Saturday, September 18, 2010

वास्तुप्रथा : दक्षिण दरवाजा : चिंता नको






संजय पाटील, 
sanjuspatil@hotmail.com
लक्ष्मी दारातून आत येते किंवा दारातूनच माघारी जाते, म्हणून वास्तुप्रथेत दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला गेलाय. फक्त दरवाजा जरी वास्तुप्रथेप्रमाणं असेल तरी अनेक सुपरिणाम मिळतात. संपूर्ण घर रेक्टिफाय करीत बसण्यापेक्षा फक्त दरवाजा रेक्टिफाय करणं सोपं, कमी श्रमाचं आणि कमी खर्चाचं आहे. ऊर्जा दोन प्रकारची असते. चांगली आणि वाईट. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. कधी कधी ‘काय अवदसा घरात आलीय!’ असं आपण सहजच म्हणून जातो. मायबोलीतील ही ‘अवदसा’ म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे अर्थात लक्ष्मी होय. लक्ष्मीचं म्हणजेच चांगल्या वैश्विक ऊर्जेचं घरात आगमन व्हावं म्हणून ज्या मुख्य दरवाजातून लक्ष्मी येते त्या मुख्य दरवाजाकडे विशेष लक्ष पुरवावं लागतं.
घराचा मुख्य दरवाजा वास्तुप्रथेनुसार असेल तर लक्ष्मी घरात येते, म्हणजे काय होतं तर योग, क्षेम, आयु, कल्याण, मांगल्य या पंचपरमेष्ठीची प्राप्ती होते. भाग्यकल्प होतो. पण मुख्य दरवाजा वास्तुप्रथेच्या विपरीत असेल तर तो वाईट ऊर्जेला निमंत्रण देतो. घरात ‘अवदसा’ आल्याची प्रचीती येते. विपरीत फळं मिळू लागतात. मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं मुख आहे. जर मुखच अस्वच्छ, दुर्गधीयुक्त, जंतुसंसर्ग झालेलं असेल तर तेथून पोटात जाणाऱ्या अन्नाची अवस्था काय होईल? जंतू घेऊन आलेलं अन्न आपल्या शरीराचं भरणपोषण करू शकेल का? दूषित ऊर्जा आपल्या घराचं स्वास्थ्य टिकवू शकेल का?
दक्षिण दिशेला दरवाजा असणं वाईट असतं, असा गैरसमज मोठय़ा प्रमाणावर आढळतो. तथाकथित वास्तुतज्ज्ञांनी लिहिलेली पुस्तकं १००-१२५ रुपयांत हल्ली सर्वत्र विकायला ठेवलेली दिसतात. या सर्व पुस्तकांत दक्षिणेला दरवाजा असणं वाईट असा उल्लेख आढळतो. ‘दक्षिण म्हणजे क्षीण’ असला काही तरी तिरपागडा तर्क त्यासाठी लढवलेला असतो.
एकदा मुंबईतील एका प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञाच्या शिबिराला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. त्या वास्तुतज्ज्ञानं त्याच्या व्याख्यानात दक्षिणेच्या दरवाजाची इतकी निंदा केली की विचारू नका! शेवटी माझा नाइलाज झाला. खरं तर यजमानांच्या विरोधी मत पाहुण्यानं जाहीरपणं प्रकट करणं हे औचित्यभंगाचं होतं, पण चुकीच्या शास्त्राचा प्रचार होऊ नये म्हणून ते धाडस मी केलं. दक्षिणेचा दरवाजा वाईट नाही, हे ग्रंथोक्त दाखले देऊन व उदाहरणासह सांगायला सुरुवात केली तेव्हा शिबिरार्थी अवाक्  झाले. मी देत असलेली माहिती त्यांच्यासाठी नवी होती, पण त्यांना १०० टक्के पटत होती. टाळ्यांच्या प्रचंड प्रतिसादात त्यांनी या भाषणाचं स्वागत केलं.
या प्रसंगाचा उल्लेख करण्याचा उद्देश इतकाच की, पुराणग्रंथाचा अभ्यास न करता काही बाही पुस्तकं चाळून व जाहिरातबाजी करून अर्धवट ज्ञानाचे लोक वास्तुतज्ज्ञ म्हणून कसे मिरवतात ते वाचकांच्या निदर्शनास आणून देणं. मयमतम, मानसारम, कामिका आगम, समरागण, सूत्रधार, राजवल्लभ, विश्वकर्मा प्रकाश, अपराजित पृच्छ,   चंद्रिका, काश्यपशिल्प, वृक्षायुर्वेद, बृहत्संहिता असे वास्तुशास्त्राला वाहिलेले आणि हजारो वर्षांची ऋषीमुनींची परंपरा सांगणारे  ग्रंथश्रेष्ठ भारतभूमीत आहेत. या ग्रंथांची धड नावं तरी या वास्तुतज्ज्ञांना माहीत असतील का याची शंका वाटते.
येथे मुद्दाम नमूद करावंसं वाटतं की, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेटस् दक्षिणाभिमुख घरात राहते. जगातील सर्वात श्रीमंत व्यापारी इमारत म्हणून जिचा उल्लेख होतो ती अमेरिकेतील एक्स्प्रेस बिल्डिंग दक्षिणभिमुख आहे. जागतिक महासत्तेचं केंद्र असणारं व्हाइट हाऊस दक्षिणमुखी आहे. जे. आर. डी. टाटांचा जन्म दक्षिणमुखी घरातला. भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचं वास्तव्य नेहमी दक्षिणमुखी घरात होतं. मुंबईतील २५ टक्के घरं, २५ टक्के दुकानं, २५ टक्के हॉस्पिटल्स दक्षिणेकडे तोंड करून आहेत. कुणाचं काही बिघडलंय???
रायगड जिल्ह्यातील एका गावात गेलो होतो. गावाची रचना गमतीशीर आहे. पूर्व-पश्चिम सरळ रस्ता आहे आणि रस्त्याकडे तोंड करून दुतर्फा घरं-दुकानांची एकेरी ओळ आहे. गावाची लांबी चार कि.मी., पण रुंदी मात्र सरासरी १२५ फूट. आता गावातील अर्धी घरं उत्तरेकडे तर अर्धी घरं दक्षिणेकडे तोंड करून आहेत हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल! मुख्य म्हणजे जितकी सुबत्ता रस्त्याच्या उजव्या बाजूला (उत्तरमुखी) असणाऱ्या घरांतून दिसते तितकीच दक्षिणमुखी घरांतून दिसते. दक्षिण दिशा निषिद्ध असती तर या घरात दारिद्रय़ नांदायला हवं होतं, नाही का?
श्री हनुमान कृपेनं आणि गुरुवर्य य. न. मग्गीरवार यांच्या आशीर्वादानं वास्तुशास्त्राच्या ग्रंथोक्त अभ्यासाची दिशा मला सापडली. वेद, पुराण, ब्राह्मण ग्रंथ, सूत्र ग्रंथ, आरण्यकं, उपनिषदं, संहिता ग्रंथ, वास्तुविषयक प्राचीन संस्कृत वाङ्मय यांचा अहोरात्र धांडोळा घेतला तेव्हा आढळलं की, कुणीही दक्षिण दिशा निषिद्ध असल्याचं म्हणत नाही. मग दक्षिण दिशेबद्दल अपप्रचार अस्तित्वात आला कसा???
दक्षिण दिशेच्या दरवाजाबद्दल अनेक वेळा लेख लिहिले, व्याख्यानं दिली. असाच एक लेख वाचल्यानंतर एका मध्यमवयीन महिलेचा फोन आला.
‘‘मास्टर, अहो तुम्ही काय सांगत असता दक्षिणेचा दरवाजा वाईट नसतो म्हणून’’.. ती महिला फोनवरून माझ्यावर करवादू लागली.
‘‘अहो, हे माझ्या मनाचं सांगत नाही. ऋषिमुनींनी जे ग्रंथात सांगितलंय तेच मी सांगत असतो’’.. माझं स्पष्टीकरण.
‘‘दक्षिणेच्या दरवाजामुळं काय प्रॉब्लेम होतात माहितंय तुम्हाला’’.. ती आपला हेका सोडायला तयार नव्हती.
‘‘काय प्रॉब्लेम होतात?’’.. मी उत्सुकतेनं विचारलं.
‘‘अहो, लांबचं जाऊ द्या. आज सकाळचं उदाहरण घ्या. मी आणि माझ्या शेजारणीनं एकाच दुकानातून एकाच वेळी एकेक डझन अंडी खरेदी केली. तिची सर्व चांगली निघाली. माझी मात्र दोन नासकी निघाली. आत्ता बोला.’’..

..काय बोलणार होतो? मी हतबुद्ध झालो. दक्षिणेचा दरवाजा वाईट असतो हा गैरसमज इतका दूरवर आणि इतका खोलवर पसरलाय की काही विचारू नका. तुम्ही उत्तरमुखी घरात राहत असा किंवा पूर्वमुखी. प्रत्येकाच्या आयुष्यात बऱ्यावाईट गोष्टी घडतच असतात, पण गंमत अशी की ज्यांच्या घराचा दरवाजा दक्षिणेला आहे अशा बहुसंख्य व्यक्ती आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीचं खापर सतत दक्षिण दरवाजावर फोडत असतात.
खरंतर दोष सर्वसामान्यांना देता येणार नाही. अर्धवट ज्ञानाच्या वास्तुतज्ज्ञांचा हल्ली सुळसुळाट झालाय. हेच लोक रेल्वेस्टेशनांवर मिळणारी पुस्तकं चाळून, कसलेतरी तिरपागडे तर्क लढवून, काहीबाही सांगत असतात. दक्षिणेचा दरवाजा वाईट असतो हा गैरसमज पसरविणारे लोक हेच. ज्योतिषशास्त्राचं ज्ञान नाही, प्राचीन ग्रंथांना हातही लावलेला नाही, मंत्र-तंत्राची माहिती नाही. मुहूर्तशास्त्राची माहिती नाही. अध्यात्माची बैठक नाही, इंटिरियर डिझायनिंग- आर्किटेक्चरचा गंध नाही आणि तरीही हे वास्तुकन्सल्टंट म्हणून मिरविणार. थोडक्यात, काय तर ‘चले मुरारी हीरो बनने’..  

दक्षिणेचा दरवाजा वाईट असतो हा गैरसमज इतका दूरवर आणि इतका खोलवर पसरलाय की काही विचारू नका. तुम्ही उत्तरमुखी घरात राहत असा किंवा पूर्वमुखी. प्रत्येकाच्या आयुष्यात बऱ्यावाईट गोष्टी घडतच असतात, पण गंमत अशी की ज्यांच्या घराचा दरवाजा दक्षिणेला आहे अशा बहुसंख्य व्यक्ती आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीचं खापर सतत दक्षिण दरवाजावर फोडत असतात.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad