Monday, June 16, 2008

दात धरला दुधावर

(डॉ. श्री बालाजी तांबे)
दातांचे आरोग्य दुधावर अवलंबून असावे, असे मानायला वाव आहे. बालकाला मातेचे दूध पुरेसे मिळणे हे त्याच्या एकूणच पोषणासाठी आवश्‍यक असते; तसेच पुढेही आयुष्यात दुधा-तुपाचा अव्हेर केला नाही, तर दातांचे आरोग्य चांगले राखता येते. ........
"अन्नाद्‌ भवन्ति भूतानि' म्हणजे अन्नानुसार मनुष्य घडतो. अन्न ग्रहण करण्यासाठी, पचविण्यासाठी महत्त्वाचे असतात "दात'. दाताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. असे हे दात मनुष्यजन्मानंतर काही महिन्यांनी हळू-हळू बाहेर येतात. अंड्यातून पिल्ले बाहेर येत असताना ज्या क्‍लेशपूर्ण परिवर्तनाच्या अवस्थेतून जीव जातो, तसेच काहीसे दुधाच्या दातांच्या बाबतीत असते. बीजातून बाहेर येणारा अंकूर जसा जमिनीतून फुटतो व त्यातून झाड बाहेर येते तसेच काहीसे चित्र दात उगवण्याच्या प्रक्रियेत माझ्या डोळ्यांसमोर दिसते. दाताचा पांढरा छोटासा मोडासारखा दाणा बाहेर दिसू लागला की सर्वांनाच आनंद व समाधान होते.

शरीरातील एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या आवश्‍यकतेचा जन्म होत असताना थोडे कष्ट सहन करावे लागणारच. त्यामुळे दात येण्याच्या काळात त्रिदोष असंतुलित होऊन मुलांना नाना तऱ्हेचे त्रास होत असतात. पण त्यावरही आयुर्वेदाने परिणामकारक उपाय सुचविलेले आहेत. त्यानुसार काळजी घेतली तर हा दात येण्याचा कालावधी व्यवस्थित पार पडतो. या काळात मुलांचे दात शिवशिवत असल्याने त्यांना त्यावेळी त्यांना चावायला काही तरी द्यावे लागते.

आयुष्यभर कुठले अन्न खायचे व ते कसे चावावे लागणार यावर सर्व प्राण्यांच्या दातांची रचना व प्रकार ठरत असतात. हे सर्व सुरुवातीस मिळालेल्या मातेच्या दुधावरच ठरत असावे.

अन्नाचे तुकडे करणाऱ्या, चावणाऱ्या व हिंसक वाटणाऱ्या दातांच्या आरोग्याकडे माणसाने लक्ष दिले नाही तर सर्वच अवघड होऊन बसते. म्हातारपणी दात पडण्याच्या वेळी पचनशक्‍ती कमी झाल्यामुळे काही लोकांचा समज असे की कवळी वगैरे बसविण्याच्या भानगडीत न पडता यापुढे पातळ व पचायला सोप्या अन्नाचेच सेवन करावे. परंतु, मुळात दात मजबूत का राहीले नाहीत, लवकर का पडले हे शोधून दातांचे आरोग्य व्यवस्थित कसे राहील याचा विचार करणे अधिक श्रेयस्कर होईल.

आपल्याकडे पहिल्या दातांना "दुधाचे दात' असे म्हणतात. मला वाटत, की "दातांचे आरोग्य दुधावर अवलंबून असते', हा विचारच त्यातून सांगितला जातो. अन्नाची सुरुवात आईच्या दुधापासून होते व पुढेही आयुष्यभर व्यवस्थित दूध घेतल्यास दातांचे आरोग्य व्यवस्थित राहते. कारण दातांसाठी आवश्‍यक असणारे सर्व घटक दुधात असतात. पूर्वीच्या काळी बासुंदीसारख्या पौष्टिक खाण्यासाठी दूध आटवत असत. त्याऐवजी जेव्हा गेल्या ५० वर्षात दुधाबद्दल असलेले प्रेम आटले तेव्हा दाताच्या तक्रारी अधिक प्रमाणात सुरू झाल्या.

दात शिवशिवणे नैसर्गिक आहे पण त्यावेळी योग्य काळजी न घेतल्यास दात वेडेवाकडे येण्याचा संभव असतो, या दृष्टीनेही मुलांकडे लक्ष ठेवावे लागते. बालकांच्या शरीरातील धातू परिपक्व झालेले नसल्याने बालकांच्या शरीरातील दात तूप-मेतकूट- भातासारखे पदार्थ खाता येईल एवढ्याच मजबुतीचे असतात. म्हणून असे दात नैसर्गिकपणे पडून त्यांच्याजागी नंतर शरीरात पूर्ण परिपक्व धातू निर्माण झाल्यावर कायमचे दात येतात. खाल्लेल्या अन्नाचे रस-रक्‍त-मांस-अस्थी-मज्जा असे रूपांतर व्हायला काही निश्‍चित कालावधी लागतो तसेच सुरुवातीच्या कालात हे धातू परिपक्व झालेले नसल्यामुळे तेव्हा आलेल्या दातांपेक्षा, हे धातू परिपक्व झाल्यानंतर आयुष्यभर उपयोगी पडतील असे कायमस्वरूपी दात येण्याची योजना निसर्गाने केलेली आहे.

सध्या सर्वत्र दुधाचे विकृतीकरण झालेले दिसते. दूध घरोघर पोचण्यासाठी त्यावर निरनिराळ्या प्रक्रिया केल्या जाऊ लागल्या व त्यामुळे दूध पचेनासे कधी झाले हे कळले नाही. असे दूध सेवन करण्यामुळे प्रकृतीला अपाय निर्माण होऊ लागला व त्यामुळे "दूध व तूप टाळावे' असा प्रचार सुरू झाला. वास्तविक शरीरातील अस्थी, मज्जा, शुक्राच्या म्हणजेच पर्यायाने दात, केस यांच्या संपन्नतेसाठी दूध, लोणी, तूप खूप महत्त्वाचे असते.

व्यवहारात एखाद्याचा द्वेष करणे, एखाद्याचा तिरस्कार करणे किंवा त्याला मारण्याची योजना करणे यास त्याच्यावर दात धरणे, डूख धरणे असे म्हटले जाते, परंतु नेमका पूर्ण आहार असलेल्या दुधावर मनुष्याने दात धरल्यामुळे दातावरच गदा आली. सर्प चावतो तेव्हा तो स्वतःच्या दातातील विष मनुष्याच्या अंगात टाकत असल्यामुळे "डूख धरणे' किंवा "दात धरणे' असे वाक्‍प्रचार अस्तित्वात आले असावेत.

- डॉ. श्री बालाजी तांबे
www.ayu.de

No comments:

Post a Comment

ad