Wednesday, November 11, 2009

आजारपणातील अन्नयोग


'रोगा सर्वेऽ पि मन्दाग्नौ' म्हणजे सर्व रोग मंदाग्नीमुळे होतात. बहुतेक वेळी आजारपणात भूक कमी झालेली दिसते ती याचमुळे.

म्हणून आजारपणातला आहार पचायला हलका, रुचकर आणि जास्तीत जास्त ताकद देणारा असावा लागतो. आयुर्वेदिक अन्नयोग तत्त्वांवर आधारित आहाराची योजना ही आजारपण सुसह्य करेल आणि आजारापासून मुक्‍त होण्यासाठी औषधांना सहायकही ठरेल.

- डॉ. श्री बालाजी तांबे

जी वनाच्या तीन मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र व निवारा. जगण्यासाठी व प्राणधारणासाठी अन्न अत्यावश्‍यक असतेच; पण अन्नयोग संकल्पनेतून साकार झालेले अन्न औषधाप्रमाणेही काम करू शकते असे आयुर्वेदशास्त्र म्हणते.

भेषजो न उपपन्नो अपि निराहारो न शक्‍यते ।

तस्मात्‌ भिषग्भिः आहारो महाभैषज्यं उच्यते ।।...काश्‍यपसंहिता

औषध कितीही उतम असले, तरी ते आहाराशिवाय रोग बरे करू शकत नाही. म्हणूनच वैद्य मंडळी आहार हे महान औषध आहे, असे समजतात.

प्रकृतीविषयी लहानसहान तक्रारींमध्ये आहारद्रव्यांच्या योगे पुष्कळसा आराम मिळू शकतो. प्रकृतिनुरूप आहारयोजना केल्याने प्रकृती संतुलित राहून लहानसहान तक्रारींना प्रतिबंध करता येतो हे आपण जाणतो. तसेच एखादा मोठा आजार झाला आणि त्यासाठी औषधयोजना करणे भाग असले, तरीही बरोबरीने उचित आहारयोजना केल्यास ती औषधेयोजनेला सहायक ठरणारी असते.

आहारयोजना ही वास्तविक प्रकृतीनुरूप, असंतुलित दोषानुरूप, वयानुरूप, औषधानुरूप बदलत जाते पण तरीही सर्वसाधारणपणे आजारपणात आहार कसा असावा, याचे मार्गदर्शन अन्नयोगातून मिळू शकते. आजार कोणताही असला तरी काही गोष्टी सरसकट करता येण्याजोग्या असतात.

पिण्याचे पाणी उकळून घेणे

उकळी फुटल्यावर 15-20 मिनिटे व्यवस्थित उकळलेले व चौपदरी कापडातून गाळून घेतलेले पाणी पचण्याच्या दृष्टीने सोपे असते व शुद्ध असते. आजारपणात अजून नव्याने जंतुसंसर्ग होऊ नये म्हणूनही उकळलेले पाणी पिणे उत्तम असते. त्यातही वात-कफदोषामुळे रोग झालेला असल्यास उकळलेले गरम पाणी पिणे उत्तम असते. पित्तदोषाचे प्राधान्य असल्यास उकळलेले थंड पाणी प्यायले तरी चालते.

ताजे व शिजवलेले, स्वच्छता व शुद्धतेची काळजी घेऊन बनविलेले अन्न खाणे -

कच्चे अन्न शिजविलेल्या अन्नापेक्षा पचण्याच्या दृष्टीने अवघड असते, शिवाय कच्च्या अन्नातून रासायनिक खते, रासायनिक द्रव्ये पोटात जाण्याचे प्रमाण बरेच जास्ती असते. ताजे अन्न म्हणजे पुन्हा पुन्हा गरम न केलेले अन्न पचण्याच्या दृष्टीने चांगले असते, तसेच आतील सत्त्व टिकविण्याच्या दृष्टीनेही चांगले असते. फ्रीजमध्ये टिकविलेले वा प्रिझर्वेटिव्हज टाकून टिकविलेले अन्न रासायनिक दृष्ट्या चांगले असते तरी त्यातील सत्त्व कमी झालेले असते. शिवाय ते शरीरातून ताज्या अन्नाप्रमाणे स्वीकारलेही जात नाही.

तेलाचा वापर कमीत कमी करणे -

तेलाचा अतिप्रमाणात वापर हा निरोगी व्यक्‍तीसाठीही अहितकर असतो. त्यामुळे आजारी व्यक्‍तीचे खाणे बनविताना तेलाऐवजी घरी बनविलेल्या साजूक तुपाचा योग्य प्रमाणात वापर करणे चांगले असते. साजूक तुपात बनविलेले अन्न रुचकरही लागते, शिवाय साजूक तुपामुळे रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत मिळाली, की रोग बरा होण्यासाही अप्रत्यक्षरीत्या उपयोग होताना दिसतो.

सुके, निःसत्त्व, थंड झालेले अन्न न खाता द्रवप्रधान, सत्त्वयुक्‍त व गरम अन्न खाणे-

आयुर्वेदात म्हटले आहे, 'शीतं शुष्कं च दुर्जरम्‌' म्हणजे थंड व सुके अन्न पचायला अवघड असते या उलट सहज खाता येईल इतके उष्ण अन्न व द्रवप्रधान अन्न पचायला सोपे असते.

जेवणाच्या वेळा सांभाळणे-

संध्याकाळचे जेवण फार उशिरा करणे इष्ट नसते. संध्याकाळी सूप, खिचडीसारखे हलके अन्न खाणे योग्य असते. प्रकृतिनुरूप भाज्या, मूग, तांदूळ, नाचणी सत्व, रवा, यांसारख्या पथ्यकर द्रव्यांपासून बनविलेले सूप संध्याकाळच्या जेवणामध्ये उत्तम असते. मुगाची पातळ खिचडी किंवा मुगाचे कढण व भात, असेही पदार्थ संध्याकाळच्या जेवणात असू शकतात.

आजारी व्यक्‍तीचे खाणे म्हणजे काही तरी मिळमिळीत, नुसतेच वाफवलेले वगैरे असावे अशी बऱ्याचदा समजूत असते. मात्र अन्नयोग संकल्पनेतून बनविलेला आहार आरोग्यासाठी हितकर असला तरी रुचकर असतो. आजारी व्यक्‍तीला आधीच आजारपणामुळे काही करण्यात फारसा उत्साह नसतो, भूकही हवी तेवढी लागत नाही, तोंडाची चवही कमी झालेली असू शकते. म्हणूनच आजारी व्यक्‍तीचे अन्न तिखट, झणझणीत नसले तरी रुचकर, स्वादिष्ट असायला हवे. टोमॅटो, चिंचेच्या ऐवजी लिंबू, कोकम; तिखट वा मिरचीच्याऐवजी आले; साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ; शेंगदाण्याऐवजी खोबरे; बेसनाच्या ऐवजी मुगाचे पीठ; मोहरी, हिंग, मिरी वगैरे तीक्ष्ण मसाल्याच्या पदार्थांऐवजी जिरे, धण्याची पूड, दालचिनी, हळद, पुदिना यांसारखे सौम्य पदार्थ वापरून अन्नपदार्थ रुचकर बनवता येतात. साध्या ताप, जुलाब, उलट्यांपासून ते पाळीचा ताप, मुदतीचा ताप वगैरे आजारापर्यंत किंवा रक्‍तदाब, मधुमेह, हृद्रोगासारख्या दीर्घकालीन विकारांपासून ते कर्करोग, किडनीचे रोगसारख्या अवघड रोगातही पथ्यकर समजल्या जाणाऱ्या काही आयुर्वेदिक पाककृती याप्रमाणे सांगता येतील.

यवागु / लापशी

यवागु षड्‌गुणे तोये संसिद्धा विरलद्रवा । यवागुर्ग्राहिणी तृष्णाज्वरघ्नी बस्तिशोधनी ।। पित्तश्‍लेष्मज्वरे देया मध्यो सा प्रकीर्तिता ।....निघण्टु रत्नाकर

तांदूळ किंचित तुपावर प्रथम भाजून घ्यावेत, त्यात सहापट पाणी घालून शिजवून पातळ लापशी तयार करावी. ही यवागु तापामध्ये हितकर असते, मूत्राशयाची शुद्धी करते, तहान शमवते.

भात

जले चतुर्दशगुणे तण्डुलानां चतुःपलम्‌ ।

विपचेत्‌ स्रावयेन्मण्डं स भक्‍तो मधुरो लघुः ।।....निघण्टु रत्नाकर

तांदूळ किंचित तुपावर भाजून घ्यावेत, मग त्यात 14 पट पाणी घालून शिजले की पेज काढून टाकून पुन्हा निखाऱ्यावर ठेवून वर झाकण ठेवावे.

असा भात चवीला मधुर असतो व पचायला हलका असतो, पथ्यकर असतो. हा खाल्ल्याने तृप्ती मिळते, रुची येते. वात व कफदोष शमतात, शक्‍ती मिळते, शुक्रधातू वाढतो.

कृशरा / खिचडी

पादप्रस्था मुद्गदालिरर्धप्रस्थाश्‍च तन्दुलाः । कृशरः साध्यते सूज्ञैस्तेषां च द्विगुणे जले ।। ....निघण्टु रत्नाकर

मुगाच्या डाळीच्या दुप्पट तांदूळ घेऊन स्वच्छ धुवावे. भांड्यात तूप घेऊन तापवावे व त्यात जिरे, हळद, हिंग, आले टाकून फोडणी करावी. तयार फोडणीमध्ये मूग-तांदळाचे मिश्रण टाकावे व दुप्पट पाणी घालून शिजवावे. अशी खिचडी तूप घालून खाल्ली असता समाधान करते, शुक्रधातू वाढवते व पथ्यकर असते.

साळीच्या लाह्यांची पेया

पेया सिक्‍थान्विता तोये चतुर्दशगुणे कृता पूर्ववच्च कृता लाजपेया लघ्वी स्मृता यतः ।...निघण्टु रत्नाकर साळीच्या लाह्या चौदा पट पाण्यात शिजवाव्यात यातच सुंठ, मिरी, पिंपळी, सैंधव वगैरे टाकावे. ही साळीच्या लाह्यांची पेया अतिशय पथ्यकर असते, अग्नीला प्रदीप्त करते, अतिसार, ताप व श्रमाचा नाश करते.

अष्टगुण मंड

धान्यत्रिकटुसिन्धुत्थमुद्गतण्डुलयोजितः । भृष्टश्‍च हिंगुतैलाभ्यां स मण्डोऽष्टगुणः स्मृतः ।। दीपनः प्राणदो बस्तिशोधनो रक्‍तवर्धनः । ज्वरजित्‌ सर्वदोषघ्नो मण्डो।ष्टगुण उच्यते ।।...निघण्टु रत्नाकर

तूप गरम करून त्यात थोडा हिंग घालावा, मग त्यात एक भाग मुगाची डाळ व दोन भाग तांदूळ टाकून थोडे परतून घ्यावे. त्यानंतर यातच धणे पूड, सुंठ, मिरी, पिंपळी, सैंधव मीठ ही द्रव्ये चवीनुसार घालून 14 पट पाणी घालून शिजवावे व गाळून घ्यावे. हा अष्टगुण मंड घेतला असता अग्नी प्रदीप्त होतो, प्राणशक्‍ती वाढते, मूत्राशय शुद्ध होतो, रक्‍त वाढते, ताप नाहीसा होतो व तिन्ही दोषांचे संतुलन होते.

मुद्गयूष

दाडिमालकाभ्यां तु मुद्गयूषः सुसाधितः ।पित्तवातहरः पथ्यो लघुराग्निप्रदः सर ः ।।...निघण्टु रत्नाकर

मुगाच्या डाळीत अठरा पट पाणी घालावे व त्यात चवीप्रमाणे डाळिंबाचे दाणे व आवळ्याचा रस घालावा. सुंठ, मिरी, पिंपळी, सैंधव व तूप ही द्रव्येसुद्धा चवीनुसार टाकावी. मुगाची डाळ चांगली शिजली की गाळून घ्यावे. हे मुगाचे सूप पित्त-वात कमी करते, अतिशय पथ्यकर असते, अग्नी प्रदीप्त करते व सारक असते.

दुपारच्या जेवणात यासारखे एखादे सूप, भात, साधी फोडणी देऊन तयार केलेली एखादी पथ्यकर भाजी (उदा. दुधी, परवर, तोंडली, घोसाळी, तांदुळजा, चाकवत, कोहळा, कारले, भेंडी, पडवळ, कर्टोली), फुलका वा भाकरी अशा गोष्टी ठेवता येतात. संध्याकाळी अष्टगुणमंडासारखे नुसते सूप किंवा मुगाचे कढण व भात वा खिचडी अशा गोष्टी घेता येतात. मधल्या वेळेत नुसत्या साळीच्या लाह्या किंवा साळीच्या लाह्या दूध किंवा साळीच्या लाह्या व ताक असे काहीतरी घेता येते. सकाळी नाश्‍त्यासाठी मऊ भात-तूप किंवा पातळ खिचडी असे घेता येते. आजारपण कोणतेही असो, "रोगा सर्वे।पि मन्दाग्नौ' म्हणजे सर्व रोग मंदाग्नीमुळे होतात हे लक्षात घेऊन आहारयोजना करणे अपेक्षित असत. बक वेळी आजारपणात भूक कमी झालेली दिसते ती याचमुळे. म्हणून आजारपणातला आहार पचायला हलका, रुचकर आणि जास्तीत जास्त ताकद देणारा असावा लागतो. आयुर्वेदिक अन्नयोग तत्त्वांवर आधारित आहाराची योजना ही आजारपण सुसह्य करेल आणि आजारापासून मुक्‍त होण्यासाठी औषधांना सहायकही ठरेल.


(डॉ. श्री. बालाजी तांबे यांचे सुप्रसिद्ध पुस्तक 'आयुर्वेदिय गर्भसंस्कार' आता ऑनलाईन मिळतेय...!)

No comments:

Post a Comment

ad