारतीयांचे आरोग्य यांचा निश्‍चित असा परस्परसंबंध आहे, तसाच निश्‍चित संबंध अध्यात्माचा आणि भारतीय लोकांचाही आहे. अध्यात्माची शास्त्रशुद्ध उपासना करणाऱ्या साधकाचे जीवन केव्हाही अधिक सुखाचे, समाधानाचे आणि समृद्धीचे होते. अष्टांगयोगाचा एक भाग म्हणून साधकांना परिचित असणारे षट्‌चक्र दर्शन हाही व्यापक अर्थाने अध्यात्माचाच एक भाग. पुढे आयुर्वेद आणि अध्यात्माच्या प्रसारासाठीच्या माझ्या निरूपणांमध्ये षट्‌चक्रांचाही आपसूकच समावेश झाला. षट्‌चक्रे आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्य यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे.

पाचव्या वर्षी माझी मुंज झाली. त्यानंतर मी रोज बारा सूर्यनमस्कार घालू लागलो. वडिलांनी हळूहळू ही संख्या वाढवायला सुरवात केली. सूर्यनमस्कार का घालायचे, त्याने काय होते, यासारखे प्रश्‍न मी त्या वेळी त्यांना विचारी आणि पटणाऱ्या, विज्ञानाचा आधार असणाऱ्या उत्तरांची अपेक्षा करी. वय वाढल्यानंतर प्रश्‍न वाढले आणि आकलनही. आकाशातल्या सूर्याला साक्षी ठेवून सूर्यचक्राची उपासना केलेली असली तरी आपल्या नाभीच्या ठिकाणी असलेल्या शरीरातील सूर्यालाही जागृत करण्याचा उद्देश आणि क्षमता त्यात आहे; शरीरातील सूर्यामुळे अन्नपचन होऊन शक्‍तीची निर्मिती होते, सामर्थ्य म्हणजे कर्म करण्यासाठी लागणारी शक्‍ती मिळते आणि ऊर्जेबद्दल आकर्षण वाढून विकासप्रक्रिया साधली जाते, हे वडिलांनी सांगितले आणि त्या वेळच्या क्षमतेनुसार मला थोडेफार समजलेही.

समज वाढल्यानंतर अथर्वशीर्षात असलेल्या "सूर्यग्रहे महानद्यां प्रतमासन्निधौ वा जप्त्‌वा' या ऋचेचा अर्थ समजून घेताना मेंदूच्या मध्यभागी कल्पिलेल्या सूर्यचक्राची कल्पना लक्षात आली. सप्तशरीरे, सप्तरंग, सप्तस्वर, सप्ताकाश, सप्तलोक, आवर्त-विवर्तातील साडेतीन गुणिले दोन, अशा सात मात्रा या सर्वांची कल्पना आल्यानंतर शरीरस्थ चक्रांची संकल्पना अनुभवाला आली. असे म्हणता येईल, की अनुभवानंतर या कल्पना विशेषरूपाने समजल्या. वेद, उपनिषद, आयुर्वेद, ज्योतिष, योग, संगीत यांच्या परस्परसंबंधांतील साताचे गणित जगातील सात आश्‍चर्यांत समाविष्ट करावयास हवे, असे वाटू लागले. पुढे पुढे मला भ्रूमध्यात दिसणाऱ्या प्रकाशाचा अनुभव येत असे.

पुण्यात 1965 मध्ये मी अभ्यासवर्ग सुरू केले. त्यात सहभागी होणाऱ्या साधकांनाही योगासनांपेक्षा भगवद्‌गीतेच्या चिंतनात व भगवद्‌गीतेच्या चिंतनापेक्षा ॐकारगुंजनात अधिक रस असे. तरीही षट्‌चक्रभेदन, कुंडलिनी उत्थापन याविषयी अनेक जण औत्सुक्‍य दाखवत असत. कुंडलिनीबद्दल अधिक जाणून घेण्याची मलाही तेव्हा उत्सुकता होती. कुंडलिनीच्या अभ्यासाला योग्य मार्गदर्शन लाभावे असे वाटत असे. म्हणून मी श्री गुळवणी महाराजांच्या आश्रमात जाऊन कुंडलिनीचे रहस्य समजून घ्यावे असे ठरवून पूज्य महाराजांना तशी विनंती केली. त्यावर ""हे रहस्य अनुभवानेच समजेल,'' असे त्यांनी सांगितले. माझे वडील वेदशास्त्रसंपन्न श्री वासुदेवशास्त्री तांबे आणि प. पू. गुळवणी महाराज हे दोघे प. पू. शक्‍तिपाताचार्य लोकनाथतीर्थ यांच्याकडे शिकत होते. या दोघांच्या गुरुबंधू संबंधामुळेच पूज्य महाराजांबरोबर अशा प्रकारची चर्चा करणे शक्‍य झाले. महाराजांनी सांगितल्यानुसार मी कुंडलिनीचे रहस्य समजून घेण्यासाठी अनुभवाची दारे आणखी उघडी केली.

दीक्षा मिळाली किंवा कुंडलिनी जागृती झाली, म्हणजे आता मोक्षात आपल्यासाठी जागेचे आरक्षण झाले असे नाही. अध्यात्म शाखेमध्ये आपल्याला प्रवेश मिळाला. यापुढे प्रत्येक चक्रावर काम केले, त्यांची उपासना केली व बरोबरीने दैनंदिन जीवन नैसर्गिकपणे जगले, आपल्या कर्मांचा त्याग न करता या दोन्ही गोष्टी करीत गेले तर साधकाला आपल्या लक्ष्यापर्यंत जाता येईल, हेच खरे. या विषयांच्या चर्चा नेहमीच होत असत. आज्ञाचक्रात दिसणाऱ्या प्रकाशाची अनुभूती साधकाला फार लवकर होऊ शकते. कुंडलिनी जागृती झाल्यावर सर्व शरीर कंपायमान झाल्याचा अनुभव आल्यास तो केवळ कुंडलिनी जागृतीमुळेच आलेला अनुभव आहे असे सांगणे अवघड असते. (किंबहुना अशा कंपनांमुळे काही वेळेला संबंधित व्यक्‍तीला दैनंदिन जीवन जगणे अवघड होऊन बसते. त्यावर उपचार करताना वेगळ्या आयुर्वेदिक संकल्पनांचा विचार करावा लागतो.) सर्वांत अडचणीचे ठरणारे चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. येथे दलदल आहे, असे मी म्हणत असे. पृथ्वीतत्त्वाचा जलतत्त्वाशी संपर्क आल्यावर त्या दलदलीतून बाहेर पडणे खूप अवघड असते. याच ठिकाणी मत्सर, कामवासना वगैरे भाव माणसास अडकवितात. यामुळेच जागृत झालेली शक्‍ती ऊर्ध्वगामी होऊन ब्रह्मरंध्राला जाण्याऐवजी मूलाधार चक्रात त्रास देऊ लागते व साधक अति कामसेवन किंवा अति भौतिकवादी होण्याचा धोका असतो. म्हणूनच कदाचित योगशास्त्राने अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, स्वाध्याय, तप, शौच, संतोष, ईश्‍वर प्रणिधान यासारखे यम-नियम सुचविले असावेत.

- डॉ. श्री बालाजी तांबे 
आत्मसंतुलनव्हिलेजकार्ला 410 405
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad