Sunday, March 20, 2011

रंग अग्नीचे


हिरण्यकश्‍यपूपासून नरसिंहापर्यंतच्या सर्व कथानकापासून जणू प्रेरणा घेऊन आयुर्वेदाने अनेक उपचारपद्धतींची योजना केली असावी. स्वेदन चिकित्सेचे अनेक प्रकार वर्णन केलेले आहेत, पण होलिका उत्सवातील स्वेदन चिकित्सेला तोड नाही.उन्हाळा कोणालाच आवडत नाही. उष्णतेमुळे शरीरातील रस कमी होतो, आर्द्रता कमी होते. उष्णतेमुळे केवळ मनुष्याच्या शरीरातीलच नाही तर सर्व वनस्पतींमधील रसही कमी होतो. सूर्य मनुष्याच्या व वनस्पतींमधील रसाचे आकर्षण करून घेतो. जीवनरस कमी झाला की साहजिकच आयुष्यही कमी होते. झाडाची फांदी ओली असली की ती मोडायला त्रास होतो पण तीच फांदी वाळली की काडकन मोडते. उन्हाळ्यात घामाघूम होणे हा त्रास सर्वांनाच जाणवतो. त्यातून समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी, दमट हवेच्या ठिकाणी तर घामाचा त्रास सहन करण्याच्या पलीकडे असतो.खाल्लेल्या अन्नाचा, पेयांचे पचन झाल्यावर त्यातील मलभाग शरीराबाहेर टाकावाच लागतो. विष्ठा, मूत्र या रूपाने सर्वाधिक मलभाग बाहेर जातो परंतु कानात, नाकात येणारा मळ किंवा घाम हा सुद्धा बाहेर जावा लागतो. घाम येण्यामुळे शरीर थंड होण्यासाठी मदत मिळते. उष्णतेमुळे शरीरातील चलनवलन वाढले, रक्‍ताभिसरण वाढले व त्वचा प्रसरण पावली की घाम येणे सोपे होते.ह्याच तत्त्वाचा उपयोग करून शरीरात साठलेला मलभाग सैल करून घामाच्या माध्यमातून शरीराबाहेर घालवणे हा उपचार करता येतो. शरीरशुद्धीसाठी व कायाकल्पासाठी सांगितलेली पंचकर्म क्रिया म्हणजेच शरीरशुद्धीची प्रक्रिया. ह्यात विरेचनामार्फत, वमनामार्फत किंवा बस्तीमार्फत शरीर शुद्ध करता येते. परंतु मुळात त्यासाठी शरीरात लपलेला दोष, आमद्रव्य किंवा विष सैल करून मुख्य प्रवाहात आणून नंतर ते बाहेर ढकलणे आवश्‍यक असते. म्हणून शरीराला अभ्यंग करून स्वेदनपेटिकेचा उपयोग केला असता शरीराच्या त्वचेवरील रंध्रे उघडून त्यातून घामाद्वारे मलभाग बाहेर टाकता येतो. स्वेदनपेटिका म्हणजे एका बंद पेटिकेत व्यक्‍तीला डोके बाहेर राहील असे बसविल्यानंतर आत वाफ सोडली जाते. ही वाफ सर्व शरीरावर काम करते व स्वेदन होण्यास मदत करते. या वाफेत औषधी तेले टाकली तर अधिक उपयोग होताना दिसतो. सर्दी झालेली असताना सुंठ, गवती चहा, तुळशीची पाने वगैरे पाण्यात टाकून वाफारा घेतल्यास सर्दी वितळवून बाहेर काढता येते असा अनुभव सर्वांना असतोच.शिशिर ऋतूत साठलेला कफ पातळ होऊन वसंत ऋतूत बाहेर यायला लागला की होणारा त्रास सर्वांच्याच परिचयाचा असतो. हा त्रास कमी करण्यासाठी आयुर्वेद व भारतीय संस्कृती यांनी एकत्रित विचार करून उपाययोजना म्हणून आयोजन केलेले आहे होलिका उत्सवाचे. तसेही सोप्या पद्धतीने, सामुदायिक रीत्या, अनेक लोकांना उपयोग होईल अशा प्रकारचे स्वेदन करण्यासाठी आयुर्वेदाने होळीत पेटविलेल्या अग्नीसारखीच व्यवस्था सुचविलेली आहे.

सध्या आधुनिक सौना पद्धतीत संपूर्ण बंद खोलीत व्यक्‍तीला बसवून उष्णता निर्माण केली जाते वा वाफ सोडली जाते, पण हे आयुर्वेदाला मान्य नाही. कारण मूत्रपिंडांच्या ठिकाणी व डोक्‍याच्या भागाला कुठल्याही प्रकारे अधिक उष्णता लागू नये हा संकेत त्यात मोडला जातो. डोक्‍याला उष्णता लागू नये या हेतूने डोक्‍यावर ओला टॉवेल ठेवला तर एक वेगळाच उपद्रव होण्याची शक्‍यता असते. म्हणून उघड्या जागेत वर छत असेल पण मध्यभागी त्याला एक भोक उघडे ठेवलेले असेल व संपूर्ण गोलाकार सर्व बाजूंनी साधारणतः एक मीटरभर उंचीची भिंत बांधून व्यवस्थित आडोसा केलेला असेल अशा तऱ्हेने, मध्यभागी अग्नी पेटवून सर्वांनी अग्नीभोवती गोलाकार बसावे अशी योजना केलेली असते म्हणजे साधारणतः शरीराला व्यवस्थित उष्णता लागते. डोके रुमाल किंवा टोपीने झाकून ठेवायचे असते, तसेच जाड आवरण येईल असा रुमाल वगैरे मूत्रपिंडांच्या भोवती बांधून बसायचे असते.

ही व्यवस्था म्हणजे आयुर्वेदाची एक होलिकोत्सवाची ही आवृत्ती आहे असे लक्षात येते. होळीच्या कथेतील होलिका राक्षसीला असा वर मिळालेला असतो की तुला अग्नीपासून भय नाही. म्हणून तिने प्रल्हादाला म्हणजे सात्त्विकतेला स्वतःच्या बरोबर घेऊन अग्नी पेटवून घेतला जेणेकरून प्रल्हादाला मृत्यू येईल ही कल्पना. प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्‍यपूने होलिका राक्षसीबरोबर ठरविलेले हे षड्‌यंत्र होते. पण झाले भलतेच, प्रल्हाद जिवंत राहिला आणि होलिका मात्र जळून गेली. नेहमीच सात्त्विकता शिल्लक राहते व पाप नष्ट होते.याच प्रमाणे स्वेदनोपचाराद्वारे शरीरातील आवश्‍यक यंत्रणा शिल्लक राहते व दोष जळून जातात. 15-20 मिनिटे स्वेदन झाल्यावर शरीर कोरडे करून शांतपणे विश्रांती घ्यावी अशी अपेक्षा असते. स्वेदनाच्या वेळी आत किती तापमान असावे हे रुग्ण व उपचार करणाऱ्याने परिस्थिती पाहून ठरवायचे असते. तसेच वाफेबरोबर कुठले औषधी द्रव्य योजावे हे रुग्णाच्या प्रकृतीनुसार ठरविता येते. स्वेदनाचा फायदा प्रत्येक रुग्णाला होतो. स्वेदन हे एक पंचकर्मापूर्वीचे आवश्‍यक असलेले पूर्वकर्म आहे. परंतु विरेचन, वमनसहित पंचकर्म करायचे नसेल तरी अधून मधून बाष्पस्वेदन व अभ्यंग करण्याने तारुण्य राखण्यास किंवा आरोग्य राखण्यास खूप मदत होते.हिरण्यकश्‍यपूपासून नरसिंहापर्यंतच्या सर्व कथानकापासून जणू प्रेरणा घेऊन आयुर्वेदाने अनेक उपचारपद्धतींची योजना केली असावी. स्वेदन चिकित्सेचे अनेक प्रकार वर्णन केलेले आहेत, पण होलिका उत्सवातील स्वेदन चिकित्सेला तोड नाही. तसेच रंगारंग उत्सवामुळे येणाऱ्या वसंतोत्सवाचे स्वागत करून नवतारुण्याच्या व चैतन्याच्या अनुभवाचा आनंद ही तर सर्वात मोठी चिकित्सा. फक्‍त उधळण्याचे रंग नैसर्गिकच असावेत.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad