Sunday, January 3, 2010

अन्नयोग : फळे

भारत देश भौगोलिकदृष्ट्या विविधतेने संपन्न असल्याने फळांच्या उपलब्धतेच्या दृष्टीनेही संपन्न आहे. दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत अनेक प्रकारची फळे तयार होतात.

* नासपती
उत्तर भारतात येणारे एक फळ असते ते म्हणजे नासपती. आयुर्वेदात यालाच अमृतफळ असे म्हटले आहे. यालाच इंग्रजीमधे पेअर असे म्हणतात.
अमृतस्य फलं धातुवर्धकं मधुरं गुरु ।
रुच्यं चाम्लं वातहरं त्रिदोषस्य च शामकम्‌ ।।
...निघण्टु रत्नाकर

* रस - मधुर, आंबट
* गुण - गुरु म्हणजे पचण्यास जड
* वीर्य - शीत
* दोष - त्रिदोषशामक विशेषतः वातशामक
नासपती फळ सप्तधातूंचे पोषण करते, चवीला अतिशय रुचकर असते व एकंदरीत सर्व दृष्टीने शामक, पथ्यकर असते. नासपती अतिशय रसरशीत असते, मनाला तृप्ती देणारे असते व ताकदही वाढवते.

* पेरू
पेरू सर्वांच्या परिचयाचा असतो पण आयुर्वेदाच्या अनेक ग्रंथात पेरूचा उल्लेख सापडत नाही. पेरूलाही निघण्टु रत्नाकरात अमृतफळ म्हणूनच संबोधलेले आहे. पेरूला संस्कृतमधे बहुबीज, हिंदीमधे अमरूद व इंग्रजीमधे ग्वावा असे म्हणतात.
ततो।मृतफलं स्वादु तुवरं चातिशीतलम्‌ ।गुरु तीक्ष्णं कफकरं वातलोन्मादनाशकम्‌ ।।......निघण्टु रत्नाकर

* रस - मधुर, तुरट
* गुण - गुरु म्हणजे पचण्यास जड, तीक्ष्ण
* वीर्य - अतिशय थंड
* दोष - कफदोषवर्धक, वातवर्धक
पेरू अतिशय थंड असल्याने व पडण्यास जड असल्याने कफकारक असतो. कफ होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी म्हणजे वारंवार सर्दी, खोकला होत असल्यास, मधुमेह असल्यास पेरू जपून खाणे चांगले.

* फालसा
ही फळेही उत्तर भारतात अधिक प्रमाणात होतात. आयुर्वेदात याचा औषध म्हणूनही अनेक ठिकाणी उल्लेख केलेला आढळतो. संस्कृतमधे परूषक, हिंदी-गुजराथीमध्ये फालसा असे म्हणतात.

स्वादु रुच्यं तर्पणं च शीतं मलविब्धकृत्‌ ।
हृद्यं धातुकरं चाम्लं वातपित्ततृषापहम्‌ ।।
रक्‍तरुग्‌-दाह-शोफांश्‍च पित्तजूर्तिक्षतक्षयान्‌ ।।...निघण्टु रत्नाकर
* रस - मधुर, आंबट
* वीर्य - शीत
* विपाक - मधुर
* दोष - वात-पित्तशामक

फालशाची फळे रुचकर असतात, शरीराची तृप्ती करतात, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात, हृदयास पोषक असतात, धातूंचे पोषण करतात. तहान शमवतात, रक्‍तदोष, दाह, सूज, पित्तामुळे येणारा ताप, क्षय वगैरे रोगांमध्ये अतिशय उपयोगी असतात. फालशाची पिकलेली फळे खडीसाखरेबरोबर खाण्याने दाह शांत होतो. फालशाच्या फळांचे सरबत करण्याचीही पद्धत आहे. उन्हाळ्यात फालशाचे सरबत घेण्याने उन्हामुळे होणारी तगमग शांत होते व पित्त वाढत नाही.


* तुती
महाबळेश्‍वरला होणाऱ्या तुती प्रसिद्ध होत. तुतीची झाडे इतरत्रही होतात, पण महाबळेश्‍वरच्या तुती अतिशय स्वादिष्ट असतात. मराठी हिंदीत तुती नावाने प्रसिद्ध, गुजरातमध्ये शेतूर नावाने ओळखल्या जातात.
गुरुणि पक्वतौतानि शीतानि मधुराणि च ।
ग्राहकाणि रक्‍तदोषवातपित्तहराणि च ।।...निघण्टु रत्नाकर

* रस - मधुर
* गुण - गुरु म्हणजे पचण्यास जड
* वीर्य - शीत
* दोष - वात-पित्तशामक
पिकलेली तुती रक्‍तदोषात हितकर असतात मात्र कच्ची तुती चवीला आंबट असतात व वीर्यानेही उष्ण असतात. त्यामुळे पिकलेल्या गोड तुती खाणेच चांगले असते.
* ऊस

वास्तविक पाहता ऊस हे फळ नाही, तर एक प्रकारच्या गवताचे खोड आहे. उसाचा रस प्रसिद्ध आहे व ऊस फळाप्रमाणे नुसता खाण्याचीही पद्धत आहे. संस्कृतमध्ये इक्षु, इंग्रजीत शुगर केन नावाने ओळखला जातो.
स्निग्धो गुरुर्मूत्रलश्‍च शीतो वृष्यो बलप्रदः ।
कफपुष्टितृप्तिकृमिकान्त्यानन्दकरः सरः ।।
रक्‍तरुग्‌वातपित्तानां नाशनो मुनिभिः स्मृतः ।
...निघण्टु रत्नाकर

* रस - मधुर
* गुण - स्निग्ध, गुरु म्हणजे पचण्यास जड
* वीर्य - शीत
* विपाक - मधुर
* दोष - वात-पित्तशामक, कफवर्धक

ऊस लघवी साफ होण्यास मदत करतो. शुक्रास हितकर असतो, ताकद वाढवतो. शरीराला पुष्टी देतो, शरीर-मनाला तृप्ती देतो. कांती सुधारतो, मलप्रवृत्तीस मदत करतो, रक्‍तदोष दूर करतो. लघवी साफ होण्यासाठी तसेच लघवी होताना जळजळ होत असल्यास ऊस खाणे चांगले असते. उसाचे फायदे मिळण्यासाठी ऊस दातांनी चावून खाणे अपेक्षित असते. उसाचा रस, विशेषतः चरकातून काढलेला रस जड होतो, शिवाय शुद्धतेच्या, स्वच्छतेच्या दृष्टीनेही योग्य नसतो. उसाचा शिळा रस तर कफ-वात वाढविणारा व शरीर जड करणारा असतो. त्यामुळे ऊस नुसता चावून खाणेच उत्तम असते. रस काढायचा झाला तर तो घरी स्वच्छतेची काळजी घेऊन काढणे चांगले होय. ऊस जेवणापूर्वी खाणे चांगले असते. जेवणामध्ये ऊस खाण्याने जडता येऊ शकते आणि जेवणानंतर ऊस खाण्याने वात वाढू शकतो.

- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405 Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad