Tuesday, March 2, 2010

ध्यानोपचार-2

डॉ. श्री बालाजी तांबे 
मेंदूने शरीर चालवायच्या संकल्पनेला (प्रोग्रामला) इंद्र म्हटलेले आहे. मेंदूतल्या वेगवेगळ्या सर्व शक्‍तिकेंद्रांना म्हणजे देवतांना सोमरसाची आवश्‍यकता असते. या मेंदूतल्या सोमरसावर आपल्याला प्राण आकर्षित करता आला, तर तो प्राण सर्व शरीरभर पसरवणे खूप सोपे होते. या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत.

ध्यानाने रोग बरे कसे व का होऊ शकतात? रोग बरा करण्यासाठी आपल्या हातात काय असते व रोग कशामुळे बरा होईल हे पाहणे आवश्‍यक आहे. अलीकडे हीलिंग हा शब्द खूप
प्रचलित झालेला आहे. अलीकडे तर लोक प्राणिक हीलिंग करताना दिसतात. आपली वडिलोपार्जित संपत्ती वाटण्यासारखा प्राण वाटायचा आहे, अशी काहीशी या लोकांची कल्पना असते की काय, हे कळत नाही. प्राण कुणाच्याही हातात आलेला नाही. परमेश्‍वराचा अंश असलेला प्राण आजपर्यंत अनेक प्रकारे संशोधन करूनही विज्ञानालाच नव्हे, तर कोणालाच कळलेला नाही. प्राण हे तर जीवनतत्त्व आहे, ते अमृततत्त्व आहे. प्राणाने आपले रोग बरे होतात, प्राणाने आपले हीलिंग होते, प्राणाने आपल्याला निरायमता मिळते व प्राणानेच आपले आरोग्य राहते. जेथे जेथे म्हणून प्राण असतील, तेथे कुठलाही दोष राहू शकत नाही. प्राण हे महातेज आहे, जेथे प्रकाशरूपी तेज असेल तेथे अंधकार कसा राहील? आपल्याला प्राणाचे आवाहन करायचे असते. प्राण हा सर्वव्यापी आहे. फुप्फुसांमध्ये ऑक्‍सिजन गेल्यानंतर आवाहन केल्यानंतर जो प्राण आत येतो, तो प्राण फक्‍त फुप्फुसात न राहता, तो रक्‍तात न मिसळता पेशीपेशीत मिसळला जातो. डोके दुखत असल्यास तो प्राण डोक्‍याकडे नेणे, गुडघे दुखत असल्यास गुडघ्याकडे नेणे, ही गोष्ट ध्यानाने साध्य होऊ शकते.

बरेच वेळा लोक म्हणतात, "मी अमुक ध्यान करतो, ते चांगले आहे का?' असे विचारल्यास मी म्हणतो, की तुमचा काय अनुभव आहे त्यावर ते चांगले की वाईट, याचे उत्तर तुम्हीच देऊ शकाल. "काय काय करता,' असे विचारल्यावर त्याने दिलेल्या उत्तरावरून असे दिसले, की ते करतात त्या ध्यानपद्धतीत कुठेही प्राणाचे आवाहन वा प्राणाचे संचरण दिसत नसल्यास रोग बरा कसा काय होणार? "शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्‌' हे सूत्र लक्षात ठेवल्यास असे दिसते, की जसे एखादे रॉकेट वर उडवायचे असल्यास प्रथम त्याचे सर्व नट, बोल्ट्‌स म्हणजे त्यातील सर्व रचना, त्याचे शरीर पहिल्यांदा तपासून पाहिले जाते; कारण त्या रॉकेटची बॉडी उडणार असते. तसेच आपले शरीर कुठल्याही ध्यानाने नीट ठेवता आले, तर ध्यानापासून मिळणारे अन्य फायदे आपल्याला मिळतील. श्रीमद्‌भगवद्‌गीतेतल्या चौथ्या अध्यायातील एका श्‍लोकात म्हटले आहे,

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान्विद्धि तान्‌ सर्वान्‌ एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ।।४-३२।।
असे जाणल्याने तू संसारबंधनापासून मुक्‍त होशील. मुक्‍त होणे या शब्दांची लोकांना फार भीती वाटते. संसारबंधनातून मुक्‍त होणार, म्हणजे मी मरणार की काय किंवा मला घरातून बाहेर काढून टाकले जाणार आहे की काय, असे लोकांना वाटते. येथे भगवंतांनी संसारबंधनातून मुक्‍त होशील असे म्हटले आहे, संसारातून नाही. बंधन कोणालाच आवडत नाही. अगदी लहान मुलालाही बंधनात राहायला आवडत नाही. सकाळी थंडी असल्याने आमच्या नातीला मोजे घातले, की तिला ते बंधन नकोसे वाटते. पाच मिनिटांत ती मोजे काढून फेकून देते. कल्याणाचे असले, तरी सर्व लहान मुले मोजे, टोपी यांचे साधे बंधन टिकू देत नाहीत. आपल्यालाही कुठलेच बंधन नको असते. भगवंत येथे म्हणत आहेत... यज्ञामुळे संसाराच्या सर्व बंधनांतून मुक्‍ती मिळेल. सर्व संतांनी आपल्याला मुक्‍तीसाठीच मार्ग सुचविलेले आहेत.

ध्यान करण्याने प्रथम आपल्याला हवी असते रोगमुक्‍ती, नंतर हवी असते दारिद्य्रमुक्‍ती, नंतर हवी असते मनःशांती म्हणजे ताणातून मुक्‍ती. सर्व प्रकारची मुक्‍ती मिळाली, की कैवल्यपदाला पोचणे अवघड नाही. कैवल्यपदातच ध्यान व समाधी असते. अशा ध्यानासंबंधी आपण माहिती करून घेणार आहोत.

भगवंतांनी अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. कुठल्याही ध्यानपद्धतीत यज्ञ होणे आवश्‍यक असते. या विधानावरून तुम्हाला असे वाटेल, की "सोम ध्यानपद्धती'त रोज अग्नी पेटवून काही आहुती द्यायच्या असतील; पण ही आवश्‍यकता नाही. अग्नी पेटवून हवन केले, तर उत्तम आहे; कारण कुठलीही गोष्ट भौतिक पातळीवर केल्याचे एक वेगळे समाधान व फळ असते; पण भौतिक यज्ञ करायलाच हवे, असे नाही. उदा. दवाखान्यात कुणाला रोग्याला भेटायला जाताना मनातल्या भावनेबरोबर एक गुलाबाचे फूल नेले, तर त्याला आणखी बरे वाटते. म्हणजेच भावनेबरोबर एखादे कर्मकांड, एखादी वस्तू नेलेली बरी असते; पण ती आवश्‍यक असतेच, असे नाही. प्राण म्हणजे काय व प्राणशक्‍तीचे आवाहन कसे करायचे? त्याचा प्राण गेला, प्राण जाईपर्यंत त्याला मारले, अशा प्रकारे प्राण शब्द आपण खूप ठिकाणी वापरतो; पण आपल्याला कोणालाही प्राण कळलेला नसतो. शारीरिक व आयुर्वेदिकदृष्ट्या पाहिले, तर आपण खाल्लेल्या अन्नातून शरीरात बनणाऱ्या सप्तधातूंमधील शेवटचा धातू आहे वीर्य. गाडीत जसे पेट्रोल असते, तसा शरीरातील व्हायटल फोर्स आहे वीर्य.

हे वीर्य शरीरातील सर्व अणूरेणूंमध्ये व्यापून राहिलेले असते. वीर्य हा प्राणाला पकडण्याचा पिंजरा आहे. प्राणवायू (ऑक्‍सिजन) हा प्राणाला आवाहन करण्याचे एक साधन आहे. प्राण नावाची शक्‍ती असल्यामुळे आपण जिवंत असतो. ती शरीरातून गेली तर आपण काहीही करू शकत नाही. प्राणावर कुणाचीही सत्ता नसते, त्याने आत कधी यावे व कधी निघून जावे, हे प्राण स्वतः ठरवतो. म्हणून आपण म्हणतो की ही परमसत्ता आहे, ही परमात्मसत्ता आहे. हा प्राण आपल्या शरीरात आला, तर आपले आरोग्य व्यवस्थित राहते.

ध्यानरूपी यज्ञात प्राणाचे आवाहन केले जाते. ही ध्यानपद्धती जितकी सोपी तितके आपले काम सोपे. ध्यानपद्धती अशी पाहिजे, की जी प्रत्येकाला जमली पाहिजे, अगदी अंथरुणावर झोपलेल्या आजारी मनुष्यालासुद्धा! अंथरुणावर झोपलेल्या आजाऱ्याला जर बोध झाला, की "एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे', हे ध्यान करण्याने मी बरा होईन, तर

त्याला प्रथम अंथरुणात ध्यान करता आले पाहिजे. आजाऱ्याला अंथरुणात ध्यान करता आले नाही, तर तो प्राणांना कसे बोलाविणार व बरा कसा होणार?

ध्यानाची पद्धत इतकी सोपी हवी, की त्यासाठी कुठलेही शारीरिक कर्मकांडाचे बंधन नसावे. ते धर्मनिरपेक्ष असावे, त्याला स्त्री-पुरुष, लहान-मोठा असे कुठलेही बंधन नसावे, त्याला जागेचे बंधन नसावे. अशी कुठली ध्यानपद्धती असली, तर ती आपल्याला आरोग्यासाठी वापरता येईलच. शेवटी भगवंतांनी सांगितले आहे, "यः प्रयाति त्यजन्‌ देहं स याति परमां गतिम्‌।' या वाक्‍यावर प्रत्येक जण घाबरतो. प्रत्येकाला वाटते, की भगवंतांनी सांगितलेली ध्यानपद्धती वापरून मला तर एवढ्यात देह सोडून कुठे जायचे नाही, आम्हाला आत्ता परमगती हवी आहे. भगवंतांनी मृत्यूपश्‍चात असे शब्द वापरलेले नाहीत. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत कुठलाही शब्द निरर्थकपणे वापरलेला नाही. साध्या अर्जुन या शब्दासाठी शंभर वेगवेगळी संबोधने आहेत. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत भगवंतांना मृत्यू हा शब्द वापरता आला नसता का? भगवंतांनी येथे मृत्यू हा शब्द वापरलेला नाही, तर त्यांनी देह सोडल्यावर असा शब्द वापरला आहे. शांत झोप लागलेली असताना आपण देहाच्या बाहेर गेलेलो आहोत व घाबरून शरीरात परत आलो, आपण कुठेतरी बाहेर फिरतो आहोत, आपण कुठे तरी जाऊन त्या ठिकाणचा डोंगर पाहतो आहोत, कुणाशी तरी बोलत आहोत... असे अनुभव आपल्यापैकी ७०-८० टक्के लोकांना कधी ना कधी आलेले असतात. थोडे कमी खाऊन व ध्यान करून झोपणाऱ्यांना असे अनुभव नक्की येतात. याला म्हणतात शरीर सोडणे व हेच यः प्रयाति त्यजन्देहम्‌।

एखादा छान सूटबूट, टाय घातलेला, श्रीमंत व प्रतिष्ठित कारखानदार वगैरे माणूस समोर आला, तरी एखाद्या स्त्रीची प्रतिक्रिया एकदम होते- हा माणूस काही चांगला दिसत नाही. हे तिने आपल्या कान, डोळे वगैरे इंद्रियांनी ओळखलेले नसते, मनाने ठरविलेले नसते, तर ते ठरविण्यासाठी सूक्ष्म शरीराच्या दृष्टीने त्याला पाहिलेले असते. मी नेहमी म्हणतो, बाहेरच्या पॅकिंगवर जाऊ नको, आतले औषध पहा, आतली व्यक्‍ती पहा व त्याच्याशी संपर्क ठेव. बाहेरच्या कपड्यांवरून कुणाबद्दल मत ठरवू नको. बालाजींमध्ये असलेल्या डॉक्‍टरशी मैत्री केली, तर ते संबंध वरवरचे व केवळ डॉक्‍टर-रोगी असे असतात, बरे झाल्यावर कोण व कुठला बालाजी हे लक्षातही राहणार नाही; पण एखाद्याची बालाजी नावाच्या संपूर्ण व्यक्‍तीशी मैत्री झाली, की वेगळे संबंध प्रस्थापित होतात. त्यामुळे आपल्याला संबंध ठेवायचा आहे आतील जीवनतत्त्वाशी - सूक्ष्म शरीराशी. आपल्या शरीराच्या पलीकडे असलेल्या कारण देहात रोगाचे मूळ असते. तेथूनच रोग शरीरात येतो. आपले शरीर आजारी असले तर सूक्ष्म शरीर आजारी पडते असे नाही; पण सूक्ष्म शरीर आजारी असले तर मात्र शरीर हमखास आजारी पडते. बहुतेक सर्व रोग मनाने उत्पन्न केलेले (सायकोसोमॅटिक) असतात. मनावर सूक्ष्म शरीराची सत्ता असते.

येणाऱ्या प्रसंगाची आधी कल्पना आली (इन्ट्यूशन), उदा. हा मनुष्य आपल्याला फसविणार आहे असे जाणवले, तर आपल्याल सतर्क राहता येईल; पण आपल्याला आधी काही कळत नाही म्हणून आपण गोंधळात पडतो. कुठला तरी लोभ धरून आपण जे काही करणार असतो, त्याचा परिणाम काय होणार, हे आपल्याला आगावू कळले, तर ते करावे की नाही, याचा पक्का निर्णय घेणे सोपे होईल. असा अनुभव व प्रेरणा ध्यानपद्धतीने येऊ शकेल, असे भगवंत म्हणतात; कारण "सोम' ध्यानपद्धतीने सूक्ष्म शरीराने प्रवास करण्याचा, परमने जाण्याचा सराव होईल, सिद्धी प्राप्त होईल. अशी सिद्धी प्राप्त झाली की जीवन आनंदमय होईल व आरोग्यही मिळेल. आपल्याला जेवढी प्राणशक्‍ती आवश्‍यक आहे, त्यापेक्षा अधिक प्रमाणात आकर्षित करता आली, तर कुठल्याही रोगावर मात करणे अवघड नाही, हे तत्त्व जर आपण लक्षात घेतले, तर असे लक्षात येईल की कुठल्याही औषधापेक्षा श्रीमद्‌भगवद्‌गीतेत सांगितलेली "सोम' ध्यानपद्धती, संतुलन ॐ मेडिटेशन उपयोगाची ठरावी. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत भगवंतांनी

म्हटलेले आहे, "समत्वं योग उच्यते.' श्रीमद्‌भगवद्‌गीता समत्वाचा पुरस्कार करते. माणसा-माणसातले, स्त्री-पुरुषातले तसेच सर्व स्तरांवरचे समत्व येथे अपेक्षित आहे. योग शब्दाची व्याख्या करतानासुद्धा श्रीमद्‌भगवद्‌गीतेने समत्वच सांगितलेले आहे. म्हणून मी या ध्यानपद्धतीला संतुलन ॐ मेडिटेशन (डरर्पीींश्ररप जच चशवळींरींरींळेप -डजच) असे नाव दिलेले आहे. या ध्यानपद्धतीला "सोम' ध्यानपद्धती असे नाव देण्याचे अजून एक कारण आहे. आपला मेंदू आपल्या शरीरावर सत्ता चालवतो, तोच सर्व रोग उत्पन्न करतो वा हटवतो. या सर्व क्रिया मेंदूत असलेल्या द्रवपदार्थाच्या (लशीशलीे ीळिपरश्र षर्श्रीळव) साहाय्याने होत असतात. रसगुल्ला जसा साखरेच्या पाकात तरंगत असतो, तसा मेंदू या द्रवपदार्थात ठेवलेला असतो. या मऊ रसगुल्ल्याचा जर कडक बटाटा झाला, तर आपण म्हणतो की तुझ्या डोक्‍यात बटाटे ठेवले आहेत का? जेव्हा मेंदूचे काम अजिबात होत नाही, तेव्हा मेंदूरूपी रसगुल्ल्याचा रसाळपणा संपलेला असतो व त्याची सच्छिद्रताही संपलेली असते, ज्यामुळे तो बटाट्यासारखा होतो. या मेंदूतल्या द्रवाला आपल्या शास्त्रात सोमरस म्हटलेले आहे. आपल्या वेदांत म्हटलेले आहे, की देवांचा राजा इंद्र याचा अधिकार सोमरसावर असतो. इंद्र म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून मेंदूने शरीर चालवायच्या संकल्पनेला (प्रोग्रामला) इंद्र म्हटलेले आहे. मेंदूतल्या वेगवेगळ्या सर्व शक्‍तिकेंद्रांना म्हणजे देवतांना सोमरसाची आवश्‍यकता असते. देव सोमरस पितात, असा संदर्भ पाहून अनेक लोक असा निष्कर्ष काढतात, की देव सोमरस पितात मग आपण भांग, दारू असे मद्यपान का करू नये? या मेंदूतल्या सोमरसावर आपल्याला प्राण आकर्षित करता आला, तर तो प्राण सर्व शरीरभर पसरवणे खूप सोपे होते. या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. भगवान श्रीकृष्णांनी "सोम' ध्यानपद्धती या दोन श्‍लोकांत समजावलेली आहे,

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणम्‌ आस्थितो योगधारणाम्‌ ।।८-१२।।
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्‌ माम्‌ अनुस्मरन्‌ ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्‌ ।।८-१३।।
(क्रमशः)

Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad