Thursday, December 10, 2009

आयुर्वेदिक रसग्रहण

जीवन जगण्यात माणसाला रस असतो, तोपर्यंतच त्याला जीवनरस मिळत राहतो. जीवनरस संपला तर झाडेही काष्ठवत होतात. तसेच जीवनरस संपला तर शरीराचे लाकूड व्हायला वेळ लागत नाही. मनुष्य किती वर्षे जगला यापेक्षा तो रसयुक्‍त काळ किती जगला, हे महत्त्वाचे असते.

""मला यात स्वारस्य नाही, मला त्यात स्वारस्य नाही, मला गाण्यात रस नाही, मला सर्कसमध्ये रस नाही, मला जीवन जगण्यातच रस उरलेला नाही,'' अशा तऱ्हेची विधाने ऐकली, की हसावे की रडावे तेच कळत नाही. एवढे काय झाले, की माणसे जगायला घाबरतात व जीवनापासून दूर पळून जातात. जोपर्यंत जीवन जगण्यात माणसाला रस असतो, तोपर्यंतच त्याला जीवनरस मिळत राहतो. जीवनरस संपला तर झाडेही काष्ठवत होतात. तसेच जीवनरस संपला, तर शरीराचे लाकूड व्हायला वेळ लागत नाही. पाण्याला जीवन का म्हणतात, कारण अगदी सहज उपलब्ध असलेला व जीवनाला प्रारंभ करून देणारा जीवनरस म्हणजे पाणी.

शरीरातील ओटीपोटाच्या ठिकाणी असलेल्या स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी जलतत्त्वाचा वास असतो. जलतत्त्व म्हणजे केवळ पाणी नव्हे. जे काही प्रवाही असेल त्याला जलतत्त्व म्हणायला हरकत नाही. या जीवनमहासागरात पोहण्यासाठी, तरून जाण्यासाठी जो मदत करतो, जो काळामध्ये माणसाला प्रवास करण्यासाठी मदत करतो तो असतो जीवनरस. जे प्रवाही असते त्याचा काही आकार असतो का? पाण्याला रंग, रूप, आकार नसतो. जे काही पाण्यात मिसळेल त्याचा रंग पाण्याला येतो. शरीरातील पाण्याचे तसे नसते. उलट त्यात शरीरास रंग-रूप देण्याची ताकद असते. एखाद्याला "पाणी दाखवून देणे' वा "पाणी पाजणे' असे उगाच म्हणत नाहीत. शरीरातील प्रवाही द्रव निघून गेले, तर मात्र कुठलाच आकार उरत नाही व असे झाले तर सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळते. चेहऱ्याचा रंग फिका पडतो.

"अयन' म्हणजे काळ. तेव्हा काळाबरोबर झुंज देण्यासाठी शरीरात जीवनरस वाढविणारे ते "रसायन'. आयुर्वेदात या रसायनाचे माहात्म्य सांगितलेले आहे. कायाकल्प करण्यासाठी आवश्‍यक असलेली शरीरशुद्धी पंचकर्माद्वारे झाली तरी सर्व पेशींना, धातूंना व इंद्रियांना पुष्टी देऊन त्यांना तारुण्य मिळवून देणारी असतात रसायने. विशिष्ट रसायनाचे सेवन केले नाही तर कायाकल्पाचा विधी अर्धवट झाला असेच म्हणावे लागेल. पंचकर्म झाल्यानंतर रसायनसेवन करावे असे सर्वसामान्यतः म्हटले जाते. रसायनसेवन करून अमरत्व प्राप्त व्हावे, म्हणजेच काळाबरोबर झुंज देत पुढे जाता यावे, यासाठी रसायन दिले जाते. शरीराचे पुनर्जीवन करण्यासाठी रसायनसेवन मुख्य असते व ते रसायन पचण्यासाठी शरीरशुद्धी करणे आवश्‍यक असते. यासाठी पंचकर्म केले जाते. शरीराची शुद्धी झालेली नसली, तर अमृतासमान रसायनांचे केलेले सेवन वाया जाऊ शकते. अर्थात या पंचकर्मात आहारविहारावर नियंत्रण; शरीरासाठी स्नेहन (मसाज वगैरे), आंतर्स्नेहन (तूप पिणे), स्वेदन, विरेचन, वमन, बस्ती वगैरे करणे; मनासाठी व शरीरातील हॉर्मोनल संस्थेसाठी व अग्नी संतुलित होण्यासाठी योगासने व प्राणायाम आणि जिवाची शुद्धी होण्यासाठी स्वास्थ्यसंगीत व ध्यान करणे या सर्व गोष्टी मोडतात. असे पंचकर्म झाल्यावर रसायनसेवन करण्यात येते.

अगदी सोप्यात सोपे रसायन म्हणून सुंठीचा व हिरड्याचा प्रयोग सांगितलेला आहे. अगदी सोपे व सर्वांना उपलब्ध असणारे रसायन आहे च्यवनप्राश. च्यवनप्राशचे आयुर्वेदातील नाव आहे च्यवनप्राशावलेह. च्यवनप्राश तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेली आहे. त्या पाठाप्रमाणे तयार केलेला अवलेह रसायन म्हणून काम करतो. च्यवनप्राशात सुवर्णवर्ख, चांदीचा वर्ख वगैरे द्रव्ये मिसळली, तर दुधात साखर असा योग होऊ शकतो.

परंतु मुळात अवलेहच योग्य पद्धतीने न बनवता काही द्रव्ये एकत्र करून नुसते मिश्रण बनवले व त्याची सुवर्णयुक्‍त, केशरयुक्‍त अशी जाहिरात केली, तर त्याचा रसायनासारखा उपयोग होणार नाही. जी द्रव्ये शरीरात गेल्यावर वयःस्थापन करतात, म्हणजे शरीराची झीज कमी करतात, शरीराला म्हातारपणाकडे जाऊ देत नाहीत, ताकद-वीर्य-शौर्य वाढवतात, धी-बुद्धी-मेधा यांची वृद्धी करतात व आयुष्य उत्तम तऱ्हेने जगायला मदत करतात ती रसायने.

खरे तर काळाची दोन परिमाणे समजून घेणे आवश्‍यक असते. एक म्हणजे रस नसलेला काळ व दुसरा रस असलेला काळ. एखादे संगीत, नाटक वा चित्रपट पाहण्यासाठी तीन तास दिले, पण त्यात काही रस वाटला नाही तर तीन तासांचा रसहीन काळ आपल्या वाटेला आला असे म्हणावे लागेल. या तीन तासात संगीत, नाटक वा चित्रपटाचा पूर्ण रसास्वाद घेता आला, तर ह्या तीन तासांच्या काळाला रसयुक्‍त काळ म्हणता येईल. दोन्ही उदाहरणांत आपण तिकिटाचे मूल्य सारखेच मोजलेले असते, आत बसायचा कालावधीही सारखाच असतो, परंतु रसाशिवायचा काळ व रसयुक्‍त काळ यांच्यात जमीन अस्मानाचा फरक असतो व त्यातून मिळालेला फायदाही वेगळा असतो.

सकाळी प्रार्थना करून दिवस सुरू केला, की जीवनात व सर्व गोष्टीत सौंदर्य दिसू लागते. आपल्याला सर्व गोष्टीत रस आहे असे वाटते. ओलेपणा असला तरच वस्तू एकमेकांत मिसळतात. रस निघून गेला, की कण कण सुटे होऊन वाऱ्यावर उडून जातात.

मातीच्या हवेत असणाऱ्या कणांवर जरासा पावसाचा शिडकावा झाला, तर मातीचे कण व पाणी एकत्र होऊन खाली येऊन जमिनीवर साठतात. त्याचप्रमाणे रसामुळे जीवन बांधले जाते, अस्तित्वात येते. जीवनात मनुष्याला रस आवश्‍यक असतो. जीवनात रस वाटण्यासाठी मुळात तशी इच्छा असणे व तशी दृष्टी असणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असते.
भौतिक पातळीवर शारीरिक संपन्नतेसाठी रसायनांचे सेवन कायम करावे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे मनाला चांगल्या मार्गाने व व्यवस्थित जीवनाचा आनंद घेता येण्यासाठी जीवन अभिरुचीसंपन्न असावे असे सांगितले आहे. "मना सज्जना भक्‍तिपंथेचि जावे' असे समर्थांनी म्हटले आहे. जीवनाला मन विटणार नाही अशी इच्छा असणाऱ्यांनी सज्जन असणे आवश्‍यक असते. सज्जन असणे म्हणजे जनसमुदायाशी एकरूप होऊन राहणे. यानंतर समर्थ म्हणतात, ""जीवनात भक्‍तिरस असल्याशिवाय जीव व आत्मा यांना रस मिळणार नाही.'' भक्‍तिरसात डुंबल्यावरच परमानंद म्हणता येईल असा आनंद मिळेल व त्याला अमरत्वाची प्राप्ती होईल.

प्रकृतीला अनुसरून, सात्त्विक व योग्य वेळी घेतलेले अन्न हेच एक रसायन असते. सुरवातीस आयुर्वेदाने सांगितलेली रसायने सेवन करून प्रकृती नीट ठेवली की त्यात असलेला जीव व मन यांना आवश्‍यक असलेल्या रसायनाची पूर्ती करण्याची बुद्धी आपसूक होईल.

आयुर्वेदाने अनेक रसायनांचा उल्लेख केलेला आहे. विशेष रसायन म्हणून नाना तऱ्हेचे लेह, कल्प, औषधे सांगितली आहेत, जी घेतल्यावर मनुष्य दीर्घायुषी होईल, नुसताच दीर्घायुषी होईल असे नाही तर जेवढा काळ तो जगेल तेवढ्या काळाची गुणवत्ता वाढेल. जीवनाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत जीवनाचा व या सृष्टीत असलेल्या सर्व वस्तूंचा रसास्वाद घेता येईल. मनुष्य किती वर्षे जगला यापेक्षा तो रसयुक्‍त काळ किती जगला, त्याने जीवनाचा रसास्वाद कसा घेतला, जीवनाचा आनंद कसा उपभोगला यावरच दीर्घायुष्याची खरी किंमत ठरू शकते.
हिरा नुसताच मोठा असून चालत नाही तर त्यात कुठलाही दोष नसला, त्यात कुठलाही काळा डाग नसला तर त्याची खरी किंमत असते. तसेच कुणी नुसत्या शरीराने आडदांड असला, शंभर वर्षे जगला, पण आयुष्यभर माणूसघाणेपणा केला, विकासात, कलेत वा इतर कशातही रस दाखवला नाही, त्यापासून आनंद मिळवला नाही तर खऱ्या जीवनाचा रस त्याला मिळालाच नाही असे म्हणावे लागले.

आयुर्वेदाने जीवनरसाचे महत्त्व ओळखून रसायनांचा स्वतंत्र अध्याय सांगितलेला आहे. आपणही या रसायनांचे महत्त्व ओळखून नित्यनियमाने ज्याला जे जमेल, परवडेल त्याने रसायनसेवन करणे आवश्‍यक आहे.

 डॉ. श्री बालाजी तांबे
--

Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad