Tuesday, May 5, 2009

जपा व्यावसायिक आरोग्य



व्यवसाय वा नोकरी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. म्हणूूनच त्याचा आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. काळाप्रमाणे व्यवसायाचे स्वरूप बदलत जाणे स्वाभाविक आहे पण प्रकृतीनुसार व्यवसाय निवडणे आणि व्यवसायानुसार प्रकृतीची काळजी घेणे आवश्‍यक होय. 
आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये पूर्वीच्या काळाला अनुसरून घोड्यावर बसल्याने काय होते, अग्नीजवळ काम करण्याने काय होते, उन्हात राहण्याने काय होते वगैरे विषयांचे मार्गदर्शन केलेले आहे. उदा. 
घोटकारोहणं वातपित्ताग्निश्रमकृन्ममतम्‌ ।
मेदोवणर्कफघ्नं च हितं तद्‌ बलिनां परम्‌ ।।
... योगरत्नाकर

घोडा चालवणे हे वात-पित्त दोषांना वाढविणारे, अग्नी प्रदीप्त करणारे पण श्रम उत्पन्न करणारे असते; तसेच मेद, वर्ण व कफ यांचा नाश करणारे असते. म्हणूून घोड्यावरून प्रवास करणे हे केवळ बलवान मनुष्यासाठी हितकर होय. 
आधुनिक जीवनशैलीमध्ये घोड्यावर बसण्याची पाळी क्वचितच येत असली तरी अशा प्रकारच्या मार्गदर्शनावरून आधुनिक व्यवसाय करताना आरोग्याची कशी काळजी घ्यायला हवी हे समजून घेता येऊ शकते. एकंदरीत आयुर्वेदशास्त्रात व्यवसायिक आरोग्याचा विचार करावा लागतो हे समजते. 
प्रकृती व व्यवसायाचा विचार करणेही या ठिकाणी आवश्‍यक आहे. प्रकृतीचा आपल्या आवडीनिवडी, एकंदर शरीरशक्‍ती व प्रवृत्ती यांच्यावर मोठा प्रभाव असतो. व्यवसाय आवडीचा असला, स्वतःच्या स्वभावाला एकंदर प्रकृतीला साजेसा व अनुकूल असला तर त्यामुळे आरोग्य चांगले राहतेच पण व्यवसायातही प्रवीणता, कार्यक्षमता उत्तम राहते. 
व्यवसाय बैठ्या स्वरूपाचा व धावपळीचा अशा दोन प्रकारचा असू शकतो. 
कफ हा स्वभावतःच शांत, स्थिर, उत्तम बलयुक्‍त आणि उत्तम सहनशक्‍ती असणारा असल्याने धावपळ, प्रवास, ताण-तणावांनी युक्‍त व्यवसाय कफपकृतीच्या व्यक्‍ती निभावून नेऊ शकतात. मात्र वात-पित्त हे स्वभावतःच चंचल, तापट, नाजूक व संवेदनशील असल्याने अशा प्रकृतीच्या व्यक्‍तींसाठी फारसे ताणतणाव नसणारा, शांत व स्थिर स्वरूपाचा व्यवसाय अधिक योग्य असतो. 
आपल्या प्रकृतीला अनुरूप व्यवसाय निवडणे शक्‍य असले तर ते सर्वोत्तम होय. पण प्रत्येक व्यक्‍तीला ते शक्‍य होईलच असे नाही. अशा वेळी आपल्या व्यवसायाचे स्वरूप, आपल्या प्रकृतीचे स्वरूप आणि व्यवसायामुळे प्रकृतीवर होणारा परिणाम यांची माहिती करून घ्यायला हवी व तो आरोग्यासाठी प्रतकूल ठरणार नाही यासाठी आवश्‍यक ती उपाययोजना करायला हवी. 
सध्याच्या युगात संगणकावर काम करणारी असंख्य मंडळी असतात. मुख्य म्हणजे हे बैठ्या स्वरूपाचे काम असते. यात डोळ्यांवर अतिताण येणे साहजिक असते. प्रखर स्क्रीनच्या सान्निध्यात राहण्याने डोळ्यांमध्ये त्यांच्यामार्फत व संपूर्ण शरीरात उष्णता वाढत असते. संगणकावर काम करताना विशिष्ट रीतीने बसावे लागत असल्याने मान व पाठीवर ताण येत असतो. तसेच की बोर्ड व माऊस याच्या वापराने खांदे, हात, बोटे, मनगट यांच्यावर परिणाम होत असतो. शिवाय संगणकावर काम करणे हे बुद्धीला ताण देणारे व मेंदूला सतत व्यस्त ठेवणारे असते. या सर्व गोष्टींचा विचार करता संगणकावर काम करणाऱ्यां व्यक्‍तींना खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते.
* उष्णता कमी करणे, विशेषतः डोळ्यांची काळजी घेणे
* यासाठी पादाभ्यंग उत्तम असतो. 
पादाभ्यंगस्तु सुस्थैर्यनिद्रादृष्टिप्रसादकृत्‌ ।।
... योगरत्नाकर
पादाभ्यंगामुळे शरीरात स्थिरता उत्पन्न होते, झोप येण्यास मदत मिळते व मुख्य म्हणजे नजर प्रसन्न होते. पादाभ्यंग घृत तळपायाला लावून काशाच्या वाटीच्या साहाय्याने पादाभ्यंग करण्याने शरीरातील उष्णताही कमी होते.
* मौक्‍तिकभस्म, त्रिफळा घृत वगैरे डोळ्यांना हितकर द्रव्यांपासून तयार केलेले अंजन, उदा. "सॅन अंजन (क्‍लिअर किंवा ग्रे)' डोळ्यात घालण्यानेही डोळ्यांवरचा ताण कमी होतो.
* खांदे व पाठीची काळजी घेणे - मानेचे व पाठीचे व्यायाम उत्तम असतात तसेच नियमितपणे "संतुलन कुंडलिनी तेला'सारखे नसांना पोषक तेल लावण्यानेही उत्तम उपयोग होताना दिसतो.
* बुद्धीची व मेंदूची काळजी घेणे - बुद्धी-मेंदूला पोषक असे पंचामृत व साजूक तूप यांचा रोजच्या आहारात समावेश करता येतो. एकाग्रता वाढावी, मेंदूची कार्यक्षमता वाढावी व मुख्य म्हणजे मेंदूवरचा ताण कमी व्हावा यासाठी नेमाने ॐकार गूंजन, अनुलोम-विलोम, संतुलन अमृत क्रिया यांचा अवलंब करण्याचा उपयोग होताना दिसतो.
प्रवास आणि आरोग्य
आधुनिक काळात "प्रवास' हाही व्यवसायाचा एक महत्त्वाचा भाग होय. रोजच्या रोज गाडीतून वा रेल्वेतून प्रवास करणे, वारंवार देशातल्या देशात वा देशाबाहेर विमानाने प्रवास करणे असे प्रवासाचे अनेक प्रकार असू शकतात.
प्रवासामुळे वात वाढतो असे आयुर्वेदशास्त्र सांगते. विशेषतः सातत्याने प्रवास करण्याने व दूरदेशीचे प्रवास करण्याने हवा, पाणी, तापमान यांच्यात मोठे बदल होत असल्याने वात वाढण्याबरोबरच पचनसंस्थेवर ताण येतो, शरीरशक्‍ती कमी होते. प्रवास करणाऱ्यांनी खालील गोष्टी सांभाळण्याचा उपयोग होतो, 
* वातशमनासाठी प्रयत्न करणे - यात अंगाला नियमित अभ्यंग करणे, नाकात साजूक तुपाचे किंवा औषधांनी सिद्ध केलेल्या"नस्यसॅन घृता' सारख्या सिद्ध घृताचे थेंब टाकणे.
शक्‍य असेल तेव्हा तज्ज्ञ आयुर्वेदिक परिचारकाकाडून शास्त्रोक्‍त पद्धतीने अभ्यंग व स्वेदन करून घेणे.
* पचनाची काळजी घेणे - प्रवासामुळे अन्न आणि जागा बदलली तरी शक्‍यतोवर जेवणाच्या वेळा सांभाळण्याचा खूप उपयोग होतो. प्रवासामुळे पचनावरचा ताण कमी होण्यासाठी जेवणानंतर "संतुलन अन्नयोग गोळ्या' किंवा अविपत्तिकर चूर्णासारखे पाचक चूर्ण घेता येते. जेवण प्रकृतीला अनुकूल व पचायला हलके असण्याकडे लक्ष देणेही उत्तम असते. 
* प्रवासामध्ये सर्वाधिक लक्ष द्यावे लागते ते पाण्याकडे. पाणी बदलले तरी पचन बिघडण्याचा सर्वाधिक संभव असतो. त्यामुळे शक्‍यतो प्रवासातही उकळलेले 
पाणी पिण्याकडे लक्ष द्यावे. 
* नियमित प्रवास करणाऱ्यांनी वातशमनासाठी आणि पचन व्यवस्थित राहण्यासाठी अधून मधून अनुवासन बस्ती घेण्याचाही चांगला उपयोग होताना दिसतो.
रात्रपाळी आणि आरोग्य
रात्रपाळीचा व्यवसाय हा सर्वात अवघड व्यवसाय समजावा लागतो. निसर्गाच्या विरोधात जाऊन कराव्या लागणाऱ्या या व्यवसायामुळे वात तसेच पित्त असे दोन्ही दोष असंतुलित होतात, पचनसंस्थेवर ताण येतो तसेच हळूहळू शरीरशक्‍तीही कमी कमी होत जाते. त्यातल्या त्यात कफप्रकृत्तीसाठी असा व्यवसाय सहन होऊ शकला तरी त्यांनीही प्रकृतीची खूप काळजी घ्यावीच लागते. रात्रपाळी करावी लागणाऱ्यांना खालील गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे, 
* झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा "सॅनकूल चूर्णा'सारखे चूर्ण घेणे. यामुळे पचनसंस्थेतील वाढलेल्या पित्ताचे शमन होते.
* स्नानाच्या पूर्वी अंगाला अभ्यंग करण्याने वाढलेला वात संतुलित होण्यास मदत मिळते तसेच शरीरशक्‍ती भरून येण्यास उपयोग होतो. 
* सकाळी गुलकंद, मोरावळा, "संतुलन पित्तशांती'सारख्या गोळ्या घेण्याने पित्त कमी होते. 
* आहारात साजूक तूप, लोणी, पंचामृत यांचा समावेश करण्यानेही वात-पित्तदोषांचे शमन होऊन शरीरशक्‍ती चांगली राहण्यास मदत मिळते. 
* पादाभ्यंग करण्याने अतिरिक्‍त उष्णता कमी होते. 
बैठे काम आणि आरोग्य
अनेकांचा बैठ्या स्वरूपाचा व्यवसायही असतो. अशा लोकांना नियमित व्यायाम करण्याची सवय लावून घेणे इष्ट असते. 
* बसून बसून पाठ-मानेत विकार उत्पन्न होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे लागते. त्यासाठी मान-पाठीचे विशेष व्यायाम करण्याचा, आठवड्यातून दोन-तीन वेळा पाठीला व मानेला "संतुलन कुंडलिनी तेल' लावण्याचा उपयोग होताना दिसतो.
* या व्यक्‍तींनी रात्रीचे जेवण अगदी हलके घेणे चांगले असते. 
* दुपारची झोप टाळणे हितावह असते. 
* बसून बसून मन व बुद्धी कंटाळले तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तंबाखू किंवा वारंवार चहा-कॉफी पिण्याची, सतत काही खाण्याची सवय लागू शकते. यातून नंतर अजूनच नुकसान होणार असते हे लक्षात ठेवणे चांगले.
बोलणे आणि आरोग्य
काही व्यवसायात सातत्याने बोलणे हा एक मुख्य भाग असतो. डॉक्‍टर, वकील, शिक्षक वगैरे व्यवसायात तर बोलणे महत्त्वाचे असते. बोलण्याने शक्‍तीचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असतो. म्हणूनच आयुर्वेदाने अति प्रमाणात बोलणे हे "साहस' म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने अहितकर सांगितले आहे.
* व्यवसायामुळे फार बोलावे लागणाऱ्या व्यक्‍तींनी सकाळी च्यवनप्राश, धात्री रसायन किंवा "सॅनरोझ'सारखे रसायन सेवन करण्याची सवय ठेवावी
* आठवड्यातून एक-दोन वेळा हळद-मीठ टाकलेल्या गरम पाण्याच्या गुळण्या करण्याचा उपयोग होताना दिसतो. 
* दिवसभर थोडे थोडे पाणी पिण्याचाही फायदा होताना दिसतो.
थोडक्‍यात, प्रत्येकाने आपापल्या व्यवसायानुरूप व प्रकृतीनुरूप आहार-आचरणात योग्य ते बदल केले, आवश्‍यक त्या औषध-रसायनांचा उपयोग करून घेतला तर त्यातून आरोग्य टिकवता येईल व कामाची प्रतही वाढवता येईल.

No comments:

Post a Comment

ad