Sunday, January 16, 2011

वधू-वरांची आरोग्य कुंडली

डॉ. श्री बालाजी तांबे
स्त्री व पुरुष मिळूनच 'एक अस्तित्व' तयार होते. त्यासाठी दोघांची आरोग्य कुंडली जमायला हवी. दोघांशिवाय आयुष्य सार्थक करणे अवघड आहे. त्याग व प्रेमानेच आपुलकी वाढते, हे लक्षात ठेवून विवाहानंतरचे जीवन कौटुंबिक व सामाजिक बांधिलकीतून हुशारीने जगावे. म्हणजे संपूर्ण आयुष्य आरोग्यमय राहून शेवट गोड होतो.

रोग्याची व्याख्या करत असताना दोष, धातू, अग्नी व मल यांचे समत्व, तसेच इंद्रिये व मन यांचे प्रसन्नपणे स्वीकारलेले आत्म्याचे स्वामित्व अभिप्रेत असते. जन्मतःच मिळालेले आरोग्य खूपसे आईवडिलांच्या प्रकृतीवर, गर्भधारणेपासून जन्मापर्यंतच्या सर्व प्रसंगांवर आणि आईने घेतलेल्या काळजीवर अवलंबून असते. जन्म झाल्यानंतर दिली गेलेली औषधे व घेतलेली काळजी यांचाही आरोग्यावर खूप परिणाम होतो. जीवन सुरू झाल्यानंतर आवडी-निवडी, बाहेरचे वातावरण आणि त्याबरोबर येणारा मानसिक ताण यावरही आरोग्य अवलंबून असते. हे सर्व सांभाळून आरोग्य टिकवणे, तेही शरीर, मन व आत्म्याचे, एक अवघड काम आहे. "एकटा जीव सदाशिव' हा अनुभवच मुळी सर्वांना घेता येत नाही. हे साहजिकही आहे. कारण स्त्री व पुरुष मिळूनच "एक अस्तित्व' तयार होते. एकट्याने राहणे निसर्गाविरुद्ध आहे व त्यामुळे सुख मिळणार नाही असे समजून जीवनसाथी शोधण्यास सुरवात होते. पण त्याचबरोबर आरोग्य सांभाळण्याचे जे आव्हान आधी होते, ते आता लग्नानंतर दुप्पट झाले आहे, हे आपल्या लक्षात येत नाही.

प्रकाशमय जीवनासाठी
शरीरसंबंध घडला, की शरीरातील गुणदोषांचा संबंध येतो. इतकेच नव्हे, तर एकमेकांच्या गुणसूत्रांवरही परिणाम होतो. मनोमिलन होईल की नाही याची शाश्‍वती नसली, तरी मनावरील ताण व मनोरोग यांना वाट मिळू शकते. त्यातून मनोमिलन झालेच तरी मनाची धारणा आसक्‍तीकडे जाऊन दुसऱ्या प्रकारे आरोग्य बिघडवू शकते. उजेड मिळावा म्हणून एका काचेच्या गोळ्यात दोन विजेच्या तारा काळजीपूर्वक एकत्र जोडल्या की उजेड मिळतो, पण उष्णताही तयार होते. त्या उष्णतेमुळे दिव्याच्या व्यवस्थेचेच नुकसान होते. पण म्हणून काही आपण दिवा न लावता अंधारात राहत नाही. पुन्हा पुन्हा प्रयोग करून उजेड तर मिळेल, पण शक्‍तिव्यय व नुकसान होणार नाही याचे उपाय शोधतो. तसेच लग्नाचे पण आहे. लग्न करून वधू व वर जेव्हा एकत्र येतात, तेव्हा एका समाजव्यवस्थेच्या व कुटुंबाच्या बंधनरूपी काचेच्या गोळ्यात हे सर्व घडले व यासाठी आवश्‍यक असणारे नियम पाळले, तर वधूवरांचे आरोग्य व्यवस्थित राहून जीवन प्रकाशमय होते. यासाठी सुरवातीपासूनच काळजी घेणे आवश्‍यक आहे.

ज्योतिषशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि सर्वांत महत्त्वाचे आरोग्यशास्त्र यांच्या मदतीने ही काळजी घेणे शक्‍य आहे. वधू/वर निवडताना त्यांची आरोग्यकुंडलीच अधिक जुळली पाहिजे. अर्थात आरोग्य म्हणजे नुसते देखणेपण किंवा शरीरसौष्ठव आणि रोगाचा अभाव एवढ्यापुरते मर्यादित ठेवता नये; तर, त्यांचे मनोमिलन आणि एकमेकावर प्रेम व आत्मसमर्पण हेही आरोग्यातच धरावे लागेल. एवढे करून ज्योतिषकुंडली, आरोग्यकुंडली वगैरे जुळली तरी ती एका चांगल्या कामाची सुरवात करण्यास मुहूर्त मार्गदर्शन म्हणून उपयोगी पडेल. एकमेकास एकमेकाची गरज आहे, दोघांशिवाय आयुष्य सार्थक करणे अवघड आहे, त्याग व प्रेमानेच आपुलकी वाढते, हे लक्षात ठेवून विवाहानंतरचे जीवन कौटुंबिक व सामाजिक बांधिलकीतून हुशारीने जगले, तर संपूर्ण आयुष्य आरोग्यमय राहून शेवट गोड होतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे.

पूर्ण अस्तित्वाचा अनुभव
एखाद्या वेळी असेही घडू शकते, की एकूणच असणारे शारीरिक आरोग्य, मनाची ठेवण, सर्व जगण्याच्या सवयी या व्यक्‍तिगत पातळीवर उत्तम असूनही जोडीदार घेतल्यानंतर सर्व आरोग्य व्यवस्थित टिकेल असे नाही. अशा वेळी एखादी व्यक्ती लग्न न करता राहू शकते. जीवनात एखादा प्रकल्प डोळ्यांसमोर असताना व आपला जन्म हा या प्रकल्पासाठीच आहे, अशा मानसिक धारणेतून कुणा व्यक्‍तीशी लग्न न करता प्रकल्पाशीच लग्न करून राहणारी माणसे असतात.

प्रत्येक मनुष्य हा अर्धनारी-अर्धनर असतो, त्यात नर गुणांचे प्राधान्य असले की बाहेरून स्त्री जोडीदार घ्यावा आणि जर स्त्री गुणांचे प्राधान्य असले तर पुरुष जोडीदार घ्यावा म्हणजे एक "पूर्ण अस्तित्व' तयार होईल अशी धारणा होते. परंतु आतील नर-नारीचे संतुलन होऊन जर एकत्वाची किंवा शिवत्वाची स्वानुभूती असली किंवा ही अनुभूती मिळवण्याची साधना करावी अशी योजना असली, तर लग्न न करता एकट्याने राहता येते. पण हे सर्व क्वचितच घडणारे आहे. सर्वसामान्यांनी गृहस्थाश्रमी जीवन जगण्यासाठी जोडीदार मिळवून लग्न करणेच इष्ट आहे.

अशी जमवा कुंडली
भारतात लग्न करायचे ठरवले, की सामाजिक आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी प्रथम घेतली जाते. आईवडील किंवा कुुटुंबातील इतर व्यक्ती ज्या वेळी 'ठरवून लग्न' ही पद्धत स्वीकारणार असतील किंवा जरी स्वतःचे स्वतः लग्न ठरवायचे असले तरी सुरवात याच मुद्‌द्‌यापासून करावी लागते. वधूवरांची संपूर्ण आरोग्य कुंडली जमवताना पुढील गोष्टींची माहिती काढणे इष्ट ठरते.

* दोन्ही घराण्यांचा आचार-विचार, कर्ज, संपत्ती, गुन्हेगारीच्या घटना, समाजात कीर्ती आणि त्या घरातील चालीरीती यांचा विचार करावा लागतो. घराण्यांच्या संबंधाचा विचार करताना गोत्र वगैरे पाहण्याची जी पद्धत आहे ती एवढ्यासाठीच, की वधूवरात कुठलेही जवळचे नाते नसावे. एकाच रक्‍ताचे म्हणजे गुणसूत्रांचा असलेले संबंध आले, तर आरोग्य नीट राहत नाही व पुढे होणारी पिढी रोगयुक्‍त होते.

* मुला-मुलीचे शिक्षण, त्यांचे व्यक्‍तिगत चारित्र्य आणि त्यांची मासिक प्राप्ती हा दुसरा मुद्दा. शिक्षणामुळे नुसतीच आर्थिक प्राप्ती होते असे नव्हे, तर शिक्षणामुळे एकूण विद्येचे संस्कार झालेले असतात, एखाद्या विषयाला हाताळायला कोणती पद्धत स्वीकारावी हे माहीत झालेले असते. त्यामुळे शरीर आकर्षणाची विस्मयता थोडी कमी झाल्यानंतर पुढे आयुष्यभर आकर्षण राहते ते सामाजिक धारणेचे आणि बुद्धी व विचार यांच्या संवादक्षमतेचे. त्यामुळे शिक्षणाचा विचार व त्याबरोबरच आवडी-निवडी यावर पुढील जीवन बरेच अवलंबून असते.

* दोघांचेही शारीरिक आरोग्य, वय म्हणजेच वयातील अंतर, देखणेपण यांचा विचार खूपच महत्त्वाचा ठरतो. शारीरिक आरोग्याचा विचार करताना कुटुंबात आई-वडील किंवा आधीच्या पिढीत अपस्मारासारखे मेंदूचे विकार, कुष्ठ, क्षय, दमा असे आनुवंशिक रोग कुटुंबात नसल्याची खात्री करून घ्यावी लागते. प्रत्यक्ष मुलगा किंवा मुलगी यांना कुठलाही मोठा रोग नाही व ऑपरेशन झाले असल्यास ते कसले, कशासाठी याची माहिती करून घेणे आवश्‍यक ठरते.
स्त्रीच्या बाबतीत ती ऋतुमती झालेली आहे व तिचा मासिक धर्म शास्त्राने सांगितल्याप्रमाणे यथावत व विनासायास चालू आहे याची खात्री करून घ्यावी लागते.

पुरुषाच्या बाबतीत पण त्याच्या अंगलक्षणांवरून व चालण्या-बोलण्यावरून नपुंसकता असण्याची शक्‍यता वाटल्यास योग्य वैद्यकीय तपासणी करून अहवाल पाहावे लागतात. रक्‍ताचा गट किंवा सद्य परिस्थितीत एच.आय.व्ही. वगैरेंची लागण झालेली नाही याचीही माहिती घेणे इष्ट ठरते.

स्त्री-पुरुषांच्या वयाच्या अंतराचा विचार करताना स्त्री 18 ते 20 व पुरुष 24 ते 26 या वयात असणाऱ्या जोडीचे लग्न झाले नाही व वय वाढलेले असले, तर आरोग्याची कुंडली अधिकच चौकसपणे मिळवून घ्यावी लागते. ज्या वेळी प्रौढ विवाह होतात, त्या वेळी शारीरिक आरोग्याबरोबर एकमेकांच्या मानसिक कलाविषयी अधिक माहिती घेतलेली बरी असते. कारण या वयापर्यंत व्यक्‍तिमत्त्व व सवयी दृढ झालेल्या असतात.

देखणेपणाचा विचार करताना विशिष्ट असे मोजमापाचे नियम नाहीत, त्यामुळे व्यक्‍ती आवडली म्हणजे आवडली ! हा केवळ व्यक्‍तिगत निर्णय. दुसऱ्याने पटवून जोडीदार सुंदर आहे असे पटवण्याचा हा विषय नाही. आत हृदयात 'घंटी वाजली' की ज्याची त्याला ऐकू येते. पण बऱ्याच वेळा शारीरिक मिलनाची उत्कंठा व एकूण सर्व जीवनाविषयीचा निष्काळजीपणा, अशा अवस्थेत नुसत्या आतील घंटीच्या आवाजाला महत्त्व देऊन जर जोडीदार निवडला तर पुढे त्रास होण्याचा संभव असतो. उत्तरायुष्यात आकर्षणे बदलली की एका घरात नावापुरते राहून जीवन कंठावे लागते.

* लग्नसंबंधात सांपत्तिक परिस्थिती बरी नसताना स्वतःच्या नातेवाइकांकडून घेतलेली अहेररूपी मदत किंवा अभिनंदन म्हणून सत्काराप्रीत्यर्थ दिलेली भेट हा व्यवहार चालू शकतो. परंतु स्त्रीकडून हुंडा म्हणून ठरवून पैसे घेणे किंवा स्त्रीच्या कुटुंबाला पैसे देऊन स्त्री विकत घेणे या दोन्हीही गोष्टी अत्यंत वाईट समजाव्यात आणि अशा ठिकाणी आरोग्यकुंडली जमत नाही असे समजून लग्न करू नये.

बऱ्याच वेळा आरोग्यकुंडली मिलनावर सल्ला देताना एकूण मुलामुलीची व कुटुंबाची मानसिकता आणि त्याचे निर्णय कुठपर्यंत आलेले आहेत याचा विचार करावा लातो, असा माझा अनुभव आहे. केवळ एका तज्ज्ञ व्यक्‍तीकडून ज्योतिषाच्या अंगाने किंवा इतर सर्व अर्थाने आरोग्यकुंडलीवर शिक्कामोर्तब करून घेणे एवढाच उद्देशही असू शकतो. मुलगा व मुलगी यांचे प्रीतीसंबंध फार खोलवर गेलेले असल्यासही वडीलधाऱ्या मंडळींना त्यांची कुंडली जमत नाही असा अभिप्राय हवा असतो; पण अशा वेळी दोन प्रेम करणाऱ्या जिवांची ताटातूट न करता त्यांच्या आयुष्याची जबाबदारी ते घेण्यास तयार असतील तर त्यांना घेऊ द्यावी, हे लक्षात ठेवूनच सूचक शब्दांत मार्गदर्शन करावे लागते. ज्योतिषशास्त्राने जसे वर्ण-वश्‍य-तारा-योनी-ग्रहमैत्री-राशीकूट-नाडी यांचे 36 गुण धरून कुंडली मिलन केले जाते, तसेच वरील सर्व मुद्‌द्‌यांना काही गुण देता येतील व एकमेकांचे जरी 60-70 टक्के गुण जमले तरी आरोग्य कुंडली जुळली असे समजता येईल. ज्योतिष शास्त्रातील गणगोत्र, 36 गुण, मंगळ व एकूण दोघांचाही भाग्योदय कुंडली मिलनासाठी पाहण्याची पद्धत आहे. आयुर्वेदाशी संबंध बघता, वात-पित्त-कफाचा व सप्तधातूंचा संबंध आरोग्याशी असल्यामुळे अंगलक्षणांवरून समजणारे शरीरप्रवृत्तीचे व मनोधर्माचे साधर्म्य कुंडलीतील राशी, ग्रह व स्थाने यांच्याशी जोडून मनुष्याचा अभ्यास करता येतो.

* वर्ण, गण, नाडी अशा ज्योतिषशास्त्रातील संज्ञा या प्रातिनिधिक असून, नंतर त्यांचे एकमेकाचे शत्रू-मित्र, जमते-न जमते असे संबंध ठरवण्यास सोपे जाते. आयुर्वेद व अंगलक्षणहोराशास्त्र यांचा ज्योतिषशास्त्राशी संबंध जोडून बऱ्याच गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेणे शक्‍य आहे असे दिसते, तरीही यावर अधिक संशोधन झाले, की आरोग्यकुंडली मिलन खूप सोपे होईल.जगाच्या चांगल्या भवितव्यासाठी सुखी कुटुंबजीवन आणि उत्तम संतती हाच मुख्य पाया आहे. वधूवरांची आरोग्यकुंडली जेवढी चांगल्या तऱ्हेने जमेल, तेवढे कुटुंबजीवन सुखी व शांतिपूर्ण होईल.

- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad