Tuesday, December 8, 2009

जळजळ होणे



- डॉ. ह. वि. सरदेसाई
छातीतील जळजळ नेहमीच ऍसिडिटीमुळे असेल असे नाही. छातीत जळजळ का होत आहे, याचा गंभीरपणे विचार करायला हवा. कधी कधी मोठ्या आजाराची ती सूचना असू शकेल.

छातीत जळजळ झाल्याची भावना एखाद्या व्यक्तीला जाणवली तर बहुतेक वेळा असा रुग्ण मला ऍसिडिटीचा त्रास होतोय, असे डॉक्‍टरांना सांगतो. वास्तविक प्रत्येक माणसाच्या जठरात हायड्रोक्‍लोरिक ऍसिड असतेच. ते जठरातच तयार होते. आपल्या आहारातील अपायकारक जिवाणू-विषाणूंना निष्प्रभ करणे हे या ऍसिडचे महत्त्वाचे कार्य असते. शिवाय, शाकाहारातून येणारा लोहाचा रेणू टॅनेट, ऑक्‍सालेट, फॉस्फेट व फायरेट या रेणूंशी घट्ट बांधलेला असतो. तो मोकळा केला गेला नाही तर आहारात पुरेसे लोह असूनही ते शोषले जात नाही. सोयाबीन्सपासून मिळणारे सोया-प्रोटीन सेवण्याने लोहाचे रेणू शोषले जाण्यात मोठीच अडचण येते. याचे कारण या सोया-प्रोटीनमध्ये फायरेटचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात. चहा-कॉफीमध्ये टॅनेट रेणू विपुल असतात. जठरातील हायड्रोक्‍लोरिक ऍसिडमुळे लोहाचे शोषण सुधारते.

अन्ननलिकेच्या अस्तरातील पेशींना हायड्रोक्‍लोरिक ऍसिडमुळे दाह होतो. कारण जठराच्या अस्तरातील पेशींप्रमाणे या अन्ननलिकेच्या अस्तराच्या पेशींना हायड्रोक्‍लोरिक ऍसिडशी संपर्क येत नसतो. ज्या वेळेस अन्ननलिकेचे स्नायू आकुंचित पावतात, तेव्हा छातीच्या मध्यभागी जळजळ झाल्याची भावना रुग्णाला जाणवते. अशी स्थिती या भागातील अनेक विकारांत येणे शक्‍य आहे. या विकारात जठरातील हायड्रोक्‍लोरिक ऍसिड उलटे फिरून अन्ननलिकेत येते. असा दाह मिरचीमधील कॅपसॅसिन या द्रव्याने, लसणामधील ऍलॅसिनमुळे, मोहरीच्या तेलाने किंवा लवंगांत असणाऱ्या युजिनॉल या रासायनिक रेणूंनीही होणे संभवते. त्यामानाने मिरपुडीत असणाऱ्या चाव्हिसिन या रेणूने असा दाह कमी प्रमाणात होतो. मद्यपान, धूम्रपान, तंबाखूचे सेवन, अनेक वेदनाशामक औषधांचा वापर, चहा-कॉफी यांचे सातत्याने सेवन, या सर्वांनी छातीत जळजळ होणे संभवते. काही वेळा जठराचा भाग छाती व पोट यामध्ये असणाऱ्या पडद्यापासून छातीकडे सरकतो. याला हायाटल हर्निया (हळरज्ञरश्र हशीपळर) म्हणतात. याचे निदान बेरियम औषध पिऊन घेतलेल्या क्ष-किरणांच्या तपासणीने सहज करता येते. सुरवातीला योग्य पथ्य, औषधे व आडवे न झोपणे, या साध्या उपायांनी हायाकल हर्नियावर मात करता येते. हे रुग्ण आडवे झाल्यावर त्यांचे त्रास वाढतात व उठून बसल्यावर किंवा उभे राहून चालल्यास त्यांना बरे वाटते. माफक जेवावे व जेवणानंतर शतपावली करावी, म्हणजे फायदा होईल.

छातीत होणारी जळजळ कधी कधी हृदयविकाराचेदेखील लक्षण असू शकते. अशी तक्रार "अपचनामुळे' किंवा ऍसिडिटीमुळे असावी, असे रुग्णाला वाटू शकते. काही अँटॅसिड गोळ्या किंवा औषधे घेण्याकडे कल होतो; त्याचा फायदा नसतो. हृदयविकारामध्ये कधी कधी रुग्णाला उलटी होते, त्यामुळे लक्ष पचनसंस्थेकडे जाणे शक्‍य आहे. रुग्णाला तपासून रक्तदाब व नाडी पाहून आवश्‍यकता वाटल्यास कार्डिओग्रॅम काढून पुढचे निर्णय घेणे आवश्‍यक असते. सुरवातीच्या काळात कार्डिओग्रॅमदेखील दोष दाखवीत नाही. रुग्णाला अकस्मात थकवा येणे, घाम सुटणे, अंधारी जाणवणे, श्‍वास जलद होणे, नाडीची गती जलद किंवा संथ होणे, असे काही आढळल्यास रुग्णाला किमान 24 ते 26 तास नजरेखाली ठेवणे आवश्‍यक असते.
महारोहिणीचे पदर मोकळे होणे (रीीेंळल वळीीशलींळेप), हा फार गंभीर आजार आहे. रुग्णाच्या छातीत, मानेत वाढीव व नंतर पोटात वेदना होतात. अशा आजाराचे निदान अनुभवी हृदयरोगतज्ज्ञच करू शकतात. सर्व तऱ्हेच्या हृदयावरील शस्त्रक्रिया करण्याची सोय व सराव असणाऱ्या रुग्णालयातच यात उपाय होणे संभवते.

सामान्यतः अशी छातीत होणारी जळजळ अन्ननलिकेच्या दाहाने होते, हे आपण पाहिलेच आहे. नाकाघशातून निघणारे द्राव गिळले जातात. त्यातील जिवाणू व अन्य पदार्थ अन्ननलिकेच्या अस्तराला दाह करतात. यासाठी श्‍वसनमार्ग मोकळा असणे जरुरीचे आहे. प्राणायाम, जलनेती यांचा उपयोग होतो. आहारात तिखट-आंबट, खारवलेले, तळलेले पदार्थ टाळावेत. चहा-कॉफी, तंबाखू, मद्यपान सोडावे. वायुमिश्रित शीतपेयेदेखील टाळणेच चांगले. थोडे खावे. वारंवार खावे. नरम भात, मुगाचे वरण, अधमुरे दही, गोड ताक, साबूदाण्याची लापशी, खीर, अधिक पिकलेली गरांची गोड फळे (पपई, केळे), सोयाबीन, चपाती/भाकरी कुस्करून दुधात बुडवून ठेवावी व चांगली मऊ झाल्यावर सेवावी. रात्रीचे जेवण आडवे होण्यापूर्वी तीन तास आधी घ्यावे. रात्री झोपताना खाटेचे डोक्‍याखालचे खूर नऊ इंच उंच करावेत. वेदनाशामक औषधांचा वापर काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
छातीतील जळजळ का होत आहे, याचा गंभीरपणे विचार केला गेला पाहिजे. कधी कधी मोठे आजार असू शकतात.


--Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

ad