Monday, December 14, 2009

सुगंध सोन्याचा


चांगले विचार करत असताना वा चांगल्या विचारांच्या सान्निध्यात असलेले पाणी पिण्याने समाधान मिळते व आरोग्यही मिळते. म्हणूनच जगभर सर्व धर्मांनी चर्च, मंदिरे वगैरे शक्‍तिस्रोत असलेल्या स्थानांच्या ठिकाणी पाणी "तीर्थ' वा "होली वॉटर'च्या स्वरूपात स्वीकारल्याचे दिसते."ह्या ला जीवन ऐसे नाव' हा वाक्‍प्रयोग पाण्याच्या बाबतीत अगदी सार्थ आहे. पाण्यामुळेच आपले सर्वांचे जीवन चालू असते. जसे जसे एकूणच पृथ्वीच्या पाठीवर पाणी कमी होऊ लागले, तसे तसे लोकांच्या तोंडचे पाळी पळाले व डोळ्यातून पाणी यायची वेळ आली. पाण्याशिवाय जगताच येणार नाही. नदीशेजारी वा पाण्याचा मुबलक साठा असलेल्या ठिकाणीच गावे वसलेली दिसतात. ज्यांच्या प्रदेशात पाणी भरपूर असते तेथे सुबत्ता असते, तेथील जीवन सुखकर असते. खडकाळ भागात, वाळवंटात कोस न्‌ कोस लांब जाऊन पाणी आणावे लागते, त्या ठिकाणी मनुष्यवस्ती तुरळक असल्याचे दिसते. पाण्याशिवाय जगताच येणार नाही. पाणी म्हणजे सर्व प्राणिमात्रांसाठी परमेश्‍वराचा असलेला ओलावा आहे. प्रेमाचा ओलावा नसला तर जीवन चालणार नाही, तसेच पाणी नसले तरीही जीवन चालणार नाही.

पावसाचे पाणी जमिनीत जिरते, पृथ्वीच्या पोटात पाण्याचा अमर्याद साठा आहे, अशा समजुतीतून मनुष्याने पाण्याचे स्रोत खूप कमी केले. जमिनीच्या खाली असलेले पाणी खोल खोल जाऊ लागले, जमिनीवर असलेले पाणी प्रदूषित केले गेले. एकूणच माणसाची हाव वाढल्यामुळे त्याच्या सर्व अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी लागणारी शक्‍ती शेवटी काम झाल्यावर उष्णतेत परिवर्तित झाल्यामुळे एकूण पृथ्वीचे तापमान वाढले व त्यामुळेही पृथ्वीवरचे पाणी कमी झाले.

पाण्याची गंमत अशी, की ते उताराकडे वाहते. देव स्वर्गात सर्वात वर व प्राणिमात्र पृथ्वीवर खाली असल्यामुळे देवाच्या मायेचा ओलावा व प्रेम वरून खाली येण्याची सवय घेऊन डोंगरावरचे पाणी वरून खाली उताराकडे व शेवटी समुद्राकडे वाहत जाते. पण समुद्र आहे खारट, तेव्हा उष्णतेने वितळलेला डोंगरावरील बर्फ माणसाला प्यायचे पाणी न देता समुद्रात भर टाकतो.

पाण्यात हायड्रोजन व ऑक्‍सिजन असे दोन भाग असल्याने प्राणवायूच्या माध्यमातून "प्राण' (जीवनशक्‍ती) राहत असल्यामुळे पाणी जसजसे शिळे होत जाईल तसतसे त्यातले जीवन कमी होते, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ते पचायला कठीण कठीण होत जाते. नदीचे वाहते पाणी पचायला अतिउत्तम असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. साठवलेले पाणी, त्यातल्या त्यात अंधारात असलेल्या टाकीत साठवलेले पाणी पचायला जड असते असे म्हणतात. अशा पाण्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी अग्निसंस्कार करणे आवश्‍यक असते. पाणी उकळवल्याने ते पुन्हा जिवंत होते, पचायला हलके होते, हे नक्की.

लग्नात सालंकृत कन्यादान करावे अशी एक परंपरा आहे. वधू सुवर्णालंकाराने नटून आली तरी ते दागिने तिच्या अंगावर चिकटवलेले नसतात. ते काढूनच ठेवायचे असतात. पण त्या दागिन्यांचा संस्कार झाला तर स्त्रीमध्ये एक वेगळी शालीनता दिसून येते. अर्थात हेही खरे आहे, की हलके हलके लोभी माणसांचे लक्ष वर घातलेल्या सोन्यावर राहिले व वधूच्या अंगावरील सोने आपल्याकडे ठेवून स्त्रीला घालवून द्यायची कल्पनाही काही नतद्रष्टांच्या डोक्‍यात आली.

सुवर्ण हा अत्यंत मौल्यवान असा राजधातू. सुवर्ण शरीरात पचत नाही; पण सुवर्णाचा नुसता संपर्क आला, तरी ते वेगळ्या प्रकारची शक्‍ती आकर्षित करून वस्तूची ताकद वाढवते. जसे राजाशी ओळख असणाऱ्या माणसांना समाजात एक वेगळाच मान मिळतो, त्याप्रमाणे हा एक संस्कार आहे. सोन्याशी संपर्क आला, की शरीरात, पाण्यात व हवेत आमूलाग्र बदल होत असावा.

सोन्यावर पडलेल्या प्रकाशकिरणांचे योग्य संयोजन केले तर विद्युतशक्‍ती तयार होऊ शकते; विशिष्ट प्रकारचे जंतू सोन्याच्या संस्काराने मरतात वा दूर राहतात. म्हणून पिण्यासाठी पाणी उकळवत असताना त्यात सोने टाकले तर पाण्यावर सुवर्णाचा संस्कार होतो व तयार झालेले सुवर्णसिद्ध जल मनुष्याला जीवन प्रदान करते, निरामय आयुष्य प्राप्त करून देते, रोग दूर करते. पाण्याचा काढा- म्हणजे पाणी एक अष्टमांश होईपर्यंत उकळवणे- पिण्यासाठी वापरला तर रोगपरिहार होतो, शरीर सुंदर व कांतिमान होते, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. पाण्याचा काढा करत असताना त्यावर सुवर्णसंस्कार केला तर दुधात केशर, सोन्याला सुगंध किंवा पाण्यात प्राणशक्‍ती.

साधारण दहा लिटर पाण्यात साधारण दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचा पत्रा टाकून पाणी साधारण 20 मिनिटे उकळले तर सुवर्णसिद्ध जल तयार होते. एक अष्टमांश होईपर्यंत उकळवून पाण्याचा काढा करण्याची योजना असली तर मात्र पाणी बराच वेळ अग्नीवर उकळावे लागते. पाणी कुठलेही असो, कुठल्याही फिल्टरमधून काढलेले असले, अगदी बाटलीबंद असले, डोंगरातून आलेल्या झऱ्याचे असले वा गंगेचे असले तरी ते पिण्याअगोदर उकळवून घेणेच योग्य असते. उकळलेले पाणी नेहमी प्राशन केल्याने, त्यातल्या त्यात वर्षा व शिशिर ऋतूत गरम उकळलेले पाणी प्राशन केल्याने, रोगाला प्रतिबंध होऊन मनुष्याला आरोग्याचा वा धष्टपुष्ट शरीर व सुंदर कांतीचा लाभ व्हायला मदत होते. चर्चच्या घुमटावरचा वा मंदिराच्या घुमटावरचा सोन्याचा पत्रा उगीचच लावला जात नसे. बॅंकॉकसारख्या ठिकाणी बुद्धमंदिरात देवाच्या अंगावर सुवर्णवर्ख चिकटवण्याची पद्धतही उगीच आलेली नसावी. आधुनिक शास्त्रानुसार यावर प्रयोग करून पाहायला काही हरकत नाही. सुवर्णाच्या वा चांदीच्या भांड्यात पाणी ठेवले असता त्यात वेगळ्या प्रकारची शक्‍ती येते का, तसेच त्यात बॅक्‍टेरिया, व्हायरस वगैरेंची वाढ रोखली जाऊ शकते का, याबद्दलही संशोधन करणे गरजेचे आहे. आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये उकळलेल्या पाण्याची, सुवर्णसिद्ध जलाची महती खूप सांगितलेली आहे.

आधुनिक संशोधनातून सिद्ध झालेले आहे, की स्पर्शाचा व मानसिक विचारांचा पाण्यावर परिणाम होतो. पाणी उकळवून घेतल्यावर ते अधिक जिवंत होते, त्यावर असलेले वाईट संस्कार निघून जातात. चांगले विचार करत असताना वा चांगल्या विचारांच्या सान्निध्यात असलेले पाणी पिण्याने समाधान मिळते व आरोग्यही मिळते. म्हणूनच जगभर सर्व धर्मांनी चर्च, मंदिरे वगैरे शक्‍तिस्रोत असलेल्या स्थानांच्या ठिकाणी पाणी "तीर्थ' वा "होली वॉटर'च्या स्वरूपात स्वीकारल्याचे दिसते. पाण्याचा तीर्थ म्हणून स्वीकार करणे, एखाद्या वस्तूवर पाणी सोडणे म्हणजे त्या वस्तूबद्दलच्या आपल्या आशा सोडून देणे, शाप देण्यासाठी पाणी वापरणे हे सर्व पूर्वीच्या ऋषिमुनींनी कसे शोधून काढले, हे मोठे कोडे आहे. पाण्यावर वस्तूंचा व विचारांचा संस्कार होतो हे नक्की आहे व त्याचा परिणाम आपल्याला बघता येतो.

म्हणून उकळून सुवर्णसिद्ध केलेले जल वापरून प्रत्येकाने आपले आयुष्य आरोग्यवान करायला हरकत नसावी. पाणी उकळताना त्यात सोने टाकले असता त्याचा पाण्यावर संस्कार होतो, पण सोने कमी मात्र होत नाही, ही यातली गंमत आहे. कुठले तरी व अशुद्ध पाणी प्राशन केल्याने जर रोग झाले तर होणाऱ्या खर्चाचा तुलनेत पाणी उकळण्यासाठी झालेला खर्च क्षुल्लक असतो.

डॉ. श्री बालाजी तांबे
--

Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad