Friday, December 9, 2011

उबदार अभ्यंग -1


डॉ. श्री बालाजी तांबे
केव्हातरी थंड हवेच्या ठिकाणी गेले असता, भरपूर चालून झाल्यावर थकवा घालविण्यासाठी फक्‍त मसाज घेण्यापेक्षा जो नियमितपणे अभ्यंग मसाज घेतो तो तरुण राहतो, त्याची ताकद वाढते, त्याची रोगप्रतिकारशक्‍तीही चांगली राहते व उबदार प्रेम देता-घेता येते.

थंडीच्या दिवसांत असते थंडगार वातावरण, थंडगार हवा, थंडगार पाणी, थंडगार स्पर्श. थंडी म्हणजे गोठणे. गोठणे याचा अर्थ इतरांपासून वेगळे पडणे. सर्व जगात पूजा होते अग्नीची. कारण तो सर्वांना आकर्षित करतो, जवळ आणतो. या अग्नीचे आकर्षण एवढे असते, की शरीरातूनसुद्धा पाहिली जाते ऊब. हालचाल करत नसलेल्या माणसाच्या कपाळाला स्पर्श करून पाहतात, की तो आहे की गेला. म्हणजेच त्याच्या शरीरात ऊब आहे की तो थंड पडला, हे पाहिले जाते. त्याच्या स्पर्शावरून कळते, की जीवन प्रवाहित आहे की नाही. जीवनप्रवाहातून वेगळेपणा कोणालाच आवडत नाही. जीवनप्रवाहात राहणे व जीवनाची ऊब मिळविणे, त्याचा आनंद घेणे प्रत्येकालाच आवडते.

अशा या थंडीमध्ये, एकसंध असलेली शरीराची त्वचा किंवा स्नायू गोठायला म्हणजे आखडायला सुरवात होते. त्वचेचा काही भाग गोठला, आखडला की इतर भागापासून सुटा पडतो, म्हणजेच शरीरावर भेगा पडायला सुरवात होते, शरीर तडतडायला लागते आणि कंड सुटायला लागते.

हे सर्व टाळण्यासाठी औषध एकच असते व ते म्हणजे ऊब. आपल्याला ऊब अनेक प्रकारे मिळते. ऊब मिळवायचा सोप्यात सोपा मार्ग म्हणजे शरीर चोळणे, घर्षण करणे म्हणजेच अभ्यंग करणे, मसाज करणे. त्यानंतर ऊब मिळविण्यासाठी करावी लागते धावपळ, म्हणजेच व्यायाम. तसेच ऊब मिळविण्यासाठी योग्य आहाराची योजना करणे आवश्‍यक असते. तसे पाहता थंडीच्या दिवसांत बाहेर सूर्यप्रकाशात, त्याच्या उबेत बसण्याएवढे आनंददायक दुसरे काही नाही. म्हणून सूर्यध्यान, खास ऊब देणाऱ्या पदार्थांचे सेवन अशा गोष्टींपासून ऊब मिळविणे आवश्‍यक असते. त्यानंतरही समाधान झाले नाही तर शेकोटी पेटवून बसणे, होळीसारखे उत्सव साजरे करणे, अशा प्रकारच्या योजना करून मनुष्य ऊब मिळविण्याच्या मागे लागतो. अर्थात थंडीच्या दिवसांत उबदार कपडे घालून संरक्षण करता येते.

थंडी हा ऋतू चांगला असतो. त्यामुळेच आपण पाहतो, की थंड प्रदेशांतील लोक भरपूर अन्न खातात, पेये पितात, मेहनत करतात, ते उंचेपुरे, गोरेगोमटे असतात. पण तेथली थंडी सहन करण्यासाठी ऊब आवश्‍यक असतेच. तेथे घरे गरम करण्याची व्यवस्था असते, गरम कपडे वापरावे लागतात.

भारतासारख्या प्रदेशात एकमेकाला भेटल्यानंतर दुरूनच नमस्कार करून मिळालेली ऊब पुरेशी ठरते, पण थंड प्रदेशांत गेले तर हाताला हात मिळवून उबेचे आदान-प्रदान व्हावे लागते आणि एवढ्याने समाधान झाले नाही तर कडकडून मिठी मारावी लागते.

शरीराच्या एखाद्या भागाला, पायाच्या बोटाला रक्‍ताभिसरण कमी झाले, तेवढा भाग रक्‍तसंचारापासून वंचित झाला तर तेवढा भाग थंड पडून बधिर होण्याची, तेथे मुंग्या येण्याची शक्‍यता असते. असे झाल्यास नखावर खाजवले असता पुन्हा तेथील रक्‍ताभिसरण वाढून ऊब निर्माण होते व त्रास जातो. हात गार पडून लिहिता येत नाही, काम होत नाही, अशा वेळी दोन हात एकमेकांवर घासण्याची क्रिया साहजिकच घडते. थोडी अधिक माहिती असणारा मनुष्य पुढून-मागून सर्व दिशांनी हात घासतोच व बरोबरीने बोटे एकमेकांत अडकवून, दाबून धरून ओढायचा प्रयत्न करतो, म्हणजे बोटांच्या कडांचे, दोन बोटांच्या मध्ये असलेल्या जागेचे घर्षण होते आणि उबेचा उत्साह येतो. पाठीवर थाप मारायची, हाही एक ऊब देण्याचाच प्रकार.

हे सर्व लक्षात घेतले तर ऊब देणे, रक्‍ताचा संचार वाढवणे, थंडीमुळे किंवा इतर कारणामुळे अवघड जागी साकळलेले रक्‍त किंवा अडकलेला रक्‍तप्रवाह दूर करण्यासाठी त्या ठिकाणी घर्षण करणे म्हणजेच अभ्यंग करणे- मसाज देणे अभिप्रेत असते. परंतु शरीराचे दोन भाग एकमेकांवर घासताना ते जर कोरडे असतील तर त्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या उष्णतेमुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. शिवाय मुख्य म्हणजे स्नेहन, मैत्री, आपुलकी शरीराशी व्हावी लागते, त्यासाठी तेलाने किंवा तत्सम पदार्थाने मसाज करणे अभिप्रेत असते. नुसते वास दिलेले तेल असेल तर त्याचा उपयोग होत नाही. उलट अशा असंस्कारित तेलाच्या वापरामुळे त्वचेवरची रंध्रे बंद होतात. असे तेल वापरून मसाज घेताना वाटलेले सुख नंतर महागात पडते.

म्हणून आयुर्वेदाने अभ्यंगासाठी वेगवेगळ्या प्रकारची अनेक तेले सुचविलेली आहेत. ही तेले बनविताना वेगवेगळ्या वनस्पती, दूध, दही, ताक, निवळी अशी अनेक द्रव्ये वापरलेली असतात, अगदी केशर, कापरासारखी द्रव्येही वापरलेली असतात. अशा तेलाने योग्य मसाज केला तर नुसती तात्पुरती ऊब न येता शरीरात टिकून राहणारी व शरीराला फायदा करणारी ऊब तयार होते. तेव्हा थंडीच्या दिवसांत प्रत्येकाने खास मसाजसाठी तयार केलेले अप्रतिम अभ्यंग तेल घेऊन स्वतःच शरीरावर चोळून व्यवस्थित मसाज करावा. जमेल त्यांनी उपचार केंद्रात जाऊन प्रशिक्षित परिचारकाकडून मसाज करून घ्यावा.

केव्हातरी थंड हवेच्या ठिकाणी गेले असता, भरपूर चालून झाल्यावर थकवा घालविण्यासाठी फक्‍त मसाज घेण्यापेक्षा जो नियमितपणे अभ्यंग मसाज घेतो तो तरुण राहतो, त्याची ताकद वाढते, त्याची रोगप्रतिकारशक्‍तीही चांगली राहते व उबदार प्रेम देता-घेता येते.                        

No comments:

Post a Comment

ad