Sunday, September 13, 2009

अन्नयोग

अन्नयोगात वापरला जाणारा प्रत्येक मसाल्याचा पदार्थ त्यातील गुणधर्माचा विचार करता मोठे औषधच आहे आणि आयुर्वेदिक औषधांमध्येही या मसाल्याच्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
अन्नयोग संकल्पनेतील महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या मसाल्यांची आता आपण माहिती करून घेणार आहोत. प्रकृतीनुसार व ऋतूनुसार उचित धान्ये, भाज्या वगैरे निवडले तरी त्यांच्यापासून बनविलेले पदार्थ स्वादिष्ट, रुचकर बनावेत, उत्तम सुवासयुक्‍त बनावेत व जाठराग्नीकडून सहजतेने पचावेत, यासाठी मसाले महत्त्वाचे असतात. अन्नयोगात वापरला जाणारा प्रत्येक मसाल्याचा पदार्थ त्यातील गुणधर्माचा विचार करता मोठे औषधच आहे आणि आयुर्वेदिक औषधांमध्येही या मसाल्याच्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
हिंग
हिंग हा वृक्षाचा चीक म्हणजे डिंक असतो. हिंगाचे वृक्ष गुजरात, अफगाणिस्तान, इराण वगैरे देशांत आढळतात. हिंग पांढरा वा काळसर वर्णाचा, तिखट चवीचा व उग्र गंधाचा असतो. दिसायला चकचकीत, स्निग्ध हिंग उत्तम समजला जातो. हिंग भाजल्यावर फुलायला हवा. बाजारात हिंगाचे खडे, तसेच हिंगाची पूड मिळते. पण शक्‍यतो हिंगाचे खडे घेऊन घरी पूड बनवणे चांगले असते, अन्यथा हिंगाच्या पुडीत भेसळ असण्याची मोठी शक्‍यता असते.
हिंगाची तीक्ष्णता घालविण्यासाठी हिंग तुपात परतून शुद्ध करून घ्यायचा असतो. स्वयंपाक करतानाही फोडणीव्यतिरिक्‍त हिंग वापरायचा असेल तर तो शुद्ध करून घेणे चांगले.
हिंगुष्णं पाचनं रुच्यं तीक्ष्णं वातबलासहृत्‌ ।
शूलगुल्मोदरानाहकृमिघ्नं पित्तवर्धनम्‌ ।।
...भावप्रकाश
हिंग उष्ण असतो, रुची वाढवतो, वात- तसेच कफदोषाचे शमन करतो. शूळ, पोटात वायू होणे, जंत, गुल्म, उदर वगैरे तक्रारींत हितकर असतो.
पोटात वायू धरला असता पोटावर तेल लावून हिंगाचा गरम पाण्यात केलेला लेप नाभीभोवती लावण्याचा उपयोग होतो.
जेवणानंतर वाटीभर ताकात तुपात परतलेल्या हिंगाचे चिमूटभर चूर्ण, जिऱ्याची पूड व सैंधव मीठ टाकून घेतल्यास अजीर्णाची सवय मोडते; जंत होण्यास प्रतिबंध होतो.
तोंडाला चव नसल्यास, भूक लागत नसल्यास, तोंडामध्ये चिकटपणा जाणवत असल्यास चमचाभर लिंबाच्या रसात चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद, जिऱ्याची पूड टाकून तयार झालेले मिश्रण जेवणाअगोदर थोडे थोडे चाटण्याचा उपयोग होतो. हिंगाचा वापर जपून करावा लागतो. अतिवापरामुळे हाडांवर वाईट परिणाम होतो. बाळंतिणीचा स्वयंपाक करताना हिंगाचा समावेश असू द्यावा. यामुळे गर्भाशय शुद्ध होण्यास हातभार लागतो.
हळद
पूजेपासून ते सौंदर्यसाधनेपर्यंत हळद मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. अन्नयोगातही हळदीचे मोठे योगदान असते. हळदीची झुडपे असतात व त्याचे कंद आपण हळद म्हणून वापरतो. हळदीचे ताजे कंद पाण्यात उकळून उन्हामध्ये वाळवून मग वापरले जातात. हळदीचे तयार चूर्ण आणण्यापेक्षा हळकुंडे आणून, धुऊन, वाळवून पूड करून वापरणे अधिक चांगले असते.
हरिद्रा कटुकतिक्‍ता रुक्षोष्णा कफपित्तनुत्‌ ।
वर्ण्या त्वग्दोषमेहास्रशोथपाण्डुव्रणापहा ।।
...भावप्रकाश
हळद चवीला कडवट, तिखट असते. वीर्याने उष्ण, तर गुणाने रुक्ष असते. कफ-पित्तदोष कमी करते. त्वचा उजळवते, त्वचादोष दूर करते. प्रमेह, रक्‍तविकार, त्वचा, तसेच जखम झाली असता हितकर असते.
स्वयंपाकात हळदीचा योग्य प्रमाणात वापर केल्यास मेदवृद्धी होण्यास प्रतिबंध होतो.
सर्दी, खोकला, वारंवार घशात कफ जमणे, घसा दुखणे वगैरे तक्रारींवर कपभर दुधात पाव कप पाणी व अर्धा चमचा हळद टाकावी व मंद आचेवर पाणी उडून जाईपर्यंत उकळावे. उरलेले दूध सुती कापडातून गाळून प्यावे. बाळंतपणात हळद नित्यनियमाने वापरल्याने स्तन्यशुद्धी तर होतेच, पण गर्भाशयही पूर्ववत होण्यास मदत मिळते.
मोहरी
सर्षपः कटुकास्तिक्‍तस्तीक्ष्णश्‍चोष्णो।ग्निदीपनः ।
किंचित्‌ रुक्षः पित्तलश्‍च रक्‍तपित्तकरो मतः।।
रुक्षो वातं कफं कण्डुं शूलं कृमीन्‌ जयेत्‌ ।
ग्रहपीडां च पीडां च नाशयेदिति कीर्तितः ।।
...निघण्टू रत्नाकर
मोहरी चवीला तिखट, कडवट असते. गुणांनी तीक्ष्ण व उष्ण असते. अग्नीला प्रदीप्त करते. किंचित रूक्ष असते, मात्र पित्त वाढवते, कफदोष शमवते. कंड, कफज रोग, त्वचारोग, जंत, तसेच ग्रहपीडेमध्ये हितकर असते. सर्दीमुळे डोके खूप जड वाटत असल्यास मोहरीच्या चूर्णाचा वास घेण्याने कफ पातळ होण्यास मदत मिळते. आहारात मोहरीचा योग्य प्रमाणात वापर करण्याने जंत होण्यास प्रतिबंध होतो, मात्र मोहरीचा अतिवापर करण्याने जंत होण्यास- विशेषतः पित्तप्रकृतीच्या किंवा पित्ताचा त्रास होत असणाऱ्या व्यक्तींना साह्यकारी ठरते. अशा व्यक्‍तींनी मोहरी जपून वापरावी.
नवजात बालक घरात असणाऱ्या घरात कुंडीमध्ये मोहरी लावावी. यामुळे ग्रहबाधेस प्रतिबंध होतो. अर्थात व्हायरस वगैरेंमुळे होणाऱ्या साथीच्या रोगांना अटकाव होतो.
काळ्या मोहरीपेक्षा छोटी मोहरी अधिक तीक्ष्ण असते आणि रंगाने फार तांबडी असणारी मोहरी अधिक तीक्ष्ण व उष्ण असते.
डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad