Saturday, July 24, 2010

घरात ठेवा मंगलकलश - भाग - १



संजय पाटील
संपर्क- 
 sanjuspatil@hotmail.com







फेंगशुईतील एक उपाय आहे. त्यात एक काचेचा वाडगा घेतात. त्यात पाणी भरतात. पाण्यात एक नाणं, निळ्या रंगाच्या गोटय़ा
ठेवतात. फुलांच्या पाकळ्या पसरतात. मेणबत्तीचा छोटा तुकडा पाण्यावर तरंगत ठेवतात. घराच्या कोणत्याही कोन्यात हा वाडगा
 ठेवून तेथील ऊर्जा तुम्ही वृिद्धगत करू शकता. पंचगुणांची वृद्धी करणारा हा उपाय आहे. कारण पाणी, निळ्या गोटय़ा (पृथ्वी),
मेणबत्ती (अग्नी), नाणं (धातू), फुलाच्या पाकळ्या (लाकूड) अशा पाचही तत्त्वाचं प्रतीकात्मक संतुलन यात राखलं जातं. पण
 थांबा! लगेच जमवाजमव करायला धावू नका! पंचगुणांची वृद्धी करण्यासाठी या उपायापेक्षा किती तरी पटीनं समर्थ, पवित्र
 आणि अस्सल भारतीय उपाय मी आपणाला आता सांगणार आहे. त्या उपायाच्या तयारीला लागा. हा जबरदस्त उपाय म्हणजे
 मंगलकलश. घरात मंगलकलश ठेवा. मंगल होणारच!
मंगलकलश हा जोडशब्द आहे. मंगल आणि कलश या दोन शब्दांनी तो बनलाय. मंगलकलशाबद्दल जाणून घेण्यासाठी आपणाला
 या दोन्ही शब्दांची फोड करावी लागेल. प्रथम कलश या शब्दाबद्दल जाणून घेऊ या.










कलशाची व्याख्या
गोलाकार, उभट पात्र म्हणजे कलश. कालिका पुराणात त्याच्या उत्पत्तीची कथा सांगण्यात आलीय. त्यानुसार देव आणि दानव
अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन करीत असताना अमृत धारण करण्यासाठी दस्तुरखुद्द विश्वकम्र्यानं एक पात्र बनवलं. ते पात्र म्हणजे
 कलश. या पात्राचं नामकरण कलश असंच का करायचं याचाही खुलासा हेमाद्रीच्या व्रतखंडात करण्यात आलाय.
 तो पुढीलप्रमाणे :-
                       कलं कलं गृहीत्वा च देवानां
                      विश्वर्कमणा निर्मितो
                     य: सुरैर्यस्मात् कलशस्तेन उच्यते
                     (हेमाद्री व्रतखंड)
अर्थात.. विश्वकम्र्यानं देवांच्या कलेकलेचं ग्रहण करून तो बनवला म्हणून तो कलश होय.
तंत्रसमुच्चयात कलशाच्या मोजमापांची माहिती देण्यात आलीय.
               पञ्चादशागलुव्याम उत्सेध: षोडषाडगुल:
              कलशानां प्रमाणं तु मखमष्टाजडगुलं स्मृतम्
                 (तंत्रसमुच्चय)
अर्थात ५० अंगुळं परिघ, १६ अंगुळं उंची व ८ अंगुळं मुख असं त्याचं आकारमान सांगितलंय.  आता एक अंगुळ म्हणते
 किती हे पाहण्यासाठी आपल्याला मानसारममध्ये डोकवावं लागेल. मानसारम ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक
४० ते ५८ मध्ये परिमाणाची माहिती दिली आहे. त्यानुसार लहानात लहान कण, की ज्याला फक्त ऋषीमुनी पाहू शकतात, तो
कण म्हणजे परमाणू (अणू) होय. परमाणूच्या आठपट मोठा असणारा कण म्हणजे रथधुळी (रेणू), रथधुळीच्या आठपट मोठा
 कण म्हणजे वालग्र (केसाचं टोक), आठ वालग्र म्हणजे एक लीक्ष (डोक्यातील लीख) आठ लीक्ष म्हणजे एक युक (ऊ), आठ
युक म्हणजे एक यव (जन) आणि आठ यव म्हणजे एक अंगुळ (बोटाची जाडी). आहे ना गमतीशीर! ऋषीमुनींचं ज्ञान किती
सूक्ष्म होतं त्याची कल्पना यावरून यावी.
अगदी ऋग्वेदातही कलशाचा उल्लेख आढळतो. ऋग्वेदातला हा कलश मातीचा किंवा भोपळ्याचा बनविलेला असे. याशिवाय
द्रोणकलश, पूतभृत व आधवनीय असे कलशाचे आणखी प्रकार वैदिक साहित्यात आढळतात. सोमरस साठविण्यासाठी तयार
केलेला मातीचा मोठा कलश म्हणजे आधवनीय व पृतभूत कलश होत. (सोमरस म्हणजे दारू नव्हे हे वाचकांनी कृपया लक्षात
घ्यावं. ऋग्वेदातील बहुसंख्य ऋचांमध्ये सोमरसाचा उल्लेख आहे. अमृताशी तुलना करू शकेल असं ते एक पवित्र द्रव्य होतं.
विशिष्ट वनस्पतीपासून ते बनवलं जात असे. आजच्या काळात मात्र सोमरस म्हणजे दारू असला अपप्रचार करून त्या पवित्र
 द्रव्याला बदनाम करण्यात आलंय.) द्रोणकलश हा द्रोणाच्या आकाराचा चौकोनी किंवा वाटोळा कलश होय. याव्यतिरिक्त कलशाचे
 नऊ प्रकार सांगितले गेलेयत. त्यांची नावं पुढीलप्रमाणे :- १ क्षितींद्र, २ जलसंभव, ३ पवन, ४ अग्निसंभव, ५ यजमान,
६ कोशसंभव, ७ सोम, ८ आदित्य, ९ विजय. यापैकी विजयकलश पंचमुख असून महादेवासमान आहे. त्याला पिठाच्या
मध्यभागी स्थापतात तर बाकीचे आठ पूर्व, पश्चिम, वायव्य, आग्नेय, नैर्ऋत्य, ईशान्य, उत्तर व दक्षिण असे अनुक्रमे
स्थापतात. कालिका पुराणाच्या राज्याभिषेकवर्णन या प्रकरणात वरील नऊ प्रकारांसह कलशाचे आणखीही प्रकार सांगितले
आहेत. त्यांची नावं अशी- १ गोह्योपगोह्य, २ मरुत, ३ मयुख, ४ मनोहाचार्य, ५ भद्र, ६ तनुदूषक, ७ इंद्रियघ्न.
वेदामध्ये सापडणारा कलश लोकगीतांमध्येही सापडतो. ‘अमृताचा करा घेऊनी बहिनीस निंगाली भावासंगं’ हे लोकगीत तुम्ही
ऐकलं असेल. यातील करा म्हणजे कलश. नवरदेवाची बहीण हा करा डोक्यावर घेते म्हणून तिला करवली म्हणायचं. लग्नातच
नव्हे तर कोणत्याही मंगलकार्यात पूजा संस्कारात, शांतिक- पौष्टिकात कलशावाचून चालायचं नाही. कलश हा हवाच आणि
तो सर्वप्रथम हवा. रोजच्या देवपूजेतही देवाच्या आधी कलशाची पूजा करावी लागते. कार्यारंभी श्रीगणेशाची पूजा सांगितलेय.
 पण त्याच्याही आधी गंधाक्षता लागतात त्य कलशाच्या कपाळी. कलश हे भारतीय संस्कृतीचं सर्वागीण आणि अग्रमानाचं
प्रतीक आहे. कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी पुण्याहवाचन करतात. हे कार्य दोन कलशांच्या साक्षीनं होतं.    
 (क्रमश:) 
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

1 comment:

  1. Very Good article.
    Thanks for explaining सोमरस.
    Some days before I had debate with my friend on some points Somarasa & other was
    1. Shree Ram & some other god ate non-veg & somaras (daru)while Vanavas.
    2. Even Devi Mahatmya mentions, Devi had some meat & soomras before killing evils.
    3. Rishis use to welcome their honorable guests by serving them madhuparka (meat cooked in honey)
    I was totally got confused hearing the above.
    Can u please explain me the above as from your article, seems u have a great knowledge to explain the same (by sending email to rohannarvekar@gmail.com)
    Thanks & regards,

    ReplyDelete

ad