Tuesday, March 2, 2010

ध्यानोपचार-3


प्राण वर घेऊन जाण्यासाठी, प्राण मूर्ध्नास्थानी नेण्यासाठी नाकपुड्या दाबून बसण्याचा अभ्यास किती दिवस करणार? त्यापेक्षा ॐ इति एकाक्षरं ब्रह्म व्याहरन्‌, याची सुरवात करा. ॐ ला एकाक्षर ब्रह्म का म्हटले? कारण सर्व ब्रह्माचे मूळ नादात आहे व हा नाद ॐ आहे.

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
र्ध्न्याधायात्मनः प्राणम्‌ आस्थितो योगधारणाम्‌ ।।8-12।।
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्‌ माम्‌ अनुस्मरन्‌ ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्‌ ।।8-13।।

श्रीमद्‌भगवद्‌गीतेतील वरील दोन श्‍लोकांचा अर्थ समजून घेऊन संतुलन ॐ ध्यानयोग (Santulan OM Meditatation - SOM) 'सोम' ध्यान कसे करावे याविषयी श्रीकृष्ण काय म्हणतात ते पाहू.

ध्यानासाठी आवश्‍यकता सांगताना स्नानाचे, कपड्यांचे किंवा एका विशिष्ट स्थानाचे बंधन सांगितलेले दिसत नाही; पण तरीही शरीराची व मनाची शुचिर्भूतता अभिप्रेत असते. ध्यानासाठी लोकरीच्या आसनावर रेशमी वा धूतवस्त्र टाकून बसणे उत्तम असते. रोज एका जागी, एका विशिष्ट वेळेला ध्यान करणे चांगले. पद्मासन, सिद्धासन वा सुखासन घालून मेरुदंड सरळ ठेवून बसणे ध्यानासाठी चांगले असते, असा अनुभव आहे. ज्यांना मांडी घालून बसता येत नाही, त्यांनी खुर्चीवर वा स्टुलावर बसावे. फक्त पावले जमिनीवर पूर्ण टेकावीत व टेकून बसू नये. म्हणजेच कंबरेच्या वरचे शरीर साधारणतः पाच अंशांनी पुढच्या बाजूला कलते ठेवावे. तर्जनी व अंगठ्याची टोके एकमेकांना मिळवून दोन्ही हात गुडघ्यांवर वा मांडीवर उताणे ठेवावेत.

सर्वद्वाराणि संयम्यभगवंतांनी येथे आपल्या शरीराच्या सर्व इंद्रियांच्या द्वारांवर लक्ष ठेवा असे सांगितले आहे. इंद्रियांचा निरोध करा वा काही पाहू नका, असे सांगितले नाही. कबीर म्हणतात की जे काही आपण पाहू, ते परमेश्‍वराचेच स्वरूप आहे व ते परमेश्‍वराचेच सौंदर्य आहे. उगाच डोळे मिटून का बसायचे? डोळे उघडे ठेवून पाहायला हरकत काही नाही; पण त्यात विकृती असता कामा नये. अशा पद्धतीने संयमन साधता येते आणि डोळे उघडे ठेवून आनंदाने बसता येते. आपण विकृतीबाबत एक उदाहरण पाहू. बसस्टॉपवर बसची वाट बघत थांबले असता एक मुलगा व मुलगी हातात हात घालून जात असताना दिसले, तर पटकन मनात येते अरे, "यांचे लग्न कधी झाले? ही मुलगी याचीच बायको आहे का? अरे बापरे, काहीतरी लफडे दिसते आहे.' जे डोळ्याला समोर दिसते आहे त्याऐवजी वेगवेगळे विकृतीजन्य विचार मनात कशाला आणायचे? काहीही पाहताना त्यात विकृती न येता आहे तसे पाहिले, तर काही समस्या नसते. जे जसे आहे तसे पाहणे, म्हणजे काही विकृती न येता पाहणे.

हृदि निरुध्य च
हदयात आपल्या मनाची स्थापना करा, असे भगवंत येथे सांगत आहेत. आपण म्हणतो, हा निर्णय तू मनाने घेतला आहे की हृदयाने? भावनेने घेतला आहे की तर्काने? एकदा सर्व तर्कशास्त्र संपले, की आपले सर्व निर्णय हृदयाला घेऊ दिले पाहिजेत. हृदयाला विचारले पाहिजे, की हे सर्व माणुसकीला धरून आहे का? हे परमेश्‍वराला आवडेल का? परमेश्‍वराला हे आवडणार असले व सर्वांच्या कल्याणाचे असले, तर हे काम मी करतो अशी वृत्ती पाहिजे. मनाला हृदयाच्या ठिकाणी आणल्याशिवाय काही काम करायचे नाही. यात अवघड काय आहे? डोळे उघडे ठेवून बसले असता लक्ष नेहमी हृदयावर हवे. याच हृदयाचा एक भाग मेंदूत आहे. त्यामुळे ध्यानाच्या वेळी भ्रूमध्यात असलेल्या पिच्युटरीच्या ठिकाणी लक्ष ठेवले तरी काम होते. वागताना मात्र लक्ष हृदयावर ठेवले पाहिजे म्हणजे कर्म करताना निर्णय हृदयानेच घेतले पाहिजेत.

र्ध्न्याधायात्मनः प्राणम्‌ आस्थितो योगधारणाम्‌
योगधारणा अशी हवी, की मला माझ्या सर्वस्वाला एकत्र करायचे आहे. माझ्यातला डॉक्‍टर, माझ्यातला मुलगा, माझ्यातले वडील, माझ्यातला भाऊ वगैरे सर्वांना एकत्रित करून मी ध्यानाला बसायला हवे. आपल्या एका शरीरात आपली अनेक व्यक्‍तिमत्त्वे अस्तित्वात असतात. यासाठी ध्यानपद्धतीत सामुदायिक ध्यान व दीक्षा अत्यंत महत्त्वाची असते. आपल्याला एकदा सामुदायिक ध्यानाची सवय लागली, की आपल्या सर्व शरीरात, मनात व व्यक्‍तिमत्त्वात असलेली सर्व अंगे एकत्र होऊन जातात. मी सर्वांना बरोबर घेऊन चालेन, ही योगधारणा. प्राण मूर्ध्नास्थानी आणून योगधारणेत स्थित व्हायचे असते. प्राण मूर्ध्नास्थानी आणणे ही एक गोष्ट जरा कठीण आहे; अवघड कोणाला आहे, तर ज्याला काही करायचे नाही त्याला. ध्यान करणाऱ्याला अवघड असे काही नाही.

श्‍वास आत घेताना सर्व शरीर प्रसरण पावावे, मुख्य म्हणजे छाती-पोट प्रसरण पावावे व तसे दिसावे अशी अपेक्षा असते. श्‍वास सोडत असताना शरीराचे आकुंचन व्हावे व छाती-पोट आत जावे. अशा प्रकारे विशिष्ट दाबाने सर्व शरीराला कार्यरत करून प्राणायाम केला की शक्‍ती मूर्ध्नास्थानी (टाळूकडे) येते. प्राणायामाचे एक गणित आहे. प्राणायामाच्या संबंधात प्राणाचे अपानात हवन, अपानाचे प्राणात हवन, अंतर्कुंभक, बहिर्कुंभक, महाकुंभक, केवलकुंभक या सर्व गोष्टी भगवंतांनी इतरत्र सांगितल्या आहेत. प्राणायामाचा पंप चालविल्यानंतर शक्‍तीचे उत्थापन होते व ही शक्‍ती मूर्ध्नास्थानी पोचविणे आवश्‍यक असते. त्यामुळे पोट आत-बाहेर होऊन पंप चालणे खूप महत्त्वाचे आहे. खूप लोक प्राणायाम तर करतात; पण त्यांचे पोट आत-बाहेर होत नाही. प्राणायाम करून प्राणाला मूर्ध्नास्थानी घेऊन गेल्यानंतर तो सर्व शरीरभर वितरित होणार असतो. प्राण मूर्ध्नास्थानी घेऊन जाणे हा खरा प्राणायाम.

झाडाला पाणी घालायचे असेल, तर आपण झाडाच्या मुळाला पाणी घालतो. शरीररूपी झाडाचे मूळ वर डोक्‍यात असते. तेव्हा मूर्ध्नास्थानी प्राण आणणे महत्त्वाचे असते. एकदा का प्राण मूर्ध्नास्थानी आला, की कल्पनेपलीकडील व आश्‍चर्यकारक गोष्टी काय काय घडतात हे पाहण्यासारखे असते. हा प्राण मूर्ध्नास्थानी घेऊन जाण्याच्या क्रियेला व शरीरातील प्रत्येक पेशीला प्राण पुरविणे याला प्राणायाम असे म्हणतात.

त्यासाठी फार काही करावे लागते असे नाही. प्राणाचे अपानात, अपानाचे प्राणात, प्राणाचे प्राणात हवन करणे वगैरे महत्त्वाचे असले, तरी शेवटी एक अवस्था अशी आली पाहिजे, की आपण नुसते बसले असता ही क्रिया सहजपणे चालायला पाहिजे, नुसता डाव्या-उजव्या नाकपुडीने प्राण घेऊन त्याच्यातच गुंतून राहिले तर समाधी अवस्थेपर्यंत, समत्वापर्यंत कसे काय पोचणार? या सर्वांची सुरवात म्हणून आपण प्राणायाम करतो. प्राणायाम करायचा म्हटला, की मार्गदर्शक गुरू व देखरेख खूप आवश्‍यक असते; कारण त्यातला कुंभक चुकीचा झाला तर त्रास होऊ शकतो.

वाचेने शब्द उच्चारण्यासाठी श्‍वास घेणे व सोडणे आवश्‍यक असते. सर्व नादाचा मूळ ध्वनी ॐकार उच्चारत असताना जी श्‍वसनक्रिया होते, ती प्राणायामातील श्‍वसनक्रियेसारखीच असते. त्यामुळे ॐकार म्हणणे हा प्राणायामाचा सहज व सोपा प्रकार आहे. सहज प्राणायाम सांगण्यासाठी भगवंतांनी पुढचा श्‍लोक सांगितला आहे.

ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्‌ माम्‌ अनुस्मरन्‌ ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्‌ ।।8-13।।

प्राण वर घेऊन जाण्यासाठी, प्राण मूर्ध्नास्थानी नेण्यासाठी नाकपुड्या दाबून बसण्याचा अभ्यास किती दिवस करणार? त्यापेक्षा ॐ इति एकाक्षरं ब्रह्म व्याहरन्‌, याची सुरवात करा. ॐ ला एकाक्षर ब्रह्म का म्हटले? कारण सर्व ब्रह्माचे मूळ नादात आहे व हा नाद ॐ आहे. आपण जेव्हा ॐ म्हणतो, तेव्हा आपल्याला कधी कधी असेही वाटते, की हा ॐ आपण म्हणतो आहे की बाहेरून ऐकू येतो आहे? सर्व आसमंतात भरलेला नाद ऐकणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी सुरवातीला भगवंतांना स्मरून ॐ म्हणणे ही एकच क्रिया आपल्याला करायची असते. त्यानंतरचे सर्व भगवंतांवर सोडून द्यायचे असते. यामुळे साधक भगवंतांशी एकरूप होऊन जातो, नाद ऐकू यायला लागतो व यानंतर लगेच भगवंतांनी सांगितलेली फलश्रुती म्हणजे "यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्‌,' अशी अवस्था प्राप्त होते.

वेगवेगळ्या तरंगलांबीचा (फ्रिक्वेन्सीचा) ॐकार मी म्हटला व त्यावर पुणे विद्यापीठात कै. डॉ. दामले यांनी प्रयोग केले, त्यानंतर डॉ. अनिता पाटील यांनीही प्रयोग केले. ॐकार म्हटल्यावर ईईजी घेऊन आपल्या मेंदूत काय घडते आहे, कुठल्या वेव्ह लेंग्थ निर्माण होतात व मेंदूची जाणीव कुठल्या पातळीवर जाते, याचे निरीक्षण केले गेले आहे. असे बदल मेंदूत होतात हे विज्ञानाला मान्य आहे. पतंजलींनी सांगितले आहे चित्तवृत्तिनिरोधः इति योगः म्हणजे मनाच्या (चित्ताच्या) वृत्ती आपल्याला शांत करायच्या आहेत. वृत्ती म्हणजे मनावर उठलेले विचारांचे तरंग.
(क्रमशः)

Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad