Sunday, July 19, 2009

अन्नयोग - पालेभाज्या

मुळ्याची पाने

आपल्या आहारात पालेभाज्या असल्याच पाहिजेत. पण कोणत्या भाज्या कुणी खाव्यात, कुठे रुजलेल्या भाज्या खाऊ नयेत, हेही पाहायला हवे.
आपण चाकवत, तांदुळजा, पालक, माठ वगैरे पथ्यकर समजल्या जाणाऱ्या भाज्यांची माहिती घेतली. आज आपण अजून काही पालेभाज्यांबद्दलचे आयुर्वेदिक मत पाहणार आहोत.
आंबट चुका
चुक्रा त्वम्लतरा स्वाद्वी वातघ्नी कफपित्तकृत्‌ ।
रुच्या लघुतरा पाके वृन्ताकेनातिरोचनी ।।
...भावप्रकाश
आंबट पानांची ही भाजी स्वादिष्ट असते, वातशामक असते, मात्र कफपित्तकारक असते. पचायला हलकी असते व वांग्याच्या भाजीसह खाल्ल्यास खूप रुचकर असते. अन्नाचे पचन व शोषण योग्य प्रकारे होत नसताना चुक्‍याची भाजी आहारात ठेवणे चांगले असते. मात्र पित्तदोषाचा संबंध असताना किंवा आम्लपित्ताचा त्रास होणाऱ्यांनी ही भाजी जपून वापरावी.
अळू
अलुकं शीतलं चैव अग्निदीप्तिकरं तथा ।
स्तम्भकरं प्रोक्‍तं मधुरं तु जडं मतम्‌ ।।
रुक्षं वृष्यं दुर्जरं च बलवृद्धिकरं परम्‌ ।
स्तन्यकृन्मलमूत्राणां कफवायोश्‍च वृद्धिकृत्‌ ।।
...भावप्रकाश
अळूची भाजी थंड असते, मात्र पचायला जड असल्याने बद्धकोष्ठता निर्माण करणारी असते. अग्नीस प्रदीप्त करते. योग्य प्रमाणात सेवन केली असता स्तन्य वाढवते. मल, मूत्र, कफदोष आणि वायुदोष यांनाही वाढवते.
अधूनमधून थोड्या प्रमाणात अळूची भाजी खाणे ठीक असले तरी पोटात वायू धरण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी, बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी अळूची भाजी न खाणेच चांगले. तसेच अळू सांडपाण्यावर वाढलेला नाही ना, याची खात्री करून मगच वापरावा.
करडई
कुसुम्भपत्रं मधुरमनेत्र्यमुष्णं कटु स्मृतम्‌ ।
अग्निदीप्तिकरं चातिरुच्यं रुक्षं गुरु स्मृतम्‌ ।।
सरं पित्तकरं चाम्लं गुदरोगकरं मतम्‌ ।।
...निघण्टु रत्नाकर
करडईची भाजी चवीला आंबटगोड पण विपाकाने तिखट असते, म्हणूनच उष्ण स्वभावाची असते. डोळ्यांसाठी अहितकर असते. अग्नी प्रदीप्त करते, रुचकर असते, रुक्ष गुणांची असते, पचायला जड असते, पित्त वाढवते, सारक असते. अति प्रमाणात सेवन केल्यास गुदरोग तयार करू शकते.
उष्णतेचा त्रास असणाऱ्यांनी करडईची भाजी फारशी खाऊ नये. करडईच्या तेलामुळे रक्‍तदोष उत्पन्न होऊ शकतो, असेही शास्त्रवचन आहे.
अंबाडी
स्याद्‌ अम्लवाटी कटुकाम्लतिक्‍ता तीक्ष्णा तथोष्णा मुखपाककर्ती ।
विदाहपित्तास्रविकोपनी चविष्टम्भदा वातनिबर्हणी च ।।
...निघण्टु रत्नाकर
अंबाडीची भाजी चवीला आंबट, तिखट व कडवट असते, उष्ण, तीक्ष्ण गुणाची असते, बद्धकोष्ठता निर्माण करू शकते. अंबाडीची भाजी नियमितपणे खाल्ल्यास तोंड येऊ शकते, रक्‍तपित्ताचा त्रास होऊ शकतो.
अंबाडीची जून झालेली भाजी अजिबात खाऊ नये. त्यामुळे पोटदुखी, शौचाला खडा होणे वगैरे त्रास होऊ शकतो.
घोळाची भाजी
लोणी रुक्षा स्मृता गुर्वी वातश्‍लेष्महरी पटुः ।
अर्शोघ्नी दीपनी चाम्ला मन्दाग्नि विषनाशिनी ।।
...भावप्रकाश
घोळाची भाजी चवीला आंबट, खारट असते, रुक्षता वाढवते, पचायला जड असते, वात तसेच कफदोष कमी करते. उष्ण वीर्याची असल्याने मंदाग्नीमध्ये हितकर असते. शरीरातील विषद्रव्यांचा नाश करते. मूळव्याधीमध्ये हितकर असते.
मुळ्याच्या पानांची भाजी
पाचनं लघु रुच्योष्णं पत्रं मूलकजं नवम्‌ ।
स्नेहस्निग्धं त्रिदोषघ्नं असिद्धं कफपित्तकृत्‌ ।।
...भावप्रकाश
मुळ्याची कोवळी पानेच वापरावीत. कोवळी पाने पचायला हलकी असतात. उष्ण वीर्याची असल्याने पचन करतात. तेल-तुपासह शिजवली असता त्रिदोषांचे शमन करतात. मात्र कच्ची खाल्ली असता कफ-पित्तदोष वाढवितात.
- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405

No comments:

Post a Comment

ad