Sunday, July 11, 2010

सेलफोनच्या विद्युतचुंबकीय लहरींमुळे मधमाश्यांचे अस्तित्वच धोक्यात




पंजाब विद्यापीठातील वैज्ञानिकांचे संशोधन
सेलफोनमधून बाहेर पडणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींमुळे मधमाशांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे, या लहरींमुळे त्यांच्या वर्तनात कमालीचा फरक पडला असून मधमाशांचा अधिवासच नष्ट होत आहे. थोडक्यात सेलफोनमुळे जैवविविधतेवर अनिष्ट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.मधमाशांच्या वसाहतींना जनुकसंस्कारित पिकांमुळे धोका आहेच त्यात आता सेलफोनमधून बाहेर पडणाऱ्या  विद्युतचुंबकीय लहरींची भर पडली आहे. मधमाशांच्या वसाहती नष्ट होण्याच्या या परिणामाला कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर (सीसीडी) असे म्हटले जाते. यापूर्वी सीसीडी परिणाम हा विषाणू, परोपजीवी पाकोळ्या, कीटकनाशके, जनुकसंस्कारित पिके व हवामान बदल यामुळे होत असल्याचे मानले जात होते, पण आता या कारणात नवी भर पडली आहे. करंट सायन्स या नियतकालिकात वेद प्रकाश शर्मल व नीलिमा आर. कुमार या पंजाब विद्यापीठाच्या वैज्ञानिकांचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला असून त्यात म्हटले आहे की, मधमाशांच्या वर्तनातील फरक हा सेलफोनच्या प्रारणांमुळे होतो. केरळमधील सैनुद्दीन पटझी यांनी अशाच एका प्रयोगाअंती सांगितले होते की, सेलफोन टॉवर्समुळे कामकरी माशा त्यांचे दिशा ओळखण्याचे कौशल्य गमावून बसतात. याच मधमाशा मध गोळा करून आणीत असतात. आता पंजाब विद्यापीठाच्या या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातही असेच निष्कर्ष निघाले असून मधमाशांच्या ज्या वसाहतींना सेलफोन प्रारणांच्या क्षेत्रात ठेवण्यात आले व ज्यांना ठेवण्यात आले नाही तेथील मधमाशांच्या वर्तनात हा फरक दिसून आला आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्रांच्या वापरामुळे इलेक्ट्रो प्रदूषण होते. या इलेक्ट्रॉनिक धुक्यामुळे मधमाशांमध्ये असलेला नैसर्गिक चुंबक त्यांना दिशा दाखवू शकत नाही व त्या भरकटतात. अपीस मेलीफेरा एल या जातीच्या मधमाशांच्या चंडीगड येथील पंजाब विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या परिसरातील चार वसाहती प्रयोगासाठी निवडण्यात आल्या होत्या. मधमाशांच्या दोन पोळ्यांजवळ जीएसएम ९०० मेगाहर्ट्झ कंप्रतेचे मोबाईल फोन ठेवले होते, तर दुसऱ्या दोन पोळ्यांजवळ ते ठेवले नव्हते. जिथे मोबाईल ठेवले होते तिथे मधमाशांची संख्या घटली. राणीमाशीचे अंडी घालण्याचे प्रमाण घटले. प्रयोगाअंती संबंधित वसाहतीत मध व परागकण काहीही राहिले नव्हते. दिवसातून दोनदा पंधरा मिनिटांसाठी विद्युतचुंबकीय लहरी या पोळ्यांना दिल्या जात होत्या. ज्या पोळ्यांजवळ या लहरींचा संपर्क नव्हता तेथे मात्र मधमाशांचे प्रमाण चांगले वाढले होते. जी राणीमाशी या लहरींच्या संपर्कात आली ती दिवसाला १४४.८ अंडी देत होती, तर जी संपर्कात आली नव्हती ती ३७६.२ अंडी दिवसाला देत होती. मधमाशा या जैवविविधतेत फार मोठी भूमिका पार पाडत असतात. त्यांच्यामुळे परागीकरणाची प्रक्रिया घडून येते व त्यांचे अस्तित्व धोक्यात आले तर वनस्पतींच्या अनेक जाती धोक्यात येऊ शकतात.
---- Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad