Tuesday, May 26, 2009

अन्नयोग

कडधान्ये, डाळी यांना आयुर्वेदात शमी वा शिम्बी या नावाने संबोधले आहे. शिम्बी म्हणजे शेंग. मूग, तूर, मटकी, मसूर आदी शेंगेत तयार होणाऱ्या कडधान्यांचा व त्यापासून तयार केलेल्या डाळींचा समावेश शिम्बी वर्गात होतो.
सर्व कडधान्यांत मूग उत्तम होत.
मुद्गाः साधारणाः शीता ग्राहका लघवो मताः ।
किञ्चित्‌ वातकरा नेत्र्याः कफपित्तज्वरापहाः ।।
...निघण्टुरत्नाकर

मूग वीर्याने थंड असतात. ते पचायला लघू म्हणजे हलके असतात. मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात. डोळ्यांसाठी हितकर असतात. कफ तसेच पित्तदोषाचे शमन करतात व ताप कमी करतात.
च्या कोवळ्या पानांची भाजी करता येते. ती चवीला कडवट असली तरी गुणांनी श्रेष्ठ समजली जाते.
तूर
तुरीला संस्कृतात आढकी म्हणतात.
आढकी मधुरा किञ्चिद्वातला च कषायका ।
गुर्वी रुच्या ग्राहिणी च रुक्षा वर्ण्या च शीतला ।।
...निघण्टुरत्नाकर
तूर चवीला गोड व थोडी तुरट व किंचित वात वाढविणारी असते. ग्राही म्हणजे मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते. वर्ण सुधारते, वीर्याने शीतल असते. चरकसंहितेत तूर कफ-पित्तनाशक सांगितली आहे.
तुरीच्या डाळीचे वेगळे वर्णन केलेले आहे.
तुवरीदालिका पथ्या किञ्चित्‌ वातकरी मता ।
क्रिमित्रिदोषशमनी घृतयुक्‍ता त्रिदोषहा ।।
...निघण्टुरत्नाकर
तुराची डाळ पथ्यकर, किंचित वातकर असते. मात्र तुपासहित सेवन केली असता कृमींचा नाश करते व त्रिदोषांचे शमन करते.
म्हणूनच रोजच्या जेवणात मूग वा तुरीच्या वरणाचा, आमटीचा समावेश असणे उत्तम असते. अख्ख्या मुगाची वा तुरीची उसळही करता येते.
मसूर
मधुरा शीता ग्राहिणी वातकारका ।
लघ्वी रुक्षा च वर्ण्या च बल्या बृंहणकारिणी ।।
...निघण्टुरत्नाकर
मसूर चवीला मधुर, वीर्याने शीत व पचायला हलके असतात. रुक्ष गुणाचे असल्याने वातकर असतात. मात्र ताकद वाढवितात, धातूंसाठी पौष्टिक असतात. मसुराचा लेप वर्ण्य असतो.
मसुराच्या कोवळ्या पानांची भाजी चवीला कडू असून पचायला हलकी असते.
मटकी
मधुराः पाके ग्राहिणो रुक्षशीतलाः ।
मुकुष्ठकाः प्रशास्यन्ते रक्‍तपित्तज्वरादिषु ।।
...चरक सूत्रस्थान
मटकी चवीला मधुर व विपाकानंतर मधुर असते. थंड वीर्याची, रुक्ष गुणाची व ग्राही म्हणजे मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणारी असते. ताप, रक्‍तपित्त वगैरे विकारात सेवन करण्यास उत्तम असते. अष्टांगसंग्रहात मटकी कृमिकारक सांगितली आहे.
कुळीथ
उष्णाः कषायाः पाके।म्लाः कफशुक्रानिलापहाः ।
कुलत्था ग्राहिणः कासहिक्काश्‍वासार्शसां हिताः ।।
....चरक सूत्रस्थान
कुळीथ चवीला तुरट, पचनानंतर आंबट व उष्ण वीर्याचे असतात. वात-कफदोष कमी करतात. शुक्रधातू कमी करतात. खोकला, उचकी, दमा, मूळव्याध (कफ-वातज) यात उपयुक्‍त असतात.
कुळीथ मूतखड्यावर औषधाप्रमाणे काम करतात. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात. मात्र पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी अपथ्यकर असतात.
- डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad