Friday, December 9, 2011

संशोधन - अर्भकांना मसाज


आपल्या शरीरासाठी नियमित मसाज करण्याची गरज असल्याचे आपल्याला माहीत असते. आपण मोठेही असा मसाज शरीराला करीत नाही. पण हाच मसाज आता अपुऱ्या दिवसांच्या अर्भकांसाठी "उपचार' ठरत आहे. अगदी हलक्‍या हाताने केलेल्या मसाजमुळे अपुऱ्या दिवसांच्या अर्भकांच्या वजनात चांगली वाढ होते, असे अमेरिकेतील मियामी विद्यापीठाच्या संशोधकांना आढळून आले आहे. असे "मसाज' उपचार केल्याने या अर्भकांच्या झोपेच्या वेळात अथवा अन्नग्रहणाच्या सवयींमध्ये फार मोठे बदल दिसून येत नाहीत; मात्र, पचन यंत्रणा नीट कार्यरत झाल्यामुळे त्यांच्या वजनात वाढ दिसून येत असावी, असे या संशोधकांनी म्हटले आहे. या संशोधकांनी अर्भकांवर पाच ते दहा दिवसांचे मसाज-उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांच्या हृदय व पोटाच्या विद्युत आलेखांच्या आधारे कार्यक्षमतेचे मोजमाप केले आणि मसाज-उपचार झाल्यानंतर पुन्हा त्यांचे मापन केले. मसाजमुळे सर्वच अर्भकांच्या या दोन्ही आलेखांत चांगली सुधारणा दिसून आली. ज्या अर्भकांवर मसाज-उपचार सुरू नव्हते, त्यांच्या तुलनेत ते सुरू असलेल्या अर्भकांचे वजन सरासरी 27 टक्‍क्‍यांनी वाढल्याची नोंदही संशोधकांनी केली आहे.

दम दमा दम!
"दम असेल तर ये समोर,' असा धमकावणीचा सूर आपण कधी ऐकलेला असतो. कोणतंही कष्टाचं काम करताना आपला दम निघू शकतो. काही वेळा आपण एखाद्या गोष्टीसाठी इतके अधीर होतो की आपल्याला दम धरवत नाही. हे "दम'दार पुराण मी का ऐकवतोय? जरा दमादमानं घ्या की! सांगतो, अमेरिकन तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दम असेल तर बुद्धीवान होता येते. ज्यांची फुप्फुसं निरोगी असतात ती मुले स्मृती, बोधन आणि बुद्धिमत्तेच्या सर्व चाचण्यांमध्ये इतरांपेक्षा सरस असतात, असे काही अमेरिकी तज्ज्ञांनी म्हटले आहे. मैदानावर, मोकळ्या हवेत खेळणाऱ्या मुलांची फुप्फुसं अधिक निरोगी असल्याचंही संशोधनात लक्षात आलं आहे. मध्यमवयीनांच्या आणि वृद्धांच्या बौद्धिक क्षमता व त्यांच्या फुप्फुसांचे आरोग्य यांचा असा परस्पर संबंध यापूर्वीच्या संशोधनांतून सिद्ध झालेला आहे. मुलांमध्येही तो संबंध तसाच आहे काय हे पडताळून पाहण्यासाठी या तज्ज्ञांनी बोस्टनमधील 165 मुलांच्या आरोग्याचा जन्मापासून सहाव्या वर्षापर्यंत माग ठेवला. सहाव्या वर्षी त्यांच्या फुप्फुसांची आणि नवव्या वर्षी मेंदूची कार्यक्षमता मोजण्यात आली. फुप्फुसांच्या कार्यक्षमतेच्या वाढीच्या प्रत्येक अंशागणिक मेंदूच्या क्षमतांमध्येही तेवढीच वाढ होत असल्याचे त्यात दिसून आले. दमा, पालकांचे धूम्रपान किंवा शिशाच्या प्रदूषणाचा परिणाम आदी फुप्फुसांच्या क्षमतांवर परिणाम करणारे घटक लक्षात घेतले तरीही फुप्फुसांची आणि मेंदूची क्षमता यांतील परस्पर संबंध तसाच कायम असतो, असे दिसून आले. फुप्फुसांच्या कार्यक्षमतेच्या मेंदूवर होणाऱ्या अशा परिणामांची कारणे अद्याप लक्षात आलेली नसली तरी, जैविक साहचर्यामुळे असे घडून येत असावे, असे मतही या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.                        

No comments:

Post a Comment

ad