Sunday, January 16, 2011

आरोग्यसण मकरसंक्रांत


डॉ. श्री बालाजी तांबे
संक्रांतीच्या दिवसात, थंडीच्या दिवसात सूर्यशक्‍ती, अग्निशक्‍तीकडे लक्ष देणेही आवश्‍यक असते. थंडीमध्ये निसर्गतःच अग्नीची शक्‍ती वाढत असते, तसेच सूर्यप्रकाशाचा आरोग्यासाठी अधिकाधिक उपयोग करून घेण्यासाठीही हा काळ उत्तम असतो.
वीन वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत. आयुर्वेदिक दृष्ट्या विचार करायचा झाला तर, संक्रांत येते थंडीच्या दिवसात म्हणजे हेमंत ऋतूत. हेमंतानंतर येतो शिशिर ऋतू, जो आदान काळातला पहिला ऋतू असतो. आदानाचे वैशिष्ट्य म्हणजे "रौक्ष्यं आदानजम्‌' अर्थात आदानकाळात रुक्षता वाढू लागते, शिवाय शिशिरात थंडीचे प्रमाण खूप वाढणार असते. थंडीपाठोपाठ रुक्षता वाढतेच. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे सर्व रीतिरिवाज रुक्षता कमी करणारे व थंडीचे निवारण करणारे असतात. आयुर्वेदाने फक्‍त संक्रांतीच्या दिवशीच नाही, तर संपूर्ण हेमंत व शिशिर ऋतूत असेच शीतता व रुक्षता कमी करणारे उपाय योजण्यास सांगितले आहेत.
चरकसंहितेमधील या सूत्रांवरून हे स्पष्ट होईल.

गोरसानिक्षुविकृतीर्वसा तैलं नवौदनम्‌ ।
हेमन्तेऽभ्यस्यतस्तोयमुष्णं चायुर्न हीयते ।।
अभ्यंगोत्सादनं मूर्ध्नि तैलं जेन्ताकमातपम्‌ ।....चरक संहिता
हेमंत ऋतूत दूध व उसापासून तयार केलेले विविध पदार्थ खावेत, गरम पाणी प्यावे, तेल, वसा वगैरे स्निग्ध पदार्थ खावेत, अंगाला अभ्यंग करावा, स्निग्ध द्रव्यांपासून बनविलेली उटणी लावावीत, डोक्‍यावर तेल लावावे, अंगावर ऊन घ्यावे. संक्रांत साजरी करताना आपण नेमक्‍या याच गोष्टी करत असतो.
संक्रांतीच्या दिवसात, थंडीच्या दिवसात सूर्यशक्‍ती, अग्नीशक्‍तीकडे लक्ष देणेही आवश्‍यक असते. थंडीमध्ये निसर्गतःच अग्नीची शक्‍ती वाढत असते, तसेच सूर्यप्रकाशाचा आरोग्यासाठी अधिकाधिक उपयोग करून घेण्यासाठीही हा काळ उत्तम असतो.

सूर्यशक्‍तीचा उपचारवेद-आयुर्वेदात प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा आरोग्यासाठी उपयोग करून घेण्याबाबत बरेच काही सांगितलेले आहे.
उद्यन्नादित्यः कृमीन्‌ हन्ति ।
उगवता सूर्य कृमींचा नाश करतो.
न सूर्यस्य संदृशे मा युयोथाः ।
सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्‍च ।....ऋग्वेद
सूर्याच्या प्रकाशापासून आमचा कधीही वियोग न होवो.
संपूर्ण स्थावर (झाडे, दगड वगैरे स्थिर वस्तू) व जंगम (प्राणी, पशू, पक्षी वगैरे हालचाल करून शकणाऱ्या गोष्टी) यांचा सूर्य हा आत्मा होय. या प्रकारच्या वेदसूत्रांमधून सूर्याचे महत्त्व समजते.
आरोग्यं भास्करात्‌ इच्छेत्‌ । असे आयुर्वेदातही म्हटलेले आहे. सूर्यपूजा, उगवत्या सूर्यप्रकाशाचा लाभ घेण्याबरोबरच सूर्यप्रकाशाचा "उपचार' म्हणूनही अनेक ठिकाणी उपयोग करून घेतला आहे.
प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा उपचार म्हणून उपयोग करण्याला "आतपस्वेद' असे नाव दिले आहे. आतपस्वेद हा मुख्यत्वे त्वचारोगात घ्यायला सांगितला आहे. तसेच तो लंघनाचा एक प्रकार आहे असेही सांगितले.
लंघनप्रकारः आतपसेवनम्‌ ।
मध्यबलस्थूलमनुष्येषु स्थौल्यापनयनाय ।...चरक सूत्रस्थान
चांगली किंवा मध्यम ताकद असणाऱ्या स्थूल मनुष्याची स्थूलता दूर करण्यासाठी आतपसेवन उपयुक्‍त असते.
सुश्रुतसंहितेत सूर्यप्रकाशाचे अजूनही फायदे सांगितले आहेत,
दुष्टव्रणपीडितेषु कुष्ठिषु तैलपानाभ्यङ्‌गाद्‌ अनन्तरमन्तःशोधनार्थं प्रयुक्‍तश्‍चिकित्सोपक्रमः ।

जुना, दूषित व्रण नष्ट करण्यासाठी, त्वचारोग नाहीसा करण्यासाठी, अंतःशुद्धीसाठी केला जाणारा उपचार म्हणजे आतपसेवन होय.
स्वेद उपचार समजावतानाही अनेक ठिकाणी उन्हाचा वापर केलेला आढळतो. काही मानसिक रोगांवर उपचार म्हणून उन्हात बसवावे, झोपवावे असे उल्लेख सापडतात. एकंदरच आरोग्य टिकवताना किंवा मिळवताना सूर्याची मोठी आवश्‍यकता असते.

शरीरातील सूर्यशक्‍ती"पिंडी ते ब्रह्मांडी' हा आयुर्वेदातला महत्त्वाचा सिद्धांत आहे. जे काही विश्‍वात आहे ते सर्व सूक्ष्म स्वरूपात शरीरात आहे. याच तत्त्वानुसार जसा बाह्य जगतात सूर्य आहे तसा शरीरात अग्नी आहे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. पृथ्वीसाठी ऊर्जेचा मूलस्रोत असतो सूर्य. सूर्यकिरणांच्या साहाय्याने अन्नधान्याची निर्मिती होते आणि अन्नधान्यातूनच सर्व जिवांचे पोषण होत असते. मात्र या अन्नधान्यातून, मग ते पाणी असो, गवत असो, भाज्या-फळांच्या स्वरूपातले असो किंवा एखाद्या प्राण्याचे मांस असो, शरीरावश्‍यक ऊर्जा तयार करण्याची संरचना प्रत्येक सजीव प्राणिमात्राला लाभलेली असते. या संरचनेतला प्रमुख घटक सूर्याचे प्रतीक स्वरूपच असतो व तो म्हणजे जाठराग्नी. आहारामध्ये असलेल्या नैसर्गिक ऊर्जेचे रूपांतर शारीरिक ऊर्जेत करण्याचे काम जाठराग्नीकडून होत असते. पचनक्रियेतून तयार झालेली ऊर्जा आपल्या प्रत्येक लहान-मोठ्या, शारीरिक-मानसिक कार्यासाठी वापरली जाते. अर्थातच जितकी अधिक व जितक्‍या चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळेल तितके शरीरव्यापार सुरळीत चालतात, आरोग्य कायम राहते. या उलट ऊर्जा कमी पडली तर अनेक प्रकारच्या समस्यांना आमंत्रण मिळू शकते. पुरेशी ऊर्जा मिळण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक म्हणजे ज्यापासून ऊर्जा मिळते तो आहार ऊर्जेने संपन्न असायला हवा आणि दुसरी म्हणजे आहारातील ऊर्जेचे शरीरव्यापारासाठी आवश्‍यक स्वरूपामध्ये रूपांतर करणारी संरचना म्हणजेच पचनक्रिया व्यवस्थित काम करायला हवी.

सजीवता, सचेतता, सतेजता यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी अग्नीवर अवलंबून असतात. जे आपल्या आवाक्‍यापलीकडचे असते, ज्याच्यावर आपण कोणताही अधिकार, सत्ता गाजवू शकत नाही, पण तरीही ज्याची आपल्याला आवश्‍यकता असते अशा तत्त्वांची आपण पूजा करतो. भारतीय संस्कृतीमध्ये दीपपूजन, दीपोत्सव, अग्निपूजन वगैरे गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. दीपावली, होळी, दिव्याची अमावस्या वगैरेंच्या निमित्ताने आपण अग्नीचे पूजन करत असतो. देवासमोर पूजा करणे हे तर आपल्या नित्यकर्मातच असते. घराला अग्नीशिवाय घरपण येत नाही, तसेच शरीराची सचेतना, सतेजताही अग्नीशिवाय शक्‍य नसते.

अग्नीची प्रार्थनाअग्नीची प्रशस्ती पुढील शब्दात केलेली आढळते,
आयुर्वर्णो बलं स्वास्थ्यमुत्साहपचयौ प्रभा ।
ओजस्तेजोऽग्नयः प्राणाश्‍चोक्‍ता देहाग्निहेतुकाः ।।
शान्तेऽग्नौ म्रियते युक्‍ते चिरं जीवत्यनामये ।
रोगी स्यात्‌ विकृते मूलमग्निस्तस्मान्निरुच्यते ।।...चरक चिकित्सास्थान

सचेतना, उत्तम वर्ण, ताकद, आरोग्य, उत्साह, उत्तम शरीर बांधा, प्रभा, ओज, तेजस्विता, प्राण ह्या सर्व गोष्टी अग्नीवर अवलंबून असतात. अग्नी व्यवस्थित असेल तर दीर्घायुष्याचा लाभ होतो, विकृत झाला तर त्यामुळे अनेक रोग होऊ शकतात आणि जर शांत झाला तर मरण येऊ शकते.

सातही धातूंचे पोषण करण्यास अन्न सक्षम असले तरी ते स्वीकारण्याचे काम अग्नीचे असते, अन्नाचे शरीरधातूत रूपांतर करण्याचे काम अग्नीचे असते. अग्नीने स्वतःचे काम व्यवस्थितपणे केले नाही तर कितीही सकस आहार घेतला, उत्तम औषध घेतले तरी त्याचा उपयोग होणार नाही, म्हणूनच आयुर्वेदात उपचार करताना अग्नीकडे विशेष लक्ष द्यावे लागते.

रोगांचे मूळ : मंदाग्नीवेळच्या वेळी भूक लागणे, पोट साफ होणे, एवढेच नाही तर शरीर हलके वाटणे, काम करण्याची स्फूर्ती व उत्साह असणे या सर्व गोष्टी संतुलित स्वस्थ अग्नीच्या योगाने मिळू शकतात. आयुर्वेदात अग्नीची अशी प्रशंसा केली आहे. तसेच हा अग्नी आपले कार्य करेनासा झाला तर काय होऊ शकते हेही आयुर्वेदाने अगदी थोडक्‍यात पण स्पष्टपणे सांगितले आहे.
रोगाः सर्वेऽपि मन्दाग्नौ । म्हणजेच अग्नी मंद झाला की तो सर्व रोगांचे मूळ कारण ठरतो.

आणि खरोखरच आयुर्वेदिक दृष्टीने विचार केला असता समजते की बहुतांशी लोकांना भेडसावणाऱ्या स्थौल्य, कोलेस्टेरॉलमध्ये वाढ, एवढेच काय पण उच्च रक्‍तदाब, मधुमेह, यासारख्या अनेक रोगांचे मूळ मंदाग्नीत असते. एकदा का अग्नीवर काम करून त्याचं मंदत्व दूर झाले की अशा रोगात फरक दिसायला सुरवात होते.

सूर्यशक्‍तीचा संबंध आपल्या शरीरातील चेतासंस्थेच्या व हाडांच्या आरोग्याशीही असतो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे अंधार नाहीसा झाला की निसर्ग जागा होतो व सर्वदूर उत्साह संचारतो, तसेच मेंदू व चेतातंतूंचे अभिसरण व्यवस्थित होण्यासाठी, चेतनत्व येण्यासाठीही सूर्यशक्‍तीची आवश्‍यकता असते. आधुनिक विज्ञानही हेच सांगते की सूर्याच्या किरणांतून मिळणाऱ्या "ड' जीवनसत्त्वाची शरीरात कमतरता उत्पन्न झाली, जी सूर्याचे दिवसेंदिवस दर्शन न होणाऱ्या अतिथंड व बर्फाळ प्रदेशातील व्यक्‍तींमध्ये उद्भवू शकते, तर तोल जाणे, चक्कर येणे, पाठीमागे पडायला होणे वगैरे त्रास उद्भवू शकतात. लहान मुलांमध्ये हाडे मृदू झाल्याने हात-पाय वाकू लागले उदा. मुडदूस, तर आधुनिक वैद्यकातही "सौरचिकित्सा' म्हणजे सूर्यप्रकाशात बसवणे याच उपायाचा अवलंब केला जातो.

प्रत्येक वर्षी पौषात 14 जानेवारीला मकरसंक्रांत येते. मकर राशीत असताना सूर्याचा प्रभाव कमी होतो. म्हणून त्या दृष्टीने, आयुर्वेदाच्या तत्त्वानुसार, भारतीय परंपरेत गुळाची पोळी खाऊन, तीळ-गूळ वाटून संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मैत्रीतील जुनी कटुता संपवावी व नवीन मित्र जोडावे, तिळाचे तेल व तीळ वाटून काढलेले दूध अंगाला लावून स्नान करून सूर्यनमस्कार व सूर्योपासना करावी अशी प्रथा आहे. विशेषतः तरुणांनी शरीरसौष्ठव व बुद्धी-मेधा-प्रज्ञा वाढविण्यासाठी थंडीत सुरू केलेली ही सूर्योपासना, योगासने, प्राणायाम व व्यायाम पुढे वर्षभर चालू ठेवावा म्हणजे तारुण्य वाढून दीर्घायुष्य प्राप्त होते.

- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad