Monday, December 22, 2008

व्यक्‍तिगत आरोग्य

व्यक्‍तिगत आरोग्य


(डॉ. श्री. बालाजी तांबे.)
रोज काही अंतर चालणे, व्यायाम, योग यांचा रोजच्या दिनक्रमात समावेश करणे, तसेच स्वतःच्या शरीर-मनाकडे, स्वतःच्या चुकांकडे लक्ष देणे, ध्यानधारणेचा अभ्यास करणे किंवा आरोग्यसंगीत ऐकण्याचा आपल्या दैनंदिन कार्यक्रमात समावेश करणे, या गोष्टीही व्यक्‍तिगत आरोग्यासाठी हितकर ठरतात....

सामाजिक आरोग्य, सगळ्या गावाचे आरोग्य व्यक्तिगत आरोग्य असे शब्दप्रयोग प्रचारात असले तरी व्यक्‍तिगत आरोग्य हेच खरे महत्त्वाचे. वातावरण दूषित झाले किंवा सामाजिक आरोग्य बिघडले तर व्यक्‍तिगत आरोग्य बिघडते हे जरी खरे असले, तरीसुद्धा प्रयत्न व्हावा तो व्यक्‍तिगत आरोग्याचाच.

शेवटी प्रत्येक व्यक्‍तीने स्वतःचे आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न केला तर गावाचे आरोग्य वा संपूर्ण मानवजातीचे आरोग्य चांगले राहीलच. एक गोष्ट मात्र खरी, की व्यक्‍तिगत आरोग्यासाठी कितीही प्रयत्न केले पण सामाजिक घडी बिघडलेली असली, समाजात अस्वस्थतेचे वातावरण, भीती वा अनाचार, अत्याचार वगैरे सर्व प्रकार वाढलेले असले तर व्यक्‍तिगत आरोग्य टिकविणे कठीण होते.

त्याचप्रमाणे नैतिकता सोडलेला समाज दुसऱ्याची काळजी करत नाही व मग सामुदायिक स्वच्छता पाळली जात नाही तसेच पर्यावरणाची काळजी घेतली जात नाही. पर्यावरणाची काळजी न घेतल्यामुळे सुरू झालेल्या पृथ्वीच्या वा वातावरणाच्या विध्वंसामुळे व्यक्‍तिगत आरोग्य सांभाळणे कठीण होऊन बसते.

पण प्रत्येकाने व्यक्‍तिगत आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते.
"लवकर निजे लवकर उठे त्याला ऋद्धी सिद्धी भेटे' या म्हणीनुसार व्यक्‍तिगत आरोग्याच्या अजेंड्यासाठी सर्वांत महत्त्वाचे सूत्र म्हणजे लवकर उठणे. लवकर उठले की लवकर झोपावेच लागते. अर्धे विकार शरीरातील वात-पित्ताच्या असंतुलनामुळे होतात व ते रात्रीच्या जागरणाने वाढतात.

व्यक्‍तिगत आरोग्यासाठी दुसरा नियम म्हणजे वेळेवर जेवणे व प्रकृतीला मानवणारा आहार घेणे. कधीही विरोधाहार न करणे. प्रकृतीला मानवत नाही पण जिभेला आवडतात, अशा गोष्टी अगदी क्वचितच घ्याव्यात. अत्यंत उत्तम, जिभेला रुचणारे व प्रकृतीला आवडणारे अन्न असले तरी ते मर्यादेतच खावे. अशा प्रकारच्या नियमांचे पालन न केल्यास व्यक्‍तिगत आरोग्य नीट राहू शकत नाही.

रोज काही अंतर चालणे, व्यायाम, योग यांचा रोजच्या दिनक्रमात समावेश करणे, तसेच स्वतःच्या शरीर-मनाकडे, स्वतःच्या चुकांकडे लक्ष देणे, ध्यानधारणेचा अभ्यास करणे किंवा आरोग्यसंगीत ऐकण्याचा आपल्या दैनंदिन कार्यक्रमात समावेश करणे. या गोष्टीही व्यक्‍तिगत आरोग्यासाठी हितकर ठरतात.

जन्माला येतानाच मनुष्य पूर्वकर्मात जमवलेल्या सवयी, आरोग्य-अनारोग्य तर आणतोच, पण वाडवडिलांकडून तयार झालेल्या शारीरिक संकल्पनाही घेऊन येतो. गरोदरपणाच्या नऊ महिन्यांत गर्भवतीने काळजी घेतली तर बालकाला जन्माबरोबर येणारे अनेक त्रास टाळता येऊ शकतात अर्थात आरोग्यवान मूल जन्माला येते. बालकाच्या जन्मानंतर काही काळ त्याला बाळगुटी, अंगाला तेल लावणे, धुरी देणे वगैरे गोष्टी केल्या तर आयुष्यभर आरोग्य राहू शकते.

विद्यार्थिदशेत असताना साधारण ८-१५ दिवसांतून एकदा सौम्य विरेचन घेऊन पोट साफ ठेवले तर पुढचे आरोग्य निरामय व्हायला मदत होऊ शकते.


तारुण्यात येता येताच अनारोग्याच्या काही सवयी लागल्या व त्यातून एखादा रोग सुरू झाला तर व्यक्‍तिगत आरोग्य सांभाळणे अत्यंत जिकिरीचे होऊन बसते. तरुणपणी शरीर व मन साधारणतः व्यक्‍तीच्या ताब्यात राहू शकत नाही. अशा वेळी चार दिवसांची मौजमजा आयुष्यभर त्रास देऊ शकते या सत्याकडे लक्ष ठेवावे. बऱ्याच वेळा संगतीमुळे कुठल्यातरी व्यसनाची सवय लागण्याची शक्‍यता असते. त्यापासून सावध राहण्याचा निर्णय करणे आवश्‍यक आहे.

व्यक्‍तिगत आरोग्याचा कार्यक्रम बनवत असताना वयोमानानुसार प्रत्येकाचा आराखडा वेगळा असू शकतो. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या लहान मुलांना व्यायामाची आवड निर्माण करणे, ती अबरचबर खात नाहीत याकडे लक्ष ठेवणे, सर्व धातू व मेंदूची वाढ होण्याच्या दृष्टीने त्यांचा आहार तयार करून त्यांना नीट जेवायला लावणे महत्त्वाचे असते.

तारुण्यात काम वाढलेले असते, ताकत वाढवायची असते, स्नायूंना बळकटी व आकार द्यायचा असतो अशा वेळी त्या पद्धतीचा आहार व विहार होतो की नाही हे पाहणे आवश्‍यक असते. गृहस्थाश्रमाला सुरुवात झाल्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे खांद्यावर असते त्या दृष्टीने आहारविहार ठरवावा लागतो.

उघडी छाती ठेवून तारुण्याचे प्रदर्शन करावेसे वाटले तरी थंड हवा लागल्यामुळे सर्दी- खोकल्याने हैराण होणे आरोग्याच्या आराखड्यात बसत नाही. धाडशी वृत्ती असणे हा उत्तम गुण असला तरी पावसात भिजून थंडीवाऱ्यात हिंडण्यासारख्या स्वतःच्या कफकारक प्रकृतीला न मानवणाऱ्या गोष्टी करणे आरोग्याच्या आराखड्यात बसत नाही.

उतारवयात हलका आहार व रात्री लवकर जेवण असा आराखडा तयार करणे व त्याबरोबरच सकाळ- संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरायला जाणे, वेळोवेळी अंगाला अभ्यंग करणे, सहाही ऋतूंतील बदलानुसार आहारात बदल करणे वगैरे गोष्टी आराखड्यात समाविष्ट कराव्या लागतात.

आराखडा संपूर्ण आरोग्याचा बनवायचा असला तर प्रत्येकाने मित्रमंडळी वाढविण्याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. मित्रपरिवार मोठा असावा, पण कोणा एकातच अडकून पडलेले नसावे. कोणा एकावाचून चालत नाही अशी मनोभावना निर्माण होणे आरोग्यासाठी चांगले नसते. इतरांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे मनाला मिळणाऱ्या समाधानामुळेही आरोग्य चांगले राहायला मदत मिळते.

सर्वांभूती परमेश्‍वर पाहून सगळीकडे विश्‍वशांती नांदावी अशी प्रार्थना करण्याने व्यक्‍तिगत आरोग्य नीट राहायला चालना मिळते तसेच यामुळे सामाजिक आरोग्य टिकवण्याचाही प्रयत्न होतो. देवावर श्रद्धा असो वा नसो, पण सार्वभौमिक सत्तेपुढे नतमस्तक होऊन शरण जाण्याची वा आपल्यापेक्षा अधिक ज्ञान असलेल्याकडून शिकण्याची मानसिकता तयार केल्यानेसुद्धा आरोग्य नीट राहू शकते. हेवेदावे, मत्सर, क्रोध यांना योग्य वेळी आळा न घातल्यास त्याचे पर्यवसान रोगात होऊ शकते.

आरोग्याचा आराखडा तयार करत असताना केवळ एखादे टॉनिक घेणे वा कुठले तरी औषध घेणे एवढ्याच बाबींचा समावेश न करता स्वतःच्या आचरणाचे वा मानसिकतेचेही काही आराखडे तयार करावे लागतात.
जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत वयोमानाप्रमाणे योग्य त्या शारीरिक व मानसिक घटना घडत जाव्यात.

ऋतुमानाप्रमाणे करावी लागणारी कामे करता यावीत, ज्यासाठी जन्म झाला ते कार्य हातून घडत राहावे, चारचौघांना प्रेम देता यावे व आयुष्याच्या संध्याकाळचे दिवस समाधानाने व शांतीने जगता यावेत असे ज्यांना वाटत असेल त्यांनी व्यक्‍तिगत आरोग्याचा आराखडा तयार करणे अत्यंत आवश्‍यक आहे.

- डॉ. श्री. बालाजी तांबे.

No comments:

Post a Comment

ad