Friday, September 25, 2009

स्वास्थ्याचे सुगंधी उत्तर 'अत्तर'


गंध हा पृथ्वी महाभूताचा गुण. त्यातही पृथ्वी आणि जलाच्या संयोगातून अतिशय मनमोहक सुगंध निर्माण होतो याची प्रचिती आपण पहिल्या पावसाच्या वेळी दर वर्षी घेत असतो. आयुर्वेदात पित्तसंतुलनासाठी सुगंधाचा विशेषत्वाने वापर करण्यास सुचवले आहे.
सुगंधाचा उपचारासाठी वापर प्राचीन काळापासून चालत आलेला दिसतो. वेदांमध्ये वनस्पतीच्या सुगंधाने रोग दूर होवोत अशा अर्थाची सूत्रे आलेली आहेत,

तानोषधे ! त्वं गन्धेन विषूचीनान्‌ विनाशय ।
...अथर्ववेद
हे औषधी, तू आपल्या गंधाने दुष्ट जंतूंचा नाश कर.
आयुर्वेदातही सुगंध हा एक गुण सांगितला आहे.
मनःप्रियो गन्धः सुगन्धः ।
...सुश्रुत सूत्रस्थान
मनाला प्रिय वाटणारा गंध म्हणजे सुगंध.
सुखानुबन्धी सूक्ष्मश्‍च सुगन्धो रोचनो मृदुः ।
...सुश्रुत सूत्रस्थान
सुगंध सुखदायक असतो, सूक्ष्म असतो, रुची उत्पन्न करतो आणि गुणाने अतिशय मृदू असतो.
सुगंधाच्या या सर्व गुणांवरून पुढील गोष्टी लक्षात येतात,
-सुगंध सुखाची अनुभूती करून देणारा असल्याने मनावरही काम करतो.
-सूक्ष्म असल्याने शरीरातील लहानात लहान स्रोतसांपर्यंत पोचू शकतो आणि त्या ठिकाणची अशुद्धी दूर करू शकतो. अगदी मनोवहस्रोतसातील दोषही दूर करू शकतो.
-रुची हा शब्द येथे चव या अर्थाने वापरलेला आहे, तसाच जीवनातील एकंदर अभिरुची या अर्थानेही वापरलेला आहे. सुगंधामुळे मरगळ, कंटाळा झटकला जातो आणि उत्साहाची जाणीव तयार होते.
-सुगंध अतिशय हळुवारपणे, मृदुतेने काम करत असल्याने त्याचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नसतात.
सुगंधामध्ये इतकी ताकद असल्यामुळेच बहुधा सुगंधी धूप, सुगंधी फुले, अत्तरे यांना भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. पूजा करण्याच्या निमित्ताने, आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्याच्या निमित्ताने घराघरात गंधाला-अत्तराला महत्त्वाचे स्थान असते. प्राचीन भारतात सणासुदीला अंगणात केशराचे सडे टाकले जात, असे संदर्भ सापडतात. आयुर्वेदातही अष्टगंधाने संस्कारित जलाने नवजात बालकाला स्नान घालावे, घरात सुगंधी धूप जाळावेत, सुगंधी द्रव्यांच्या साहचर्यात राहावे, असे अनेक उल्लेख सापडतात.
मुळात गंध हा पृथ्वी महाभूताचा गुण. त्यातही पृथ्वी आणि जलाच्या संयोगातून अतिशय मनमोहक सुगंध निर्माण होतो याची प्रचिती आपण पहिल्या पावसाच्या वेळी दर वर्षी घेत असतो. आयुर्वेदात पित्तसंतुलनासाठी सुगंधाचा विशेषत्वाने वापर करण्यास सुचवले आहे.
मृदुसुरभिशीतहृद्यानां गन्धानाम्‌ उपसेवा ।
...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
मृदू, शीत व मनाला सुखकर सुगंधाचे सेवन पित्तदोषास संतुलित करते.
सेवन या शब्दात फक्‍त "खाणे' इतकाच अर्थ या ठिकाणी अभिप्रेत नाही, तर सेवन शब्दातून सुगंधी जलाने स्नान करणे, सुगंधी फुले धारण करणे, घरात सुगंधी जल शिंपडणे, सुगंधी अत्तर लावणे वगैरे सर्वतोपरी सुगंधाचा उपयोग करण्यास सुचवले आहे.
सूक्ष्म गुणांनी युक्‍त असल्याने सुगंधाचा उपचार म्हणून अनेक मार्गांनी उपयोग होऊ शकतो. श्‍वासावाटे सुगंध घेणे उत्तम असतेच; पण सुगंधी द्रव्यांचा लेप लावणे, सुगंधी द्रव्यांचा धूप करणे, सुगंधी द्रव्ये सेवन करणे अशा अनेक प्रकारांनी सुगंधाचा उपयोग करून घेता येतो.
अनेक वनस्पती सुगंधी असतात, तसेच कस्तुरी किंवा अंबरसारखी अनेक प्राणिज द्रव्येही सुगंधी असतात. मातीचा सुगंध तर सर्वज्ञात आहे. कोणत्याही सुगंधी द्रव्यापासून अत्तर तयार करता येते. अत्तर म्हणजे सुगंधी द्रव्याचा जणू अर्क वा सारभारच असतो. अर्थातच अत्तराचा प्रभाव अधिक उत्कट असतो. गुलाब, मोगरा, सोनचाफा, बकुळ, केवडा, देवदार वगैरे वृक्षांच्या सारभागातून अत्तरे काढली जातात.
गुग्गुळ, राळ वगैरे झाडाच्या डिंकापासून सुगंधी अर्क काढले जातात. केशर हे फुलातील केशर असते. केशरापासूनही अत्तर काढले जाते. दालचिनी, वेलची, लवंग वगैरे मसाल्याच्या पदार्थांचेही तेल काढले जाते. कस्तुरी, अंबर वगैरे प्राणिज द्रव्यांचे अर्क काढले जातात, मातीचेही अत्तर बनवले जाते. बऱ्याचशा अत्तरांचा बेस चंदनाचे तेल असते. चंदनाच्या तेलावर चढवलेला सुगंध कायम टिकतो, उलट जितका जुना तितका अधिकाधिक उत्कट होत जातो. नुसत्या अर्कापेक्षा चंदनाचा बेस असलेले अत्तर अधिक टिकते.
आयुर्वेदात अनेक औषधी वनस्पतींच्या अर्कांचे गुणधर्म दिलेले आहेत. अर्काचा प्रभाव सर्वांत श्रेष्ठ असतो असेही सांगितले आहे,
द्रव्यकल्पः पञ्चधा स्यात्‌ कल्कश्‍चूर्णं रसस्तथा ।
तैलमर्कः क्रमात्‌ ज्ञेयं यथोत्तरगुणं प्रिये ।।
...निघण्टु रत्नाकर
कल्कापेक्षा चूर्ण, चूर्णापेक्षा रस, रसापेक्षा तेल आणि तेलापेक्षा अर्क अधिक गुणकारी असतो. अर्क हा मूळ द्रव्यापेक्षा अधिक सुगंधी असतो. जिभेवर ठेवला असता मूळ द्रव्याप्रमाणेच चव लागते आणि द्रव्याचे जे जे सर्व गुण सांगितलेले असतात ते सर्व त्या द्रव्याच्या अर्कासही अधिक उत्कट स्वरूपात असतात.
चंदन - चंदनाचे अत्तर
चन्दनं शीतलं रुक्षं तिक्‍तमाल्हादनं लघु ।
श्रमशोष विषश्‍लेष्मतृष्णपित्तास्रदाहनुत्‌ ।।
...भावप्रकाश
चंदन शीतल असते. शरीर तसेच मनाला आल्हाददायक असते, श्रम नाहीसे करते, विषाचा नाश करते, तहान शमवते, रक्‍तशुद्धी करते, पित्त तसेच कफदोषाचे संतुलन करते, शोष (अंग सुकणे) नष्ट करते. चंदनाचे तेल मूत्रवहस्रोतसात उपयुक्‍त असते.
कस्तुरी - मस्क
कस्तुरिका कटुस्तिक्‍ता क्षारोष्णा शुक्रला गुरुः ।
कफवातविषच्छर्दि शीतदौर्गन्ध्यशोषहृत्‌ ।।
...भावप्रकाश
कस्तुरी अतिशय सुगंधी असते, वीर्याने उष्ण असते, शुक्र तयार करते, कफ तसेच वातदोष कमी करते, विषद्रव्यांचा नाश करते, शोष (अंग सुकणे), उलटी, दुर्गंधी वगैरेंना नष्ट करते. कस्तुरीमृगाची हत्या होऊ नये म्हणून कस्तुरी वापरण्यावर निर्बंध असतात.
केशर
कुंकुमं कटुकं स्निग्धं शिरोरुक्‌ व्रणजन्तुजित्‌ ।
तिक्‍तं वमिहरं वर्ण्यं व्यङ्‌गदोषत्रयापहम्‌ ।।
...भावप्रकाश
केशर तिन्ही दोषांचे संतुलन करते, त्वचा उजळवते, डोकेदुखी कमी करते, जखम भरून येण्यास मदत करते, जंतूंचा नाश करते.
गुलाब अर्क
दाहश्रयार्त्तिवमिमोहमुखामयघ्नः ।
तृष्णार्तिपित्तविषदोषहरः स्मरस्य ।।
सन्तर्पणश्‍चिरमरोचकनाशश्‍च ।।
...भावप्रकाश
गुलाबाचा अर्क दाह, थकवा, उलटी, मनोविभ्रम यांचा नाश करतो, मुखरोग दूर करतो, तहान, पित्तदोष, विषदोष दूर करतो. शरीर-मनाला तृप्ती देतो व दीर्घ काळापासून असणारी अरुची नष्ट करतो.
निघण्टु रत्नाकरात अनेक सुगंधी पुष्पांचा एकत्रित अर्क काढण्याचा उल्लेख आहे. शेवंती, गुलाब, माधवी, चमेली, जुई, चाफा, बकुळ, कदंब या फुलांवर केवड्याच्या पानांचे झाकण ठेवून अर्क काढावा.

मण्डलैकप्रयोगेण क्‍लीबो।पि पुरुषो भवेत्‌ ।
वर्षाधिकं तु यक्ष्माणं हन्यात्‌ श्रेष्ठो मृगान्तकः ।।
...निघण्टु रत्नाकर
४८ दिवस हा पुष्पार्क मिरीच्या चूर्णासह सेवन केला असता पौरुषत्व प्राप्त होते. वर्षभर सेवन केल्यास रोगांचा राजा समजल्या जाणाऱ्या राजयक्ष्माचा अर्थात क्षयरोगाचाही नाश होतो. हा अर्क सिंहाप्रमाणे श्रेष्ठ समजला जातो.
सुगंध अर्क
कापूर, कस्तुरी, चंदन, अगरू, गुग्गुळ, राळ, लवंग, वेलची, दालचिनी, केशर, वाळा, जटामांसी, कापूरकाचरी वगैरे सुगंधी द्रव्यांच्या समुदायाला सुगंधी गण असे म्हणतात यांचा विधिपूर्वक अर्क काढला जातो.
विधिनिष्कासितो।र्क़स्तु, रुच्यः पाचनदीपनः।
मुखदौर्गन्ध्यहृन्नेत्रो लेपान्मेदः श्रमापहः ।।
...निघण्टु रत्नाकर
हा सुगंध अर्क रुची वाढवतो, अग्नी प्रदीप्त करतो, पचनास मदत करतो, मुखदुर्गंधीचा नाश करतो व नेत्रांसाठी हितकर असतो. या अर्काचा लेप केला असतो मेद व श्रम यांचा नाश होतो.
कोणताही अर्क, तेल, अत्तर हा त्या त्या द्रव्याचा सारभाग असल्याप्रमाणे असते. संपूर्ण द्रव्यापेक्षा अर्क, अत्तर वगैरे अधिक वीर्यवान असतात, अधिक प्रभावी असतात; पण अर्क वा अत्तर काढण्याची पद्धत क्‍लिष्ट व खूप वेळ लागणारी असते. मूळ द्रव्याच्या तुलनेत त्यापासून निघणाऱ्या अर्काचे, अत्तराचे प्रमाण खूपच थोडे असते. अर्थातच या सगळ्यामुळे अत्तरे महाग असणे स्वाभाविक असते; पण खरा गुण हवा असला, सुगंधाचा उपयोग व्हायला हवा असला, तर शुद्ध व खरे अत्तरच वापरायला हवे. आजकाल रासायनिक द्रव्यांच्या साह्याने कृत्रिम रीतीने, प्रयोगशाळेत अत्तरे, अर्क बनविता येतात. या अत्तरांना गंधही असतो; पण सुगंधाचा जो उपयोग होणे अपेक्षित आहे वा द्रव्यांतील गुणाचा जो उपयोग होणे अपेक्षित आहे, तो या कृत्रिम अत्तरातून मिळू शकत नाही. उलट रासायनिक द्रव्यांमुळे वातावरण अधिकच दूषित होत असते. धूप, उदबत्त्या, पर्फ्युम्स, रूम फ्रेशनर्स, डिओडरंट अशा अनेकविध वस्तूंमध्ये कृत्रिम सुंगध घातलेले असू शकतात, म्हणूनच अनेकांना अशा गोष्टींची ऍलर्जी येताना दिसते.
थोडक्‍यात सुगंधी अत्तरे, सुगंधी अर्क हे शरीर-मनाला नवचैतन्य मिळण्यासाठी, शरीर-वातावरणातील विषद्रव्यांचा नाश करण्यासाठी एक उत्तम वरदान आहे. शुद्धता व शास्त्रोक्‍तता १०० टक्के पाळून बनविलेली अत्तरे, अर्क वगैरे गोष्टी वापरात ठेवल्या तर या वरदानामुळे जीवन संपन्न करून घेता येईल.
डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad