Friday, May 14, 2010

वैद्यकाच्या दाही दिशा : ।। आहार हेच औषध।। (न्यूट्रास्यूटिकल्स)

डॉ. उल्हास कोल्हटकर,
आहारशास्त्र हे एकमेव असे शास्त्र असावे की ज्यात आपणाला सर्व काही कळते अशी आपल्यापैकी बऱ्याच जणांची समजूत असते. दुर्दैवाने परिस्थिती बहुसंख्य वेळा उलटीच असते. आधुनिक तंत्र-विज्ञानामुळे आरोग्य शास्त्राची व आधुनिक वैद्यकाची क्षितिजे विस्तारू लागल्यापासून तर, आहारशास्त्र अधिकाधिक प्रगत व गुंतागुंतीचे होऊ लागले आहे.केवळ पोषणापुरत्याच त्याच्या मर्यादा न राहता, विविध आजारांच्या उपचारांमध्ये व रोगप्रतिबंधनामध्येही ‘आहारा’ची भूमिकाही अधिक ठळक होऊ लागली आहे. जणुकीय पाश्र्वभूमी लाभलेल्या जीनॉमिक्स (GENOMICS) च्या सहाय्याने उपचारांमध्ये अतिविशिष्ट वैयक्तिक आहाराचा (Personalised Food Therapy) उपयोग हे आहारशास्त्राचे एक नवे क्षितीज. या सर्व घडामोडींना, विशेष करून आहाराचा औषध म्हणून उपयोग करण्याच्या शास्त्राचे विशेषकरून आहाराचा औषध म्हणून उपयोग करण्याच्या शास्त्राचे सन १९८९ मध्येच ‘फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन इन मेडिसीन’ यू.एस..च्या संस्थापक चेअरमन डॉ. स्टीफन डिफेलिस यांनी छान बारसे केले आहे व ते म्हणजे- न्यूट्रास्यूटिकल्स- न्यूट्रिशन + फार्मास्युटिकल्स- आहार + औषध! तसे पाहिले तर गेल्या काही शतकातील आहाराविषयीचा आपला संकुचित दृष्टीकोन सोडला, तर आयुर्वेदाने आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासात आहाराचा र्सवकष व सखोल विचार केल्याचे लक्षात येते. ‘औषधं जान्हवी तोयं’ (गंगेचे पाणी म्हणजे औषधच!), ‘रसोद्भव: पुरुष:’ (अन्न) रसातूनच व्यक्तीची निर्मिती होते!), ‘यथा अन्नं, तथा मन:’ (जसे अन्न तसे मन!) यासारखे औपनिषदिक् विचार म्हणजे एका अर्थाने आरोग्यविषयक ब्रह्मवाक्येच! आयुर्वेदाची ‘आहार’ संकल्पनाही अशीच व्यापक व वैशिष्टय़पूर्ण आढळते. त्या शास्त्रानुसार आपल्या शरीरात पंचज्ञानेंद्रियामार्फत जे जे काही ग्रहण केले जाते, ते ते त्या त्या इंद्रियांचा, म्हणजे पर्यायाने शरीराचा आहार. उदा. रसनेमार्फत (जीभ) घेतले जाणारे अन्न म्हणजे स्थूल आहार, दृश्ये हा दृष्टीचा आहार, गंध हा घ्राणेंद्रियाचा (नाक) आहार, श्रृती (ऐकणे) हा कानाचा आहार तर स्पर्श हा त्वचेचा आहार! व म्हणून आहाराचा विचार म्हणजे या सर्वाचा विचार आणि आरोग्याकरिता योग्य व सात्त्विक आहार म्हणजे या सर्व दृष्टीकोनातून योग्य व सात्त्विक आहार! अर्थात आपल्या आजच्या लेखमर्यादेत आपण ‘आहारा’चा केवळ पारंपरिक स्थूल अर्थानेच, म्हणजे ‘खायचे अन्न’ या दृष्टीकोनातूनच विचार करणार आहोत.
इतिहास : ‘न्यूट्रास्यूटिकल्स’ हे नाव जरी नवीन असले तरी अन्नाचा औषध म्हणून वापर ही कल्पना तशी जुनीच आहे. आधुनिक वैद्यकाचा जनक ‘हिप्रोक्रेटिस’ ही योग्य आहाराचा उपचाराकरिता पुरस्कार करत असे. आयुर्वेदाने तर आरोग्य टिकविण्याकरिता व संवर्धनाकरिता ज्या स्वास्थ्यवृत्ताचा पुरस्कार केला त्याचा बराच भाग आहारविषयकच आहे. आयुर्वेदामध्ये रुग्णोपचारांमध्ये आहारविषयक ‘पथ्य-अपथ्य’ संकल्पनाही खूपच दृढमूल आहेत. आधुनिक कालखंडामध्ये बघितल्यास एकोणविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिकेमध्ये थायरॉईड ग्रंथीच्या ‘गॉयटर’ (Goitre) या विकासाकरिता आयोडिनयुक्त मीठाच्या वापराची संकल्पना प्रथम मांडली गेली असे आढळते आणि आज तर नेहमीच्या वापरातल्या खाद्यपदार्थाचे अनेक आरोग्यविषयक गुणधर्म नव्याने लक्षात येत आहेत. उदा. टोमॅटोमधील लायकोपीन द्रव्यामुळे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांना आळा बसतो; साल्मन माशातील ‘ओमेगा ३’ या द्रव्यामुळे धमन्यांची लवचिकता टिकून राहते, इ. तर काही धान्ये वा भाजीपाला यांचे नवीन पद्धतीने, म्हणजे हायब्रिडीकरण किंवा जैवतंत्रज्ञानाने जनुकीय रचनेत बदल करून उत्पादन होत आहे. उदा. बीटा कॅरोटीन द्रव्याने (जे गाजरात भरपूर असते व शरीरातील विटामीन ए करिता वा अ‍ॅण्टीअ‍ॅक्सिडंट म्हणून ज्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे) युक्त असा तांदूळ किंवा विटामिन संपृक्त ब्रोकोली ही भाजी इ.

आहारस्फोट- आहार व आरोग्य यांचा अन्योन्य संबंध अधिकाधिक स्पष्ट होत जाणे, माहिती व तंत्रविज्ञानाचा स्फोट, दीर्घायुषी लोकांचे वाढते प्रमाण, नेहमीच्या आरोग्यसेवांच्या वाढत्या किमती आणि रोगप्रतिबंधनाविषयक वाढती जागृती अशा अनेकविध कारणांमुळे हा ‘आहारस्फोट’ होत आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.
न्यूट्रॉस्यूटिकल्स म्हणजे नेमके काय?
डॉ. स्टीफन डिफेलिस यांच्या व्याख्येनुसार आपल्या नेहमीच्या पोषणमूल्यांव्यतिरिक्त (म्हणजे विटामिन्स, क्षार, स्निग्ध- पिष्टमय- प्रथिन पदार्थ इ. इ.) रोगप्रतिबंधन व रोगोपचारांचे (यात अ‍ॅनेमियाचा समावेश नाही) मूल्य असणारे वैद्यकीय व आरोग्यदृष्टीने फायदेशीर असे सर्व अन्नपदार्थ म्हणजे न्यूट्रॉस्यूटिकल्स! यात फळे, भाज्या, धान्य, मासे, दूध, दुग्धजन्य पदार्थ अशा सर्व पारंपरिक अन्नपदार्थाचा समावेश तर होऊ शकतोच. पण शेतीतंत्रज्ञानाने (हायब्रिडीकरण काही जैवतंत्रज्ञान इ.) निर्माण झालेली नवीन प्रकारची धान्ये किंवा भाजीपाला तसेच काही पारंपरिक पदार्थाचे मूल्यवर्धन उदा. कॅल्शियममुक्त ऑरेंज ज्यूस, फोलिक अ‍ॅसिडयुक्त पीठे इ. अशा अनेक अपारंपरिक अन्नपदार्थाचाही समावेश होतो. या क्षेत्रात नित्यनवीन संशोधन होत असून विविध पारंपरिक अन्नपदार्थातील गुणवान द्रव्ये आढळून येऊ लागली आहेत. (सोबतचा तक्ता पाहा.) अर्थात या सर्व अन्नघटकांची व जुन्या वा नव्या अन्नपदार्थाची मानवी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता आणि व्यावहारिक उपयुक्तता यासंबंधी अधिकाधिक संशोधन होणे महत्त्वाचे आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनालयाच्या माध्यमातून अशा प्रकारची उत्पादने निर्माण करण्यासंबंधीचे तसेच त्यांच्या जाहिराती (काय नमूद करावे वा काय नमूद करता येणार नाही) यासंबंधी एक अधिक व्यापक सरकारी धोरण असणे आवश्यक आहे असे वाटते. युरोप व अमेरिकेमध्ये तेथीलोऊअ तसेच ‘न्यूट्रिशन लेबलिंग अँड एज्युकेशन अ‍ॅक्ट’ (NLEA) इ. माध्यमातून अशी बरीच उपयुक्त नियंत्रणे आणण्याचे प्रयत्न केले गेले आहेत व जात आहेत.
भविष्यवेध- आरोग्य जागृतीमुळे समाजाचा व वैद्यकाचाही रोगप्रतिबंधनाकडे वाढता कल लक्षात घेतला तर आहारोपचारांना, म्हणजेच न्यूट्रास्यूटिकल्सना नजिकच्या भविष्यात अधिक चांगले दिवस येतील अशी स्पष्ट सुचिन्हे दिसतात. एकटय़ा अमेरिकेतच २००३ साली वार्षिक ३१ बिलियन अमेरिकी डॉलर्सची उलाढाल असणारा न्यूट्रामेटिकल्सचा उद्योग आज ८६ बिलियन डॉलर्सपर्यंत झेपावला आहे. भारतातही आजमितीस रु. ४४०० कोटींचा उलाढाल असणारा उद्योग येत्या ३ वर्षांत दुप्पट होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. युरोप व जपानमध्ये तर या उद्योगाची व्याप्ती अमेरिकेहून प्रचंड आहे. एकटय़ा जपानमध्ये सुमारे ४७ टक्के लोक एखादे तरी न्यूट्रॉस्यूटिक दररोज वापरतात असे काही सर्वेक्षणे सांगतात. भारतीय उद्योजकांनीही हे संकेत जाणून पुढे जाणे आवश्यक आहे असे मुद्दामहून नमूद करावेसे वाटते. आहारोपचार अथवा न्यूट्रास्यूटिकल्सनी आपल्या उपचारात भविष्यात अतिमहत्त्वाचे स्थान मिळविले तर आश्चर्य वाटावयास नको. अखेर ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हेच खरे!
---- Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad