Saturday, October 17, 2009

रोगप्रतिकारशक्‍ती


उत्तम आरोग्यासाठी, संपन्न जीवनासाठी रोगप्रतिकारशक्‍ती व्यवस्थित हवी. सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या, वाढत्या रोगराईच्या काळात तर रोगप्रतिकारशक्‍ती चांगली ठेवण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करायलाच हवेत आणि त्यासाठी आयुर्वेदिक जीवनशैली, आयुर्वेदिक रसायने यांना पर्याय नाही.
रोगांना प्रतिकार करू शकणारी शक्‍ती म्हणजे रोगप्रतिकारशक्‍ती. आरोग्याचे रक्षण हे आयुर्वेदाचे प्रथम आणि महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आरोग्यरक्षण म्हणताना त्यामागे उत्तम रोगप्रतिकारशक्‍ती अध्याहृत असतेच.
आयुर्वेदात मांडलेली व्याधिक्षमत्व ही संकल्पना रोगप्रतिकारशक्‍तीशी मिळती-जुळती आहे. व्याधिक्षमत्व जितके चांगले तेवढी रोग होण्याची शक्‍यता कमी, याउलट व्याधिक्षमत्व जेवढे कमी तितकी आजार होण्याची शक्‍यता अधिक. व्याधिक्षमत्व कमी असू शकणाऱ्या काही स्थिती आयुर्वेदात याप्रमाणे सांगितल्या आहेत.
शरीराणि चातिस्थूलानि अतिकृशानि अनिविष्टमांसशोणितास्थीननि दुर्बलानि असात्म्य-आहारोपचितानि अल्पाहाराणि अल्पसत्त्वानि च भवन्ति अव्याधिसहानि, विपरीतानि पुनर्व्याधिसहानि ।
...चरक सूत्रस्थान
१. अतिस्थूल
सप्तधातूंपैकी फक्‍त मेदधातूच शरीरात वाढला, तर त्यामुळे शरीराची एकंदर ताकद कमी होते. विशेषतः मेदधातूच्या पुढील धातू म्हणजे अस्थी, मज्जा, शुक्र या महत्त्वाच्या धातूंपर्यंत पोषण पोचले नाही, की शरीर हळूहळू निःसत्त्व होऊ लागते व त्यातून रोगप्रतिकारशक्‍ती कमी होते.
२. अतिकृश
जीवनशक्‍ती, रोगप्रतिकारशक्‍ती ही धातूंच्या आधाराने राहत असते. विशेषतः रसधातू, रक्‍तधातू, मज्जाधातू, शुक्रधातू हे सर्व धातू जीवनशक्‍तीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात. अतिकृश व्यक्‍तींमध्ये धातूंचे प्रमाणच कमी असल्याने रोगप्रतिकारशक्‍ती कमी असते.
३. रक्‍त, मांस व हाडे शिथिल असणाऱ्या व्यक्‍ती
रक्‍तधातूच्या ठिकाणी प्राण राहतात. मांसाच्या दृढतेवर, कणखरतेवर एकंदर शरीरशक्‍ती अवलंबून असते आणि हाडे म्हणजे शरीराचा मुख्य आधार, मुख्य कणा असतो. हे तिन्ही धातू व्यवस्थित नसतील, प्रमाणबद्ध नसतील, तर त्यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती कमी होऊ शकते.
४. दुर्बल
स्वभावतःच ताकद कमी असल्यास किंवा खूप प्रवास, खूप परिश्रम, अति मानसिक ताण, एखादे मोठे आजारपण यामुळेही प्रतिकारशक्‍ती कमी होत असते.
५. असात्म्य आहार करणाऱ्या व्यक्‍ती -
असात्म्य अन्न म्हणजे प्रकृतीला प्रतिकूल असणारे, शरीरात सहजपणे सामावू न शकणारे अन्न. जीवनशक्‍ती हवी तर त्यासाठी संपन्न धातू हवेत आणि संपन्न धातू हवे असले, तर पोषक, प्रकृतिनुरूप आहार सेवन कराला हवा. शरीरपोषणाचा विचार न करता कुठलेही अन्न सेवन करणाऱ्यांची प्रतिकारशक्‍ती, जीवनशक्‍ती कमी होऊ शकते, असे आयुर्वेदशास्त्र सांगते.
६. अल्प आहार करणाऱ्या व्यक्‍ती
सर्वमन्ने प्रतिष्ठितम्‌ असे आयुर्वेदात सांगितले जाते. प्रतिकारशक्‍ती चांगली असण्यासाठी सकस, पोषक आणि पुरेसे अन्न खूप महत्त्वाचे असते. उपवास वा अन्य काही कारणांमुळे पुरेसे अन्न सेवन न करणे एकंदर शरीरशक्‍तीसाठी, प्रतिकारशक्‍तीसाठी चांगले नाही.
७. कमकुवत मन असणाऱ्या व्यक्‍ती
मनाची शक्‍ती शरीरशक्‍तीपेक्षाही प्रभावी असते हे आपण जाणतोच. मनाची उभारी असेपर्यंत, मन श्रद्धा व विश्‍वासाने युक्‍त असेपर्यंत एकंदर शरीरशक्‍ती, जीवनशक्‍ती चांगली असते. अगदी मोठ्या आजारपणातूनही कणखर मनाच्या व्यक्‍ती संपूर्णपणे बऱ्या होतात. निरोगी शरीर असूनही, मन कमकुवत असले, तर रोग होण्यास वेळ लागत नाही हे आपण व्यवहारात अनेकदा पाहतो. थोडक्‍यात, या सात प्रकारांत मोडणाऱ्या व्यक्‍तीचे व्याधिक्षमत्व म्हणजेच रोगप्रतिकारशक्‍ती कमी असते, तर याविरुद्ध म्हणजे प्रकृतिनुरूप बांधा असणाऱ्या, कणखर व दृढ शरीरधातू असणाऱ्या, उत्तम शरीरशक्‍ती असणाऱ्या, प्रकृतिनुरूप व सत्त्वयुक्‍त अन्नाचे योग्य प्रमाणात सेवन करणाऱ्या व सशक्‍त मन असणाऱ्यांचे व्याधिक्षमत्व चांगले असते. व्याधिक्षमत्व, प्रतिकारशक्‍ती चांगली असण्यासाठी जबाबदार असणारे शरीरघटक खालीलप्रमाणे सांगता येतील.

अग्नी -
बलमारोग्यमायुश्‍च प्राणाश्‍चाग्नौ प्रतिष्ठिता ।।
...चरक सूत्रस्थान
बल, आरोग्य, दीर्घायुष्य, प्राण हे सर्व अग्नीमध्ये प्रतिष्ठित असतात. म्हणजेच आरोग्य टिकविण्यासाठी, रोग होऊ नयेत यासाठी अग्नी संपन्न असणे आवश्‍यक असते. आहार-औषधातून पोषक तत्त्वे शरीरात गेली, तरीही ती पचवून शरीरात स्वीकारली जाण्यासाठी अग्नी आवश्‍यक असतो. आहाररसापासून सप्तधातू तयार होण्यासाठीही अग्नीची शक्‍ती लागतेच. सतेजता, काम करण्यासाठी लागणारी शक्‍ती आणि काम करण्यासाठी लागणारा उत्साह या गोष्टीही अग्नीवरच अवलंबून असतात.
रसधातू -
रसधातू सर्व शरीरावयवांना तृप्त करण्याचे काम करत असतो. म्हणूनच रसधातू प्रमाणापेक्षा कमी झाला, तर त्यामुळे शरीरशक्‍ती कमी होते, थकवा जाणवतो, थोड्याही श्रमाने दम लागतो. अर्थातच, रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहण्यासाठी रसधातू चांगला ठेवणे आवश्‍यक असते.
रक्‍तधातू -
शरीरात ज्या दहा ठिकाणी प्राण राहतो, त्यांपैकी एक रक्‍तधातू होय. रक्‍तधातू शुद्ध व उत्तम असता शरीरशक्‍ती चांगली असते, वर्ण उत्तम असतो, जीवनशक्‍ती उत्तम असते आणि आयुष्य सुखाने संपन्न असते, असे आयुर्वेद म्हणतो. तेव्हा रोग होऊ नयेत यासाठी रक्‍तधातू उत्तम ठेवायलाच हवा. रक्‍त म्हणजे साक्षात जीवन असे आयुर्वेदात सांगितले आहे, त्यावरून रक्‍ताचे महत्त्व कळते. प्रत्यक्षातही हिमोग्लोबिन किंवा लोहतत्त्व कमी असणाऱ्या व्यक्‍तींमध्ये रोगप्रतिकारशक्‍ती कमी दिसते.
मज्जाधातू -
मज्जा स्नेहं बलं शुक्रपुष्टिं पूरणमस्थ्नां च करोति ।
...सुश्रुत सूत्रस्थान
शरीराला उचित स्निग्धता देण्याचे, शरीरशक्‍ती उत्तम ठेवण्याचे, हाडांना व शुक्रधातूला पोसण्याचे महत्त्वाचे काम मज्जाधातू करत असतो. मेंदू, चेतासंस्था वगैरे महत्त्वाच्या गोष्टी मज्जाधातूवर अवलंबून असतात. काही कारणास्तव मज्जाधातू अशक्‍त झाला, तर त्यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती कमी होताना दिसते.
शुक्रधातू
शुक्रधातू सर्व धातूंमधील शेवटचा धातू. अनेक वेळेला शुद्ध केलेले सुवर्ण जसे तेजस्वी व सारसंपन्न असते, त्याचप्रमाणे प्रत्येक धातू तयार होताना मलभाग निघून गेल्यामुळे शेवटचा शुक्रधातू अतिशय संपन्न असतो. शुक्रधातूचे वैशिष्ट्य म्हणजे तो फक्‍त शरीराची ताकद वाढवतो असे नाही, तर मनालाही शक्‍ती देतो, धैर्य देतो, उत्साह निर्माण करतो. या सर्व गोष्टींमुळे रोगप्रतिकारशक्‍ती व्यवस्थित राहण्यास मदत मिळते.
ओज
ओज हे सुद्धा प्राणाचे राहण्याचे उत्तम स्थान असते. ओजामुळे सर्व शरीर अवयवांना स्थिरता मिळते, शरीरातील सर्व कार्ये व्यवस्थित चालू राहतात. व्यक्‍तीची एकंदर तेजस्विता, सतेजता ओजावर अवलंबून असते. सर्व धातूंचे साररूपी ओजतत्त्व काही कारणास्तव कमी झाले, तर अनेक रोग होऊ शकतात, प्रसंगी मृत्यूसुद्धा येऊ शकतो, असे सांगितले जाते. म्हणूनच रोगप्रतिकारशक्‍ती व ओजतत्त्वाचा खूप जवळचा संबंध असतो. तेव्हा रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहण्यासाठी या सर्व शरीरतत्त्वांचे व्यवस्थित पोषण होण्याकडे लक्ष ठेवायला हवे व त्याहून महत्त्वाचे म्हणजे या तत्त्वांचा क्षय होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी...
आरोग्यरक्षणासाठी आयुर्वेदाने सांगितलेले सर्व उपाय रोगप्रतिकारशक्‍ती टिकून राहावी व वाढावी यासाठी उत्तम असतात.
दिनचर्येत अंतर्भूत केलेले अभ्यंग, उद्वर्तन, नस्य, अंजन, व्यायाम वगैरे सर्व गोष्टी प्रतिकारशक्‍ती वाढवूनच आरोग्यरक्षण करत असतात.
प्रकृतिनुरूप व ऋतुनुरूप आहार घेणे, मनाच्या शांती व प्रसन्नतेसाठी योग, ध्यान वगैरे गोष्टींचा रोजच्या दिनक्रमात अंतर्भाव करणे हे देखील अप्रत्यक्षरीत्या रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत करत असते. मनाची प्रसन्नता ओज वाढवण्यास कारणीभूत असते, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. त्यावरूनही ही गोष्ट सहज लक्षात येईल.
दीर्घश्‍वसन, ॐकार गुंजन, अनुलोम-विलोम, प्राणायाम, व्यायाम यांच्या अभ्यासाने सर्व शरीरात प्राणाचे अभिसरण व्यवस्थित व्हायला लागले, की त्यामुळेही रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहते. "प्राणवहस्रोतसामध'चे काम नीट झाले, की त्यामुळे एकूणच आरोग्य नीट राहते हा अनेकांचा अनुभव असतो.
घरात सकाळ-संध्याकाळ धूप करणे, नैसर्गिक सुगंधाच्या सान्निध्यात राहणे, आपल्या आसपास विशिष्ट वनस्पती, वृक्ष किंवा प्रभावयुक्‍त औषधे औषधी द्रव्ये असू देण्यामुळे सुद्धा रोगराईपासून दूर राहता येते.
प्यायचे पाणी उकळून घेणे, चांदीच्या वा स्वच्छ तांब्याच्या भांड्यात पाणी साठवणे व पिणे, चांदीच्या ताटात जेवणे यांसारख्या साध्या साध्या गोष्टीही रोगप्रतिकारशक्‍ती नीट राहण्यास पूरक ठरतात.
डॉ. श्री बालाजी तांबे

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

ad