Saturday, January 2, 2010

प्रताप बत्तिशीचा

एकवेळ स्नान न करता मूल घराबाहेर गेले तरी हरकत नसते, पण उठल्यावर लगेच चूळ भरून, दात घासण्याची सवय लावायलाच हवी. तसेच रात्री झोपण्यापूर्वी दात घासून, चुळा भरण्याची काळजी घेणे आवश्‍यक असते.

आमच्या घरात एक उदाहरण आहे, याला आश्‍चर्य म्हणावे का हे कळत नाही. माझे वडील 100 वर्षे जगले व शेवटपर्यंत त्यांचे आरोग्य उत्तम होते. त्यांच्या वयाच्या 92-93 च्या सुमारास त्यांचे काही दात शिल्लक होते. वयाच्या 93व्या वर्षी त्यांचा आहार खूपच कमी झालेला होता. ते जवळजवळ दुधावरच होते. ते प्रवचन वगैरे करत असत. बोलायला सोपे व्हावे या दृष्टीने त्यांना कवळी करून घेतली. पण दीड-दोन वर्षांतच त्यांना कवळी बसेना. दातांच्या डॉक्‍टरांकडे तक्रार नेली असता तपासणीनंतर डॉक्‍टरांना आश्‍चर्याचा मोठा धक्काच बसला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या वयात मूळ दातांच्या ठिकाणी लहानपणी येतात तशा दातांच्या कण्या वर आल्यामुळे त्यांना कवळी बसत नव्हती. याचे कारण त्यांची हाडे अत्यंत मजबूत होती.

"धृ' म्हणजे "धारण करणे' या संस्कृतच्या क्रियापदावरून "धातू' हा शब्द तयार झालेला आहे. मातीचा लगदा करून त्याची मूर्ती बनविली जाते. मूर्ती बनविताना त्यात आत सळई ठेवलेली असते, ज्याच्या जोरावर मूर्ती उभी राहते. त्याचप्रमाणे आपले शरीर उभे राहण्यासाठी आतील सांगाडा मजबूत असणे आवश्‍यक असते. तो सांगाडा म्हणजे अस्थिधातू. थोडक्‍यात अस्थी म्हणजे हाडे. आपल्या शरीरात सात धातू असतात. अन्न खाल्ले की त्यापासून रसधातू निर्माण होतो, रसापासून रक्‍तधातू, रक्‍तापासून मांसधातू, नंतर मेद, अस्थी, मज्जा व शुक्र असे क्रमाक्रमाने धातू आपल्या शरीरात तयार होतात.

धातूच्या बरोबरीने उपधातू असतात. दात व नखे हे अस्थिधातूचे उपधातू आहेत आणि केस हा अस्थिधातूचा मल आहे. म्हणजे यांना हाड म्हणता येणार नाही, पण ते हाडांबरोबर तयार झालेले असतात. दातावर एक चमक असते, एक आवरण असते. आपण दाताला मोत्यांची उपमा देतो ती अत्यंत सार्थ आहे. मोती आतून ठिसूळ असतो, पण त्यावरची चकाकी कठीण असते.

दात हे हाडांचे उपधातू असल्याने ते मजबूत असतात व त्यांच्यावर आणखी कडक आवरण असते. ह्या आवरणामुळे दातांचे कार्य होत असताना ते झिजत नाहीत. दाताला काही चिकटून राहू नये, दाताला इजा पोचू नये यासाठी या आवरणाचा उपयोग होतो. नखेही खूप कडक असतात, ती सहजासहजी कशात विरघळत नाहीत. नखे खाण्याची सवय असलेल्यांच्या पोटात, प्लीहेत वगैरे कुठेतरी नखांची कडक गाठ होऊन राहते, ज्यापासून अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात.

आपण घेतलेल्या श्‍वासाबरोबर ओढला जातो प्राणवायू (ऑक्‍सिजन). याच प्राणवायूबरोबर "प्राण' आत घेऊन रक्‍तात मिसळला जातो. दुसरी लागते शक्‍ती. ही शक्‍ती मिळते अन्नापासून आलेल्या वीर्यशक्‍तीपासून. रक्‍त व वीर्यशक्‍ती या दोन गोष्टी सतत तयार होत राहाव्यात व शरीराचे आरोग्य नीट राहावे, शरीरातील सर्व इंद्रिये व्यवस्थितपणे काम करत राहावीत यासाठी आवश्‍यक असतो वीर्यधातू. अन्नाचे रूपांतर होत होत शुक्र तयार झाले नाही तर शरीराला शक्‍ती मिळणार नाही. हळूहळू ही प्रक्रिया कमी वेगात होते म्हणून म्हातारपण येते. याचाच परिणाम म्हणून म्हातारपणी शरीरातील हाडे ठिसूळ होणे (ऑस्टिओपोरोसिस), हाडात ताकद नसणे वगैरे समस्या दिसू लागतात. दात हा अस्थिधातूचा उपधातू असल्याने अर्थातच म्हातारपणात दातही कमकुवत व्हायला सुरवात होते. सध्या कमी वयातच दात पडणे, दाताच्या समस्या सध्या अधिक प्रमाणात दिसतात त्याचप्रमाणे सध्या हाडे ठिसूळ होण्याची समस्याही दिसते.

अलीकडे बहुधा सर्वजण ब्रश वापरतात, पण कुणीही ब्रशला टोपण लावून ठेवलेले दिसत नाही. मोठी माणसे निदान एका उंच पेल्यात वगैरे ब्रश उभा ठेवतात, पण लहान मुले मात्र बेसिनवरच कुठेतरी ब्रश टाकतात. अशा ब्रशमधून किती जीवाणू, किटाणू आत प्रवेश करत असतील कोण जाणे? शिवाय किती जण ब्रश वेळेवरबदलतात हा एक संशोधनाचा विषय आहे. लहान मुलांना बोटाने दात घासण्याची सवय लावली तर दात व्यवस्थित घासले जातात, दाताला वा हिरडीला इजा होण्याची शक्‍यता उरत नाही. अलीकडे मुले गोळ्या, चॉकलेट, जंक फूड वगैरे गोष्टी मोठ्या प्रमाणावर खाताना दिसतात. जंक फूडमध्ये तेल, चीज वगैरे चिकट गोष्टी मोठ्या प्रमाणावर असल्याने त्या गोष्टी दातावर अधिक प्रमाणात चिकटून राहण्याची शक्‍यता असते. त्यामुळे काहीही खाल्ल्यावर लगेच चूळ भरण्याची सवय मुलांना लावायला पाहिजे. किडलेल्या दातांनी नीट चावता येत नाही हे तर आहेच, पण किडलेला दात खालच्या हिरडीला इजा करू शकतो, दाताच्या मुळाला इजा करू शकतो.

दुधाचे दात अशा प्रकारे किडलेले असले तर पुढे येणारे दात कसे काय चांगले येतील? त्यामुळे लहान मुलांच्या दुधाच्या दातांकडे दुर्लक्ष करून अजिबात चालत नाही. एक वेळ स्नान न करता मूल घराबाहेर गेले तरी हरकत नसते, पण उठल्यावर लगेच चूळ भरून, दात घासण्याची सवय लावायलाच हवी. तसेच रात्री झोपण्यापूर्वी दात घासून, चुळा भरण्याची काळजी घेणे आवश्‍यक असते. एक वर्षाच्या मुलाला चूळ भरता येत नाही अशा वेळी इतक्‍या लहान मुलाला काही खायला दिल्यानंतर निदान तीन -चार घोट सावकाशपणे पाणी द्यावे म्हणजे खाल्लेल्या पदार्थाचे कण तोंडात राहणार नाहीत. अगदी लहान मुलापासून ते म्हातारपणापर्यंत खाल्ल्यावर खळखळून चुळा भरणे व दिवसातून दोन वेळा दात घासणे अतिशय आवश्‍यक असते. पूर्वीच्या काळी बाभळीचे दातून वगैरे वापरले जात असत. असे दातून अलीकडे परदेशात मिळू लागले आहेत.

सर्वप्रथम हे लक्षात ठेवावे की मातेचे दूध बंद झाल्यावर व वरचा आहार सुरू झाल्यावर अनेक मुले दूध पिणेच बंद करून टाकतात. "दूध त्याला पचत नाही, दूध दिले की तो उलटी करतो, कफप्रकृती असल्याने त्याला दूध देणे योग्य नाही, मूल जरा जाड आहे' अशा अनेक कारणांवरून त्याचे दूध बंद केले जाते. अशा वेळी दातांसाठी आपण काय काळजी घेत आहोत याकडे लक्ष ठेवणे, आहारातून अस्थिधातू बळकट होण्यासाठी त्यांना आवश्‍यक ती द्रव्ये मिळत आहेत याकडे लक्ष ठेवणे, दूध देणे व त्याला कॅल्शियमची पूर्ती नीट होईल इकडे लक्ष देणे अतिशय आवश्‍यक असते. बाहेरून रासायनिक कॅल्शियमची पूर्ती करताना अनेकदा असे दिसते, की त्यामुळे उष्णता वाढल्याने शौचाला खडा होते. त्या दृष्टीने मौक्‍तिक, प्रवाळ वगैंरेंद्वारे मुलाला कॅल्शियमची पूर्ती करण्याचा प्रयत्न करावा. अशा नैसर्गिक द्रव्यांमार्फत कॅल्शियम दिल्यास शरीराला कॅल्शियम मिळते पण ते उष्ण पडत नाही, नैसर्गिक असल्याने शरीरात लवकर सात्म्य होते. दात खराब झाल्यास दातांचे विकार व दातांच्या विकारांमुळे झालेले इतर विकार अशा दोन प्रकारच्या विकारांना सामोरे जायची वेळ येते.

दात किडणे, दात पिवळे पडणे वा श्‍वासाची दुर्गंधी हे झाले सामान्य विकार. बऱ्याच लोकांना फार आंबट खायची सवय असते. सारखे चिंच, आवळे यासारखे आंबट पदार्थ खाण्यामुळे त्यात असलेल्या अम्ल द्रव्यात दाताचे बाहेरचे आवरण विरघळते. मद्य टाकून टोमॅटोचा रस पिणारे लोक असतात. हेही दातांसाठी चांगले नाही. आंबट फळांचे रसही दातासाठी चांगले नाहीत. फार गोड खाणेही दाताच्या आरोग्यासाठी चांगले नाही. गोड खाल्ल्यावर तर निश्‍चितपणे दात घासावेत. अति प्रमाणात खारट पदार्थांच्या सेवनाने दाताला त्रास होतो.

असे दाताचे आवरण झिजवणारे पदार्थ अधिक काळ सेवन करण्याने दातावरचे आवरण झिजते, त्यामुळे गरम वा गार पदार्थ खाल्ल्याने दाताला कळा येतात. या त्रासांना रोग म्हटले नाही तरी हे त्रास आहेत हे खरेच. दाताचे आवरण गेल्याने दात लवकर किडू शकतात, हलू शकतात. मधुमेही व्यक्‍तींच्या सर्व धातूंचा ऱ्हास होत असल्याने त्यांच्या हिरड्याही लवकर खराब होतात. मधुमेही लोकांच्या शरीरात गेलेली साखर पचली नाही की रक्‍तात साठते.

इन्सुलिन वगैरे घेऊन रक्‍तातील साखर नियंत्रणात ठेवली तरी धातूंचा ऱ्हास झाल्याने शरीर कमकुवत होते, पर्यायाने त्यांच्या हिरड्या खराब होतात. हे सर्व दाताचे क्षुद्र रोगच आहेत. दातात जरा काही अडकले की काहीतरी टोकदार वस्तू घेऊन दात कुरतडत बसण्याची सवय अनेकांना असते. त्याने हिरडीला जखम होते. हिरड्यांमध्ये असलेले इन्फेक्‍शन फुफ्फुसात जाऊ शकते. दात किडणे, पायोरिया, किडलेल्या दातात अडकलेले अन्न सडल्यामुळे श्‍वासाला वास येणे असेही त्रास संभवतात.

दाताचा आजार सर्वात वाईट असतो. दात एकदा दुखायला लागला की ते दुखणे अनेकदा असह्य असते. दोन थेंब लवंगाचे तेल, थोडासा कापूर वा चिमूटभर "योगदंती दंतमंजन' दुखणाऱ्या दाताखाली धरले तर दुखणे कमी होते. रात्री, बेरात्री दात दुखायला लागला तर वरील उपायांनी दुखणे कमी होऊ शकते. दात दुखण्यामागचे मूळ कारण असते किडलेला दात. कीड खाली खाली पसरते, त्यामुळे दात पोकळ होत जातो.

त्यात अन्नकण साठतात व ते सडतात, त्याचे इन्फेक्‍शन दाताच्या मुळाला होते व दुखणे सुरू होते. दात थोडासाच किडलेला असला तर तो साफ करून त्यात फिलिंग (दाताच्या पोकळीत भरलेले द्रव्य) भरून घेता येते. दातात सोने भरण्याची परंपरा फार प्राचीन व सर्व जगभर होती. पूर्वी सोने भरत असत, मध्यंतरी काही सिंथेटिक मटेरियल भरायची पद्धत सुरू झाली. अलीकडे परत सोने भरण्याकडे कल वाढतो आहे असे ऐकले आहे. सिंथेटिक फिलिंगमुळे मनुष्याचे विचार बदलतात, त्याच्या बायो एनर्जीमध्ये फरक पडतो अशा चर्चा परदेशात झालेल्या आढळतात. एकूण आपले आरोग्य दातांवर अवलंबून असल्यामुळे सकाळी उठल्याबरोबर पहिला मान दाताला मिळतो व चूळ भरून दंतधावन क्रियेने दिवसाची सुरवात होते.

- डॉ. श्री बालाजी तांबे Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad