Sunday, August 2, 2009

अन्नयोग - कंद

आपल्या आहारात कंद हवा. मग ते गाजर असो वा सुरण; बटाटा असो वा रताळे. मात्र आपल्या आहारातील कंदाचे पथ्यापथ्य समजून घेऊन त्याची निवड करा.
आपण आत्तापर्यंत फळभाज्या तसेच पालेभाज्यांची माहिती घेतली. आज आपण कंद स्वरूपात तयार होणाऱ्या भाज्यांची माहिती घेणार आहोत.
सुरण
उपवासासाठी चालणाऱ्या काही मोजक्‍या भाज्यांमध्ये सुरणाचा अंतर्भाव होतो. सुरणाचे कंद खूप मोठे असू शकतात.
सुरणो दीपनो रुक्षः कषायः कण्डुकृत्‌ कटुः ।
विष्टम्भी विशदो रुच्यः कफार्शः कृन्तनो लघु ।
विशेषात्‌ अर्शने पथ्यः प्लीहगुल्मविनाशनः ।।

...भावप्रकाश
सुरण चवीला तुरट असतो, विपाकाने तिखट असतो. इतर सर्व कंदमुळांपेक्षा पचायला सोपा असतो. सुरण अग्निदीपन करतो, रुक्षता वाढवतो, तसेच अवष्टंभकर असतो. कफज मूळव्याधीत विशेष पथ्यकर असतो. प्लीहा वाढणे, गुल्म तयार होणे वगैरे व्याधींत हितकर असतो.
सुरणामध्ये खाज निर्माण करण्याचा दुर्गुण असतो. तो घालविण्यासाठी सुरणाचे तुकडे चिंचेच्या पाण्याने धुतले जातात किंवा चिंचेच्या पाण्यासह उकळायचे असतात.
सुरण वाफवून तयार केलेली भाजी मूळव्याधीमध्ये, विशेषतः कंड सुटणाऱ्या मूळव्याधीमध्ये हितकर असते. मात्र त्वचारोगात तसेच रक्‍तपित्तामध्ये सुरण अपथ्यकर समजले जाते.
बटाटा
काहींच्या मते बटाटा ३००-४०० वर्षांपूर्वी भारतात आला. आयुर्वेदात पिण्डालुक, आलुक, रक्‍तालु वगैरे अनेक प्रकारचे कंद वर्णन केलेले आहेत, तसेच आलुकाचे सामान्य गुणही वर्णन केलेले आहेत. हे बटाट्याला चपखल बसणारे आहेत.
आलुकं शीतलं सर्वं विष्टम्भी मधुरं गुरु ।
सृष्टमूत्रमलं रुक्षं दुर्जरं रक्‍तपित्तनुत्‌ ।
कफानिलकरं बल्यं वृष्यं स्वल्पाग्निवर्द्धनम्‌ ।।

...भावप्रकाश
सर्व प्रकारचे आलुक म्हणजे बटाटे वीर्याने थंड असतात, चवीला गोड असतात, पचायला जड असतात, मल-मूत्र होण्यास सहायक असतात, कफकर तसेच वातकर असतात. रक्‍तदोष, पित्तदोषात हितकर असतात, ताकद वाढवतात, शुक्रधातू वाढवतात व काही प्रमाणात अग्निसंदीपन करतात.
या ठिकाणी बटाटा वातकर सांगितला असला तरी तो उकडून मिरी, जिरे, आले वगैरेंसह खाल्ला तर वात वाढताना दिसत नाही. तळलेल्या बटाट्यामुळे मात्र वात वाढू शकतो. अग्नी मंद असताना बटाटा खाल्ला, तर पचनसंस्थेत थोडा वात वाढताना दिसला तरी बटाट्यामुळे चवळी, वाटाणा, चण्याप्रमाणे वात वाढत नाही, असा अनुभव आहे.
रताळे
आयुर्वेदात रक्‍तालु नावाने ओळखले जाणारे रताळेही उपवासासाठी चालते.
आलुकी बलकृत्स्निग्धा गुर्वी हृत्कम्पनाशिनी ।
विष्टम्भकारिणी तैले तलिता।तिरुचिप्रदा ।।

...भावप्रकाश
रताळे स्निग्ध असते, ताकद वाढवते, पचायला जड असते, हृदयाची धडधड कमी करते, मलावष्टंभ करू शकते व तळून खाल्ले असता खूप रुचकर लागते.
रताळे उकडून खाणे चांगले असते; मात्र भूक न लागणाऱ्या व्यक्‍तींनी रताळे विचारपूर्वक खावे. प्रमेह, मधुमेह, स्थूल व्यक्‍तींनीही रताळे शक्‍यतो टाळावे.
गाजर
गृज्जनं मधुरं तीक्ष्णं तिक्‍तोष्णं दीपनं लघु ।
संग्राहि पक्‍तपित्तार्शो ग्रहणीकफवातजित्‌ ।।

...भावप्रकाश
गाजर चवीला गोड असले तरी गुणाने उष्ण-तीक्ष्ण असते, अग्नी प्रदीप्त करते, पचायला हलके असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते. गाजर पित्तज मूळव्याध, संग्रहणीमध्ये पथ्यकर असते, तसेच कफदोष व वातदोषात हितकर असते.
गाजराचा कोशिंबीर म्हणून वापर करणे चांगले असते. त्यातही ते शिजवून खाणे अधिक चांगले असते. मात्र आजकाल रूढ होत असलेली गाजराचा रस पिण्याची पद्धत चांगली नाही. कारण त्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते, त्वचारोग बळावतात, मलावष्टंभ होऊ शकतो.

No comments:

Post a Comment

ad