मन मोकळं मोकळं!
(डॉ. राजेंद्र बर्वे)
मुक्त मन म्हणजे स्वैराचारी किंवा सैरभैर मन नव्हे! स्वैरता म्हणजे स्वतंत्रता! प्रत्येकाचं मन अगदी जन्मतः मुक्त असतं. माणूस हा "बॉर्न फ्री' प्राणी आहे, असं म्हणतात ते या अर्थानं. मन मुक्त असलं तरी ते अनिर्बंध नसतं. त्या मुक्त मनाला आंजारून गोंजारून कामाला लावल्यास मनाची महाप्रचंड शक्ती, अचाट सामर्थ्य पणाला लावता येते. .......
स्वतःच्या मनाशी आणि माणसाच्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न सर्व तत्त्वज्ञ, आध्यात्मिक गुरू आणि मार्गदर्शकांनी केला आहे. बहिणाबाईसारखी अनागरी स्त्री असो की रामदासांसारखे राजगुरू असोत, माणसांच्या मनाचा शोध सगळ्यांनी घेतलाय. बहिणाबाई "मन' म्हणजे देवाजीला जागेपणी पडलेलं "सपान' मानतात; तर रामदासांसारखे गुरुजन मनाच्या विविध गुणांना जोपासण्यासाठी काय करायला हवं ते ठासून काव्यरूपातून प्रतिपादित करतात. अगदी एकविसाव्या शतकातला विद्याविभूषित तरुण मनाशी भेटगाठ घेऊन त्याला संगणक विज्ञानाच्या अवकाशात नेऊ पाहतो. प्राचीन काळापासून ते अर्वाचिन वर्तमानापर्यंत मनाची महती सर्वांना विदीत झाली आहे.
मन म्हणजे नेमकं काय? मनाचा अवयव कोणता? मनामध्ये असतं म्हणजे नेमकं कुठे? मन आणि शरीर यांचा परस्पर संबंध काय? या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत की एकाच नाण्याच्या दोन बाजू? मन कुठे संपतं, आणि शरीर कुठे सुरू होतं?
मना-मनात संवाद घडतो तेव्हा काही वेळ एकही शब्द उच्चारलेला नसतो, तरी इथूनचे तिथे कसे पोहोचते? मन मोठं कर, म्हणजे काय? मनी वसे ते स्वप्नी दिसे? मग स्वप्नात पाहिलेलं जातं कुठं? येतं कुठून? परत परत का येतं? आपण मनाची खूणगाठ मारून लक्षात ठेवतो, मनाशी खूणगाठ कशांनी मारतो? कुठे मारतो?
"मन मनास उमजत नाही, आधार कुठे शोधावा?' असं कवी अगतिकतेनं म्हणतो. तेव्हा मनाला आधार कोण देतं? मनोभावे प्रार्थना केली की सारं काही प्राप्त होतं, असं म्हणतात. इथे मनोभावे म्हणजे काय? तो कर्ता, कर्मणी की भावे प्रयोग!
मनासंदर्भातल्या अनेक प्रश्नांची ही सूक्ष्म झलक आहे. यातील बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी संशोधन चालू आहे. सद्य शतकातील मानवापुढचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे त्याचं "मन.'
या सर्व प्रश्न, उपप्रश्न आणि अनुत्तरित प्रश्नांना आपण किंचित बाजूला सारून मनाच्या काही अत्यंत महत्त्वाच्या गुणधर्माविषयी चर्चा करू, त्यातूनच कदाचित वरील प्रश्नांची उत्तरं नाहीत, निदान प्रश्न तरी नीट समजतील.
मनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं, तर "मन' ही सर्वस्वी मुक्त गोष्ट असते. मुक्त म्हणजे अगदी "मनोजवं मारुत तुल्य वेगं.' म्हणजे वाऱ्यासारखं मोकळं आणि क्षणोक्षणी बदलणारं, परिवर्तित होत असतं.
तुम्हीदेखील इथपर्यंतचा मजकूर लक्षपूर्वक वाचला असेल आणि एखाद्या निमिषार्धात तुमचं मन या कागदावरून उडून अमेरिकेतल्या आपल्या मुलाशी मनानं हितगुज करीत असेल किंवा अगदी काल रात्री ऐकलेल्या एखाद्या विनोदाला आठवून हसत सुटेल! याचा अर्थ मन कधीही स्थिर नसतं. ते एके जागी बांधून राहत नाही. अशा रीतीने ते कल्पनाविश्वात भूतकाळ-वर्तमान-भविष्यकाळात भ्रमण करतं. ते केव्हा कुठे कसं जाईल याचा नेम सांगता येत नाही.
म्हणजे मन वाऱ्यासारखं मुक्त असतं, माकडासारखं चंचल, हरिणासारखं चपळ, बिबळ्या वाघासारखं झपाटलेलं असतं. मनाचा हा गुणधर्म खरोखरंच एकमेवाद्वितीय आहे. माणसाच्या मनाइतकं या पृथ्वीवरच नव्हे; तर अखिल विश्वात काही नाही! मन इतकं मुक्त असण्याचं कारण मन म्हणजे मनाचा अवयव म्हणजे मानवी मेंदू हा अत्यंत उत्क्रांत प्रक्रिया करणारा अनाकलनीय संगणक आहे. करोडो पेशींनी बनलेल्या मेंदूची रचना विशेष आहे. या सर्व पेशी आपल्या दहा-बारा अँटेनासारख्या धाग्यासारख्या प्रोसेसिसनी सदैव जोडलेल्या असतात. त्या कोणत्याही क्षणी, कुठल्याही पेशीजालाशी विजेच्या वेगाने संपर्क साधतात. मनात केवळ विविध विचारांची जाळी असतात असं नव्हे; तर या सर्व विचारपेशींचा मेंदूमधल्या भावनिक पेशीजालाशी (इमोशनल ब्रेन) अतूट संबंध असतो. इतकंच काय मेंदूमधल्या या अंतर्गत पेशींचा शरीरातील सर्व पेशींशी क्षणोक्षणी संपर्क असतो. रंग, गंध, चव, श्रवण आणि स्पर्श, संवेदना देणाऱ्या ज्ञानेंद्रियातल्या पेशी मेंदूतल्या पेशींशी सदैव कुजबुजत असतात. म्हणूनच, एखाद्या सुवासानं आपण काही समजण्याच्या आत भूतकाळातल्या रम्य आठवणीत हरवून जातो. या प्रक्रिया इतक्या वेगानं घडतात की त्या घडताहेत याचीही जाणीव होत नाही.
मेंदूतल्या पेशीजालाचं हे जाळं अजूनही पूर्णपणे आकलनीय झालेलं नाही. मेंदूतल्या पेशीजालांच्या अशा परस्परांतल्या संबंधाच्या नेटवर्कच्या अनन्वित शक्यतामुळेच मन इतकं मुक्त आणि वेगवान असतं.
अर्थात, प्रशिक्षण आणि प्रतिक्षिप्त यांच्या आधारे या पेशीजालांच्या नेटवर्कमध्ये काही साचेबद्धता निर्माण होते. एखादी कृती परत परत केल्यास, त्या गोष्टीची सवय जडते. ती सफाईदारपणे होते. त्यात कौशल्य प्राप्त होते. उदा. आपण सायकल चालवायला शिकतो तेव्हा पडत झडत प्रयत्न करून आपण त्यावर स्वार होतो, चालवू लागतो. पुढे पुढे ते काम आपण सफाईदारपणे आणि कुशलतेने करू शकतो. त्या ऍक्शनची इतकी सवय होते, की आपण आपोआप-नकळतपणे त्या कृती करू लागतो. सुरुवातीला आपल्या मुक्त मनाला आवरून एकाग्र करून त्या कृती आत्मसात करतो. त्यांची सवय झाली की त्या कृती आपसुक घडतात.
याचा अर्थ मन मुक्त असलं तरी ते अनिर्बंध नसतं. त्या मुक्त मनाला आंजारून गोंजारून कामाला लावल्यास मनाची सर्व शक्ती पणाला लावता येते.
मन मुक्त असतं; पण त्याला बांधताही येतं, हेच यावरून सिद्ध होतं.
मुक्तावस्था हा मनाचा महत्त्वाचा गुणधर्म आपण इथे विस्तारानं तपासला. त्या मुक्तपणामागची शरीरशास्त्रीय कारणं पाहिली. इथे मुक्त मन म्हणजे स्वैराचारी किंवा सैरभैर मन असा अर्थ होत नाही हे लक्षात घ्यावं. अर्थात स्वैरता म्हणजे स्वतंत्रता! प्रत्येक माणसाचं मन अगदी जन्मतः मुक्त असतं. माणूस हा एक "बॉर्न फ्री' प्राणी आहे, असं म्हणतात ते या अर्थानं.
बॉर्न फ्री असल्यानं वर म्हटल्याप्रमाणे त्या मनात महाप्रचंड शक्ती असते. अचाट सामर्थ्य असतं. चंद्रावर जाण्याची, स्वप्न पाहण्याची शक्ती असते, त्याप्रमाणे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी वापरावी लागणारी बुद्धीही असते. म्हणूनच एकांतवासात अडकलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे फक्त शरीर त्या कोठडीत होते, मन मात्र मुक्त होते. कविता रचित होते. स्वा. सावरकरांनी आपल्या मुक्त मनाला मोकळं सोडलेलं नव्हतं. तर कामाला लावलं आणि त्यातूनच अत्यंत ओजस्वी कविता निर्माण झाल्या.
या उदाहरणांवरून, आपण एक पायरी पुढे गेलो आहोत. मनाचा आणखी एक गुणधर्म आपण तपासतो आहोत. माणूस "बॉर्न फ्री' आहे. त्यामध्येच त्याला "फ्रीडम ऑफ चॉईस' आहे. म्हणजे निवडीचे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. इथे निवडीचे स्वातंत्र्य याचा नेमका अर्थ कळायला हवा.
रामदास स्वामी म्हणतात, "मना सज्जना भक्तीपंथेचि जावे' म्हणजे रामदासांना या फ्रीडम ऑफ चॉईसचं भान निर्माण करायचं आहे किंवा असावं. त्यांना अभिप्रेत असलेली ही "फ्रीडम ऑफ चॉईस' खूप व्यापक अर्थाची संकल्पना आहे. फ्रीडम ऑफ चॉईस म्हणजे "आज मी कोणता पोशाख घालू?' स्कॉच पिऊ की रम? रेसला जाऊ की रमी खेळू? असल्या निर्णयांचा चॉईस आपल्याला असतो, याची जाणीव रामदासस्वामींना करून द्यायची नव्हती आणि वाचकांनीही तसा अर्थ लावू नये!
मग "फ्रीडम ऑफ चॉईस' म्हणजे काय? रामदास स्वामी म्हणतात, फ्रीडम ऑफ चॉईस म्हणजे जीवनक्रमण्याचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य.
मना सज्जना, तू जीवनाचा कोणता पंथ स्वीकारणार आहेस? भक्तिमार्ग की भोगाची वाट? तुला यापैकी कोणतीही वाट निवडण्याचं स्वातंत्र्य आहे, याची मला जाणीव आहे! माणसाचं मन मुक्त असल्यानं जीवन कसं जगावं? कसं जगू नये हे ठरविण्याचा त्याला पूर्ण हक्क आहे. म्हणून मनाच्या सज्जनपणाला आव्हान करून मी असं ठामपणे (कान पिळून) सांगतो की भोगाच्या आणि उपभोगाच्या, अनैतिकतेच्या आणि नकारात्मकतेच्या शेकडो वाटा तुला भेटतील; पण तू मात्र भक्तिमार्ग स्वीकार. भक्तिमार्ग म्हणजे सत्यत्वावर भक्ती. भक्ती म्हणजे देवत्वावर भक्ती, सत्यम शिवम सुंदरमवर भक्ती. रामदासस्वामींनी म्हटले, की भक्तिमार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे, हे विसरू नका.
म्हणून भक्तिमार्ग हा होकारात्मक मार्ग स्वीकारणं श्रेयस्कर आहे.
मनाची स्वतंत्रता आणि निवडीचे स्वातंत्र्य या दोन्ही संकल्पना आपल्याला रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकात आढळतात. यातील मनाची स्वतंत्रता त्यांनी गृहीत धरली आहे; तर निवडीचं स्वातंत्र्य कसं वापरावं याविषयी नेमकी सल्लामसलत केली आहे. त्यांचे श्लोक प्रामुख्याने आनंदी व प्रसन्न मनाकरता दिलेली "प्रिस्क्रिप्शन' आहेत.
मानवी मनाचा आवाका इतका प्रचंड आणि अवाढव्य आहे की त्याला शिस्त लावण्यासाठी आणि होकारात्मक दिशेनं जाण्यासाठी रचलेले हे श्लोक आहेत.
यापूर्वी, मनाला प्रशिक्षण दिल्याने (इथे उल्लेख केलेलं सायकल चालवायला शिकण्याचं उदाहरण) मनाची स्वैर शक्ती कशी प्रभावी ठरते, याचा विचार केला.
रामदास स्वामी मनाच्या प्रशिक्षणाचे असे अनेक (भक्ती) मार्ग सुचवितात. जेणेकरून मनाच्या सामर्थ्याला गवसणी घालून त्याला योग्य दिशा देता येईल.
"मना सज्जना भक्तीपंथेचि जावे' या चरणाचा मला उलगडलेला आणि भावलेला हा अर्थ! इति.
- डॉ. राजेंद्र बर्वे, मानसोपचारतज्ज्ञ, मुंबई
No comments:
Post a Comment