Friday, July 17, 2015

शरीराचे घड्याळ

भौतिक प्रगतीच्या मागे धावणाऱ्यांना निसर्ग माफ करत नाही. निसर्ग माणसाला त्याच्या चुकीची नेहमीच शिक्षा देत असतो. गगनचुंबी इमारती बांधल्यावर तेथे साहजिकच सूर्यप्रकाशाचा अभाव असतो व त्यामुळे त्यात राहणाऱ्यांना सूर्यप्रकाशाचे फायदे मिळू शकत नाहीत. अशा ठिकाणी भर दुपारी बारा वाजता सूर्यप्रकाश आला, तरी यात राहणारी मंडळी सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांपासून वंचित राहतात. एकंदर मनुष्याच्या डोळ्यांना सूर्यप्रकाश दिसणे आवश्‍यक आहे. त्यामुळे शरीराच्या घड्याळाला ट्युनिंग होत राहते. सूर्य जसजसा आकाशात सरकतो तसे शरीराचे घड्याळ चालू राहते. जेथे विज्ञान प्रगत झालेले आहे अशा देशांमध्ये या गोष्टी लक्षात घेऊन आठवड्यातून एक दिवस का होईना बागबगीचांमध्ये जाणे, उपवनांमध्ये सगळ्यांनी जमणे अशा तऱ्हेचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत, तसेच सूर्यकिरणांतील नीलतरंग पण आरोग्यासाठी उपयुक्‍त असतात हे लक्षात आले आहे.

डॉ. श्री. बालाजी तांबे
मनुष्याला काळाचे भान कसे झाले? एक तर बाह्यवातावरणात झालेल्या बदलांमुळे किंवा दुसरे स्वतःच्या आत आलेल्या अनुभवांमुळे. बाहेरचा बदल सर्वप्रथम दोन प्रकारे लक्षात आला. बाहेर एक तर प्रकाश आहे किंवा अंधार आहे हे लक्षात आले. त्यामुळे दिवस व रात्र हे काळाचे दोन मोठे विभाग लक्षात आले. शरीराच्या आत अनुभवाला येणाऱ्या बदलांमध्ये भूक लागणे व मलविसर्जन प्रवृत्ती होणे या दोन उलट-सुलट क्रिया लक्षात आल्या. हेही लक्षात आले, की प्रकाश देणारा व बाह्यवातावरणाचे भान करून देणारा आकाशातील भानू - सूर्य नियमाने उगवतो व मावळतो. बाह्य वातावरणात होणाऱ्या बदलांनुसार शरीरात काय बदल होतात हे मनुष्याच्या लक्षात आले. बाह्य वातावरणातील उष्णतेमुळे होणाऱ्या बदलामुळे वारा जोरात वाहू लागतो किंवा थांबतो आणि एका चक्राची सुरवात होते हेही लक्षात आले. शरीरावर या सर्व बाह्य वातावरणाचा मुख्य म्हणजे सूर्याचा परिणाम होऊन शरीराचेही एक घड्याळ तयार होते. या घडाळाचा अभ्यास करून आयुर्वेदाने पंचमहाभूतांची चालणारी कार्ये, त्यांचे अपापसांतील संबंध व त्यातून सर्व वस्तुजातावर विशेष परिणाम कसा घडतो हे दाखवून दिले. या परिणामांचा अभ्यास करून वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष निसर्गात व शरीरात क्रमाने कसे वाढतात हे लक्षात घेतले, उदा. वसंत ऋतूत हलकी उष्णता वाढते, त्यानंतर ग्रीष्म ऋतूत कडक उन्हाळा सुरू होतो, हेमंत ऋतूत हलकी थंडी पडते व नंतर येणाऱ्या शिशिर ऋतूत कडक थंडी पडते वगैरे. या ऋतूंचा शरीरावर परिणाम होत असतो, उदा. शिशिर ऋतूत कफ साठू लागतो व वसंतात त्याचा प्रकोप होतो; ग्रीष्मात वात साठतो, तर नंतर येणाऱ्या वर्षा ऋतूंत वाताचा प्रकोप होतो वगैरे. अशा प्रकारे तीन दोषांत होणारे सहा बदल लक्षात घेऊन काळ सहा ऋतूंमध्ये विभागला आहे हे लक्षात येते. हे ऋतुचक्र व दिवस-रात्रीचे चक्र पुन्हा पुन्हा चालते हे मनुष्याच्या लक्षात आले. सहा ऋतू एकानंतर एक परत परत येतात हे लक्षात आल्यावर वर्षाची संकल्पना लक्षात आली. हा सर्व अनुभव सर्वसामान्यांना येण्यासारखा होता. त्यासाठी फार मोठ्या संशोधनाची गरज नव्हती.

तात्पर्य हे, की मनुष्याच्या शरीरावर बाह्य वातावरणातील उष्णतेचा, सूर्यप्रकाशाचा परिणाम होतो व त्यातून त्याचे जन्म-मरणाचे चक्रही उत्पन्न होते. काळानुसार शरीरात अनेक बदल होत असतात, तसेच कालानुसार जन्म-मरणाच्या चक्रातही बदल होत असतात. 

मनुष्याला सूर्याचे महत्त्व पटल्यामुळे ‘भास्कराय नमः’ ही प्रथम प्रार्थना त्याच्या तोंडून बाहेर पडली. जो सर्वांना ज्ञान देतो व ज्याच्यावर सगळ्या जगाचे अस्तित्व अवलंबून आहे अशा तेज देणाऱ्या, तेजाचे अनुभव देणाऱ्या सूर्याला देवत्व बहाल केले. हा रोज नियमाने उगवणारा सूर्य सर्वांना मदत करतो, त्यामुळे त्याला मित्र असेही म्हटले जाऊ लागले. तो जणू आकाशात उडणारा पक्षी आहे म्हणून त्याला खग म्हटले जाऊ लागले. मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पूष, हिरण्यगर्भ, मरीची, आदित्य, सवितृ, अर्क, भास्कर अशी सूर्याची बारा नावे घेऊन सकाळी सूर्यनमस्कार घातले जाऊ लागले. आरोग्यासाठी, चांगल्या जीवनासाठी, सुख-समृद्धीसाठी आणि ज्ञानाच्या समाधानासाठी हा पहिला योगप्रकार मनुष्याच्या जीवनात सहजरीत्या अंतर्भूत झाला. आरोग्यासाठी सूर्यप्रकाशाची, सूर्यकिरणांची अत्यंत आवश्‍यकता असते हे आता सर्व जगाला पटलेले आहे. 

शरीराचे घड्याळ वेळच्या वेळी चालले नाही तर शरीराचे आरोग्य नीट राहणार नाही हे लहान मुलालाही कळते. भूक लागल्यानंतर अगदी तान्हे मूलही कसे आकांत करते हे प्रत्येक आईच्या अनुभवाचे असते. भूक लागल्यानंतर शरीराची प्रत्येक पेशी अशाच प्रकारे आकांत करते. ती वेळ सांभाळली गेली नाही, शरीराचे घड्याळ सांभाळले नाही तर रोगोत्पत्ती होते. त्यात एक मोठी अडचण अशी दिसून आली, की प्रत्यक्ष सूर्यप्रकाश अंगावर आल्यावर शरीरात काही विशेष जीवनसत्त्वे तयार होतात. त्यामुळे सतत बंद खोलीत राहणाऱ्यांच्या व सतत विजेच्या दिव्यांमध्ये बसून काम करणाऱ्यांच्या आरोग्यात बदल व्हायला लागतात व आजारपण वाढायला लागते. मनुष्याने मोठा गुन्हा केला तर त्याला सर्वप्रथम अंधारकोठडीत टाकले जाते म्हणजे त्याला इतर लोकांपासून व सूर्यप्रकाशापासून तोडले जाते, जेणेकरून त्याला काळाचे भान राहणार नाही. 

भौतिक प्रगतीच्या मागे धावणाऱ्यांना निसर्ग माफ करत नाही. निसर्ग माणसाला त्याच्या चुकीची नेहमीच शिक्षा देत असतो. गगनचुंबी इमारती बांधल्यावर तेथे साहजिकच सूर्यप्रकाशाचा अभाव असतो व त्यामुळे त्यात राहणाऱ्यांना सूर्यप्रकाशाचे फायदे मिळू शकत नाहीत. अशा ठिकाणी भर दुपारी बारा वाजता सूर्यप्रकाश आला, तरी यात राहणारी मंडळी सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांपासून वंचित राहतात. एकंदर मनुष्याच्या डोळ्यांना सूर्यप्रकाश दिसणे आवश्‍यक आहे. त्यामुळे शरीराच्या घड्याळाला ट्युनिंग होत राहते. सूर्य जसजसा आकाशात सरकतो तसे शरीराचे घड्याळ चालू राहते. जेथे विज्ञान प्रगत झालेले आहे अशा देशांमध्ये या गोष्टी लक्षात घेऊन आठवड्यातून एक दिवस का होईना बागबगीचांमध्ये जाणे, उपवनांमध्ये सगळ्यांनी जमणे अशा तऱ्हेचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर केले सुरू होत आहेत, तसेच सूर्यकिरणांतील नीलतरंग पण आरोग्यासाठी उपयुक्‍त असतात हे लक्षात आले आहे. 

प्राचीन भारतीय संस्कृतीतही उपवनांमध्ये जमणे, वृक्षपूजा करणे, सकाळी सूर्याला अर्घ्य देणे अशा पद्धती रूढ होत्या. तसे पाहता, सूर्य हा पावसा-पाण्यासाठीही जबाबदार असतो. आपण सर्वांना पुन्हा सूर्यप्रकाशात येऊन आरोग्य, ऐश्वर्य व समाधान मिळण्याच्या हेतूने फूल ना फुलाची पाकळी म्हणून सूर्याला पळीभर अर्घ्य देण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे.
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad