Friday, October 2, 2009

अन्नयोग - ओवा


भाजलेली बडीशेप मीठ लावून खाल्ल्यास पचनास उपयोगी पडते.

मसाल्याचे पदार्थ ही भारताची विशेषता समजली जाते. इतिहासात भारतावर परकीयांची अनेक आक्रमणे झाली, त्यामागे मसाल्याचे पदार्थ हे एक मोठे कारण होते, असे सांगितले जाते.
ओवा
पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे.
यवानी पाचनी रुच्या तीक्ष्णोष्णा कटुका लघुः ।
दीपनी च तथा तिक्‍ता पित्तला शुक्रशूलहृत्‌ ।।
वातश्‍लेष्मोदरानाह गुल्मप्लीहकृमिप्रणुत्‌ ।... भावप्रकाश
ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, वीर्याने उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी, तसेच जंत होणे वगैरे तक्रारींत हितकर असतो. मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी करतो.
किसलेले खोबरे व ओवा एकत्र खाण्याने संतुलन साधू शकते. भूक लागत नसल्यास जेवणापूर्वी थोड्याशा तुपावर भाजलेला ओवा अर्धा चमचाभर खाण्याचा उपयोग होतो. याने तोंडाला चव येते व नंतर पचनही व्यवस्थित होण्यास मदत मिळते.
अपचनामुळे पोटात वायू झाला असल्यास व पोटात दुखत असल्यास तुपावर भाजलेला ओवा खाण्याचा व ओव्याच्या पुरचुंडीने पोट शेकण्याचा उपयोग होताना दिसतो. खूप खोकला झाला असता, छातीत कफ साठल्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास होत असता किंवा डोक्‍यात सर्दी साठल्यामुळे सायनस, डोके जड होऊन दुखत असल्यास गरम ओव्याच्या पुरचुंडीने शेक करण्याने लगेच बरे वाटते. ओव्याची धुरी जंतुनाशक असते. विशेषतः सर्दी-खोकला वगैरेस प्रतिबंध करते.
गर्भाशयाची शुद्धी करण्याचा गुणही ओव्यामध्ये असतो. त्यामुळे बाळंतिणीच्या सुपारीत ओवा टाकला जातो.
बडीशेप
जेवणानंतर मुखशुद्धीसाठी बडीशेप खाल्ली जाते; पण बडीशेप स्वयंपाकासाठीही वापरतात आणि औषध म्हणूनही वापरतात.
मधुराबृंहणी बल्या पुष्टिवर्णाग्निवर्धनी ।
ऋतुप्रवर्तनी धन्या योनिशुक्रविशोधनी ।।
उष्णा वातप्रशमनी मङ्‌गल्या पापनाशनी ।
पुत्रप्रदा वीर्यकरी शतपुष्पा निदर्शिता ।।... काश्‍यपसंहिता
बडीशेप चवीला गोड व वीर्याने उष्ण असते. ताकद वाढवते. पुष्टी, वर्ण व अग्नीस वाढवते. योनीची, तसेच शुक्रधातूची शुद्धी करते. पाळी आणण्यास मदत करते, वातदोषाचे शमन करते, अपत्यप्राप्तीसाठी हितकर असते, मंगलकारक व पापांचा नाश करणारी असते. बडीशेप पाचक असते. बडीशेप, सैंधव यांचे मिश्रण गरम पाण्याबरोबर घेतल्यास गॅसेस होत नाहीत, पोटदुखीस प्रतिबंध होतो. स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून कमी जात असल्यास अर्धा चमचा बडीशेप व अर्धा चमचा जिरे यांचे चूर्ण पाण्यात भिजत घालून सकाळी गाळून घेऊन ते पाणी पिण्याचा उपयोग होतो. लघवीची जळजळ होत असल्यास बडीशेपेचा काढा घोट घोट पिण्याने उपयोग होतो. भाजलेली बडीशेप मीठ लावून जेवणानंतर खाल्ल्यास पचनास उपयोगी पडते. सांधे दुखत असल्यास किंवा लागल्यामुळे सूज येऊन वेदना होत असल्यास बडीशेप, ओवा व मीठ यांच्या पुरचुंडीने शेक करण्याचा उपयोग होतो.
बाळंतशेपा
शेपूच्या भाजीच्या बिया म्हणजे बाळंतशेपा. नावाप्रमाणेच या बाळंतिणीसाठी हितकर असतात. बाळंतिणीने रोज जेवणानंतर बाळंतशेप खाल्ली, तर त्याने भरपूर स्तन्यनिर्मिती होते व स्तन्याची शुद्धीही होते. पाळीच्या वेळेस कमी रक्‍तस्राव होत असल्यास, अंगावरून काळपट रंगाचे जात असल्यास, काही दिवस बाळंतशेपांचे अर्धा अर्धा चमचा चूर्ण गरम पाण्यासह घेण्याचा उपयोग होतो.
- डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad