Sunday, October 18, 2009

गुडघेदुखी टाळण्यासाठी फिजिओथेरपी


आजकाल वाढत्या वयात गुडघेदुखीचे प्रमाण नक्कीच वाढत चालले आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांची गुडघेदुखी डोकेदुखी झाली आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे वाढते वजन, वाढता आहार आणि बैठे काम!
जसे वय वाढत जाते तशी स्नायूंची नैसर्गिक क्षमता कमी होऊ लागते, तसेच अस्थिबंधने अधिक लुळी पडतात. त्यामुळे सांध्यांची झीज होऊ लागते. वाढत्या वजनाने व व्यायामाच्या अभावाने ही क्रिया लवकर आणि वेगाने सुरू होते. अर्थात या क्रियेचा वेग प्रत्येकात निराळा असतो व काही अंशी तो आपल्या कौटुंबिक इतिहासावरही अवलंबून आहे.
सहसा उतारवयात येणारी गुडघेदुखी अचानक उद्‌भवत नाही. हळूहळू ती वाढत जाते. म्हणूनच सुरवातीला तिच्याकडे बऱ्याच वेळा दुर्लक्षच केले जाते. जेव्हा दुखणे आपल्या "हाताबाहेर' जाते तेव्हा आपण डॉक्‍टरांकडे "धावतो'. विविध उपचारपद्धती आपापल्या मतानुसार "ट्राय' करतो आणि दुखण्याबद्दलच्या संभ्रमाला सुरवात होते. कारण प्रत्येक शास्त्राचे वेगवेगळे नियम आणि विचारसरणी असते. त्यामुळे मोठ्या अडचणीत आपण पडतो. काही डॉक्‍टर पहिल्यांदा वजन कमी करायला सांगतात, तर काही "जास्त चालू नका' असा सल्ला देतात. आता चालले नाही तर वजन वाढते आणि चालले तर गुडघेदुखी...
यातून फिजिओने असा मार्ग काढतात - प्रथम गरजेनुसार फिजिओथेरपीची उपकरणे (उदा.- अल्ट्रासाउंड, डाएथर्मी/ आय.एफ.टी.ई.) वापरून दुखणे कमी केले जाते.
या दुखणे कमी असलेल्या काळाचा वापर व्यायाम सुरू करण्यासाठी केला जातो. ज्यांना दुखणे कमी प्रमाणात किंवा अधूनमधून आहे त्यांचे लगेच व्यायाम सुरू केले जातात. हे व्यायाम दोन प्रकारांत मोडतात. एक - मांडीचे स्नायू बळकट करण्यासाठी, दोन - गुडघ्याच्या बाजूचे सर्व स्नायू लवचिक करण्यासाठी. जेव्हा हे स्नायू बळकट, तसेच लवचिक असतात तेव्हा ते गुडघ्यावर येणारे शरीराचे वजन अंशतः स्वतः पेलू शकतात. त्यामुळे सांध्यांची झीज कमी होते. परिणामी दुखणेही. हे व्यायाम अतिशय हलक्‍या पद्धतीचे असतात. त्यामुळे त्यास वयाचे, तसेच कुठल्याही मेडिकल प्रॉब्लेमचे बंधन नाही.
व्यायामांची सुरवातीला ४-५ सीटिंग्ज घेणे फायद्याचे असते, जेणेकरून व्यायामातील बारकावे लक्षात येतात. नियमित व्यायाम सुरू केल्यानंतर तीन आठवड्यांत मांडीचे स्नायू बळकट होऊ लागतात. त्यानंतर चालणे सुरू केल्यास त्रास होत नाही. कारण बळकट झालेले स्नायू गुडघ्याला आधार देतात.
या पहिल्या तीन आठवड्यांच्या काळात सायकलिंग/ पोहणे इ. गुडघ्यांवर वजन न येणारे व्यायाम करण्यास काहीच हरकत नाही, तरी आपण आपल्या थेरपिस्टला विचारून सुरवात करावी. या काळात गुडघ्यांचे अर्गोनोमिक्‍स पाळणे गरजेचे आहे.
अर्गोनोमिक्‍स म्हणजे एखादी हालचाल कशी करावी किंवा करू नये, याचे नियम- जेणेकरून सांध्यांवर येणारा अतिरिक्त भार कमी होईल. जसे गुडघेदुखी टाळण्यासाठी ज्या स्थितीत गुडघा जास्त वाकलेला असतो ती स्थिती टाळावी, मांडी घालून बसू नये, उकिडवे बसू नये, शक्‍यतो कमोड वापरावा, जास्त वेळ उभे राहणे टाळावे, दोन्ही पायांवर समान वजन देऊन चालावे, खुर्चीवरून उठताना हातावर वजन देऊन उठावे, अतिरिक्त जिना चढणे-उतरणे टाळावे, इ.
एक-दोन महिन्यांत नियमित व्यायामाने व अर्गोनोमिक्‍सने आपल्याला नक्कीच चांगला बदल दिसतो, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या उपचार पद्धतीत कोणतेही दुष्परिणाम नाहीत! तेव्हा अशा रीतीने फिजिओने ही डोकेदुखी आपण पळवून लावू शकता.
- डॉ. सुप्रिया अंतरकर, पुणे

1 comment:

ad