Thursday, December 3, 2009

अन्नयोग : फळे

फळे नुसती खाता येतात, फळांचा रस काढून घेता येतो किंवा रायते, कोशिंबीर बनवून आहारातही फळे समाविष्ट करता येतात. प्रसाद-पूजेसाठी फळे महत्त्वाची असतात. अशाच काही फळांची आपण माहिती घेणार आहोत.
- डॉ. श्री बालाजी तांबेनारळ
जा असली की नारळ लागतोच. नारळाचे गुणधर्म पाहिले, की देवालाही नारळ प्रिय असेल याची खात्री पटते.
नारिकेलं गुरु स्निग्धं शीतं वृष्यं च दुर्जरम्‌ ।
बस्तिशुद्धिकरं बल्यं बृंहणं कफकारकम्‌ ।।
स्वादु विष्टम्भकृत्‌ प्रोक्तं शोषतृषापित्तनाशनम्‌ ।
वातपित्तं रक्‍तदोषं दाहं चैव विनाशयेत्‌ ।।...निघण्टु रत्नाकर
* नारळ चवीने मधुर, वीर्याने शीतल, गुणाने स्निग्ध, शुक्रधातू वाढविणारा असतो; पण पचायला जड असतो. नारळामुळे वात-पित्तदोष कमी होतात, तर कफदोष वाढतो, ताकद वाढते. नारळ लघवी साफ होण्यास मदत करतो. शोष, तहान, रक्‍तदोष, दाह वगैरेंमध्ये हितकर असतो.
* खोबरे- विशेषतः ताजे खोबरे स्वयंपाकात वापरले असता पदार्थ रुचकर बनतो. तसेच त्यातील तीक्ष्णता कमी होण्यास मदत होते. विड्यात वगैरे खोबरे घालण्याची पद्धत याचमुळे असते.
* ताजा ओला नारळ किसून काढलेले दूध अतिशय पौष्टिक असते. कोरडा खोकला असल्यास नारळाचे दूध घेण्याचा फायदा होतो. नारळाचे दूध नियमित घेण्याने ताकद वाढते; ऍसिडिटीमुळे पोटात जळजळ होणे, डोके दुखणे वगैरे तक्रारी कमी होतात.
* नारळाचा सुकलेला गोटा ओल्या खोबऱ्यापेक्षा पचायला जड असतो, मलावष्टंभकर असतो, पण ताकद वाढवतो. वीर्यवृद्धीसाठीही उपयुक्‍त असतो.
* शहाळे विशेषत्वाने पित्तशामक असते. शरीरात उष्णता वाढल्याने लघवीला जळजळ वगैरे होत असल्यास शहाळ्याचे पाणी पिणे उत्तम असते. पित्तामुळे अर्धशिशीचा त्रास होत असल्यास खडीसाखर घालून शहाळ्याचे पाणी घेण्याचा फायदा होतो. गर्भारपणात शहाळ्याचे पाणी पिणे चांगले असते.
केळे
कदली शीता गुर्वी वृष्या स्निग्धा च माधुरी ।
पित्तं रक्‍तविकारं च योनिदोषं तथाश्‍मरीम्‌ ।
रक्‍तपित्तं नाशयति इत्येवमाचार्यभाषितम्‌ ।।...निघण्टु रत्नाकर
* केळे चवीला गोड, तर वीर्याने शीत असते. पूजेसाठी, पंगतीसाठी केळीचे खांब, केळीची पाने वापरण्याची पूर्वापार पद्धत आहे. भूक व्यवस्थित लागत असताना, छाती-पोटात जळजळ होत असल्यास, पित्तामुळे पोटात दुखत असल्यास तुपासह केळे खाणे चांगले असते.
* लहान मुलांमध्ये किंवा कफ होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांमध्ये केळ्यामुळे कफ होऊ नये म्हणून केळे मधासह घेता येते. केळ्याचे काप करून त्यावर थोडे मध व तूप टाकून खाणे अधिक श्रेयस्कर असते.
* सोनकेळे म्हणून केळ्याचा एक प्रकार असतो. ही आकाराने लहान असतात व सोन्यासारखी तेजस्वी दिसतात. साध्या केळ्यापेक्षा सोनकेळे गुणांनी अधिक श्रेष्ठ असते.
सुवर्णकदली शीता मधुरा चाग्निदीपनी ।
बल्या वृष्या च गुर्वी च तृड्‌दाहकफकफनाशिनी ।।...निघण्टु रत्नाकर
* सोनकेळे चवीला गोड, वीर्याने शीत असते. अग्नीदीपन करते. ताकद वाढवते. शुक्रधातूस वाढवते. पचायला जड असले तरी फारसा कफदोष वाढवत नाही. तहान, दाह वगैरे तक्रारींमध्ये हितकर असते.

आंबा
पक्वाम्रो मधुरः शुक्रवर्धकः पौष्टिकः स्मृतः ।
गुरुः कान्तितृप्तिकरः किंचिदम्लो रुचिप्रदः ।।
हृद्यो मांसबलानां च वर्धकः कफकारकः ।
तुवरश्‍च तृषावातश्रमाणां नाशकः स्मृतः ।।......निघण्टु रत्नाकर

* पिकलेला आंबा चवीला गोड पण किंचित आंबट व तुरट असतो. पचण्यास जड असतो. शुक्रधातू वाढवतो. पौष्टिक असतो. चवीला अतिशय रुचकर असतो. तृप्ती करणारा असतो. मांसधातूची ताकद वाढवतो. कफकर असतो. तृष्णा, वात व श्रमाचा नाश करतो.
* पिकलेला आंबा तासभर साध्या पाण्यात भिजत ठेवून नंतर रस काढून साजूक तूप, थोडीशी मिऱ्यांची पूड, सुंठपूड टाकून खाणे चांगले असते. यामुळे आंबा पचायला सोपा होतो व सहसा बाधत नाही. मधुमेही व्यक्‍तींखेरीज इतरांनी आंब्याच्या ऋतूत ताजा आंबा खाणे उत्तम होय. आंबा पचला असता त्यामुळे मांस व शुक्रधातूचे उत्तम पोषण होते.

- डॉ. श्री बालाजी तांबे

Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad